पावसा पावसा

Submitted by Asu on 21 September, 2019 - 06:20

पावसा पावसा (बालकविता)

जा रे जा रे पावसा
येऊ नको ना दिवसा
दिवसभर हुंदडत राही
आई बाबा तुला नाही?

कधी शाळा कधी सुट्टी
वेळापत्रक समजत नाही
येतो कधी जातो कधी
सगळ्यांची गंमत पाही
वेधशाळेचा करी पोपट
अभ्यासाचा खेळ होई

धो धो पाऊस घराबाहेर
घरात प्यायला पाणी नाही
बालक आम्ही, पालिकांची
जादू आम्हां समजत नाही

शिस्त तुला गुरुजींनी कधी
लावलेली दिसत नाही
सदा न् कदा रडत असतोस
अश्रू सारखे गाळत असतोस
अभ्यास तुझा नियमित नाही
म्हणून वाटतं मार खाई

एक सांगतो तुला ऐक -
शिस्त हवी माणसा नेक
चार दिवसांचा तू पाहुणा
नको मुक्काम हो शहाणा
नको होऊस केविलवाणा
ना तर होशी कंटाळवाणा

आता तू रडू नको
आम्हालाही छळू नको
सूर्य प्रकाश पडू दे
आम्हां बाहेर खेळू दे

न येऊन, डोळ्यात पाणी
येऊन, ओली आणीबाणी
काय तुझ्या मनात देवा?
नको वागूस माणसावानी

पावसाचा कुठे थेंब नाही
तरीही गाव वाहून जाई
काय माणसा लीला तुझी
देवालाही समजत नाही

रस्त्याच्याच झाल्या नद्या
काय व्हायचे आणि उद्या?
शाळेत आता शिक्षण द्यावे
पोहायचे वर्ग कायम घ्यावे

जिवंत आज देवापायी
उद्याचे काय माहीत नाही

- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
(दि.21.09 2019)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults