पाभेचा चहा

Submitted by पाषाणभेद on 24 September, 2019 - 13:15

चहा पिणे अन पाजणे हे काही आपल्याकडे पुर्वी नव्हते. पुर्वी चहा नव्हताच. लोक गुळपाणी देवून स्वागत करायचे. नंतर कधीतरी बोस्टन टी पार्टी झाली. अमेरीका स्वातंत्र्य झाली. ब्रिटीश भारतात आले. चीन मधल्या चहाला शह देण्यासाठी त्यांनी चहाची भारतात लागवड केली अन त्यानंतर चहा भारतात उत्पादीत होत गेला. चीन नंतर भारत चहा उत्पादनात दोन क्रमांकावर गेला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात रेल्वेस्थानकांवर चहा विकला जावू लागला. चहाची विक्री जाहीरात करून केली गेली. चहा पिणे कसे चांगले हे जाहिरात करून सांगितले जायचे. नंतर लोक चहाचे चाहते झाले. मला आठवते ब्रूक ब्राँडचा चहा एका लाल रंगाच्या तिन चाकी हातगाडीवर आठवडे बाजारात विकायला यायचा. तो घ्यायला गर्दी व्हायची.

बरे चहाचे प्रकार तरी किती? साधा चहा, स्पेशल चहा, सुंठ घातलेला चहा, मसाला चहा पत्ती चहा, भरपुर दूधाचा चहा, काढा, तुळशी अन गवत टाकलेला गवती चहा, आयुर्वेदीक चहा, ब्लॅक टी, लेमन टी, ग्रीन टी, हर्बल टी, पिवळा चहा, बॉबी, कट, टक्कर, मारामारी, अगदी मनमाडी चहा देखील आहे.

तुम्हाला आण्णाचा चहा अन नानाचा चहा माहीत आहे काय? आपल्या दुकानात गिर्‍हाईक आले तर त्याला खरोखर चहा पाजायचा असेल तर नोकराला आण्णाचा चहा आणायला सांगायचे. अन तेच फुटकळ टाईमपास करणारे गिर्‍हाईक असेल तर नानाचा चहा मागवीत अन तो येत नसे, किंवा उशीरा येत असे अन गिर्‍हाईक तो पर्यंत कंटाळून निघून जात असे.

अनेक देशोदेशी चहा तयार करण्याचे अन तो पिण्याचे तंत्र निरनिराळे असते. चिनी चहा, कोरीयातला चहा, जपानमधला चहा, अमेरीकेतला चहा.
चहाची बहीण कॉफी अगदी निराळी. तिने तर मोठमोठ्या कॉफीशॉपच्या कंपन्या काढल्या ज्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड झाल्या. पण कॉफी हा लेखाचा विषय नाहीये.

चहा हा ताजा केलेला असेल तरच चांगला. उकळून कडक झालेला चहा हा अ‍ॅसीडीटीला आमंत्रण ठरतो. काही जण चहा अजिबात पित नाही. अर्थात असे लोकं विरळेच. मग ते दूध तरी घेतात. हातावरचे पोट असणारे कित्येक जण भूक मारण्यासाठी चहा पितात. काही जण चहाबरोबर पाव, टोस्ट, बटर, खारी, नानकटाई, स्लाईस आदी खावून भूक भागवतात. चहासाठी लोकं फिरायला जातात. लोक निमित्त काढून चहा पितात. काही जण दिवसाला दहा बारा कप चहा पितात. चहा प्यायला बोलावणे हा आदरसत्काराचा भाग मानल्या जावू लागला. एखाद्याला भेटायला घरी गेलो अन चहा दिला नाही तरी लोक नाराज होतात. चहाचे पाणीदेखील पाजले नाही असा उल्लेख करतात.

जुनी गोष्ट आहे. खरी आहे. माझ्या पाहण्यात एक चहा विक्रेता आहे. नव्वदच्या दशकातली. तो सायकलवर चहा खेड्यापाड्यात विकत असे. आमच्या गावाजवळ रेल्वे जाते अन तेथल्या नदीवर रेल्वेपुलआहे. एकदा रेल्वे पुलावरून तो सायकल ढकलत चालला होता. तिकडून रेल्वे आली अन हवेच्या झोतामुळे तो उंच पुलावरून खाली कोसळला. नदीत पाणी वगैरे होते की नाही ते माहीत नाही. पण तो जबर जखमी झाला. नंतर हॉस्पीटलात राहीला. त्यानंतर त्याला कोणतेही अन्न पचेनासे झाले. काहीही खाल्ले तर ते बाहेर पडत असे. नंतर त्याच्या घरच्यांनी वेगवेगळ्या अन्नपदार्थांचा त्याचेवर प्रयोग केला. काहीच पचेनासे झाले. नंतर शेवटी ते अशा निष्कर्षापर्यंत आले की त्याला चहा पचतो! मग सुरूवातीला चहाचे पाणी अन नंतर काही दिवसांनी थोड्या जास्त दूधाचा चहा हाच त्याचा आहार झाला. बरे एवढाच आहार असूनही ती व्यक्ती शारीरिक कष्ट करत असे. किराणा दुकान चालवत असे. सायकल चालवत असे. तर चहा विकतांना अपघात झाला अन शेवटी चहाच त्याचा आहार बनला. जवळपास दहा एक वर्षे ती व्यक्ती चहावरच होती. तुम्हाला खोटे वाटेल हे. नंतर आम्ही गाव बदलले. त्या व्यक्तीनेही गाव अन व्यवसाय बदलला. मध्ये काही काळ गेला अन ती व्यक्ती शहरातल्या एमआयडीसीत एका कंपनीत सायकलवर जेवणाचे डबे पुरवतांना दिसली. शारीरिक ठेवण तशीच शिडशीडीत राहीली होती. असो.

खेडेगावात दूधाची कमतरता असते. जे दूध निघते ते सकाळीच शहरात विकायला पाठवले जाते. मग एखाद्या लहानग्याला हातात पेलाभर किंवा पाच दहा रूपयाचे दूध घ्यायला ज्याचे घरी दूभते असते त्याकडे पाठवतात. तर एकदा एका ठिकाणी मी पाहूणा गेलो होतो. खेडेगावच ते. दूध मिळालेच नाही. साखर नव्हती, गूळ होता. मग त्या माऊलीने गुळाचाच काळा चहा मला पाजला. मला तर त्याचे काही वाईट वाटले नाही कारण तसली परिस्थीती मला माहीत होती. पण त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी दिसले. अशासाठी की आलेल्या पाहूण्याला बिन दूधाचा, बिन साखरेचा चहा पाजला. त्याच्याच जवळपासचा अनुभव असा की एका माऊलीने चहा बनवला. तेथेही दूध नव्हते. साखरेचे नाही आठवत पण त्या माऊलीने पावडरचे दूध बनवले अन मग मला चहा पाजला.

चांदवडला आम्ही लहान असतांना देवीच्या दर्शनाला गावातून पायी गेलो. येतांना ढग भरून आले. अन जोरात पाऊस चालू झाला. आम्ही पूर्ण भिजलो. गाव तर लांब होते. आडोशाला काहीच नाही. रस्त्यात एका झोपडीत आम्ही गेलो. तेथे विस्तवाचा उबारा भेटला. तेथे त्या मालकाने चहा करून दिला. पण तेव्हढ्यात जोराचा वारा आला अन त्या वार्‍याने झोपडीचे एका बाजूचे कूड उघडे पाडले. आम्हाला वीजच कोसळली की काय असे वाटले पण तसे काही झाले नव्हते. असा प्रसंग लक्षात ठेवणारा चहा अन असे चहाचे अनुभव.

आताशा अनेक चहाचे ब्रांड तयार झालेले आहेत. अमूक चहा, अमृततुल्य इत्यादींची फ्रांचायजीचा धंदा झाला आहे. (म्हणूनच या लेखाला मी "पाभेचा चहा" असे नाव दिले आहे हे चतुर वाचकांच्या लक्षात आलेच असेल. तर आपण आता आपला लेखक पुढे काय म्हणतो आहे ते पाहूया.)

तर अशा ब्रांडांच्या किंवा फ्रांचायजींच्या चहाच्या दुकानात पु.ल. म्हणतात तसे आपले खायचे पान घेवून पानाच्या दुकानासारखे पान तयार करण्यासारखे वाटते. तेथे आपूलकी नसते. विक्रेता केवळ किती कप धंदा झाला याचा विचार करतो. एका कपात दोन जण चहा पिवू शकत नाही. उभे राहून चहा पिणे अन तेथून निघून जाणे एवढेच साध्य होते. चहा बरोबर गप्पा होत नाहीत. किंबहूना गप्पांसाठी चहाच्या दुकानात गेले तर त्याची लज्जत काही औरच असते. या नव्या कार्पोरेट चहाच्या दुकांनात हे साध्य होत नाही. उकळीचा चहा तेथे भेटत नाही. आधीच उकळलेला अन थर्मासमधला रेसेपीदार, त्यांचा प्रोप्रायटरी फॉर्मुला असणारा चहा तेथे भेटतो. त्यामुळे तसला फ्रांचायजीचा चहा पिवून खरा चहा पिण्याचे समाधान होत नाही. आणि तो चहा तुलनेने थंडदेखील असतो हा माझा अनुभव आहे. उकळीच्या चहातली मजा नाही त्यात. तो चहा फक्त पोटात जातो. त्याने पोट भरत नाही. ते चहाचे दुकान म्हणजे त्या दुकान मालकाची अधिकची आर्थिक गुंतवणूक असते. अन टपरीवरचा चहा म्हणजे त्या दुकानदाराचा संसार असतो.

असो. चहात पाणी टाकतात किंवा पाण्याचा फुळकट चहा असतो तसे लेखात अनेक संदर्भ येवून हा चहावरचा लेख मोठा होवू शकतो. चहा पोहे अन त्या बरोबरचे किस्से, चहा बरोबर खायचे पदार्थ घेवून केलेला लेख, चहा कशात घेतात त्या वस्तू, त्यांची ठेवण. असे केले तर हा लेख म्हणजे चहाचा मळाच होईल. म्हणून असो.

चहा हा फक्त चहाच नसतो तर तो एक आपूलकीचा धागा असतो. आणि असेच धागे काढत काढत अन ते विणून विणून त्याचे असले लेखवस्त्र होते.

अन हो, तुम्ही प्रतिक्रीया देवूनही हा चहालेख वाढवू शकतात ना!

( हा चहाचा लेख मागच्या आठवड्यात लेखनाच्या आधनावर ठेवला होता. मग एक एक अनुभवाच्या, प्रसंगांची सामग्री यात टाकत गेलो. अन आज हा चहा लेख उकळी पावला अन तो तुम्हाला गाळून (मुद्रीतशोधन करून) देतो आहे. त्याचे प्राशन करा अन कसा झाला आहे तेही सांगा.)

- पाषाणभेद
२४/०९/२०१९

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> तुम्हाला आण्णाचा चहा अन नानाचा चहा माहीत आहे काय? आपल्या दुकानात गिर्‍हाईक आले तर त्याला खरोखर चहा पाजायचा असेल तर नोकराला आण्णाचा चहा आणायला सांगायचे. अन तेच फुटकळ टाईमपास करणारे गिर्‍हाईक असेल तर नानाचा चहा मागवीत अन तो येत नसे, किंवा उशीरा येत असे अन गिर्‍हाईक तो पर्यंत कंटाळून निघून जात असे.>> हे माहीत नव्हते.
छान आहे चहापुराण.

छान आहे लेख!!!

मी एकदा खरगपूरला जाताना, ट्रेनमध्ये "खराब से खराब चाय पियो!!!" हे ऐकलं होतं. आधी वाटलं ऐकण्यात चुकी झाली असेल, पण नाही! ते तसंच म्हणत होते, आणि त्या परिसरात सर्व स्टेशनवर ट्रेन थांबल्यावर तेच ऐकायला मिळालं... कारण नाही माहिती!! आता राज्य कोणतं होतं तेही आठवत नाहीये...

धन्स सामो, पद्म, ॲमी, किल्ली, ऑर्कीड यांचे की तुम्ही हा चहा चाखला. (ॲमी यांनी तर चार कप प्यायला!)

इतरांचेही धन्स ज्यांनी ह्या चहा पाहीला अन त्याचा सुगंध घेतलात. आता त्या चहात तुम्ही तुमच्या आठवणींच्या अन अनुभवांच्या वस्तू टाका अन हा चहा आणखीन फक्कड करा.

पाभेचा चहा ओपन सोर्स आहे. कोणतीही रॉयल्टी देण्याची गरज नाही. तुम्ही या रेसेपी मध्ये पाहीजे तो बदल करून तुमच्या पातेल्यात हा चहा उकळवू शकतात.

लवकर दुकान चालू करा. गि-हाईके चहासाठी खोळंबलीत.

ए चाये, चाय चाये,
गरमा गरम चाय!

तुम्ही मारामारी चा उल्लेख केला - हा चहाचा प्रकार मी सोलापुर मधे घेतला होता.
जबरी मजा !!!! चहा आणि कॉफी एकत्र !!!

शीर्षक वाचुन मला येवले, कात्रज सारखा काहीतरी पाभेचहा आहे असं वाटलेलं.
चान लिहिलम्य चहाबद्दल.

मस्त झालाय की चहा. आवडला. मागे एकदा कूठे तरी लमसा टी बद्दल वाचलं होतं, त्याची हौस म्हणून कधी कधी मी बोनव्हिटा घालून चहा पिते Lol मस्त लागतो.

नाशिक जिल्ह्यातील एका अतिदुर्गम भागात एकदा कलेक्टर भेटीला गेले होते. त्यांना बिन दुधाचा कोरा चहा कसा द्यायचा हा प्रश्न गावकऱ्यांना पडला. उन्हाळ्यात गुरे मोकाट जंगलात सोडून द्यायची व पावसाळ्यात परत आणायची प्रथा. शेवटी एका तान्ह्या बाळाच्या मातेचं वाटीभर दूध टाकून चहा बनवला व अधिकाऱ्याला चहा दिला.

मानवनिर्मित किंवा मानवौत्पादित दूधाचा चहा?
याइक्स!!!! Sad कल्पनाच करवत नाही.

वर चालू असलेल्या प्रतिसादाच्या/चर्चेच्या अनुषंगाने
“IDYLL” BY GUY DE MAUPASSANT
ही अतिशय प्रसिद्ध कथा वाचण्यासारखी आहे..

मस्तच. .. Happy

>>>>>>>खेडेगावच ते. दूध मिळालेच नाही. साखर नव्हती, गूळ होता. मग त्या माऊलीने गुळाचाच काळा चहा मला पाजला. मला तर त्याचे काही वाईट वाटले नाही कारण तसली परिस्थीती मला माहीत होती. पण त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी दिसले<<<<<<

वरचा प्रसंग वाचल्यावर मला सुधा मूर्ती यांच..

"When I stop drinking milk" हे पुस्तक आठवलं..