हा खेळ बाहुल्यांचा! - भाग ७

Submitted by अज्ञातवासी on 3 October, 2019 - 13:15

भाग ६

https://www.maayboli.com/node/70390

सुखद अंत सगळ्यांना हवाहवासा वाटतो!
पण कुणाला दुःखद अंत हवाहवासा वाटला तर?
◆◆◆◆◆
रामरावाचा अंत्यविधी उरकला आणि मी ब्रांचवर आलो. फाईलचा ढिगारा समोर होताच. मी पटापट कामाला लागलो.
कामात वेळ कसा जातो कळतच नाही. मी तर मध्यरात्रीपर्यन्त काम करत होतो.
कारण मला वाड्यावर जायचं नव्हतं...
अचानक लक्ख काळोख पसरला. लाईट गेली होती बहुतेक.
मला डोळ्यासमोर काहीही दिसत नव्हतं. सगळी मंडळी कितीतरी आधीच घरी गेली होती.
...तेवढ्यात माझ्या पायाभोवती मऊसर विळखा मला जाणवला...
'सोड, सोड...' मी जिवाच्या आकांताने ओरडू लागलो.
तेवढ्यात क्षणभर वीज चमकली, मला समोरचा दरवाजा दिसला, आणि मी जीव घेऊन पळत सुटलो.
मुसळधार पाऊस चालूच होता. रस्ताभर चिखल झाला होता. शिदीडे, गांडुळं बाहेर आली होती.
मात्र मी सगळं तुडवत जिवाच्या आकांताने धावत होतो.
कुठे ते मलाच माहीत नव्हतं.
पळून पळून माझी छाती फुटायची वेळ आली, मी शेवटी जवळच वडाच्या पारावर विसावलो.
वाऱ्याने पारंब्या अस्तावस्त झुलत होत्या. एकमेकांमध्ये गुंतत होत्या.
...आणि त्याक्षणी एका पारंबीला उलटी लटकून ती स्त्री माझ्याजवळ आली.
...लालभडक कपडे, केसांच्या बटा, तसेच लालभडक डोळे, अंगावर कवड्यांची माळ.
भूक लागलीये मला, तिने अक्राळविक्राळ जीभ बाहेर काढली.
मी पुन्हा भीतीने पळत सुटलो. तीही दोन पारंब्या हवेत झुलवत भूक भूक करत माझ्यामागे येऊ लागली.
मी पूल ओलांडला. नदीच्या त्या किनाऱ्यावर जाणार, तेवढ्यात माझ्या पाठीवर सपकन एक रट्टा बसला.
त्या माराने मी जागीच कोसळलो...
"जाशील कुठं? भूक, भूक!" ती जवळ येऊ लागली.
तिने माझ्यावर झेप घेतली, आणि...
◆◆◆◆◆
बराच वेळानंतर मला जाग आली.
मी एका लाकडी चितेवर पहुडलो होतो.
...माझ्या समोर त्या लाल कपड्यातील स्त्रीच मुंडक पडलं होतं...
...आणि ती बाहुली माझ्याकडे बघून हसत होती...
माझी भीतीने गाळण उडाली...
ती बाहुली आता माझ्यासमोर नाचत होती. मला तिथून पळावस वाटत होतं, पण एका अनामिक शक्तीने मला जखडून ठेवलं होतं...
...ती हसत होती, गात होती, काहीतरी पुटपुटत होती.
माझे हात पाय शिथिल पडायला लागले. आकुंचित व्हायला लागले. कातडीऐवजी कापड पांघरलय, असा भास व्हायला लागला. माझं रूपांतर बाहुल्यात होत होतं.
तिचा आवाज टिपेला पोहोचला, नाचण्याचा वेग वाढला...
'धाड!!!!!!!'
पुढच्याच क्षणी ती निपचित खाली पडली.
मी पूर्ववत झाल्याचा मला भास झाला, आणि मी चितेवरून उठलो.
समोरची व्यक्ती माझ्याकडेच बघत होती.
◆◆◆◆◆
"आशा आहे, की तुम्ही आता बरे असाल."
त्या व्यक्तीच्या प्रशस्त आतल्या खोलीत मी बसलो होतो.
त्याची फडताळे चित्रविचित्र रसायनांनी भरली होती. अनेक विचित्र वस्तू आजूबाजूला नीट रचून ठेवल्या होत्या.
तळेगावपासून कितीतरी वेळ प्रवास करुन आम्ही याठिकाणी पोहोचलो होतो.
"तुम्ही कोण?" मी भीत भीतच विचारलं.
मी अंगद! तुम्ही मला तांत्रिक, मांत्रिक अशा अनेक उपाध्या लावू शकतात, पण मी आहे एक साधारण माणूस, जो त्याच्या अल्पमती आणि बलाप्रमाणे अमानवी शक्तींना आळा घालतो.
"तुम्हाला कसं कळलं, की मी...ती..." माझ्या तोंडातून शब्द फुटेना.
"शांत व्हा. सगळी उत्तरे मिळतील. जरा धीर धरा."
मी गप्प बसलो.
त्याने एका कपात चहा ओतला.
घ्या!
मी चहाचा कप तोंडाला लावला. मला थोडी तरतरी आली.
"मी जे सांगतो, ते आता शांतपणे ऐका. कारण यापुढील सर्व गोष्टींसाठी मला तुमची मदत लागेल."
मी लक्षपूर्वक ऐकू लागलो.
त्याने सुरुवात केली....

Group content visibility: 
Public - accessible to all site users