कोकणी वडे

Submitted by मनीमोहोर on 5 October, 2019 - 15:33

वडे म्हटलं की मराठी मनाला आठवतात ते वरती बेसनाचे पातळ कुरकुरीत आवरण, आत लसूण आलं घातलेली बटाट्याची भाजी, आकाराने लहान आणि चपटे, खरपूस तळलेले, खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाल्ले जाणारे, कायमच कमी पडण्याचा शाप असलेले, मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे बटाटेवडे. पण कोकणी माणसाला वडे म्हटलं की हे वडे न आठवता पुरी सारखे दिसणारे तांदुळ, उडीद डाळीचे वडे जे " मालवणी वडे " म्हणून ही प्रसिद्ध आहेत तेच वडे आठवतात.

कोकणात आमच्याकडे कोणत्याहि शुभ कार्याला, कुळाचाराला, तसेच श्रद्धपक्षादि विधींना हे वडे लागतातच. कोकणातला पदार्थ असल्याने नॅचरली ह्यात मुख्यत्वे तांदुळच असतात. तांदळात थोडी उडीद डाळ आणि थोडे धणे जिरं घालून भरडसर दळून आणलं की झालं वड्याचं पीठ तयार. एकदा कोणताश्या कार्यासाठी वड्याचं पीठ करायचं होतं पण उडीद डाळ थोडी कमी होती घरात. त्याकाळी दुकानं नव्हती घराजवळ हवी ती वस्तु लगेच विकत जाऊन आणायला. तडजोड म्हणून माझ्या तिथे रहाणाऱ्या सासुबाईनी मग त्यात थोडे गहू घातले. त्या पिठाचे वडे गव्हामुळे मऊ आणि तांदूळ उडीद डाळीमुळे खुसखुशीत आणि चवीला खूप छान झाले. सगळ्यांनाच आवडले. म्हणून तेव्हापासून थोडे गहू ही घातले जातातच पीठ तयार करताना.
आमच्याकडे कार्यप्रसंगी वडे भरपूर लागतात आणि मुंबईच्या चाकरमान्यांना ही जाताना थोडं पीठ देतोच. म्हणून पीठ केलं की ते भरपूर प्रमाणावरच कराव लागतं.

वड्याचं पीठ भिजवायचं काम नेहमी माझ्या जाऊबाईच करतात. त्यामागे कारण ही तसंच आहे. एकदा असंच काहीतरी कार्य होतं घरात. घरची मंडळी, पाव्हणे , गडी माणसं मिळून भरपूर पानं जेवायला होती. वडे केले होतेच कुळाचारासाठी म्हणून. त्या दिवशी जाऊबाई काहीतरी दुसऱ्या कामात बिझी होत्या म्हणून आचाऱ्याने वड्याचं पीठ भिजवलं होतं. दुपारी पंगत बसली. मात्र नेहमी वड्यांवर तुटून पडणारी मंडळी आज वडे नको म्हणत होती. अगदी गड्यांच्या पंगतीत ही मंडळी “ वैनीनू, वडो नको , भातचं घेतंय “ असंच म्हणत होती. पंगतीच्या शिष्टाचारा नुसार वडे का नकोत हे कोणी सांगत ही नव्हतं. शेवटी सैपाकघरात जाऊबाईंनी एक तुकडा तोंडात टाकून बघितला आणि कारण कळलं. वडे खूपच कडक झाले होते. ते दातांनी चावण ही कठीण होत. कडकपणामुळे खाताना तोंड ही हुळहुळलं जात होतं आणि म्हणूनच वड्यांकडे पाठ फिरवली जात होती. रात्री घरातल्या एका सुगरणीने ते वडे हाताने चांगले कुस्करले. त्यात कांदा टोमॅटो मिरची वैगेरे घालून जरा मुरवत ठेवले आणि एका नवीन चवदार पदार्थाचा जन्म झाला. सगळ्यांनी ते आवडीने खाल्ले. मात्र तेव्हापासून काही झालं तरी जाऊबाईच पीठ भिजवतात वड्याचं.

वड्याची कृती तशी सोपीच आहे. करायचं काय तर पिठात मीठ, अगदी थोडं तिखट, किंचित हळद आणि तेल घालून सगळं सारखं करून घ्यायचं . नंतर त्यात गरम पाणी घालून ढवळून थोडा वेळ झाकून ठेवायचं. थोडं मुरलं की थंड पाणी आणि तेलाचा हात लावून ते पोळ्यांच्या कणके इतपत सैल मळून घ्यायचं. मग त्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून केळीच्या पानावर लिपुन म्हणजेच थापून त्याची पुरी करायची आणि गरम तेलात सोडून खरपूस तळून काढायचे.

आमचं कुटुंब मोठं असल्याने वडे नेहमीच खूप मोठया प्रमाणात करावे लागतात. त्यामुळे जनरली हे मागच्या पडवीत चूल मांडूनच केले जातात. नवीन लग्न झालेली सुनबाई घरात असेल तर शकुनाचे म्हणून तिच्याकडून पहिले पाच वडे लिपुन घेतात. एक दोघी पीठ मळून लाट्या करायला, दोघी तिघी वडे थापायला आणि एक तळणीशी इतक्या जणी तरी कमीत कमी लागतातच. गप्पा मारत मारत मागे कधीतरी कोणाच्या तरी लग्नात वडे कसे कमी पडले पण जाऊबाईंनी चतुराईने परत पीठ भिजवून वेळ कशी साजरी केली वैगेरे आठवणी सहाजिकच निघतात. तसेच माझ्या एका सासूबाईंची आठवण ही नेहमी निघते वडे करताना. त्या अगदी गोऱ्या पान आणि शेलाट्या होत्या. एक पाय दुमडून त्या पाटावर वडे थापायला ( कोकणात वडे लिपतात , थापत नाहीत खरं तर ) बसत असत. आपल्या लांबसडक नाजूक बोटांनी हळुवार हातानी वड्यावर बोटांचे ठसे न उमटवता त्या इतके सुंदर वडे लिपत असत की बघत रहावे. बांगड्या, पाटल्या घातलेले , वड्यावर नाजूकपणे गोल गोल फिरणारे त्यांचे हात विलक्षण सुंदर दिसत असत. अगदी एकाग्र चित्ताने त्या वडे लिपत असत आणि म्हणूनच S तेव्हा त्या अतिशय सुन्दर ही दिसत असत. असो. तर काय सांगत होते अश्या पाच सहा जणी लागल्या करायला की बघता बघत वेचणी मध्ये टम्म फुगलेल्या, पिवळसर लालसर रंगावर तळलेल्या वड्यांचा ढीग जमू लागतो. तळणीचा धूर आणि वड्यांचा खमंग वास नाकात जाऊन आता थोड्याच वेळात पंगत बसणार आहे ह्याची वर्दी ही देतो.

जेवणाची पंगत बसली की वडे सर्वानाच आवडत असल्याने त्यानाच जास्त डिमांड असते. गरम गरम वडे चवीने खाल्ले जातात. लहान मुलं ही हातात धरून नुसता वडा मजेत खातात. खोबऱ्याची चटणी, लोणचं, वांग्या बटाट्याची भाजी , लोणी, दही ह्या गोष्टी वड्याची चव आणखी खुलवतात. वड्यांबरोबर पाण्याला तांदळाचं पीठ लावून त्यात गूळ आणि भरपूर नारळाचा चव, किंचित मीठ आणि जायफळ घालून केलेलं घाटलं किंवा आम्ही त्याला " रस " ही म्हणतो त्या बरोबर ही छान लागतात हे वडे. संध्याकाळी जेवताना वड्यांबरोबर खाण्यासाठी कुळथाच पिठलं केलं जातच. कु पी आणि वडे हा एकदम हिट बेत आहे आमच्याकडे. एवढं करून ही जर वडे उरलेच तर दुसऱ्या दिवशी सकाळी चहा बरोबर ही हे मस्तच लागतात. ताज्या वड्यांपेक्षा शिळे वडे आवडणारी मंडळी ही आहेत घरात. तात्पर्य काय तर वडे संपेपर्यंत अगदी शिळे झाले तरी आवडीने खाल्ले जातात. आणि संपले की “ अरे रे ! संपले का “? अस ही वाटतंच नेहमीच.

अशी ही कोकणातल्या वड्यांची चवदार कहाणी इथे सफळ संपूर्ण .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वडे !! नुसता लेख वाचूनच तोंडाला पाणी सुटलं .
ताजे , टम्म फुगलेले वडे एक तोंडात टाकायला हवा . जेवणावर वड्यासोबत काळ्या वाटाण्याची उसळ नाहीतर चिकन रस्सा .
वड्यासोबत ईतर कुठलाही खाणार्या लोकांच्या पंक्तीला आपण बसू नये Happy
दूपारच भारी जेवण झाल्यावर संध्याकाळी चहासोबत थंड वडे . उरले तर शिळे वडे परत सकाळच्या चहासोबत .

आमच्या शेजारच्या काकू भन्नाट चवीचे वडे बनवायच्या . तसे वडे अजून कुठेच खाल्ले नाही . आई-आजी कोणालाच जमत नाही Happy

दाल बाटी अनदर ओव्हर हाइप्ड पदार्थ. >>>> कालच मैत्रिणीकडे खाल्ली . आताच लंच टेबल वर तीच चर्चा झाली . जीव टाकण्यासारख त्यात काय हे मला समजत नाही . पण आवद आणि चव असते एकेकाची .

हे झाले भाजणीचं पिठ वापरुन बनवलेले वडे... गावाकडे काकड्यांचे वेल असतात. (काकडीला तौसा म्हणतात मालवणात) एक - दोन काकडी तसेच राहु देतात वेलीवर अन काकडी पिकली कि वेलीवरुन काढुन त्याचा गर काढुन त्यात तांदळाचं पिठ, थोडं गुळ, हळद, मिठ मिक्स करुन पिठ मळतात अन वडे तळतात मग केळीच्या पानावर थापुन ते तळतात.. हे पण खुप छान लागतात वडे. काळ्या वाटाण्याचं झणझणीत सांबार मस्त लागत याबरोबर. Happy

मस्त लेख ! मी खाल्ले नाही हे वडे. एकदा जावेची मैत्रिण घरी देऊन गेली होती, पण नेमका त्याच वेळेस उपास असल्याने मला खाता आले नाही, आणी घरात उरले पण नाही. Sad Sad

काळ्या वाटाण्याची उसळ खावी ती मालवणी पद्धतीचीच, खास पाट्यावरल्या वाटणातली. मिक्सर मधल्या वाटणाला ती चव नाही.

काय सुरेख लिहिलंय, व्वा!! मगाशी घाईत होतो. आत्ता चहा पिता पिता निवांतपणे वाचला - बरं झालं थांबलो ते :-). पण बाकीच्यांचे प्रतिसाद मात्र वाचत बसलो नाहीये. एकतर या लेखानेच भूक चाळवल्येय. त्यात बाकीच्यानी "आमच्याकडे या वड्यांबरोबर ह्यांव करतात नी त्यांव करतात" सांगितलेलं असणार नक्की ते कुठे वाचत बसू? !

हेमाताई, मी काळा वाटणा उसळ, कोकणात गरम मसाल्याची आमटी करतात लावणीच्या दिवसांत त्या पद्धतीनेच करते, ती पद्धत तुम्हाला माहिती असेल, पण मी गरम मसाला विकतचा वापरते, वाटण मात्र घरी करते Wink .

इतके दिवस लेख चिकन कबाब वैगेरे टाईपचा असेल म्हणुन वाचलाच नव्हता..
आणि आज अधाशासारखा वाचला. प्रतिसादांचा सुद्धा अगदी फडशाच पाडला.
ममो,आता कोंबडीवड्यांची रेसिपीसुद्धा येऊदेत. Happy

माझी आईसुद्धा अशाच प्रकारचे वडे करते रेसिपीसुद्धा सिमिलर वाटतेय.. पण नाव मटणवडे. मला ते नुसते खायला खुप आवडतात..

धन्यवाद सगळ्याना पुन्हा एकदा.

ममो,आता कोंबडीवड्यांची रेसिपीसुद्धा येऊदेत. >>@ मन्या s मी वड्यांची दिलीय, कोंबडीची तुमच्याकडुन येऊ दे.☺

हेमाताई, मी काळा वाटणा उसळ, कोकणात गरम मसाल्याची आमटी करतात लावणीच्या दिवसांत त्या पद्धतीनेच करते, ती पद्धत तुम्हाला माहिती असेल, पण मी गरम मसाला विकतचा वापरते, वाटण मात्र घरी करते >> हो, अंजू, ती माहितेय , करून बघेन तशी काळ्या वाटण्याची आमटी .

रात्रीस खेळ चाले-२ मधे माईने कधीच वडे तळालेले दिसले नाहीत Uhoh पांडबा इसारला वाटतं..! Proud >>@ DJ इथलं वाचून आता next week मध्ये करेल माई वडे ☺
तुमचं मालवणी मस्तच झालंय DJ , मी लिहिलेलं मालवणीत करून द्या ना

गरम मसाल्याची आमटी करतात लावणीच्या दिवसांत त्या पद्धतीनेच करते, >>>>>अन्जू, रेसिपी टाक की.आगाऊ धन्यवाद !

इथे उगाच धागा वड्याकडून आमटीकडे वळेल. आधी इथेच पोस्ट केलेली पण मग चुकीचं वाटलं म्हणून विपुत दिली.

अंजू इथे पण लिहून ठेव म्हणजे कोंबडी ऐवजी कोणाला काळ्या वाटण्याचं सांबारं करायचं असेल तर इथे रेडिमेड मिळेल रेसिपी.

अहाहा, वाचतांना इतकं तोंपासु झालं होतं ना की काय सांगू
मी नाही खाल्लेत कधी ही तरी चव उतरली तोंडात
मस्त मस्त खुलवुन लिहितेस अगदी

मी लिहिलेलं मालवणीत करून द्या ना <<<<<
मनीमोहोर.. तुमका काय मालवणीत लिवान होयां .. माका सांगा.. मी करून देतंय..

इथलं वाचून आता next week मध्ये करेल माई वडे ☺ >> हे हवं आहे मालवणीत करून

माका वडे दितलं काय? तर मी पण दीतय.

मला वडे आवडतात गणपतीच्या दिवशी करतात ते ॠषीच्या भाजी सोबत. काळ्या वाटाण्याचं सांबारं ओले काजू घालून करायचं नि मग वडे :तोंपासु:

माझी एक आत्त्या हे वडे आणि चवळीची उसळ करायची ते पण छान लागायचे!

ह्या वड्यांची माझी आठवण आहे ती श्राद्धातली. बाहेर गुरुजी विधी करत आहेत आणि आत आई गुळाची खीर बनवतेय. माझ्या सगळ्या माहेरवाशणी आत्या हे वडे लावत आहेत आणि मोठी काकी हे तळते आहे. किचनच्या निळ्या सनमायकापासून, स्टोच्या बाजूला बसलेलया , धगीने लालसर झालेल्या बेबी आणि मंदा आत्या. वडे तळणारी हिरवी प्रिंटची साडी नेसलेली काकी, आणि दारात चौकटीवर जोर देऊन, एका पायावर दुसरा पाय घेऊन उभ्या माली आणि सुमती. मालीची साधी तर सुमतीची खास नववार साडी. कल्ला करणारी आम्ही बेडरुमातली मुलं, बाहेर बसलेले काका आणि आत्तोबा. ह्या सगळ्यात दरवळणारा वड्यांचा, स्वयंपाकाचा वास. ह्या अश्या प्रसंगातून आजीच्या आजोबांच्या आठवणी माझ्या आत्त्या सांगत असायच्या नि आमच्या कानावर यायच्या.

अय ते रेस्प्या विपूत द्यायच्या न्हायीत म्हायीत न्हायीकाय?
उग्गा विपौड्या माराव्या लागतात अन मग विपुतल्या रेस्प्या नावानं उद्धाराव्या लागतात. रेस्पी योजाटा अन लिंकांच्या रिक्श्या हितं फिरवा लगालगा.

ममो, लेख नेहेमीप्रमाणेच मस्त! हे राह्यलं Happy

हेमाताई काळा वाटाणा नाही लिहिलं, गरम मसाला आमटी रेसिपी विचारली देवकी यांनी, ती दिली. काळा वाटाणा सांबार माझ्यापेक्षा मालवणी पद्धतीने करणारे जास्त छान लिहू शकतील इथे. मी तसे नाही करत.

देवकी यांनी नक्की काय विचारलं, मी confused.

इथलं वाचून आता next week मध्ये करेल माई वडे >>> हयलां वाचून फुडच्या आठवड्यात माई वडे करतली.. Happy

@ मनीमोहर : Bw

रात्रीस खेळ चाले-२ मधे माईने कधीच वडे तळालेले दिसले नाहीत Uhoh पांडबा इसारला वाटतं..! Proud >>@ DJ इथलं वाचून आता next week मध्ये करेल माई वडे ☺>> DJ हंयसरलं वाचुक आता येतल्या सप्ताहात माई वडे करतलां Proud (भाषांतर जमलं का..? Wink )

थँक्यू सगळ्यांना.

कोणीतरी काळ्या वाटाण्याच्या सांबाऱ्याची रेसिपी लिहा बरं इथे.

जाईजुई मस्तच लिहिलंय. डोळ्यासमोर उभं राहिलं चित्र.

हयलां वाचून फुडच्या आठवड्यात माई वडे करतली.. Happy >> थँक्यू परदेसाई .

हंयसरलं वाचुक आता येतल्या सप्ताहात माई वडे करतलां Proud >>> DJ मस्तच जमलंय

बापरे डिजे.. Sad
Happy चांगला प्रयत्न.. बाकी मी वरती लिवलंय..

मन्या ऽ मी वड्यांची दिलीये,कोंबडीची तुमच्याकडुन येऊदेत>> कोंबडीचं आणि माझ आधी पासुन वाकडं आहे..
ममो, एकेरीच हाक मारा.. आवडेल मला.. Happy

मला पण शिकायचीये कोकणी भाषा.. ऐकायला खुप गोड वाटतीये.. Happy

सप्ताह पर्याय हे शब्द आहेत काय मालवणीत परवा आण्णा पण पर्याय नाही वगैरे एकदम शुद्ध मराठी शब्द वापरत होते. ते शावंता बरोबर लपले होते ते सोडा. आमच्या बाई मालवणीत इलंस काय गोड मधुर म्हण तात . मला त्यांनी एक मसाला आणून दिला आहे त्याची प्रॉन करी, चिकन करी फार भारी होते. तसेच गणपतीत्सुन आल्यावर दोन डाळ्याचे लाडू पण दिले होते. वर्तमान पत्रात गुंडाळून आणलेले. इतना प्यार पा कर मैंतो रोने लगी. तिच्या कडून विचारून घेतंय वडे रेसीपी आनि काळ्या वाटाण्याच्या सांबाराची रेसीपी.

मस्त लेख आणि सगळे प्रतिसाद! माझ्यासाठी वडा म्हणजे एक बटाटेवडा, दुसरा दहिवडा आणि तिसरा साबुदाणा वडा. पुरी म्हणजे वडा हे ऐकून सर्दच झाले होते. कोंबडीवडा खायचा योग आलेला नाही अजून. तेव्हढा एक फोटो टाका की कोणितरी. दुधाची तहान ताकावर....

पुरी म्हणजे वडा हे ऐकून सर्दच झाले होते. कोंबडीवडा खायचा योग आलेला नाही अजून. >>>> स्वप्ना, पुरी वेगळी वडा/वडे वेगळे! पुरी लाटून करतात.वडे थापून करतात.
कोंबडीवडा म्हणून प्रकार नसतो.कोंबडीच्या रश्श्याबरोबर वर सांगितलेले वडे खातात. हां,माझ्या कामवालीला मी चिकन दिले होते,त्यात तिने बाजरी+ज्वारीचे पीठ घालून तसेच वडे केले होते.टेस्टी झाले म्हणाली.

सप्ताह पर्याय हे शब्द आहेत काय मालवणीत >>>> हो अमा!

स्वप्नादी घे .. फोटो टाकला आहे.
कोंबडीच चिकन आणि बाजुला आहे तो वडा..

kombadi-vade-recipe.jpg

- फोटो नेट वरुन घेतला आहे.
कृपया फोटोवरच समाधान मानून घ्यावे ही विनंती . Lol Lol

Pages