रंग मातीचा

Submitted by _तृप्ती_ on 22 September, 2019 - 23:29

हा पॉटरी स्टुडिओ तिच्या ऑफिसच्या अगदी जवळच होता. ती तिथे ३-४ वेळा तरी जाऊन आली होती. पण वर्कशॉपला जायला जमत नव्हतं. ती पहिल्यांदा आली ते निव्वळ वेळ घालवण्यासाठी. घरी जाऊन करण्यासारखं काहीच नव्हतं आणि ऑफिसमध्ये नसलेली कामं करत वेळ काढणार तरी किती. आतमध्ये एका बाजूला वेगवेगळ्या आकाराचे, रंगांचे, मातीचे घडे, कप, भांडी, मूर्ती आणि अजून काही सुंदर वस्तू मांडून ठेवल्या होत्या. मागे मंद संगीत सुरु होतं. ती एक एक वस्तू न्याहाळत पुढे चालली होती. प्रत्येक वस्तूसमोर ती बनवणाऱ्या कलाकाराचे नाव आणि मुख्य म्हणजे वयही लिहिलं होतं. तिला सुरुवातीला वाटलं, वय लिहिण्यात काय अर्थ आहे. मग तिच्या लक्षात आलं. त्या सगळ्या कलाकृतींना वयाचं बंधन नव्हतं. तिथे ५ वर्षांच्या मुलापासून ८० वर्षाच्या आजीपर्यंत अनेकांनी वस्तू बनवल्या होत्या. ती पुढे आली. तिथे तिला तो दिसला. त्याला बघून तिला हसूच आलं. मातीच्या ढिगाऱ्यात पाय घालून तो यथेच्छ नाचत होता. त्याचे पाय जवळजवळ गुडघ्यापर्यंत मातीने माखले होते. हातही बरबटलेले होते. त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. "काय हो? तुम्हाला पण यायचंय का?" तिला वाटलं काहीतरीच काय. मागच्या बाजूला कोणी चाकावर पॉट बनवत होतं, कोणी रंग देत होतं, कोणी मातीचा गोळा बनवत होतं. ती कॉऊंटरवर आली, तेव्हा मगाचचा तो तिथे. तेव्हा तिला समजलं की हाच माणूस या पॉटरी स्टुडिओचा मालक आहे. तोच म्हणाला मग, “आवडला का स्टुडिओ?" “हो. माझा वेळ कसा गेला कळलंच नाही" त्याने त्याच्या वर्कशॉपचे माहितीपत्रक दिले. "तुम्हाला मातीत मनसोक्त खेळायचं असेल तर नक्की या" तो हसून म्हणाला आणि पुन्हा आपल्या कामाला निघून गेला. ती काही वेळ तिथे रेंगाळली. मग निघून गेली. पण तो स्टुडिओ मनात कुठेतरी घर करून बसला होता आणि आजकाल तर तिच्या विरंगुळयाचं साधन झाला होता. ती दिसायला तशी साधीच. काळी सावळी पण पाणीदार डोळे. आजकाल त्या डोळ्यातली चमक नाहीशीच झाली होती. तशी ती उच्चशिक्षित होती आणि एका मोठ्या कंपनीमध्ये उच्च पदावरही होती. पण विरंगुळ्याची ठिकाणं कमी कमी होत आता नाहीशी व्हायला लागली होती. मग तिने आज या वर्कशॉपला यायचं असं ठरवलं. तिला मनातून शंका होती की मातीचं काही बनवणं आपल्याला जमेल का? आवडेल का? ती आली होती ते खर तर त्या जागेच्या मोहाने. तिला तिथलं वातावरण फार आवडायचं. मातीत हात घालून बसलेली माणसं. स्वतःच्या विश्वात मग्न. कुठे कुणाची काहीतरी बनवण्यासाठी चाललेली गडबड, कोणी मातीत कोपरभर हात घालून, स्वतःच्या कपड्याचीही पर्वा न करणारी माणसं, कोणी हातातल्या ब्रशने मातीला रंग लावणारी आणि या सगळयांना शिकवणारा, हसतमुख, थोडासा मिश्किल, असा तो. तिला तर ती सगळी माणसचं एखाद्या मूर्तीसारखी वाटायची.
ती आत शिरली. तिथे वर्कशॉपला आलेले ६-७ जणं होते. हे सगळे लोकं तिला पुढचे ३ रविवार तरी भेटणार होते. त्याने सगळ्यांना वर्कशॉपचा आराखडा सांगितला आणि म्हणाला आता आधी मातीची ओळख करून घ्या, मग पुढे सुरवात करू. एका बाजूला मातीचे वेगवेगळे छोटे ढीग केले होते. पहिली गोष्ट शिकायची होती ती माती मळायला. तो एकेकाला समजावून सांगत होता. तिलाही सांगितलं. पण तिला सुरुवातच करता येत नव्हती. म्हणजे मातीत हात घालून सगळं बरबटून घ्यायला तिला आवडत नव्हतं. तिने बराच वेळ एका खुरप्याने, शक्यतो हाताला माती लागू न देता कालवण्याचा प्रयत्न केला. पण माती एकसारखी कालवायची तर हात घालायलाच लागणार होता. तिला तिच्या कपड्यांना माती लागलेली आवडत नव्हती. थोडी चेहऱ्यालाही लागली असावी. तिला वाटलंच, तरी बरं मातीचा रंग माझ्या रंगाशी मिळताजुळता आहे. तिला काही तो सगळा प्रकार फारसा आवडेना. तिने आजूबाजूला पाहिलं. सगळेच सुरवातीला गांगरले होते. पण हळूहळू सगळ्यांनीच मनसोक्त हात बरबटायला सुरवात केली होती. सगळेच मातीच्या खेळात पुरते बुडाले. कोणालाही आपण किती मळलो आहे, गालाला माती लागली आहे का नाकाला की केसाला याचं भानच उरलं नव्हतं. तो सगळीकडे फिरून ज्याला जे लागेल ते आणून देत होता. माती मळायला मदत करत होता. आता ती सोडून सगळे मातीच्या या खेळाला तयार झाले होते. काही जणांनी तर उत्साहाने पायाने माती कालवता येते का ते पण पाहिले. तिला आता ते चित्र नेहमीसारखं आनंदी, उत्साहाने भरलेल दिसायला लागलं. मनमोकळे हसणारे चेहरे, मातीच्या गंधाने मोहून गेले होते. बघता बघता तीन तास संपले. तिला जरा बरंच वाटलं. पुढच्या वेळेस मातीमध्ये इतका हात घालायला लागणार नव्हतं. सगळे निघाले. तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं. तो तिने मळलेला मातीचा गोळा हाताने पुन्हा मळत होता. तो कामात इतका बुडाला होता की ती जवळ उभी असूनही त्याचं लक्ष गेल नाही. त्याने गोळा सारखा केला आणि एका बाजूला ठेवला. आता त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं. तिच म्हणाली, “मला जमलं नाही माती मळायला. बहुतेक मातीचं काही बनवायला जमायचं नाही मला." "तुम्ही प्रयत्नच केला नाही तर कसं जमणार?" तिला समजलं नाही. “वर्कशॉपमध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला दिवस. आज तुम्हाला मातीशी नातं जोडायचं असतं." तिचा प्रश्न. "असं हात बरबटून?" तो हसतो. “तुम्ही तर माती जराही अंगाला लागू दिली नाहीत. जोपर्यन्त मातीचा स्पर्श अंगाला होत नाही, तोपर्यँत तिचा पोत, तिचा गंध, तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, तिची आकार घेण्याची क्षमता, हे सगळं कसं कळणार? तुम्ही तो स्पर्शच नाकारलात." त्याच्या आवाजात थोडी नाराजी. मग तोच सावरून. "हरकत नाही. पुढच्या कुठल्यातरी सेशनमध्ये तुमची होईल मातीशी मैत्री. मातीतूनच आलो सगळे आणि मातीतच विलीन होणार. तिला नकार कसा देणार? जमेल तुम्हाला. तुम्ही फक्त कशाचीही काळजी न करता मातीशी मैत्री करा." ती हसून म्हणाली, "बाकीचे सगळे मातीमध्ये छान लडबडले होते. मला तुमच्या वर्कशॉपचं हे वातावरण फार आवडतं. एकदम फुलेललं." आणि तिला कुठेतरी खोलवर जाणवलं की हे फुलणंच ती विसरून गेली आहे. ती तिथून निघाली.
पुढच्या रविवारी पुन्हा सगळे हसरे चेहरे, मातीत हात घालायला आसुसलेले. आज मातीचा गोळा घेऊन त्याला चाकावर आकार देण्याचं तंत्र शिकायचं होतं. प्रत्येकाला हवा तो आकार निवडायचा होता. त्याप्रमाणे चाक कसं फिरवायचं, मातीवर किती दाब द्यायचा आणि चाकाचा वेग, हा सगळा ताळमेळ घालायचा होता. सगळे सरसावले. चाकं फिरू लागली. ती मन लावून आकार द्यायचा प्रयत्न करत होती. वाटतं तितकं सोपं काम नव्हतं ते. जितक्या सहजतेने स्टुडिओचा मालक दाखवत होता तसं जमणं तर कठीण होतं. तिच्या शेजारच्या छोट्या मुलाने त्यामानाने पटकन हे तंत्र आत्मसात केलं आणि छोटा पॉट तयार सुद्धा केला. तो उत्साहाने सगळयांना दाखवत इकडून तिकडे फिरत होता. एवढ्यात तिचा धक्का लागला. मुलाच्या हातातून पॉट खाली पडला. तिला वाटलं हा मुलगा आता नाराज होणार. पण झालं उलटंच. त्याने पुन्हा एकदा मातीचा ढीग मागून घेतला. त्याला त्याने कालवलेल्या मातीचाच पॉट करायचा होता. पुन्हा मातीत हात घालायला मिळणार म्हणून तो खुश. तिला मात्र मनातून अपराधी वाटत होतं. चुकून का होईना पण तिचाच धक्का लागला होता. ती त्या छोट्या मुलाला माती मळायला मदत करायला लागली. त्याच्याशी बोलता बोलता तिनेही मातीत हात घातले. तो जरा जरा वेळाने मातीत अगदी जवळ जाऊन मातीचा वास घेत होता. तिला गंमत वाटली. "काय रे, लांबून सुद्धा वास येतो की. इतकं नाक आत कशाला घालायला हवं." “अगं घालून तर बघ. मज्जा येते. मला फार आवडतो हा वास. तू पण कर ना." तिने पण मातीत नाक घातलं. भरभरून मातीचा वास आला. तिच्या नाकाला सुद्धा माती लागली. हातही कोपरापर्यन्त माखले. तो स्पर्श फार मुलायम होता. पुढचा काही वेळ कसा निघून गेला ते तिला कळलंच नाही. एवढ्यात तो तिथे आला. त्या दोघांना इतकं रमबाण झालेलं बघून त्याने ती छबी कॅमेरामध्ये बंद केली. तिच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी. "तुमच्या परवानगीशिवाय हा फोटो कुठेही वापरणार नाही. पण तुम्ही दोघं फार सुंदर दिसत होतात." "छे. मी काही सुंदर नाही" ती नकळत बोलून गेली. तिच्या डोळ्यासमोर नुकताच मिळालेला पन्नासावा नकार तरळून गेला. त्याही स्थितीत तिला थोडं हसूच आलं. चला म्हणजे अर्धशतक तर पदरात पडलं. "अहो, कुठे हरवलात? तुम्हीच पहा फोटो आणि सांगा. मागच्यावेळेस मातीत हात घातला नव्हतात त्यामुळे आज घालायला लागला. मातीचा रंग लागला की सगळे सुंदरच दिसतात मला." ती विचारातच बोलून गेली, "माझ्या काळया रंगावर तर माती दिसतही नसेल. अजूनच विचित्र दिसत असेंन मी" तो तिला चिडवत म्हणाला, "हो. विचित्र नक्की दिसताय. नाकाला माती. केसाला माती, गालाला माती. कार्टूनच म्हणा की.“ तिच्या डोळ्यात अचानक पाणी दाटून आले. त्याला कळलंच नाही. “मी सहज म्हणालो. तुम्हाला आवडलं नसेल तर सॉरी." ती जरा सावरून,”दोष तुमचा नाहीये. मला माहिती आहे मी सुंदर नाही. कितीही मेकअप केला तरी, मी सुंदर दिसत नाही. माझ्या रंगाचा दोष आहे." त्याला काय बोलावं समजेना. "रंगाचा दोष? सुंदर असण्याशी रंगाचा काय संबंध? मग मातीचे हे सगळे पॉट्स सुंदर नाहीत का? त्याचा सुद्धा रंग लाल,काळाच आहे की? “ती खिन्न हसली.”मातीला कोणाशीच लग्न करायचं नाहीये, म्हणून बरं. लग्नाच्या बाजारात काळ्या रंगाला किंमत नाही. असू दे. मला सवय झालीये आता नकार ऐकण्याची." तो बोलत बोलत तिला मातीला आकार द्यायला शिकवू लागला. "तुम्हाला एक सांगू. मला बाहेरून दिलेले रंग फारसे आवडत नाहीत. मातीचा खरा रंगच जास्त चांगला दिसतो. बाहेरच्या रंगानी शोभा येते पण सुंदरता नाही.” तो पुढे बोलत राहिला आणि ती ऐकत, “माझ्याकडे येणारे सगळेजण मातीत हात घालायला लागले की आपोआप खुलायला लागतात. मनमुराद हसतात. हे सगळं मला फार आवडतं. कारण ते सगळं आतून फुललेल असतं. आतून फुललेलं सगळंच फार सुंदर असतो हो. त्याला काही रंग, रूप अशी बंधनं नसतात. तुम्ही जेव्हा मोकळेपणानी मातीत हात घातलात, मातीचा वास भरून घेतलात, मनापासून हसलात, सुंदर होतं ते चित्र. कोणाला काय वाटतं त्यापेक्षा आतून काय खुलतं ते महत्वाचं. मगाशी तुम्ही हसलात ना, ते मिस वर्ल्डला सुद्धा चॅलेन्ज करेल“ तिला खरंच हसू आलं. तीही थोडी मोकळी होत म्हणाली, "हे सगळं ऐकायला छान आहे हो. पण त्याने काही नवरा मिळत नाही ना." त्यानेही मान डोलवली, "अहो तो मिळवणं मिस वर्ल्डला तरी कुठे सोपं आहे? रंग हे एक कारण असेल. पण आपण स्वतःला दोष का द्यायचा? प्रत्येक मातीच्या गोळ्यामधून ठरवलं तर काहीतरी सुंदर नक्कीच बनतं" बोलत बोलत ती चाक फिरवत, मातीच्या गोळ्याला आकार देत होती. हळूहळू एक नक्षीदार घडा आकार घ्यायला लागला. मातीच्या गोळ्यावरून हात फिरवता फिरवता तिच्या मनातही कुठेतरी चक्र फिरत होती. जसा जसा घडा आकार घायला लागला तशी तिच्या मनावरची मरगळही गळून पडायला लागली. घडा सुंदरच बनला होता पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे तिने त्याला कुठलाही रंग द्यायचा नाही हे ठरवूनच टाकलं होतं. मातीच्या गंधाने भारूनच ती आज घरी गेली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खुप छान .. आवडल>
माती हा माझ्य जिव्हाळ्याचा विषय Happy

ठीकंय.

बाकी सगळं वर्णन छानेय. पण उच्चशिक्षित, मोठ्या कंपनीमध्ये उच्च पदावर असणारी बाई
”मातीला कोणाशीच लग्न करायचं नाहीये, म्हणून बरं. लग्नाच्या बाजारात काळ्या रंगाला किंमत नाही. असू दे. मला सवय झालीये आता नकार ऐकण्याची."
"हे सगळं ऐकायला छान आहे हो. पण त्याने काही नवरा मिळत नाही ना."
असले काहीतरी बोलून, डोळ्यातली चमक घालवून, डिप्रेस झालेली वगैरे असलं वाचणं मला आजकाल झेपत नाही....
असली माणसं असतात माहितीय. फक्त मलाच आता यात रुची राहिली नाही.

आई ग्ग!!! काय सुरेख कथा आहे. जिओ!!!
हे असं अलवार लेखन माबोवरतीच!!! हे वाचायला बरेचसे वाचक येतात. पुलेशु.

लिखाण चांगलं आहे.

मॅनेजर, टीएल वगैरे पदावर काम करणाऱ्या अविवाहित तिशी उलटलेल्या महिला बघितल्या आहेत. कुणी कुणी फार बिंदास असतात, नाही झालं लग्न its okay म्हणतात, काहींना करायचंच नसतं तर काही या वरच्या कॅटेगरीमधल्या.. करायचं आहे पण जमत नाही. अर्थात तिसऱ्या कॅटेगरीमधल्या पण पहिल्यासारख्या वागतात, पण जरा आतवर पोचलो की कळतं, दु:ख तर आहे नक्की.

छान

कथा वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार. @आदू बरोबर आहे. उच्च शिक्षण आणि भावनाप्रधान मन याचा तसा संबध नाहीच.

सुंदर...

>> अर्थात तिसऱ्या कॅटेगरीमधल्या पण पहिल्यासारख्या वागतात, पण जरा आतवर पोचलो की कळतं, दु:ख तर आहे नक्की. >> खरंय.

तृप्ती, जे सांगायचंय ते नीट पोहोचतंय.