नदी माय

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 13 October, 2019 - 10:50

पाण्यात या शिरू नका
पुराशी त्या खेळू नका
चिडली ही नदी माय
तिची साक्ष काढू नका
.
जीवनाची धात्री जरी
सारे नाही तिच्या हाती
वरुणाचे देणे कधी
जड होते तिच्या माथी
.
युगेयुगे धावती ती
तिला ठाव तीच गती
तेच पाणी दिसे तरी
नित्य नवी होते रिती
.
पाणियाचा धर्म पाणी
गाणे जीवनाची गाणी
खोलवर डोहामध्ये
परि कालियाची फणी
.
आदबीने वागायाचे
काठावर राहायाचे
सहज ती होता पुन्हा
अंगावरी लोळायाचे
.
देणारीही तीच आहे
घेणारीही होते कधी
म्हणून का होते कधी
लेकराची कमी प्रीती
.
तटाहून दारांमध्ये
दारातून घरामध्ये
आली तरी म्हणतो मी
माय माझे भाग्य मोठे
.
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

**

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तटातुन दारांमध्ये
दारातुन घरामध्ये
आली तरी
म्हणतो मी
माय माझे
भाग्य मोठे>>
एवढं सगळं होऊनही खंबीर होऊन उभं ठाकायचं. मुळीच सोप नसतं.. तुमच्या कवितेतली ती सकारात्मकताच प्रचंड आवडली. Happy Happy

डॉ.काका, तुमची कविता वाचताना शिरवाडकरांची 'कणा' आठवली.. शाळेत असताना नीटशी समजली नव्हती, जेव्हा समजली तेव्हा मात्र प्रचंड आवडलेली.. Happy

काय सुंदर कविता आहे.
>>>>>>>>> जीवनाची धात्री जरी
सारे नाही तिच्या हाती
वरुणाचे देणे कधी
जड होते तिच्या माथी>>>>>>> पटले.

उद्बोधन करणारी कवीता आहे. छानच.

पाणी गाळा, नारू टाळा.
हिवतापाची येता साथ, मच्छरदाणी लावा झकास.