मी अजिबात घाबरत नाही....! - २

Submitted by मी मधुरा on 23 September, 2019 - 22:55

भाग २

तिने स्पर्श केला तसा मी शहारलो..... तिचा स्पर्श मध्यरात्रीच्या हवेतल्या गारव्यासारखा आहे. कधी आल्हाददायक, कधी नसानसांत शिरून जागीच गोठवणारा ! मी तिला भेटलो नसतो तर कदाचित हे मी मान्य केलेच नसते की हृदय नावाचा अवयव ऑपरेशन न करता असा दुसऱ्याला देता येतो आणि तरीही जिवंत राहता येते. हाहाहा! विनोद होता ओ.... नाही कळला तर सोडून द्या. तसेही माझे विनोद केवळ मलाच कळतात. पण अताशा ती सुद्धा हसते माझ्या विनोदांवर. तिला ते कळतात का नाही यावर आपण नंतर विचारमंथन करू.

तुर्तास महत्वाचे हे, की ती माझी सवय बनली आहे..... (की व्यसन?) तिला पाहिले नाही की रात्री निद्रादेवी सुद्धा माझ्यावर प्रसन्न होत नाहीत. ती भेटल्यापासून माझ्यात काहीतरी बदल झाला आहे कदाचित. म्हणूनच कि काय, जोशी बाईंनी पण मला बोलून दाखवलं.... म्हणे, 'तुम्ही आजकाल लवकर जाता घरी.' मी पण सांगितले.... 'रोज उशिरा पर्यंत इथे थांबायला मी काही सहाशी नाहीये.' सहाशी हे आमच्या ऑफिस सिक्युरिटीवाल्याचे आम्ही ठेवलेले टोपणनाव. त्याचे खरे नाव आम्हालाही माहिती नाही. आधी त्याला 'पिचकारी' म्हणायचो सगळे. रोज त्याच्या मुखकमलातून बाहेर पडणारा लाल-गडद सडा आणि त्याचे लयबद्ध उडणारे तुषार पाहून डोळे दिपले होते आम्हा कर्मचाऱ्यांचे. आम्ही कैकदा सांगितले होते.... 'महाराज, या अनुकृपेची गरज आपल्या ऑफिस च्या कुंपणभिंतीला नसून आपली ही रंगरंगोटीची समाजसेवा दुसरीकडे जाऊन करा कुठेतरी.' पण तो लाल- काळे दात दाखवत हसायचा आणि फाटक्या खिशात हात घालून पुढचे गुटख्याचे पाकिट शोधायचा. आमच्या कुंपणाची भिंत वरच्या बाजूने पांढरी आणि खालच्या बाजूने मळकट तपकिरी बनली होती. तो लाल रंग पाहिला की रक्त पिण्याची इच्छाच मरून जायची. त्याने गेटजवळच्या भिंतीवर केलेले रंगकाम आमच्या बॉस च्या नजरेत खुपू लागले आणि पिचकारीला सरळ हुद्द्यावरून खालसा करण्याची धमकीच मिळाली. लातोंके भूत बातोंसे नही मानते! त्याने एकदाचे गुटखा खाणे बंद केले. हुश्श....

आणि पुढच्याच दिवसापासून त्याने तंबाखू खायला सुरवात केली. 'कप्पाळ माझं' बॉसने डोक्यावर हात मारून घेतला. पण निदान रंगाऱ्याचे रंगकाम थांबले. 'पिचकारी' ते 'सहाशी' च्या त्याच्या प्रवासाचे आम्ही साक्षीदार होतोच. गुटखा सुटून हातात तंबाखू आली पण त्याचे पांढऱ्या रंगाशी असलेले वैर मात्र कायम आहे. आधी भिंतीवरचा पांढरा रंग झाकायचे काम करायचा आणि आता तोंडातले पांढरे दात किडवून काळे करण्याचं काम जोमाने करतो आहे. बाकी सगळ्या दातांनी त्याच्या प्रयत्न सातत्यांना बघून साष्टांग दंडवत घालत त्याच्या जबड्याची रजा घेतली. तरीही त्याचे दर्शनी भागातले सहा दात मात्र हट्टाने मूळाशी धरून उभे होते. म्हणून तो सहाशी! ('बत्तिशी' म्हणायला २६ दात कमी पडतात फक्त.)

आजकाल तो सुद्धा माझ्याकडे बघून सलाम करत नाही. का करेल? मी त्याला एक दिमडी सुद्धा देणार नाही हे माहिती आहे त्याला. मी व्यसनांकरता पैसे अजिबात उधळत नाही. मला स्वतःलाही कोणते व्यसन नाहीये. पण कदाचित एक आहे..... तिचे! तिच्याशी केवळ गप्पा मारायला म्हणून मी मि.धोत्रींची फाईल सुद्धा पेंडिंग ठेवू शकतो. पण माझ्या रहस्याबद्दल तिला सर्व ठाऊक आहे, असा संशय येतो मला कधी कधी. पण तस असेल तर ती उत्तम अभिनेत्री असायला हवी. चेहऱ्यावरून ती मला घाबरत असावी असं वाटत नाही अजिबात. पण अताशा मलाच भिती वाटते. माझ्या स्वतःच्याच वागण्याची. मागच्या वेळी दोनदा मी माझी रक्ताची तहान अतृप्त ठेवली.... सावज अगदी नाजूक होते.... अगदी त्याच पलाश मार्गवाल्या रस्त्यावर. यावेळी तर खविस, मुंजा, हडळ..... वगैरे कोणी मधे पडणार नव्हते. पण मी अर्धवट रक्त पिऊन त्या माणसांना जिवंत सोडून दिले. डोक्यावर विशिष्ट पद्धतीने फटका मारून त्यांच्या स्मरणातून तो प्रसंग हटवला आणि वर त्यांना मानवांच्या वस्तीत सोडून आलो माझ्याच बाईक वरून.

मला दाट शंका येते आहे. यांचे रक्त पिऊन-पिऊन माझ्याच नसांमध्ये मानवता वगैरे वाहायला लागली नसेल ना? तो पलाश मार्ग.... आणि तो वाडा..... माझ्या घराच्या समोरचा! या ठिकाणांना सर्वजण घाबरून असायचे. अंधश्रद्धाळू कुठले! तो वाडा झपाटलेला आहे अशी अफवा पसरवली होती साऱ्यांनी. मी तिथे गेलो तेव्हा एकजण आयता सापडला. डॉक्युमेंट्री बनवायला आला होता कॅमेरा घेऊन 'हॉंटेड हाऊस' वर. म्हणाला 'थ्रिलर बनवायचे आहे.' मनाचा मोठेपणा ओ! मी खूप मदत केली. एकदम लाईव्ह थ्रिलर अनुभव दिला त्याला! आता त्याची डॉक्युमेंट्री बनू शकली नाही हा काही माझा दोष नाही. त्याचाच आहे. उगाच माझ्या भुकेच्या वेळेला कॅमेरा घेऊन तिथे यायची गरज होती का? पण बाकी काहीही असो, त्याची डॉक्युमेंट्री पूर्ण व्हायला हवी होती. अर्थात फायदा माझाच होणार होता. वाडा झपाटलेला आहे ही अंधश्रद्धा दूर झाली असती आणि लोक त्या निमित्ताने तरी वाडा बघायला आले असते. माझी सोय झाली असती ओ, बाकी काय? पण आता माझं स्वातंत्र्य तिने हिरावून घेतलं होतं. तिलाही राहायला तोच वाडा मिळाला? कमी खर्च म्हणून लोक अगदी पिंपळाच्या झाडावरही घर बांधायला कमी करणार नाहीत अशी भिती वाटते मला. आणि तसं झालंच तर तो मुंजा-पक्या माझ्याकरता काहीही शिल्लक ठेवणार नाही!

एकदा मी खिडकीतून बाहेर डोकावत होतो, आणि समोरच्या खिडकीत ती दिसली. कपडे वाळत घालत होती. तेव्हा.... अगदी तेव्हाच रेडिओवर गाण लागलं होतं..... 'मेरे सामाने वाले खिडकीमे....' एकदा मनात विचारही आला. कामसू आहे, एकटी आहे.... आयर्न चांगलं असणार रक्तात. तुम्हाला सांगतो आजकाल लोक फास्टफूडच्या नावाखाली जंकफूड खातात. चवच राहत नाही रक्ताला. हिच्या कडे बघूनच कळतं किती योग्य आहार आहे तिचा ते. हिमग्लोबिन आणि आयर्न कमी असणार रक्त अजिबात चांगले लागत नाही. बाकी हिचे मस्त असणार चवीला. पण 'का' काय माहिती, मी तिच्याकडे बघून तोंडाला आलेलं पाणी पुसत लक्ष वेधवायला टिव्ही लावून बसलो.

बातम्यांच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवण्याचे काम मिडिया अविरतपणे करत आली आहे आजवर; आत्ताही तेच सुरु होते. खरतरं पाहायलाच नकोत बातम्या. मला सांगा, काही राहिले आहे का पाहण्यासारखे आजकाल टिव्हीवर? 'चित्रपट' असे उत्तर देऊ नका. त्यात व्हॅमपायरची सर्रास बदनामी चालते! माझ्याकडून चित्रपट बनवणाऱ्यांचा तिव्र निषेध.
अर्थात 'का' ते सर्वांना कळणार नाही. अहो, एका चित्रपटात एक वटवाघूळ एका माणसाला त्याच्या मानेत दात खूपसून पिशाच्च बनवते असे दाखवले होते. कै च्या कै लॉजिक आहे! आता मला सांगा, माकडाने चावल्यावर माणूस मि. वागळे बनतो का? उगाच आपलं काहीतरी!
एका चित्रपटात तर पिशाच्च स्वतःच चक्क वटवाघूळ बनून उडताना दाखवला. उद्या पिशाच्च म्हणजे इच्छाधारी डास असतो, असेही म्हणायला कमी करणार नाहीत हे. याही पलीकडे जाऊन त्यांची कल्पनाशक्ती, अफाट-अथांग अश्या सिनेमॅटीक लिबर्टीच्या अवकाशात त्यांना नसलेल्या अकलेचे तारे तोडते तेव्हा मात्र अगदी हताश व्हायला होते. त्यांनी एक पिशाच्च चक्क पाल खाताना दाखवला. याक्! यापेक्षा एकवेळ मी पुणेकरांनी केलेला अपमान सहन करेन. हे सिनेमावाले नक्की काय समजतात आम्हाला? किडे-मकोडे, सरपटणारे प्राणी खाणारे जनावर? की इच्छाधारी पक्षी? तरी बरं..... अजून एकता कपूरला ही 'इच्छाधारी पक्षी' संकल्पना क्लिक झालेली नाही!

एकदा भेटू देत ओ पिशाच्चांवर चित्रपट बनवणाऱ्यांपैकी कोणी. नाही त्याच्या पृष्ठभागाच्या वक्र प्रतलावर लाथरुपी प्रसाद दिला ना, तर नाव नाही लावणार माझ्या डेस्कच्या पाटीवर माझं. तसं अजूनही माझ्या डेस्कवर माझ्या नावाची पाटी लागलेली नाहीये, हा भाग वेगळा!

तसही, मी तिला पाहिल्यापासून ऑफिस मध्ये कमी आणि घरी जास्त असतो. खिडकीत उभा राहून मी तिच्याकडे बघत असतो तासनतास. साधी आणि सुंदर आहे ती. तिच्या डोळ्यांत एक वेगळीच नशा आहे. कोणती माहित नाही, पण तुम्ही समजता ती नक्कीच नाही. ते मादक नजर वगैरे सेंसॉरशिपवालं 'A' सर्टिफाइड इकडे काहीही नाहीये. माझ्याबाबतीत असली कोणतीही अंधश्रद्धा बाळगू नका! मी ही बाळगत नाही. मी खविस, मुंजा, भूत, चेटकीण, हडळ वगैरे कश्यालाही अजिबात घाबरत नाही. पण बहुदा ती घाबरत असावी. ती रात्री एकटी जात नाही ना कुठेही बाहेर. तसा मी काही रात्रभर तिच्या घराकडे नजर लावून बसलेलो नसतो. पण रात्रीसुद्धा तिच्या खोलीत प्रकाश असतो म्हणून म्हणालो.

माझ्या घराच्या समोरच्या पडक्या घरात ती राहायला आली आणि माझा एक डायनिंग हॉल कायमचा बंद झाला. तशी माझी काळजी करू नका. पलाश मार्ग आहे ना अजून!

मला जोशी बाई काही दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्या. "तुम्ही लवकरच प्रेमात पडणार आहात." आणि त्यांच्याच डब्यावर ताव मारत मी त्यांची पुरेपूर खिल्ली उडवली होती. त्यांनी मला 'पलाश मार्गावरून जपून जा.' असेही अनेकदा सुचकपणे सांगितले होतेच की. कुठे काय त्रास देऊ शकले बाकीचे मला? खविस तर माझ्या वाटेला जातच नाही. चेटकीणीला काहीही रस नाही या सगळ्यात. भूतांना तर काहीच देणे घेणे नसते. बिचारी झाडावर निमुटपणे बसलेली असतात नुसती. हडळ तर चार हात लांबच राहते खविसामुळे. मुंजाही प्रयत्न करून थकलाय. पण मी अजूनही नीट आहे. मग यावेळी काय खात्री आहे की मी प्रेमात पडेन, वालं त्यांच वक्तव्य तरी खरं ठरेल? कारण हडळीला तर मी जवळही फिरकू देणार नाही. चेटकीण नकोच. आमचे जमायचेच नाही आणि दुसरी पिशाच्च पण नको. भांडणं होतील आमच्यात सावजावरून. (नवरा बायको खूप भांडतात म्हणे. तेही कारण नसताना. इथे तर ठोस कारण असेल.) मग....... माणूस?

'हे सनबर्नचे डाग आहेत का?' असं मला तिने विचारलं तेव्हापासून मला माझं गुपित तिच्यासमोर उघड पडेल की काय अशी भिती वाटते आहे. तरी मी अंग पूर्णपणे झाकून बाहेर पडतो पण ऐनवेळी तिच्याकडे जाताना हाताची गुंडी लावायची राहिली होती आणि भाजलं.
आमची घट्ट मैत्री केव्हा झाली कळलंच नाही. पण जाणवलं, जेव्हापासून तिची श्रद्धा म्हणून मी हातात चक्क काळा धागा बांधून फिरू लागलो. जोशी बाईंनी लगेच विचारलं..... "काय हो? हे काय? तुम्ही तर मानत नाही ना हे सगळं?" लगेच बेरक्याने मधे तोंड उघडून टोमणा मारून घेतला, "कोणीतरी म्हणलं होतं ना की मी हवतर कुत्र-मांजर पाळेन पण अंधश्रद्धा नाही." तेव्हा द्यायला उत्तरच नव्हतं माझ्याकडे.

ती माझ्यावर जादू वगैरे करत असावी की काय? चेटकीण असेल? पण देवापुढे धुप जाळून कुठे तारूण्यरस तयार करता येतो? मग.... मग मी कसा इतकं तिच्या ताब्यात गेलो? ती हडळ तर नसेल? पण मग आमचे पटेल कसे? बहुदा...... पिशाच्च? पण मग मी नक्कीच ओळखले असते आणि माणूस असेल तर अजिबातच नको.... कधी मलाच तिच्या रक्ताची तहान लागली तर? आणि मानवांचे आयुष्य तरी किती? फार फार तर १५०. त्या नंदिताआज्जीसारख. मग नंतर मी एकटाच राहू, आठवणींच ओझं घेऊन? नाही. काही गरज नाही. आणि अन्नावरच प्रेम केलं तर जगायचं कसं?

अमावास्येची रात्र! मी तिथे पोचलो तेव्हा सगळे झोपले होते. फक्त एकच नर्स अर्धवट जागी होती. पांढऱ्या कपड्यात लाल लिपस्टिक लाऊन. एकांत..... शांतता.... रात्रीचा हवेत भिनलेला गारवा.... ही संधी कदाचित परत मिळणार नाही. मी दबक्या पावलांनी पुढे गेलो...... आज मात्र मला रहावले नाही. मी प्रयत्न केला स्वतःवर संयम ठेवायचा. माझ्यासाठी नाही. तिच्यासाठी. अगदी तिने मला बांधलेला धागा पण नजरेस पडला, पण...... शेवटी......
मी सरळ पाच-सहा ब्लड बॉटल तिथल्या फ्रिजमधून उचलल्या आणि पळवून आणल्या ब्लड बॅंकेतून. मान्य आहे, २-३ सुद्धा पुरल्या असत्या, पण आठवड्याभराचा स्टॉक आणून ठेवण्याचा मोह आवरला नाही. आणि मी काही चोर नाहीये नेहमी नेहमी जाऊन असं चोरून आणायला. पण यातही माझी काही चूक नाहीये. मी खरेदी करायला म्हणून आधी गेलो तेव्हा ब्लड बॅंक वाले विचारत होते, वेगवेगळ्या ब्लडगृपच रक्त का हवयं म्हणून. त्यात गावच हॉस्पिटल आणि ब्लड बॅंक एकाच बिल्डिंगमध्ये. मित्रांचा गृप ॲक्सिडेंट झालाय ही थाप खपणार नव्हती. आता यांना खरं कसं सांगू? रोज ऑरेंज ज्युस पिऊन तुम्ही कंटाळल्यावर ॲप्पल ज्युस पिता कि नाही? मग व्हरायटी नको का मलाही?

अर्थात हे चूक आहे, वर हे असं थंड रक्त बेचव लागतं, हे सर्व मला माहित आहे. पण अताशा कोणाला आपल्या भूकेकरता मारणं.... जीवावर येत माझ्या.
मी एकदम माणसांसारखं बोलू लागलो आहे का? नाही.... असं करून चालणार नाही. नेहमी असं ऱक्त पळवू लागलो तर कधी ना कधी ते पकडतीलच. मी अंधश्रद्धा बाळगत नाही आणि भूत, खविस, मुंजा, हडळ, चेटकीण वगैरे ला अजिबात घाबरत नाही, पण माणसांच्या बुद्धीला घाबरतो. अर्थात इथे सर्वांकडे ती नाही म्हणून माझं गुपित अजून शाबूत आहे.
पण ती बुद्धीमान आहे. तिच्या हालचालींवरून ती जाणवू देत नाही, पण तिला माझ्याबद्दल नक्कीच खूप काही माहित आहे. तसे नसते तर तिने मला सकाळी नेले असते मंदिरात. सगळे सकाळीच जातात. पण सुर्य मावळल्याशिवाय ती मला बाहेर जायचा आग्रह करत नाही.

माझ्या मानेजवळ पहाटेच्या गारव्या सारखा..... मऊ हातांचा थंड स्पर्श झाल्यासरशी मी शहारलो. हात फिरवून सोफ्यावर पाडत मी सेल्फडिफेंस ॲक्षन करणार तर समोर 'ती' !
"काय करतोयस अरे?" सोफ्यावर रुतून बसत घाम पुसत तिने घाबरून विचारलं.

"ओह, सॉरी. मला कल्पना नव्हती की तू आहेस."
"हरकत नाही. तू तरी कुठे सामान्य माणूस आहेस रे?"
"म्ह... म्ह... म्हणजे?" मी पुरता घाबरलो होतो. तसा मी कोणालाही अजिबात घाबरत नाही. पण....
"रोज गुंड येतात नै का तुझ्या अंगावर धावून! म्हणून कोणी हात जरी लावला की लगेच साहेबांची मारामारी सुरू. हल्ली खूप दाक्षिणात्य सिनेमे पाहतो आहेस वाटते." ती खट्याळपणे हसली.
घ्या! प्रेमात पडून-पडून बोंबलायला हिच्याच प्रेमात पडलो? आणि मला वाटतं होतं की ही एकतर बुद्धीमान तरी आहे किंवा चेटकीण तरी किंवा हडळ तरी.... अगदीच नाहीतर काही अमानवी तरी!
'प्रेमात' म्हणलो मी? नाही, नाही.... भास झाला असेल तसा तुम्हाला. मी काही कोणाच्या प्रेमात पडलेलो नाहीये. बघताय काय असे? मला एकदा सांगूनच टाका. तुम्ही नक्की कोणाच्या बाजूने आहात? माझ्या कि जोशी बाईंच्या? सद्ध्या गार-ढोण शीळ रक्त पिण्याची सवय झाली असली तरी ताज्या रक्ताची चव अजूनही मला आवडते, हेही लक्षात असू द्या उत्तर देताना!

"ऐक ना, मला शहरात जायचे आहे."
"का? कश्याला? असं एकदम? आणि मधेच कशी काय....."
"अरे हो?! प्रश्नांची सरबत्ती थांबवलीस तर उत्तर देऊ शकेन ना मी!"
"सॉरी, बोल."
"मी शहरातल्या ब्रांच ला अप्प्लय केलं होतं आणि इंटरव्हू कॉल आला आहे मला." तिच्या चेहऱ्यावरून उत्साह ओसंडून चालला होता.
"काय?"
मी क्षणभर बधिर झाल्यासारखा उभा राहिलो. तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि माझ्या चेहऱ्यावरची स्मशाणशांतता!
"हे काय? अरे, इंटरव्हू म्हणजे मला बोलावलयं त्यांनी तिकडे मुलाखती करता."
"हो कळालं."
"अरे मग असा काय तू....."
"कधी आहे इंटरव्हू?"
"उद्या सकाळी."
"हम्म."
"तू ठिक आहेस ना? कुठे पडला वगैरे नव्हतास ना डोक्यावर मी येण्याआधी?"
मी कशी मान हलवली मलाही कळलं नाही.
"'हो' की 'नाही'?"
"सोड ना....जा तू."
"अरे? हे असं का वागतोयस तू?"
"तुला काही मदत लागली तर कळवं. माझा नंबर आहेच तुझ्याकडे."

मी सोफ्यावर बसून राहिलो. मला राग आला होता. कोणाचा? माहिती नाही. पण आला होता. ती काही क्षण नुसतीच उभी राहिली. मग जाऊ लागली.

"इथला जॉब काय वाईट होता?"
"समाधानकारक तरी कुठे आहे? तिथे सुरक्षित वातावरणही आहे आणि पॅकेजही छान आहे."
"इथे काय असुरक्षित आहे तुझ्याकरता?"
"काय नाहीये? सांग ना, काय नाहीये इथे असुरक्षित? इथे राहायचं एक कारण दे मला."
"मला नाही वाटतं इथे काही आहे ज्याला मी असताना घाबरण्याची गरज आहे तुला." (बाय बोथ वेज अराउंड! कारण माझ्याहून भयानक कोण होत तिथे तिने घाबरायला?)
"मी जिथे राहते त्या वाड्याबद्दल काय म्हणतात सगळे माहिती आहे ना? आणि तो पलाश मार्ग माझ्या रोजच्या जाण्यायेण्याचा एकमेव मार्ग आहे. तु ऐकल्या असशीलच तिथल्या बातम्या."
"अगं पण घाबरून पळून कसे चालेल?माझ्याकडे बघ, मी....."
"भूत, खविस, मुंजा, हडळ वगैरेला घाबरत नाहीस! पाठ झालंय. किती थापा मारशील अरे?"
"थाप कसली अगं त्यात?"
"तू? तू घाबरत नाहीस? आत्ता मी आले तेव्हा घाबरून तू मला सोफ्यावर ढकललंस, विसरला नाहीस ना?"
"सी.... ॲम रिअरी सॉरी अबाऊट दॅट!"
"दॅट्स ओके. मी आजच निघते आहे. ही द्यायला आले होते. म्हणलं सोबत खुशखबर ऐकवूया. पण इकडे वेगळाच सिन चालू आहे तुझा." हातात किल्ली ठेवून 'रियाज चाचाला दे आठवणीने' म्हणत ती निघून गेली.

मला बोलायचंच नाहीये. कोणाशीच नाही. तुमच्याशीही नाही.
तुम्ही का नाही अडवलतं ओ तिला?
'का अडवायचं' काय? असं अमावास्येच्या रात्री एकट जाणं योग्य आहे का? सांगा तुम्हीच!
मी?
मी का आडवू?
काय संबंध?
मी म्हटलं ना मी काही प्रेमात वगैरे नाहीये.

हातातला तिने बांधलेला धागा काढला आणि नेऊन टेबलावर ठेवला.
मला सांगा, तिला तरी कुठे.....एक मिनिटं! ती गावाकडून शहराकडे जाणार. तेही पलाश मार्गावरून? अरे देवा! त्यांनी.... त्यांनी तिला पाहिले आहे माझ्यासोबत. अनेकदा. आणि मी सोबत नाही म्हणाल्यावर.....

"ए..... थांब!" मी आजपर्यंतच्या आयुष्यात पहिल्यांदा हेल्मेट न घालता गाडीला किक मारली.

क्रमश:

भाग ३

https://www.maayboli.com/node/71699

©मधुरा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मन्या, धन्यवाद आणि त्याचं नाव हॉटेल ट्रंस्वेलेनिया का काहीतरी आहे बहुतेक...... Biggrin

अंकु, मन्या,
पुढचा आणि अंतिम भाग:
https://www.maayboli.com/node/71699