कोकणी वडे

Submitted by मनीमोहोर on 5 October, 2019 - 15:33

वडे म्हटलं की मराठी मनाला आठवतात ते वरती बेसनाचे पातळ कुरकुरीत आवरण, आत लसूण आलं घातलेली बटाट्याची भाजी, आकाराने लहान आणि चपटे, खरपूस तळलेले, खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाल्ले जाणारे, कायमच कमी पडण्याचा शाप असलेले, मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे बटाटेवडे. पण कोकणी माणसाला वडे म्हटलं की हे वडे न आठवता पुरी सारखे दिसणारे तांदुळ, उडीद डाळीचे वडे जे " मालवणी वडे " म्हणून ही प्रसिद्ध आहेत तेच वडे आठवतात.

कोकणात आमच्याकडे कोणत्याहि शुभ कार्याला, कुळाचाराला, तसेच श्रद्धपक्षादि विधींना हे वडे लागतातच. कोकणातला पदार्थ असल्याने नॅचरली ह्यात मुख्यत्वे तांदुळच असतात. तांदळात थोडी उडीद डाळ आणि थोडे धणे जिरं घालून भरडसर दळून आणलं की झालं वड्याचं पीठ तयार. एकदा कोणताश्या कार्यासाठी वड्याचं पीठ करायचं होतं पण उडीद डाळ थोडी कमी होती घरात. त्याकाळी दुकानं नव्हती घराजवळ हवी ती वस्तु लगेच विकत जाऊन आणायला. तडजोड म्हणून माझ्या तिथे रहाणाऱ्या सासुबाईनी मग त्यात थोडे गहू घातले. त्या पिठाचे वडे गव्हामुळे मऊ आणि तांदूळ उडीद डाळीमुळे खुसखुशीत आणि चवीला खूप छान झाले. सगळ्यांनाच आवडले. म्हणून तेव्हापासून थोडे गहू ही घातले जातातच पीठ तयार करताना.
आमच्याकडे कार्यप्रसंगी वडे भरपूर लागतात आणि मुंबईच्या चाकरमान्यांना ही जाताना थोडं पीठ देतोच. म्हणून पीठ केलं की ते भरपूर प्रमाणावरच कराव लागतं.

वड्याचं पीठ भिजवायचं काम नेहमी माझ्या जाऊबाईच करतात. त्यामागे कारण ही तसंच आहे. एकदा असंच काहीतरी कार्य होतं घरात. घरची मंडळी, पाव्हणे , गडी माणसं मिळून भरपूर पानं जेवायला होती. वडे केले होतेच कुळाचारासाठी म्हणून. त्या दिवशी जाऊबाई काहीतरी दुसऱ्या कामात बिझी होत्या म्हणून आचाऱ्याने वड्याचं पीठ भिजवलं होतं. दुपारी पंगत बसली. मात्र नेहमी वड्यांवर तुटून पडणारी मंडळी आज वडे नको म्हणत होती. अगदी गड्यांच्या पंगतीत ही मंडळी “ वैनीनू, वडो नको , भातचं घेतंय “ असंच म्हणत होती. पंगतीच्या शिष्टाचारा नुसार वडे का नकोत हे कोणी सांगत ही नव्हतं. शेवटी सैपाकघरात जाऊबाईंनी एक तुकडा तोंडात टाकून बघितला आणि कारण कळलं. वडे खूपच कडक झाले होते. ते दातांनी चावण ही कठीण होत. कडकपणामुळे खाताना तोंड ही हुळहुळलं जात होतं आणि म्हणूनच वड्यांकडे पाठ फिरवली जात होती. रात्री घरातल्या एका सुगरणीने ते वडे हाताने चांगले कुस्करले. त्यात कांदा टोमॅटो मिरची वैगेरे घालून जरा मुरवत ठेवले आणि एका नवीन चवदार पदार्थाचा जन्म झाला. सगळ्यांनी ते आवडीने खाल्ले. मात्र तेव्हापासून काही झालं तरी जाऊबाईच पीठ भिजवतात वड्याचं.

वड्याची कृती तशी सोपीच आहे. करायचं काय तर पिठात मीठ, अगदी थोडं तिखट, किंचित हळद आणि तेल घालून सगळं सारखं करून घ्यायचं . नंतर त्यात गरम पाणी घालून ढवळून थोडा वेळ झाकून ठेवायचं. थोडं मुरलं की थंड पाणी आणि तेलाचा हात लावून ते पोळ्यांच्या कणके इतपत सैल मळून घ्यायचं. मग त्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून केळीच्या पानावर लिपुन म्हणजेच थापून त्याची पुरी करायची आणि गरम तेलात सोडून खरपूस तळून काढायचे.

आमचं कुटुंब मोठं असल्याने वडे नेहमीच खूप मोठया प्रमाणात करावे लागतात. त्यामुळे जनरली हे मागच्या पडवीत चूल मांडूनच केले जातात. नवीन लग्न झालेली सुनबाई घरात असेल तर शकुनाचे म्हणून तिच्याकडून पहिले पाच वडे लिपुन घेतात. एक दोघी पीठ मळून लाट्या करायला, दोघी तिघी वडे थापायला आणि एक तळणीशी इतक्या जणी तरी कमीत कमी लागतातच. गप्पा मारत मारत मागे कधीतरी कोणाच्या तरी लग्नात वडे कसे कमी पडले पण जाऊबाईंनी चतुराईने परत पीठ भिजवून वेळ कशी साजरी केली वैगेरे आठवणी सहाजिकच निघतात. तसेच माझ्या एका सासूबाईंची आठवण ही नेहमी निघते वडे करताना. त्या अगदी गोऱ्या पान आणि शेलाट्या होत्या. एक पाय दुमडून त्या पाटावर वडे थापायला ( कोकणात वडे लिपतात , थापत नाहीत खरं तर ) बसत असत. आपल्या लांबसडक नाजूक बोटांनी हळुवार हातानी वड्यावर बोटांचे ठसे न उमटवता त्या इतके सुंदर वडे लिपत असत की बघत रहावे. बांगड्या, पाटल्या घातलेले , वड्यावर नाजूकपणे गोल गोल फिरणारे त्यांचे हात विलक्षण सुंदर दिसत असत. अगदी एकाग्र चित्ताने त्या वडे लिपत असत आणि म्हणूनच S तेव्हा त्या अतिशय सुन्दर ही दिसत असत. असो. तर काय सांगत होते अश्या पाच सहा जणी लागल्या करायला की बघता बघत वेचणी मध्ये टम्म फुगलेल्या, पिवळसर लालसर रंगावर तळलेल्या वड्यांचा ढीग जमू लागतो. तळणीचा धूर आणि वड्यांचा खमंग वास नाकात जाऊन आता थोड्याच वेळात पंगत बसणार आहे ह्याची वर्दी ही देतो.

जेवणाची पंगत बसली की वडे सर्वानाच आवडत असल्याने त्यानाच जास्त डिमांड असते. गरम गरम वडे चवीने खाल्ले जातात. लहान मुलं ही हातात धरून नुसता वडा मजेत खातात. खोबऱ्याची चटणी, लोणचं, वांग्या बटाट्याची भाजी , लोणी, दही ह्या गोष्टी वड्याची चव आणखी खुलवतात. वड्यांबरोबर पाण्याला तांदळाचं पीठ लावून त्यात गूळ आणि भरपूर नारळाचा चव, किंचित मीठ आणि जायफळ घालून केलेलं घाटलं किंवा आम्ही त्याला " रस " ही म्हणतो त्या बरोबर ही छान लागतात हे वडे. संध्याकाळी जेवताना वड्यांबरोबर खाण्यासाठी कुळथाच पिठलं केलं जातच. कु पी आणि वडे हा एकदम हिट बेत आहे आमच्याकडे. एवढं करून ही जर वडे उरलेच तर दुसऱ्या दिवशी सकाळी चहा बरोबर ही हे मस्तच लागतात. ताज्या वड्यांपेक्षा शिळे वडे आवडणारी मंडळी ही आहेत घरात. तात्पर्य काय तर वडे संपेपर्यंत अगदी शिळे झाले तरी आवडीने खाल्ले जातात. आणि संपले की “ अरे रे ! संपले का “? अस ही वाटतंच नेहमीच.

अशी ही कोकणातल्या वड्यांची चवदार कहाणी इथे सफळ संपूर्ण .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनीमोहोर, लेख मस्त लिहिला आहे. वाचताना पूर्ण वेळ कोकणातील कुटुंबाचं दृश्य दिसत राहिलं. एखादा फोटो टाकला असता तर हे वडे दिसतात कसे ते कळलं असतं.

कोकणातल्या अनेक ट्रिप्स मध्ये 'कोंबडी वडे मिळतील' चे बोर्ड पाहिले होते आणि चिकन कबाब सारखं काही (पण रोस्ट न करता तळलेलं) असेल अशी कल्पना केली होती. आता जाड पुरी आणि चिकन करी हे कॉम्बिनेशन कळलं आणि आवडलं. पुढच्या कोकण ट्रिपमध्ये एकदा प्रत्यक्ष खाऊन मग मत बनवेन. Happy

तुमचा हा लेख आजच 'अंगतपंगत' वर पण वाचला. Happy

ममो , मस्त लेख

हे वडे शिळे झाले की चहाबरोबर मस्त लागतात . कोकणातील 4 च्या चहाच्या वेळेस आवर्जून खाल्लं जातात

मनीमोहर अगदी सुरेख वर्णन केले आहे.सगळे डोळ्यासमोर उभे राहिले.

आमच्या कडे ही भाजणीचे आणी तांदूळउडिद हे दोन्ही वडे करतात.
श्रावणात देवकार्याला आमच्या कडे वडे करतात आणी बरोबर काळ्या वाटाण्याची आमटी,सिमलामिरचीच पंचामृत,मोकळे तिखट,आणी गुळवणी करतात.
आणी तांदूळ उडीद वडे कोंबडीरस्सा बरोबर पण छान लागतात.

वड्यांबरोबर पाण्याला तांदळाचं पीठ लावून त्यात गूळ आणि भरपूर नारळाचा चव, किंचित मीठ आणि जायफळ घालून केलेलं घाटलं किंवा आम्ही त्याला रस ही म्हणतो त्या बरोबर ही छान लागतात . >>>आम्ही याला गुळवणी म्हणतो ममो.

आई ह्या वड्या चे पिठ करताना तांदुळ उडीदडाळ जिरे गहू थोडीशी मेथी घालते.आई छान करते हे वडे आणी फास्ट ही करते. थापते पण तिच आणी तळते पण तिच. एका वेळी 70वडे करते एकटीच.

छान लिहिलयं..
रेसिपी चा एक वेगळा धागा सुद्धा काढा.
म्हणजे सविस्तर माहिती मिळेल. Happy
Btw मला पण कोंबडी वडे ही non vegetarian dish असेल असंच वाटत होतं बरेच दिवस.

वडे खूपच कडक झाले होते. दातांनी चावण ही कठीण होत कडकपणामुळे. >>>>> या ऋषीपंचमीच्यावेळी माझ्या घरी तशीच परिस्थिती झाली होती.म्हणजे दाताने चावता येत होते,तरी कडक झाले होते.थापले माझ्या बाईने.पुढल्यावेळी मीच थापणार.

एवढी हाईप का ते काही कळेना! >>>> राजसी,मलाही वड्यांसाठी लोक जीव का टाकतात कळत नाही.तसेच काळ्या वाटाण्याचे दबदबीत आणि आमटी,अजिबात आवडत नाही.

काकडि (तवसं) घालुन हि वडे करतात, मस्त लागतात ते. गरमागरम खाल्यानंतर खुप तहान लागते ती बहुतेक वडे डीपफ्राय केल्यामुळे असावी...

देवकी अनुमोदन. (पण गुपचूप)
वडा आवडतो पण जीव टाकावा ईतका नाही. नुसता खायला भारी लागतो.

पाटवड्यांचा विषय कुणी काढला? आहा हा! येऊद्या रेस्पी लवकर.

धन्यवाद अश्विनी. मला वाटलंच होतं.
वडे म्हणजे मनिमोहर म्हणाल्या तसे बटाटे, साबुदाणा आणि उडीद Happy बाकीचे काय! Happy

सगळ्याना खूप खूप धन्यवाद .

पाटण करीण बाईं मुळे ऑल थिंग्ज कोकण आर फेवर्रीट. अमा , अगदी अगदी ...रात्रीस माझी पण फेव आहे. आणि त्यातल्या त्यात पाटणकरीन तर जरा जास्तच.

आई छान करते हे वडे आणी फास्ट ही करते. थापते पण तिच आणी तळते पण तिच. एका वेळी 70वडे करते एकटीच. >>> @ amupari ग्रेट

एखाद्या पदार्थाशी आपल्या ज्या आठवणी जोडल्या गेलेल्या असतात ,त्यामुळे तो पदार्थ आपल्याला जास्त आवडतो. हे वडे आवडण्याच हे ही एक कारण असू शकेल. सांदण, आंबा डाळ, वरणफळ, फोडणीची पोळी असे अनेक पदार्थ असतील प्रत्येकाच्या लिस्ट मध्ये की त्याच्याशी जुळलेल्या आठवणी रम्य असतात आणि म्हणून ते पदार्थ आवडीने खाल्ले जातात.

कोंबडी वडे ह्या डिश बद्दल ही किती गैरसमज आहेत ते आज ह्या धाग्यामुळे कळलं. ☺

ज्यांना फार आवडत नाहीत हे वडे त्यानी परत एकदा खाऊन बघा , आवडतील ही एखाद वेळेस आता.

हॉटेल मधील पदार्थ आणि घरी केलेला पदार्थ ह्यांच्या चवीत जमीन अस्मानाचा फरक पडतो. उदा. हॉटेल मधील थलिपीठं मला वाटत चक्क डीप फ्राय करून देतात घरी आपण तेल थोडं वापरून करतो. चवीत खूप फरक पडतो.

हेमाताई आता तुमच्याकडचे वडे खाईन आणि नवे मत बनवेन.
बाकी काय भारी नावे घेतलीत. वाह.
आचवून उठलो आणि दोन मिनिटात समोर वाफाळती वरणफळे आली तर मी पुन्हा जेवायला बसेन.

काळ्या वाटाण्याची उसळ >>> हो बरोबर भरत. हिच्याबरोबर छान लागतात पण ही उसळ ब्राम्हणी पद्धत्तीने न करता वाटण आणि गरम मसाला घालून करते मी. ते लिहायला विसरले. एरवी आमच्या उसळी गोडा मसाल्याच्या आणि गुळाच्या असतात पण ही वाटणाची आवडते आमच्याकडे. मालवणी मसाल्याऐवजी गरम मसाला घालते मी त्यात.

भरडा/भाजणी - धान्ये, डाळी कच्ची/भाजून दळून.

न शिजणारी कडधान्ये - आठ तास भिजवून पाणी टाकून द्यायचे. मग हवे तेवढ्या पाण्यात चिमुटभर सोडा घालून दोन तास भिजत ठेवायचे. नंतर त्याच पाण्यात शिजवायचे.

हॉटेल मधील पदार्थ आणि घरी केलेला पदार्थ ह्यांच्या चवीत जमीन अस्मानाचा फरक पडतो. - हो. उदा वेज कटलेट्स, कोथिंबीर वडी. पदार्थ उरतात, वाया जातात म्हणून शॉर्टकट्स असतात.

ज्या पदार्थांची जनरली हाईप केली जाते ते पदार्थ आपल्याला नॉस्टॅल्जियामुळे आवडतात आणि भारी वाटतात. पण ज्या लोकांनी आधीपासून खाल्लेले नसतात त्यांना त्यात भारी काही वाटत नसावं.
माझं आवडतं उदाहर्ण म्हणजे दालबाटी. राजस्थानी लोकं प्रचंड कौतुक करतात खरी पण मला अजिबात खाववत नाही.

काळे वाटाणे कोमट पाण्यात मी सात आठ तास भिजवते. भाजीच्या कुकरमध्ये फोडणीत वाटण, गरम मसाला घालून परतते मग वाटाणे घालते, पाणी घालते मग इतर म्हणजे तिखट, मिठ, एखादं आमसूल म्हणजेच कोकम घालते. कुकर जरा मध्यम आचेवर ठेवते आणि तीन शिट्या करते. चांगले शिजतात वाटाणे. अगदी लगदा नाही आवडत आम्हाला. ह्यात मी गुळ, साखर घालत नाही.

ममो, नेहमीप्रमाणेच सुरेख लिहिलयं! अगदी डोळ्यासमोर उभे राहीले.
आमच्याकडे भाजणीचे वडे करतात आणि तांदूळाचेही वडे करतात. तांद्ळाच्या वड्याच्या पिठात हरबरा डाळ, उडदाची डाळ ,थोडे गहू. धणे, जीरे, मेथी घालतात. वड्यांना मधे भोक पाडत नाही. कोंबडी, मटण यासोबत हे वडे खाल्ले जातात किंवा मसुराच्या तळल्या मसाल्याच्या आमटी सोबत.

मसुराच्या तळल्या मसाल्याच्या आमटी सोबत. >>> ही कशी करतात, इंटरेस्टींग वाटते. मसुराची उसळ किंवा आमटी मी काळ्या वाटाण्यासारखी करते वाटण, गरम मसालावाली.

जागू चा मस्त लेख आहे ह्या वड्यांवर. क्युट लिहीले आहे. मी इतके आयसोलेटेड राहते की ओ एम जी एकत्र येउन वडे करायचे हाउ क्वेंट असे वाट ले होते. पण कम्युनि टी एक्स्पिरिअन्स महत्वाचा असू शकतो .

दाल बाटी अनदर ओव्हर हाइप्ड पदार्थ. भारतीय असले की दाल आवडायलाच हवी का असा प्रश्न पडतो. है द्राबादेस दाल भात आजारी असले की खिलवतात. मी कोंबडी वडे खाल्लेले त्यात सुद्धा रस्सा एकदम ऑसम ओला नारळ वगैरे वाला होता तर ह्या बरोबर हे तळकट कश्याला. हलके नीर दोसे असते तर चार तरी नक्कीच खाल्ले अस्ते असे वाटून गेले.
आताच्या जाल बेस्ड कल्चर मुळे आपण प्रत्येक जागीचे पदार्थ क खायला उत्सुक असतो पण त्या मागचे कल्चर समजते असे नाही.

काळा वाटाणा काय असतो?

अंजू Happy

काळःया वाटाण्याच्या उसळीत गूळ वाचून मला क्षणभर काही कळेचना. मग तुमची पोस्ट वाचून लक्षात आलं.
ही उसळ आमटीकडे जाणारी असते.

अगदी आवडीचे वडे! भाजणीचे पण आवडतात आणि हेपण. भजणी आणि उडीदा-तांदळाचं पीठ हे दोन्ही आई घरीच करते. मी एकदा " उडदाचे वडे म्हणजे कोंबडीवड्यातले वडे" म्हटल्यावर माझ्या सगळ्या मैत्रिणी दचकल्या होत्या कारण मी शाकाहारी असून हे वडे खाते हे कसं शक्यंय असं त्यांना वाटलं. अर्थातच त्यांचा ही गैरसमज होता की कोंबडीवडे म्हणजे चिकन कबाबचा चुलत्/मावसभाऊ असेल! Wink त्यामुळे "तू कशी नॉन्वेज खातेस?" असं त्यांनी विचारलं होतं. मग त्यांचं प्रबोधन करायचं मोठ्ठं काम मी केलं होतं!

आमच्यात ह्या वड्यांना तांदळा चे वडे च म्हणतात. कोंबडी वडे नाही म्हणत. कोंबडी वडे हे नाव हॉटेल वाल्यांनी पाडले आहे का? लहानपणी हॉटेल बाहेर येथे कोंबडी वडे मिळतिल अशी पाटी असायची तेंव्हा वाटायचे की जसे बटाटे वडे करतात तशी चिकन ची भाजी करुन बेसन पिठात तळतात. Biggrin

प्रतिसाद सगळेच सुंदर , धन्यवाद सगळयांना.

शाली ,नक्की करू या वड्यांचा बेत. तुम्हाला आवडतील. अर्थात अमच्याकडे कोंबडी नाही मिळणार पण इतर गोष्टी असतील नक्की.

कोंबडी आणि वडे असं लिहिलं हॉटेल वाल्यानी तर बरेच गैरसमज कमी होतील कोंबडी वडे ह्या डिशबद्दलचे.☺

जागू चा मस्त लेख आहे ह्या वड्यांवर. >> @ अमा , हो मस्तच आहे तो लेख.

ज्या पदार्थांची जनरली हाईप केली जाते ते पदार्थ आपल्याला नॉस्टॅल्जियामुळे आवडतात आणि भारी वाटतात. पण ज्या लोकांनी आधीपासून खाल्लेले नसत >> @ सायो , पटलं अगदी.

आता लगे हाथ काळ्या वाटाण्याच्या आणि मसुरच्या तळल्या मसाल्याच्या आमटी ची रेसिपी पण द्या कुणीतरी.

प्रेशर कुकर मधे डाळी नीट शिजण्यासाठी ४-५ शिट्ट्या होऊन गेल्यावर गॅस बारीक करून परत आत प्रेशर जमू द्यावे आणि मग शिट्टी होण्यापूर्वी गॅस बंद करावा. आणि झाकण आपले आप उघडू द्यावे. झाकण उघडल्यावर डाळ जर पुरेशी शिजली नसेल तर झाकण लाउन पुन्हा वरील कृती करावी.

Pages