हॅरी पॉटर - भाग एक

Submitted by राधानिशा on 2 October, 2019 - 13:14

हॅरी पॉटर भाग 1

ज्यांना मुळात वाचन या प्रकाराचीच ऍलर्जी आहे अशांचा काही प्रश्नच नाही . पण अनेक वाचनप्रेमी मराठी लोक हॅरी पॉटर म्हणजे लहान मुलांची पुस्तकं किंवा काय ती जादू आणि छड्या बिड्या .. हे काय वय आहे का परीकथा वाचायचं .... लहान होतो तेव्हा वाचलं कि अल्लादिन आणि जादूचा दिवा वगैरे ... आता त्यात इंटरेस्ट वाटणं शक्य नाही असं म्हणतात आणि हॅरी पॉटरच्या वाटेलाच जात नाहीत . तर काहीजण हॅरी पॉटरचे चित्रपट पाहतात (क्वचित कुतूहल म्हणून किंवा बहुधा मुलांच्या आग्रहाखातर ) आणि त्यांचा त्यातला रस संपतो . " माहीत आहे स्टोरीलाईन मला ; एवढी काही खास नाही ! " असं म्हणतात आणि पुस्तकांच्या वाटेला जात नाहीत .

ह्या वाचकांना हॅरी पॉटर हि फक्त लहान मुलांसाठीची पुस्तकं नाहीत त्याचप्रमाणे उथळ कल्पनाविलास नाही हे सांगण्याचा हा एक प्रयत्न . उथळ म्हणजे आजपर्यंत वाचत आलेल्या जादूच्या गोष्टींमध्ये तर्कशुद्ध स्पष्टीकरण दिलेलं सापडत नाही , उदा . स्नो व्हाईट मधल्या राणीकडे जादूचा आरसा कुठून आला ? हा आरसा कुठे निर्माण झाला ? किंवा अल्लादिन चा जादुई दिवा कुठे निर्माण झाला ? ह्यातला जिन मूळचा कुठला ? तो दिव्याच्या मालकाच्या आज्ञा का पाळतो ? इ इ .

हॅरी पॉटरच्या कथानकाची साधारण कल्पना यावी व कथानकाच्या खोलीची जाणीव व्हावी यासाठी त्यातल्या मला महत्वाच्या वाटणाऱ्या काही गोष्टींबाबत थोडक्यात माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे . यात काही स्पॉइलर्स असण्याची शक्यता आहे ( स्पॉईलर - कथेतले एखादे रहस्य आधीच समजणे , यामुळे कदाचित काहीजणांना कथा वाचताना तिची लज्जत कमी झाल्यासारखी वाटू शकते तर काहीजणांना ती वाढल्यासारखीही वाटू शकते . ज्याच्या त्याच्या स्वभावावर आहे )

१ - जादू / मॅजिक -

हॅरी पॉटर मधली जादूची संकल्पना फार विस्तृत आहे .

ही एक अतिन्द्रिय / अनैसर्गिक शक्ती आहे . ही शक्ती जनुकांमधून व्यक्तीत येते अशी संकल्पना मांडली आहे . उदा . आई व वडील दोघांमध्ये ही शक्ती असल्यास मुलामध्ये ती येण्याची शक्यता 99 % असते . दोघांपैकी एकातच ही शक्ती असल्यास ती मुलांमध्ये येण्याची शक्यता - प्रोबॅबिलिटी काही प्रमाणात कमी होते . कदाचित अशा दाम्पत्याच्या 3 मुलांपैकी एकामध्येच ही शक्ती येऊ शकते किंवा तिघांतही . पण जर एकातच आली तर उरलेल्या 2 मुलांच्या अपत्यांमध्ये ती येणारच नाही असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही . शिवाय आई व वडील दोघांतही ही शक्ती नाही व कुटुंबात अनेक पिढ्यांत कुणातही ही शक्ती नव्हती अशा दाम्पत्याच्या पोटीही ही शक्ती असलेली मुलं जन्म घेतात . अर्थात याचं प्रमाण खूप कमी असतं .

ही शक्ती असलेल्या व्यक्ती कोणत्याही शिक्षणाशिवाय लहानसहान जादू करू शकतात किंवा बऱ्याचदा ठरवून काही करण्यापेक्षा अशी जादू आपोआपच होते . याला ऍक्सिडेंटल मॅजिक असे नाव दिले आहे . ही शक्ती असलेली मुले वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षांपासून हे ऍक्सिडेंटल मॅजिक दाखवू लागतात . उदाहरणार्थ . पहिल्या पुस्तकात हॅरीची मावशी त्याचे केस अगदी बारीक आणि वाईट पद्धतीने कापते , उद्या शाळेत सगळे चेष्टा करणार ह्या विचाराने त्याला रात्रभर झोप लागत नाही , सकाळी त्याचे केस होते तसे वाढलेले असतात . यावेळी आपण जादूगार आहोत हे त्याला माहीतही नसतं . खूप राग आल्यास किंवा खूप भीती वाटल्यास अशी जादू ह्या मुलांकडून होते .

पण ह्या नियंत्रण नसलेल्या जादूचा तसा काही उपयोग नसतो . ही नियंत्रणाखाली आणून वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरण्याकरता छडी खरेदी करावी लागते ( ह्या विशिष्ट छड्या बनवणारे काही तज्ज्ञ जादूगार असतात , छडी बनवण्याचे शास्त्र हा एक वेगळाच विषय आहे ) आणि जादूविद्या शिकवणाऱ्या विद्यालयात जाऊन 7 वर्षे जादूच्या वेगवेगळ्या शाखांचं शिक्षण घ्यावं लागतं .

२ - मगल -

वर उल्लेखलेली शक्ती असलेले लोक म्हणजे जादूगार . त्यांनी हि शक्ती नसलेल्या लोकांना म्हणजे बहुसंख्य लोकसंख्येला मगल हे नाव दिलं . मगल म्हणजे ज्यांच्यात जादू नाही ते लोक . मगल लोकांमध्ये जादूगारांबद्दल प्रचंड भीती असल्यामुळे कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत म्हणून जादूगार समाज अज्ञात राहतो .

३ - जादूगार समाज

जादूगार समाज म्हणजे जादू करू शकणाऱ्या लोकांचा समाज . ज्यांच्या अनेक पिढ्या जादूगारच होत्या अशा लोकांनी मगल समाजापासून स्वतःला लांब ठेवलं , लपवून / अज्ञात ठेवलं . मगल लोकांसमोर जादूगार समाजाचं / जादूचं अस्तित्व उघड होऊ द्यायचं नाही हा जादूगार समाजाचा सर्वात मोठा नियम / कायदा आहे .

४ - जादू मंत्रालय -

जादू मंत्रालय जादूगार समाजाचे वेगवेगळे प्रश्न हाताळतेच .. उदा . जादुई प्राण्यांची व्यवस्था , जादूच्या वस्तूंवरचे नियम , गुन्हेगार जादूगारांवर कारवाई करणे इ इ . पण त्याचे सर्वात मोठे काम म्हणजे मगल समाजापासून जादूगार समाजाचे अस्तित्व लपवून ठेवणे . त्यासाठी अनेक कुशल , बुद्धिमान विशेष गुणवत्ता प्राप्त केलेले जादूगार या मंत्रालयाच्या विविध शाखांमध्ये काम करतात .

५ - अझ्काबान -

हा जादूगारांसाठीचा तुरुंग एका ओसाड बेटावर आहे याचे पहारेकरी म्हणजे डिमेन्टर्स हे जादुई जीव .

डिमेन्टर - डिमेन्टर ह्या जादुई जीवाची निर्मिती लेखिकेने डिप्रेशन ह्या मानसिक आजारावरून केली आहे . डिमेन्टर जवळ येताच व्यक्तीला अतिशय उदास , दुःखी , वाईट वाटू लागते ... आयुष्यात घडून गेलेल्या सगळ्या वाईट घटना आठवू लागतात , आपण आता कधीच आनंदी होऊ शकणार नाही अशी त्याची खात्री पटते . हे डिमेन्टर व्यक्तीचा आनंद , उत्साह , आयुष्यावरचं प्रेम सगळं शोषून घेतं , तेच त्याचं अन्न आहे . डिमेन्टरना भलेभले कुशल जादूगारही थरथर कापतात . ह्याच्याशी सामना करणं फार कठीण आहे पण अशक्य नाही . त्याला पळवून लावण्याचा एक मंत्र आहे . अर्थात छडी हलवून मंत्र म्हटला कि ते पळून जातं एवढं हे सोपं नाही . त्यासाठी जादूगार अतिशय खंबीर मनाचा असणं आवश्यक आहे कारण डिमेन्टर समोर येताच लढण्याची शक्ती फार कमी होते , गळून जायला होतं . अगदी निपुण म्हणवणारे जादूगारही ह्या मंत्राचा यशस्वी वापर करण्यात अयशस्वी होतात . हा मंत्र आयुष्यातल्या अतिशय सुखद प्रिय अशा एखाद्या आठवणीवर पूर्ण लक्ष केंद्रित करून , डीमेंटरच्या दुःखद प्रभावाने प्रभावित न होता , सर्वशक्तिनिशी त्याला घालवून लावण्याची इच्छा करून म्हटला तरच यशस्वी होतो .

अझ्काबानमध्ये जादूचा गुन्हेगारीसाठी वापर केलेल्या जादूगारांना कैदी म्हणून ठेवलं जातं , छडी जप्त केलेली असते त्यामुळे ते या मंत्राचा उपयोगही करू शकत नाहीत , थोड्याच दिवसात ते आपलं मानसिक संतुलन हरवून बसतात . डिमेन्टरकडून दिली जाणारी सर्वात वाईट शिक्षा म्हणजे kiss of dementor , डिमेन्टरचं चुंबन ... ज्यात ते व्यक्तीचा आत्मा शोषून घेतं . सर्वात भयानक गुन्हेगारांनाच हि शिक्षा दिली जाते . व्यक्ती मरत नाही पण केवळ शरीर जिवंत राहातं , आतली अस्मिता नष्ट होते . डिमेन्टर्स वर जादू मंत्रालयाने नियंत्रण प्राप्त करून त्यांना आपल्या सेवेत घेतलं आहे . हे नियंत्रण त्यांनी नाखुशीनेच स्वीकारलं आहे , अर्थात यात त्यांचा फायदा आहेच पण नियंत्रण नसतं तर ते स्वतंत्र पणे जादूगार आणि मगल समाजात विहरले असते आणि लोकांचं सुख आनंद शोषून घेत राहिले असते .

६ - शुद्ध रक्त , अर्ध रक्त आणि अशुद्ध रक्त संकल्पना / Pure blood , Half blood , mudblood / muggleborn concept -

जादूगार / अलौकिक शक्ती असलेल्या लोकांचं प्रमाण एकूण लोकसंख्येच्या तुलनेत खूप कमी आहे . जादूगार समाजात काही घराणी अशी होती की ज्यांच्या आधीच्या सगळ्या पिढ्या जादूगार होत्या , त्यांनी हा वारसा जपण्याचा फार प्रयत्न केला ... म्हणजे दोन्ही पालक मगल आहेत अशा जादूगाराशी लग्न करायचं नाही , नाईलाजच झाल्यास एक हाफ ब्लड घराण्यातील जोडीदार स्वीकारायचा आणि मगल तर नाहीच नाही . जेणेकरून अपत्य जादूगार नसण्याची प्रोबॅबिलिटी शून्य होईल . हे स्वतःला प्युअर ब्लड म्हणवून घेत .

ह्या घराण्यांतील काही घराण्यांच्या मते ज्यांच्या कुटुंबात मगल जोडीदार किंवा मगल कुटुंबात जन्मलेला जादूगार जोडीदार म्हणून निवडला जातो अशी कुटुंबे ही अनेक पिढ्या जादूगारच असलेल्या कुटुंबांपेक्षा कमी व हलक्या दर्जाची , अशुद्ध रक्ताची आहेत व अशी भेसळ घडवून आणणे हे एकप्रकारचे घृणास्पद कार्य आहे .

एक पालक मगल व दुसरा जादूगार किंवा दोन्ही पालक जादूगार पण आजी आजोबा पैकी कोणीतरी मगल असून जी मुले जादुई गुण घेऊन जन्माला आली त्या सगळ्यांसाठी हाफ ब्लड हि संज्ञा . प्युअर ब्लड जादूगारांच्या मते हाफ ब्लड कमी दर्जाचे पण अगदीच तिरस्करणीय नाही .

तर ज्यांच्या मागच्या पिढ्यांत कोणी जादूगार नव्हते , ज्यांचा जादूशी काही संबंध नाही अशा मगल कुटुंबात जन्मलेले जादूगार म्हणजे अशुद्ध रक्ताचे - मडब्लड्स किंवा मगलबॉर्न .. हे प्युअर ब्लड्स च्या मते अगदीच खालच्या दर्जाचे , तिरस्करणीय . अशांना जादूगार समाजात प्रवेशच देऊ नये , जादू तंत्रविद्यालयात प्रवेश देऊ नये , जादूचे शिक्षण घेऊ देऊ नये . आणि मगल लोक तर पूर्णच तिरस्करणीय , त्यांच्याशी कसलाच संबंध ठेवायचा नाही .

अर्थात सगळीच प्युअर ब्लड घराणी या मताची नव्हती . काही असा भेद मुळीच मानत नसत आणि सर्व समान हे तत्व मानीत . शिवाय जादूगारांच्या घराण्यांची संख्या मुळातच थोडी होती त्यामुळे सुरूवातीच्या काळात तरी वंश टिकवायचा तर भेसळीचा धोका पत्करून मगल लोकांमधून जोडीदार निवडण्याशिवाय पर्यायच नव्हता . त्यामुळे काही प्युअर ब्लड घराण्यांमध्ये असे मगलबॉर्न किंवा मगल लोक जोडीदार म्हणून स्वीकारले गेले आणि हे वंश पुढे वाढले ... आज त्यात जन्माला आलेले काहीजण हाफब्लड तर काहीजण प्युअरब्लड आहेत .

पण काही प्युअर ब्लड घराणी मात्र शुद्ध रक्ताचा अट्टाहास ठेवून बसली त्यामुळे मोजक्या कुटुंबांशी वैवाहिक संबंध जोडण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय राहिला नाही .

बराच काळ जादूगार समाजाची साधारण परिस्थिती वरीलप्रमाणे होती .

७ - हॉगवॉर्ट्स स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्डी / हॉगवॉर्ट्स जादू आणि तंत्र विद्यालय

हॅरी पॉटरच्या जगात जादूचं तंत्रशुद्ध शिक्षण देणारी 11 विद्यालयं आहेत . त्यापैकी ब्रिटन मधलं विद्यालय म्हणजे हॉगवॉर्ट्स. हॉगवॉर्ट्सची स्थापना सुमारे एक हजार वर्षांपूर्वी केली गेली . गॉड्रिक ग्रिफिनडोर / ग्राइफिन्डॉर , सलझार स्लिदरीन / स्लायदेरीन , रोवेना रेव्हनक्लॉ आणि हेल्गा हफलपफ या चार असामान्य प्रतिभावंत जादूगारांनी हॉगवर्ट्सची स्थापना केली .

चौघांनी चार हाऊस निर्माण केले . जादुई शक्ती असलेल्या मुलांचं वर्गीकरण ठराविक गुणांनुसार या चार हाऊसेस मध्ये केलं जाऊ लागलं .

गॉडरिक ग्राइफिन्डोर यांनी आपल्या ग्रायफिन्डोर हाऊसमध्ये धैर्यवान , शूर , निधड्या छातीच्या मुलांना घेतलं जाईल असं ठरवलं . रोवेना रेव्हनक्लॉ यांनी रेव्हनक्लॉ हाऊस मध्ये बुद्धिमान , प्रतिभासंपन्न मुलांना घेतलं जाईल असं घोषित केलं , सलझार स्लायदेरीन यांनी शुद्ध रक्त , हुशार , महत्वाकांक्षी , धूर्त आणि वेळप्रसंगी हवे ते साध्य करण्यासाठी नियमांकडे दुर्लक्ष करणे , स्वहिताला सर्वोच्च महत्व देणे हे गुण महत्वाचे मानून अशा विद्यार्थ्यांना आपल्या स्लायदेरीन हाऊस मध्ये समाविष्ट करण्याचं ठरवलं तर हेल्गा यांनी मेहनत कष्ट घेण्याची तयारी असलेले , निष्ठापूर्ण , समंजस , प्रेमळ विद्यार्थी आपण आपल्या हफलपफ हाऊस मध्ये घेऊ असं सांगितलं .

हॉगवार्ट्सची इमारत म्हणजे एक प्रचंड किल्ला आहे . ज्यात अनेक मजले , बुरुज , गुप्त खोल्या , तळघरे वगैरे आहेत . हि इमारत व तिच्या आसपासचा काही एकर परिसरावर मगल लोकांना तो दिसू नये अशी जादू करण्यात आली आहे . जर एखादा मगल मनुष्य तिथे गेला तर " धोका ! दूर राहा ! प्रवेश करू नका ! " असा संदेश लिहिलेली पाटी एका ओसाड , उध्वस्त इमारतीवर लावलेली दिसते .

या चार संस्थापकांनी एक उत्कृष्ट जादू शिक्षण देणाऱ्या विद्यालयाची स्थापना करायच्या हेतूने हॉगवार्ट्सची स्थापना केली खरी पण पुढे त्यांच्यात मतभेद निर्माण झाले . सलझार स्लायदेरीन हे सुरुवातीपासूनच शुद्ध रक्ताचे आग्रही होते . त्यांनी मगल कुटुंबात जन्मलेल्या मुलांना हॉगवार्ट्समध्ये प्रवेश देऊ नये असा आग्रह धरला . हा हट्ट उरलेल्या तिघांना मान्य झाला नाही . शेवटी सलझार हॉगवार्ट्स सोडून निघून गेले .

जाण्यापूर्वी सलझार स्लायदेरीनने हॉगवार्ट्समध्ये एक गुप्त तळघर बांधून त्यात एक असा राक्षसी प्राणी ठेवला आहे जो वेळ येताच हॉगवार्ट्सला सगळ्या मडब्लड विद्यार्थ्यांपासून मुक्त करेल . सलझार स्लायदेरीनचा वारस जेव्हा हॉगवार्ट्स मध्ये येईल तेव्हा तोच फक्त या प्राण्याला नियंत्रणाखाली आणू शकेल व तो या प्राण्याकरवी तेव्हा जे कोणी मगलबॉर्न विद्यार्थी असतील त्यांना मारून टाकेल अशी आख्यायिका / दंतकथा पुढे प्रचलित झाली .

अशाप्रकारे 1000 वर्षांपूर्वी हॉगवार्ट्सची स्थापना झाली आणि काही वर्षांतच एक संस्थापक विद्यालय सोडून निघून गेला .

हि सगळी हॅरी पॉटरची साधारण पार्श्वभूमी झाली . मिपावर पूर्वप्रकाशित लेख आहे .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोस्ट केला आहे .. 6 भाग लिहिले आहेत मिपावर , आजच इकडे पोस्ट केले असते पण डम्पिंग ग्राउंड वगैरे आरोप नको .. 2 -3 दिवसात टाकते ...

हॅरी पॉटरचं पोस्टमार्टेम केलंय! सगळी 'जादुई' मजा गाळून उरलेला चोथा चिवडत बसल्या सारखं वाटतंय... फॉर डमीज स्टाईल.
स्पष्ट लिहितोय म्हणून सॉरी. पण ज्यांना नाही वाचायचं उन्हे अपने हाल पे छोड दो.