झंटालमन

Submitted by सतीश कुमार on 4 October, 2019 - 11:38

झंटालमन "

यष्टी धुरळा उडवत इश्ट्यांड मदी घुसली अन् वाईला जानारी मानसं दानकन् हुटली. पासिंजरचा योकच गलका सुरू जाला. मी बी गर्दीत घुसलो अन् रेटारेटीत मागं फुडं व्हाय लागलो. माज्या डोल्यावर काळा चष्मा व्हता. टेरीकाटचा बगळ्यावाणी सफेद सदरा आन् सास्किनच्या काळया इजारित माजी पर्शनालीटी लई झकास वाटत व्हती.

" सगळे बाकावर बसा.." कंडाक्टर वराडला, " कुनी बी टिकाट घेतल्या बिगर गाडीत चढायचं नाई.." आन् तंबाकूची येक लांब पिंक टाकीत तो कंटरोलर कॅबिनकडं वळला.

पून्यांदा येकदा गलका झाला अन् गुळाला मुंग्या चिकटाव्या तशी दाराला चिकाटलेली मानसं बाकड्यावर लंबर लावाय पळली. लई मोठा घोळका झाला अन् समोरल्या माणसाच्या खांद्यावरून माजा हात तेच्या म्होरं असलेल्या हिरव्या शर्टाच्या खाकंत घुसला. त्याच टायमाला कुणाचं तरी ल्हान कारटं माज्या पायात कडमाडलं आन् मी खाली वाकलो. त्या लहानग्याला मी बाजूला सारलं आन् तोल सावरत व्हतो तवा परत धक्कामुक्की जाली आन् मी पडलो. ' जाउंदे त्येच्या मायला… मागल्या यष्टीनं जायाचं ' असा इचार केला आन् मी बाजूला सराकलो.

मी बगाय लागलो तर माझी इजार अन् सदरा धूळ भरला झाला व्हता. त्वांड बी मातकट वाटत हुतं. हात बी लई घान दिसत व्हते. जरा पान्यानं धुतले तर बरं वाटल म्हून मी पर्साधन घराकडं चाललो. आत शिरलो अन् हातातली बेग खाली ठिवली अन् बॅसीनचा नळ फिरविला. त्वांडाला पानी लागलं तवा जिवाला लई सुक वाटलं. समोरल्या आरशात बगून मी त्वांड पुसला तवा माज्या नजरंला आरशाच्या वरल्या बाजूला येक हात वर, बारकं भगदाड दिसलं. मी पाय वर करून भगदाडात हात घातला. हाताला माती चिटाकली. मी परत हात धुतले आन् मग भाईर आलो.

***

कंडाक्टर अजून बी आला न्हवता. माणसं जरा गप व्हती पर त्यो हिरवा सदरा वरडत व्हता. " च्वार व्हता रं बाबा… माज पाकीट मारलं की रं… पटकी लागली रं त्येला.. हज्जार रूपे व्हते पाकिटात…कसं व्हायचं अत्ता.. कसा मी जानार घरला.. त्याचं बी वाकडं व्हनार बगा म्या सांगतू…."

बाजूला मानूस व्हता त्येला मी इचारलं काय झालं, तर त्यो म्हनला, " पाकीट मारलं गर्दीत त्येचं. बिचारं…लई च्वार हायीत हिकडं.. हजार रूपे गेले.."

मी हिरव्या सदऱ्याकडं बगीतलं. त्येच्या डोल्यात पानी तरारून आलं हुतं. मी त्येच्याकड गेलो आन् कसं जालं इचारलं. " म्हाईत न्हाई कसं.. कुनी आन् कसं काढून घितला काय बी सुदारला न्हाई. लेंघाच्या खिशात चोरी व्हते ना तर मी वरल्या खिश्यात पाकीट ठिवला व्हता. काळं पाकिट हाय. पाकिटात साईबाबाचा फोटू बी हाय. म्हटलं साईबाबा आपल्याला वाचिवतात." तो हुंदत हुंदत बोलत व्हता. " ज्येनं घेतलं त्ये लई बेनं हाय. पचनार न्हाई त्येला. त्याचं धा हजार जातील म्या सांगतू. लै नुस्कान व्हनार त्येचं..." त्यो हमसत व्हता.

" खुट जानार हाय तुमी " मी इचारलं. " वाईस जातूया." त्यो बोलला. " आता कसं जानार मी. पैसा बी न्हाई."

माज्या मागं, म्होरं आन् आजूबाजूला धा बारा मानसं घोळका करून हुबी व्हती. माजा सफेत सदरा आन् भारी इजार बगून मला ती मानसं झंटालमन समजत व्हती.

" आपून असं करू, " मी म्हटलो, " मी पन्नास रूपे देतो तुमास्नी आन् वाईला जायचं टिकिट बी काडून देतो. रडता कशा पायी.." मी खिशात हात घातला आन् पन्नासची आणि ईसची नोट काढून त्याच्या म्होरं धरली. त्येन माज्याकडं नजर केली. त्येच्या नजरंत उपकार दिसलं. " लै उपकार जाले साहेब, तुमच्या रुपात साईबाबाच भेटले जनू.. न्हाईतर काय बी खरं नव्हतं आज.." त्यानं माजे हात धरले. मला लाजल्यावाणी झालं. लगंच आजूबाजूला असणाऱ्या लोकास्नी बी दया आली आन् कुनी धा तर कुनी पाच रूपे त्याला दिले आन् जरा येळ त्येबी साईबाबा बनले.
येवढ्यात कंडाक्टर आला. सर्वे लोकांनी तिकिटं घेतली आन् पटापटा येश्टीत चडली. कंडाक्टरनं दोन बेल मारल्या आन् बस आली तशीच धुरळा उडवत गेली बी इश्ट्यांडच्या भाईर.

सगळीकड कशी सामसूम जाली. माजा सदरा बी धूळ लागून मळला व्हता. मी केसातनं हात फिरविला तर त्यात बी धूळ. वाईच केसातून फणी फिरवूया असा इचार केला आन् परत पर्साधन घराकडं निघलो. मघाच्याच आरशा म्होरं हुबा ऱ्हायलो. खिशात हात घातला, फणी काढली आन् मास्त भांग पाडला. मग पाय वर करुन भगदाडात हात घातला आन् आल्लाद पाकीट खाली घेतलं. पाकिटाचा रंग काळाच व्हता. उघाडलं आन् बघितलं तर साईबाबांचा फोटू. पन्नासच्या नोटा मोजील्या तर बराबर ईस व्हत्या. मी भाईर आलो. वाईला जानाऱ्या बाकड्यावर परत मानसं गोळा झाली व्हती. मी बी परत बाकड्याकडं चालाय लागलो.

समाप्त.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झंटालमन खिसेकापू.. ते पैल्या टैमाला भगदाडात हात घातला तवाच वाटलं इतं कायतरी पाणी मुरतंय म्हून. चांगली लिहिलीय.

मस्तय !
ह्याचा पार्ट २ करा आता --
ते पाकीट रिकामी होतं आणि मिस्टर हिरवे गर्दिकडून माणुसकी खातर पाच पन्नास करत दोन पाचशे रूपडे घेवून वाईची बस पकडतो.रिटर्न जर्नी पुन्हा तेच नाटक Proud म्हणजे दिवस भराची कमाई म्हणून आता खरंच त्याच्या पाकिटात हजार रूपडे जमतील !

@ अज्ञात वासी, तुम्ही असे अज्ञात राहिलात तर आम्हाला मार्गदर्शन कोण करणार? तुमच्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

@सामो, सुरूवातीला अरे देवा वाचून घाबरलो... पुढचं वाचलं आणि सातवे आसमान पर पहुंच गए... धन्यवाद..!

@नौटंकी, वाई म्हणजे दक्षिण काशी. महाभारत काळात विराट नगरी म्हणून नाव लौकीक होता. आणि सध्या तर बॉलिवुडचे शूटिंगसाठी आवडते ठिकाण. वाईकर बिचारे नाहीत तर नशीबवान...! एनीवेज.. तुमचे मनापासून धन्यवाद.

@नेहा, झंटालमन दिस्त्यात त्ये कवा कवा च्वार बी निगत्यात. नीरव मोदी, मल्ल्या, सुशील मोदी, मेहुल चोक्सी, हर्षद मेहता, ह्ये बी झंटालमन व्हते... च्वा र निगले....! लै भारी वाटलं तुमि वाचन केलं. वाचाल तर वाचाल असं काय तरी म्हणत्यात...द न्यवाद...!

सतिश कुमार भाऊ, जेम्स हेडली चेसची भरपूर पॉकेट बुक्स त्या वयात वाचली आहेत. अगाथा नाही वाचलं कधी पण शेरलॉक होम्स च्या गोष्टी खूप वाचल्या आहेत.

भारी जमलीय कथा.
'लई मोठा घोळका झाला अन् समोरल्या माणसाच्या खांद्यावरून माजा हात तेच्या म्होरं असलेल्या हिरव्या शर्टाच्या खाकंत घुसला.' हे वाचल्यावरच वाटलेलं दाल मे कुछ काला है.
पुलेशु

मस्तय गोष्ट.
किट्टूसारखंच मलादेखील अंदाज आला होता.

छान..
गोष्ट आवडली..
भाषा आणि शैली अधिक आवडली..