कोकणी वडे

Submitted by मनीमोहोर on 5 October, 2019 - 15:33

वडे म्हटलं की मराठी मनाला आठवतात ते वरती बेसनाचे पातळ कुरकुरीत आवरण, आत लसूण आलं घातलेली बटाट्याची भाजी, आकाराने लहान आणि चपटे, खरपूस तळलेले, खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाल्ले जाणारे, कायमच कमी पडण्याचा शाप असलेले, मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे बटाटेवडे. पण कोकणी माणसाला वडे म्हटलं की हे वडे न आठवता पुरी सारखे दिसणारे तांदुळ, उडीद डाळीचे वडे जे " मालवणी वडे " म्हणून ही प्रसिद्ध आहेत तेच वडे आठवतात.

कोकणात आमच्याकडे कोणत्याहि शुभ कार्याला, कुळाचाराला, तसेच श्रद्धपक्षादि विधींना हे वडे लागतातच. कोकणातला पदार्थ असल्याने नॅचरली ह्यात मुख्यत्वे तांदुळच असतात. तांदळात थोडी उडीद डाळ आणि थोडे धणे जिरं घालून भरडसर दळून आणलं की झालं वड्याचं पीठ तयार. एकदा कोणताश्या कार्यासाठी वड्याचं पीठ करायचं होतं पण उडीद डाळ थोडी कमी होती घरात. त्याकाळी दुकानं नव्हती घराजवळ हवी ती वस्तु लगेच विकत जाऊन आणायला. तडजोड म्हणून माझ्या तिथे रहाणाऱ्या सासुबाईनी मग त्यात थोडे गहू घातले. त्या पिठाचे वडे गव्हामुळे मऊ आणि तांदूळ उडीद डाळीमुळे खुसखुशीत आणि चवीला खूप छान झाले. सगळ्यांनाच आवडले. म्हणून तेव्हापासून थोडे गहू ही घातले जातातच पीठ तयार करताना.
आमच्याकडे कार्यप्रसंगी वडे भरपूर लागतात आणि मुंबईच्या चाकरमान्यांना ही जाताना थोडं पीठ देतोच. म्हणून पीठ केलं की ते भरपूर प्रमाणावरच कराव लागतं.

वड्याचं पीठ भिजवायचं काम नेहमी माझ्या जाऊबाईच करतात. त्यामागे कारण ही तसंच आहे. एकदा असंच काहीतरी कार्य होतं घरात. घरची मंडळी, पाव्हणे , गडी माणसं मिळून भरपूर पानं जेवायला होती. वडे केले होतेच कुळाचारासाठी म्हणून. त्या दिवशी जाऊबाई काहीतरी दुसऱ्या कामात बिझी होत्या म्हणून आचाऱ्याने वड्याचं पीठ भिजवलं होतं. दुपारी पंगत बसली. मात्र नेहमी वड्यांवर तुटून पडणारी मंडळी आज वडे नको म्हणत होती. अगदी गड्यांच्या पंगतीत ही मंडळी “ वैनीनू, वडो नको , भातचं घेतंय “ असंच म्हणत होती. पंगतीच्या शिष्टाचारा नुसार वडे का नकोत हे कोणी सांगत ही नव्हतं. शेवटी सैपाकघरात जाऊबाईंनी एक तुकडा तोंडात टाकून बघितला आणि कारण कळलं. वडे खूपच कडक झाले होते. ते दातांनी चावण ही कठीण होत. कडकपणामुळे खाताना तोंड ही हुळहुळलं जात होतं आणि म्हणूनच वड्यांकडे पाठ फिरवली जात होती. रात्री घरातल्या एका सुगरणीने ते वडे हाताने चांगले कुस्करले. त्यात कांदा टोमॅटो मिरची वैगेरे घालून जरा मुरवत ठेवले आणि एका नवीन चवदार पदार्थाचा जन्म झाला. सगळ्यांनी ते आवडीने खाल्ले. मात्र तेव्हापासून काही झालं तरी जाऊबाईच पीठ भिजवतात वड्याचं.

वड्याची कृती तशी सोपीच आहे. करायचं काय तर पिठात मीठ, अगदी थोडं तिखट, किंचित हळद आणि तेल घालून सगळं सारखं करून घ्यायचं . नंतर त्यात गरम पाणी घालून ढवळून थोडा वेळ झाकून ठेवायचं. थोडं मुरलं की थंड पाणी आणि तेलाचा हात लावून ते पोळ्यांच्या कणके इतपत सैल मळून घ्यायचं. मग त्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून केळीच्या पानावर लिपुन म्हणजेच थापून त्याची पुरी करायची आणि गरम तेलात सोडून खरपूस तळून काढायचे.

आमचं कुटुंब मोठं असल्याने वडे नेहमीच खूप मोठया प्रमाणात करावे लागतात. त्यामुळे जनरली हे मागच्या पडवीत चूल मांडूनच केले जातात. नवीन लग्न झालेली सुनबाई घरात असेल तर शकुनाचे म्हणून तिच्याकडून पहिले पाच वडे लिपुन घेतात. एक दोघी पीठ मळून लाट्या करायला, दोघी तिघी वडे थापायला आणि एक तळणीशी इतक्या जणी तरी कमीत कमी लागतातच. गप्पा मारत मारत मागे कधीतरी कोणाच्या तरी लग्नात वडे कसे कमी पडले पण जाऊबाईंनी चतुराईने परत पीठ भिजवून वेळ कशी साजरी केली वैगेरे आठवणी सहाजिकच निघतात. तसेच माझ्या एका सासूबाईंची आठवण ही नेहमी निघते वडे करताना. त्या अगदी गोऱ्या पान आणि शेलाट्या होत्या. एक पाय दुमडून त्या पाटावर वडे थापायला ( कोकणात वडे लिपतात , थापत नाहीत खरं तर ) बसत असत. आपल्या लांबसडक नाजूक बोटांनी हळुवार हातानी वड्यावर बोटांचे ठसे न उमटवता त्या इतके सुंदर वडे लिपत असत की बघत रहावे. बांगड्या, पाटल्या घातलेले , वड्यावर नाजूकपणे गोल गोल फिरणारे त्यांचे हात विलक्षण सुंदर दिसत असत. अगदी एकाग्र चित्ताने त्या वडे लिपत असत आणि म्हणूनच S तेव्हा त्या अतिशय सुन्दर ही दिसत असत. असो. तर काय सांगत होते अश्या पाच सहा जणी लागल्या करायला की बघता बघत वेचणी मध्ये टम्म फुगलेल्या, पिवळसर लालसर रंगावर तळलेल्या वड्यांचा ढीग जमू लागतो. तळणीचा धूर आणि वड्यांचा खमंग वास नाकात जाऊन आता थोड्याच वेळात पंगत बसणार आहे ह्याची वर्दी ही देतो.

जेवणाची पंगत बसली की वडे सर्वानाच आवडत असल्याने त्यानाच जास्त डिमांड असते. गरम गरम वडे चवीने खाल्ले जातात. लहान मुलं ही हातात धरून नुसता वडा मजेत खातात. खोबऱ्याची चटणी, लोणचं, वांग्या बटाट्याची भाजी , लोणी, दही ह्या गोष्टी वड्याची चव आणखी खुलवतात. वड्यांबरोबर पाण्याला तांदळाचं पीठ लावून त्यात गूळ आणि भरपूर नारळाचा चव, किंचित मीठ आणि जायफळ घालून केलेलं घाटलं किंवा आम्ही त्याला " रस " ही म्हणतो त्या बरोबर ही छान लागतात हे वडे. संध्याकाळी जेवताना वड्यांबरोबर खाण्यासाठी कुळथाच पिठलं केलं जातच. कु पी आणि वडे हा एकदम हिट बेत आहे आमच्याकडे. एवढं करून ही जर वडे उरलेच तर दुसऱ्या दिवशी सकाळी चहा बरोबर ही हे मस्तच लागतात. ताज्या वड्यांपेक्षा शिळे वडे आवडणारी मंडळी ही आहेत घरात. तात्पर्य काय तर वडे संपेपर्यंत अगदी शिळे झाले तरी आवडीने खाल्ले जातात. आणि संपले की “ अरे रे ! संपले का “? अस ही वाटतंच नेहमीच.

अशी ही कोकणातल्या वड्यांची चवदार कहाणी इथे सफळ संपूर्ण .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त मस्त अगदी सुरस वर्णन नेहेमीप्रमाणे. फणशात पोचवलंत.

माझी ह्या वड्यांशी ओळख सासरीच झाली, माहेरच्या कोकणात हे वडे नाही करत. मला भाजणीचे वडे माहिती होते आणि हे वडे मटण खाणारी लोकं त्याबरोबर खातात अशी माझी समजूत होती. लग्नानंतर गावी गेल्यावर सत्यनारायण पूजेला हे वडे बघून आश्चर्य वाटलं. सासरी बरेचदा केले जातात. मला मात्र भाजणीचे आवडतात जास्त. इथे मी नवऱ्याला आवडतात म्हणून करते पण पीठ विकत आणते. यंदा भावाने मात्र गणपतीत मालवणी वडे order दिलेली, मागच्यावर्षी भाजणीचे सांगितले म्हणून यावर्षी वेगळे, त्यांनी थोडी कोथिंबीर घातलेली, छान चविष्ट झालेले.

मला रस्सा भाजी बरोबर आवडतात, लसणीचे तिखट आणि त्यात दही घालून किंवा फोडणीची मिरची आणि दही घालून पण मस्त लागतात. सासरी वड्यांना मध्ये भोक पाडत नाहीत, मी मात्र पाडते कारण मला भाजणीचे वडे करताना सवय आहे तशी.

कधी नुसते नारळ दुध काढून त्यात गुळ घालून करतात सासरी तोंडीलावणे, नारळाचा रस म्हणतो. घाटले मी केलेलं मागे एकदोनदा पण इथे बरेचदा दही साखर, मुरांबा, श्रीखंड असं असते. मला तिखट तोंडीलावणे काहीतरी Lol

अंजू, धन्यवाद !

मस्तच प्रतिसाद ,किती छान लिहिलं आहेस .

आमचे एक शेजारी कुडाळकडचे. त्या काकू घावने , खांडस, दाणे लाडू केले की पाठवत. कोंबडीवड्याचा बेत असला की पहिला वड्याचा गरम घाणा काढून पाठवत आणि मग पुढचा सैपाक. वडे किती चांगले लागतात हे माहिती आहे.
तुम्ही जाऊबाई, सासूबाइंचं लिहिलं आहे ते खरं आहे. कोकणच्या लोकांत /नातेवाइकांत एक गोष्ट पक्की असते ती म्हणजे अमुक एक पदार्थ जिचा चांगला होतो तिच्याकडेच सगळे जमतात आणि गप्पा मारत कौतुक करत खातात. मासे, वडे, घावने हे ठराविक काकी/मावशांना वाटून दिलेले असतात. फोटोंंचा आग्रह नाही कारण चव काही त्यात येत नाही. लेखनातून कोकणात नेलेत. पाककलेतून त्या वातावरणात, त्या लोकांत पोहोचवणे हीच खरी गंमत.

मस्तच!
मित्राने एकदा जेवायला बोलावले होते. बेत अर्थात कोंबडी वडे. पहिल्यांदाच खाणार होतो त्यामुळे उत्सुकता होती. मला वाटले कोंबडी वडे म्हणजे कबाबचा कोकणी प्रकार असणार. प्रत्यक्षात त्याने चिकन व पुऱ्या वाढल्या. वडे काही आलेच नाही पानात. नंतर कळले त्या पुऱ्या म्हणजेच वडे. माझा चांगलाच वडा झाला. Lol
पण ते वडे नुसते खायला देखील चवदार लागत होते. साधनाताईकडेही एकदा वडे खायचा योग आला होता पण ते तितकेसे आवडले नाही. कदाचीत इतर मेन्यू खुप असल्याने तसे झाले असेल.

मी भाजणीच्या भोकाच्या वड्यांची फॅन. घट्ट दह्यासोबत, घरच्या लोण्यासोबत खायचे.

हे वडे साधारण १०-१२ वर्षांपुर्वीपर्यंत माहित नव्हते. कोंबडी वडे संदर्भातच ऐकिवात आले. घरी, सासरी, माहेरी व कोकणातल्या आजोळी कधीच केले गेले नाहीत. शाकाहारी जेवणात करतात हे माहित नव्हते. एक दोन वेळा मैत्रिणीने वडे आणून दिले तेव्हा चाखले होते. तोपर्यंत बटाटा वडा जसा बटाटयाचा करतात तसा कोंबडीचा करत असतील असा समज होता Lol

वडा म्हणजे जाड पुरी

नवीन Submitted by BLACKCAT on 6 October, 2019 - 08:53. >>>

खरं तर पुरी म्हणजे पातळ वडा.

असो, वड्याच्या १ किलो पिठात दोन चमचे भाजलेल्या मेथीच्या दाण्यांची पावडर टाकली तर वडे आणखी मस्त होतात.

सायो, ह्यात तांदूळ व उडीद डाळच दिसतेय. भाजणीच्या वड्यासारखे ब्राऊनिश व खमंग नसतात हे. पण नुसते खायला बरे वाटले होते.

मस्त लेख.
वडे तेच, पण कशा शी खायचे तो पदार्थ वेगळा. अनेकांनी कोंबडी लिहिलंच आहे. सामिष न खाणार्‍यांसाठी काळ्या वाटाण्याची उसळ. खिरी सोबतही छान लागतात.

सामिष न खाणार्‍यांसाठी काळ्या वाटाण्याची उसळ. खिरी सोबतही छान लागतात. >>> एकदा बेत करायला हवा. बरं ते भिजवलेले काळे वाटाणे मऊ शिजावेत ह्यासाठी काय करावे. एकदोनदा ती उसळ केली होती पण ५-६ शिट्ट्या काढूनही मऊ शिजले नव्हते.

अश्विनी, मऊ शिजत नाहीत पण फोडणीला घातले की त्यातले डावभर काढून मिक्सरला फिरवायचे. त्याने उसळ मिळून येते.

पाऊस सुरू झाल्यावरची पहिली अमावस्या. - माडा पोफळीच्या वाडीला पहिला नैवेद्य असतो घाटुलं वड्याचा. तो खाल्ला आहे.

माझ्या सासर-माहेरी, फक्त तांदळाच्या पिठाचे वडे करतात.वर बरेचजणांनी सांगितल्याप्रमाणे खाल्ले जातात.ऋषीपंचमीच्या दिवशी कंदमूळ आणि हे वडे असतात.
ममो, माझ्या कोकणी मैत्रिणीने भाजणीच्या वड्यांच्या पीठाचे प्रमाण दिले होते.त्यात गहू,ज्वारी हे पण घटक होते.सगळ्यात तिचा शॉर्टकट आवडला,तो म्हणजे चणाडाळ,उडीदडाळ प्रत्येकी १ चमचा+धणे+बडीशेप रात्री भिजत घालायची.दुसर्‍यादिवशी हे सारे वाटून त्यात मावेल इतके बाजरी /ज्वारीचे पीठ घालायचे आणि वडे करायचे.छान होतात.

वडे म्हटले की कोंबडीचा रस्सा हवाच. आमच्याकडे भाऊबीजेला हमखास करतात. वर भरत यांनी सांगितल्याप्रमाणे शाकाहारी लोकांसाठी काळ्या वाटण्याचा सांबारा.
बायकोच्या माहेरी, रत्नागिरीला, वड्यांच्या मध्ये मेदूवड्यासारखं भोक करतात. मला मात्र पूर्ण टम्म फुगलेले वडेच आवडतात

वडे मटणाबरोबर असो वा चहाबरोबर .. तिथे पुरी चपाती रोटी शोटी नान कुलचा पाव पराठा वगैरे सारे फिके पडतात.

लेख आता वाचतो Happy

ममो, नेहमी प्रमाणे चित्र उभे केलेत. छानच. वाचून भुक प्रज्वलीत केलीत. पण आज अष्टमी चा उपास.
असो, दसरा नंतर बेत नक्की जमवणार. पुलेप्र

आमच्याकडे भाजणीचे वडे‘च’.
आमच्याकडे रस्सा भाजी, उसळीबरोबर वगैरे. कोंबडी व मटण सुद्धा. आम्ही भोक पाडतोच.
फक्त तांदूळ, उडीद डाळ, चणा डाळ आणि धणे पूड आवडीनुसार.

आमच्याकडे रस्सा वडे अगदी फेमस....भाजणीचे वडे असतात. भोक तर पाहिजेच त्याशिवाय रस्सा-वडयाच फिल येत नाही.
हळद उतरनी, नविन जावई बुवा पहिल्यांदा घरी आले, गटारी अमावस्या, मोठी दिवाळी ई. सारख्या या सगळ्या तिखट कार्यक्रमांच्या वेळी वडे पाहिजेतच.

सगळ्यांना धन्यवाद. सगळेच प्रतिसाद वड्यांइतकेच खुसखुशीत.

भाजणीचे वडे खाल्ले की खूप तहान तहान होते, तशी हे वडे खाल्ले की होत नाही असं मला वाटतं.

अश्विनी, काळे वाटाणे शिजवताना तीन चार शिट्ट्या झाल्या की 7/8 मिनिटं गॅस बारीक करून ठेव म्हणजे काळे वाटाणे अगदी मऊ शिजतात. तसेच उसळ करताना गूळ घातला की जास्त वेळ शिजवू नको. त्यामुळे ही शिजलेले वाटाणे परत कडक होऊ शकतात.

ममो, मी साधा वरण भाताचा कूकर लावतानाही गॅस बंद करायच्या आधी भरपूर प्रेशर धरू देते. भाजीत गूळही अगदी शेवटी घालते. पण काळा वाटाणा साल मुळातच कडक असल्याने काहितरी बिनसतंय खरं. आता ही व सायोची युक्ती एकत्र करून बघते.

हो भाजणीच्या वड्यांनी तहान लागते. लोण्यापेक्षा दह्याबरोबर खाल्ले की कमी लागते.

लेख खूप छान☺️

वडे, अहाहा, खूप आवडतात मला. आमच्याकडे म्हणजे कोल्हापुरात संक्रांत अन दसऱ्याला केले जातात. आता ते भाजणी चे की कसले ते माहीत नाही, मम्मी करते, माझी मदत झालीच तर फक्त तळण्यापूर्ती.
कोंबडी वडे, जेव्हा इच्छा होईल तेव्हा करतो, सणाला थोडे गोडे अन जास्त तिखट वडे असतात. ते वड्याच्या मध्ये भोक फक्त कोंबडी वड्यात करतो, सणाच्या नाही

मला कोम्ब्डी वडे आव डतात. हेवी ऑन द स्टमक पण बरोबरच कोंबडीचा रस्सा एकदम भारी लागतो. सध्या पाटण करीण बाईं मुळे ऑल थिंग्ज कोकण आर फेवर्रीट.

वाटाणे 3 तास तरी आधी भिजत घालायचे मग pressure कूक करायचे, आणि वर म्हटल्याप्रमाणे नंतर गॅस जरा कमी करायचा, मग चांगले शिजतात.

कोकण ट्रिप मध्ये हॉटेलमध्ये हे वडे खाल्ले होते, अजिबात आवडले नाही. एवढी हाईप का ते काही कळेना! कदाचित घरगुती चव छान असेल. ते एक भरड्याचे वडे म्हणजे कसले असतात?

वाटाणे 3 तास तरी आधी भिजत घालायचे मग pressure कूक करायचे >>>> रात्रभर भिजवते कुठलंही कडधान्य.

ते एक भरड्याचे वडे म्हणजे कसले असतात? >>>> हेच भरड्याचे वडे बहुतेक.

Pages