हा खेळ बाहुल्यांचा! - भाग ६

Submitted by अज्ञातवासी on 22 June, 2019 - 14:15

भाग ५

https://www.maayboli.com/node/70293

मानव म्हणजे एक त्या विधात्याने बनवलेलं एक बाहुलं, त्याचं जीवन म्हणजे त्या विधात्याने घडवलेला बाहुला - बाहुलीचा खेळ.
...पण जर तो खेळ शब्दशः खरा ठरला तर?
-------------------------------------------------------
पाच फूट उंची, पांढराफटक सपाट चेहरा, तसेच पांढरे हातपाय. अंगावर लाल शालूसारखं काहितरी, अंगाची वळकटी वाळलेली.
...ती बाहुली बघूनच मला भीती वाटली.
मी त्या बाहुलीला का भीत होतो?
थोडीशी भीती कमी झाल्यावर मी तिला हात लावून बघितलं.
तीच शरीर कापडाने शिवल होतं, पण त्या कापडाला हात लावताच मध्ये मांसाचा भास होत होता.
आणि त्याच गाठोडीत एक प्रचंड मोठ बाड होतं. संपुर्णपणे कोरं!
पण मी जाणे का, माझी भीती हळूहळू कमी व्हायला लागली होती. त्या बाहुलीत मला काहीतरी विशेष जाणवत होतं.
काहीतरी मला खेचत होतं. काहीतरी मला तिच्याशी जोडत होतं.
मी सगळं बाड उलटसुलट करून बघितलं. अक्षरं तर सोडाच, रेषसुद्धा उमटलेली नव्हती.
बाहेर पावसाचा मारा बंद झाला होता. वाराही थांबला होता.
एक विचित्र वातावरण तयार झालं होतं, कृत्रिम, अभद्र, अमानवीय.
आणि मात्र आता मला अमानवीय झोपसुद्धा यायला लागली होती. आजकाल मी जास्तच झोपायचो. प्रचंड मानसिक थकवा आणि शारीरिक क्लेश यामुळे असेल.
त्या बाहुलीला बाहेर कुठे फेकून द्यावा असाच मला प्रश्न पडला, प्रचंड क्लेशकारक वातावरणात मी त्या बाहुली कडे बघत होतो.
माझा थकवा आता अनावर झाला होता.
लाकडी कपाटे, काचेची कपाटे!
आता मला त्या कपाटांची प्रयोजन कळलं होतं.
म्हणजे एखाद्या जुन्या निष्णात बाहुली बनवणारे कलाकार यांनी त्या कपाटांची बाहुली ठेवण्यासाठी आणि प्रदर्शनासाठी निर्मिती केली होती.
मी ती बाहुली आणि ते बाड कपाटात ठेवलं आणि झोपायला गेलो.
कुणीतरी माझ्याकडे बघतय, असा मला भास झाला.
मी अर्धवट ग्लानीतच वर झोपायला पोहोचलो.
मी पलंगावर अंग टाकलं आणि लगेच झोपी गेलो.
-------
मी एका प्रचंड भव्यदिव्य वाड्यासमोर उभा होतो.
कुणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी चमकून मागे पाहिले.
तिचं वर्णन काय कराव? ती अवर्णनीय सुंदर होती. जगातली कुठलीही रुपगर्विता तिच्यापुढे फिकी पडेल इतकी सुंदर...
... तिने माझा हात पकडला, आणि वाड्यात घेऊन गेली.
वाड्यात चिटपाखरूही नव्हतं. आतल्या खोलीत तिने मला नेलं.
एक लांबरुंद पलंग सजवलेला होता. त्यावर मऊ गादी अंथरलेली होती.
मी तिच्या रुपात एकजीव झालो होतो. तिच्या तपकिरी डोळ्यांमधून माझ्यावर जसकाही संमोहनाचे बाण सोडले जात होते.
तिने मला ढकललं, मी पलंगावर पडलो, आणि ती माझ्याजवळ आली.
ती माझ्या गालावर हात फिरवत होती.
माझ्या गालाला चाटत होती... तिच्या प्रेमात आकंठ बुडवत होती.
------------------------
आणि मी खाडकन जागा झालो.
ती बाहुली माझ्या अंगावर पहुडलेली होती...
मी तिला उचलून फेकलं, आणि लगेच खोलीबाहेर पळालो.
मला सगळे देव आठवू लागले.
मी तसाच वाड्याबाहेर आलो, प्रचंड वारा सुटला होता.
मी वाड्याबाहेर पळत राहिलो, ग्लानीत पळतच राहिलो,
आणि मी केव्हा पडलो, मलाच कळलं नाही.
-----------------------------------------------------
सकाळी जाग आली, तेव्हा मी वाड्यातच होतो. माझ्याच खोलीत, माझ्याच पलंगावर.
म्हणजे रात्रीच स्वप्न, बाहुली, माझं पळणं हा सगळा भास होता?
माझं अंग प्रचंड घामेजलेलं होतं.
काहीतरी आठवून मी खाली पळतच गेलो.
ती बाहुली जागच्या जागी होती, आणि तिच्याबरोबर ते बाड सुद्धा होतं.
म्हणजे एक तर तो भास होता नाहीतर ते मला पडलेले स्वप्न होतं...
पण आजही माझ्या ब्रांचवर उशिरा जाणं मला परवडण्याजोगे नव्हतं.
मी पटकन तयारी केली आणि ब्रांच वर निघालो.
ब्रांचवर आज कुणीही आलं नव्हतं. शेजारच्या दीपक चहावाल्याकडे एक चौकशी केल्यावर ते रामरावकडे गेलेले कळलं.
काहीतरी बडबडतच रामराव गेला होता...
बऱ्याच लोकांचा संशय नामदेवावर होता, मात्र नामदेव गावातून कधीचा गायब होता.
रमरावची बातमी ऐकून मला थोडं हळहळलंच. काहीही झालं तरी आधीपासून तो माझा सोबती होता.
आणि मी सरतेशेवटी, रामरावकडे गेलोच.
तीन दिवसात रामराव काडी झाला होता. त्याचा चेहरा भयाण काळानिळा होऊन ओढग्रस्त झाला होता.
मला रामरावाचे शब्द आठवत होते, आणि माझं काळीज थरथरत होतं.
तळेगावात पुन्हा मुसळधार पाऊस चालू झाला होता...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ तेरी! अज्ञा!!
काय जबरदस्त लिहिलंय राव. पु.भा.प्र! Happy

भारी लिहिलंय..तोचतोचपणा नाहीये या कथेत नेहमीच्या भयकथेत असतो तसा आणि वेगळेपण आहे. तुम्ही जे भीतीच वातावरण तयार केलत ते थोडसुद्धा कमी होऊ दिल नाहीत.. आणि स्वप्न बाहुली त्यांच्यातली लिंक म्हणजे एकंदरीत मजा येणार आहे वाचायला.