शिवधनुष्य !!!!

Submitted by Sujata Siddha on 17 September, 2019 - 01:31

शिवधनुष्य !!!!

( प्रास्ताविक -वाचकहो हि एक सत्यकथा आहे , अगदी १००% सत्य कथा , यात थ्रिलर किंवा हॉरर असं काही नाही पण चकीत करणारं वास्तव जरूर आहे , पात्रांची नावं सोडली तर कथेत काहीही बदल केलेला नाही . )

मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा , हिरव्यागार ताज्या केळीच्या पानावर नैवेद्य वाढलेला बघताना जितकं पवित्र आणि प्रसन्न वाटतं तितकं छान वाटलं मला, अर्थात तेव्हा मी तिला ओळखत नव्हते , पण एखाद्याला प्रथमदर्शनी पाहताच जे काही फील होतं , त्या टाईपचं फील होतं ते , तेव्हा म्हणजे साधारण दहा एक वर्षांपूर्वीची गोष्ट, मी कॉलेजला होते , परीक्षा जवळ आली म्हणून माझ्या मैत्रीणीच्या कामिनीच्या घरी मी अभ्यासला गेले होते , बेडरूममध्ये तिच्या प्रशस्त बेडवर सगळीकडे पुस्तकांचा पसारा आणि जोडीला एका भल्या मोठ्या ट्रे मध्ये खूप साऱ्या बाउल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स , पलीकडच्या टीपॉय वर दोन पाण्याचे ग्लास ठेऊन गप्पा मारत , खात खात वेळ मिळेल तसा आमचा अभ्यास चालू होता त्याच वेळी ती आली , ‘सोनाली’ !.. ,काहीतरी हवं होतं म्हणून आलेली बहुतेक ‘ कांदे ‘किंवा असंच काहीतरी . आमच्याशी थोड्याशा गप्पा मारून ती आली तशी सहज निघून गेली ,बेताची उंची , सडपातळ बांधा ,गोरापान रंग असलेल्या या मुलीत तोपर्यँत काही विशेष आहे असं मला वाटलं नव्हतं, थोडा वेळ अभ्यास करून आम्ही उठलो आणि कंटाळा घालवण्यासाठी कॉफ़ी पीत गॅलरीत उभे राहिलो , शेजारच्या घराच्या गॅलरीत एक आजोबा एका ७-८ वर्षाच्या मुलीचा अभ्यास घेत होते , कामिनी म्हणाली ,”हि सोनालीची मुलगी ‘आभा ‘ ,
“ अय्या मघाशी आली होती तिची ?अगं पण ती तर किती लहान दिसते , आपल्यापेक्षा फार तर ३-४ वर्षांनी मोठी असेल ना ? मी आश्चर्याने विचारलं . “ हो लवकर लग्न झालं तिचं , पळून जाऊन लग्न केलं तिने १२ वी जेमेतेम पूर्ण झाली असेल . लग्नाआधीच दिवस राहिले होते , त्यामुळे माहेरच्यांनी संबंध तोडून टाकले तिच्याशी , माहेरचं कोणी फिरकत नाही तिच्याकडे “ “ओह “ मी म्हटलं , “वाटत नाही गं तिच्याकडे बघून , कसली सोज्वळ दिसते ,बरंय बाई सासू -सासरे तरी चांगले दिसतात बिचारे , आई -वडिलांनी सोडून दिलं पण त्यांनी सांभाळलं , नाही ? “
“अगं ते कुठले ? हीच सांभाळते त्यानां , रिटायर्ड शिक्षक आहेत सासरे , प्रायमरीला शिकवायचे आणि सासूबाई हाऊस वाईफ
“ हो ? मग तिचा नवरा ? तो काय करतो ? “
“ you mean संकेत ?अगं तो परागंदा आहे गेले कित्येक दिवस , खूप लोकांना पैशाना फसवलं त्याने , मग देणेकऱ्या पासून तोंड लपवायचं म्हणून अज्ञातवासात आहे कुठेतरी “ आता मात्र अभ्यास बाजूला ठेवून मी सरसावून बसले , मधल्या काळात आम्ही परत रूम मध्ये आलो होतो , पण सोनाली विषयी मला जरा उत्सुकता वाटली ,त्याचवेळी सोनाली परत आली , आम्ही अभ्यास करत होतो त्याचं तिला फार कौतुक वाटत होतं असं दिसलं म्हणून आमच्यासाठी खायला घेऊन आली होती , आम्ही अभ्यास बाजूला ठेऊन मग तिच्याशीच गप्पा मारत बसलो ,दुपारचे साधारण बारा-एक वाजत आले होते, घड्याळाकडे बघत सोनाली उठली, आणि जायला निघाली, तेवढ्यात सावळ्या रंगाची अतिशय गोड चेहेऱ्याची एक मुलगी ,बहुतेक मिनी k.G. त असेल , शाळेतून आली आणि आल्या आल्या आमच्या इथे बसलेल्या सोनालीला येऊन बिलगली , सोनालीने पटकन तिला जवळ घेऊन तिचा पापा घेतला आणि तिला कडेवर घेऊन निघाली जाताना माझ्याकडे बोट दाखवून तीने त्या छोटीला सांगितले , “हि नवी मावशी बरं का मन्या ? सुजू मावशी म्हणायचं तिला ..”
“कश गोंडोल आहे ते , नाव काय तुझं ? “ मी विचारलं
“नमिता “ असं म्हणून सोनालीच्या पदरात तिने चेहेरा लपवला . सोनाली तिला घेऊन गेली .
आमचं सोनाली पुराण पुढे चालू झालं , “ अगं तो नवरा आहे का खवीस ? “ इतक्या गोड बायका मुलांना असं वाऱ्यावर सोडताना त्याला काहीच कसं वाटत नाही ?आणि हि आत्ता आलेली मुलगी पण त्यांचीच का ? अगं हि सुशिक्षित आहे ना सोनाली ? नोकरी वैगेरे करते ना ? मग तिला कळत नाही का असल्या लफ़ंग्या नवऱ्यापासून दुसरं मूल कशाला होऊ द्यायचं हिने ? “ माझा सात्विक संताप बघून कामिनी मला म्हणाली , “ अगं हो हो … नमिता त्या संकेत ची मुलगी आहे , सोनालीची नाही काही .”
“काय बोलतेस कामिनी ? म्हणजे संकेतचं पाहिलं लग्न झालं होतं कि काय ? “ पण असं बोलतानाच मला एक कळलं कि काहीतरी गोंधळ होतोय , नमिता हि जर संकेतची आधीच्या बायकोपासून झालेली मुलगी असती तर एवढी लहान कशी ?
आणि माझा तो प्रश्न बरोब्बर कॅच करत कामिनी म्हणाली , “बरोबर आहे तुझं , नमिता हि संकेत च्या दुसऱ्या बायकोपासून झालेली मुलगी आहे . संकेतशी पळून जाऊन लग्न केल्यानंतर सोनालीचे काही दिवस सुखात गेले , सासू सासरेही वयस्कर असल्यामुळे त्यांनी फारसा विरोध केला नाही , उलट सोनालीने त्यांची मनं जिंकून घेतली , पण पुढे २-३ वर्षातच संकेत ज्या कंपनीत होता त्यात अफरातफर करत असल्याच्या बातम्या कानावर येऊ लागल्या , देणेकरी हळूहळू दाराशी येऊ लागले आणि रोजच्या देणेकऱ्यांच्या शिव्याशापांना तोंड देता देता सगळ्यांना नाकी नऊ आले , अशातच एके सकाळी उठल्यावर सोनालीला कळालं कि संकेत बेड वर नाही , तो रात्रीतूनच परागंदा झाला होता कि देणेकऱ्यानी पळवलं होतं काही कळायला मार्ग नाही , (त्याने आजपर्यँत संपर्क साधला नव्हता ) त्या धक्क्यातून सावरतेय तोच एके दिवशी एका सरकारी हॉस्पिटल मधून सोनालीला फोनवर निरोप आला कि ताबडतोब येऊन भेटा आणि सोनाली तातडीने गेली , तिथे गेल्यावर कळलं की संकेत ने एका मुलीला फसवून देवळात जाऊन लग्न केलं होतं , त्याही मुलीचा बाळंतपणात अंत झाला आणि तिचीच हि मुलगी नमिता , मरताना त्या मुलीने संकेत च्या घरचा पत्ता दिला होता . नुकताच जन्मलेलं ते एवढंसं मूल छातीशी धरून सोनाली घरी आली . आणि खूप विचारांती तिने त्या बाळालाही सांभाळण्याचा निर्णय घेतला . “
“OMG !.. किती भयानक आहे हे सारं , केवढी मोठी फसवणूक बिचारीची ,अगं पण ती जी कोणी मुलगी होती जिच्याशी संकेतने लग्न केलं , तिला कोणी नातेवाईक नव्हतं का ? “इतका वेळ श्वास रोखून हि कथा ऐकल्यावर कामिनीला मी प्रश्न केला .
“ असलं तरी सोनाली कुठे जाणार शोधायला , जिचं नाव गाव काही माहिती नाही , जिचा काही पत्ता नाही , अशा मुलीला ही बिचारी कुठे जाणार शोधायला ? आणि समजा त्या लोकांनी हिलाच धरलं तर ? “
“ ते ही खरंच आहे , “ मी विचारात पडत म्हणाले , “मग आता कसं गं ? दोन दोन मुली शिवाय सासू सासरे , कसं करणार हि मुलगी ? मला सोनालीची लहानशी मूर्ती आठवून खूप वाईट वाटायला लागलं. मघाशी आमच्याशी गप्पा मारताना सोनाली इतकी हसत होती आणि ज्योक्स crack करत होती की ही एवढ्या प्रॉब्लेम्स मध्ये आहे , कोणाला सांगून सुद्धा खरं वाटणार नाही ,
“ अगं तु तिच्या एवढ्याशा चणी कडे पाहू नको भारी आहे ती खूप, आजपर्यँत कधीही रडताना नाही पाहिलं मी तिला, जॉब सांभाळून , घरचं करून बघितलंस ना कीती प्रेमाने सांभाळते नमिताला? न पाहिलेल्या सवतीच्या मुलीला ? “ कामिनी म्हणाली .
“हो खरंच ग .. महान आहे , इथून दंडवत तिला “ मी सोनालीला मनोमन नमस्कार करत म्हणाले.
कामिनीच्या घरून मी निघाले , जाताना न राहवून सोनालीच्या घरात डोकावलं , सोनाली नमिताला काऊ-चिऊ ची गोष्ट सांगून भरवत होती . मी विचार करत होते , आपण संस्कार संस्कार म्हणतो ते कोणत्या बेसिस वर ठरवायचे ?, म्हणजे लग्नाआधी गरोदर राहिली म्हणून संस्कारहीन कि बदफैली नवऱ्याशी एकनिष्ठ राहून सगळ्या कसोट्यांमधून पार पडायची कसरत एक सावत्र आणि एका सख्ख्या मुलीसह करणारी , गरज नसताना फाटलेल्या संसाराच शिवधनुष्य आपल्या अशक्त खांद्यावर केवळ मनोबलाच्या जोरावर पेलणारी सोनाली संस्कारित म्हणायची ?

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

..... फारच कमी शब्दात वास्तव्य वर्णन केलं... जगात याहून ही वाईट लोक आहेत... संकेत सारखे

चांगलं लिहलंय.
तुमच्या कथा नेहमी ग्रुपपुरत्या मर्यादित का ठेवता तुम्ही? प्लबिक ऍक्सेस का नाही ठेवत?

बाप रे!! कोणत्या ध्येयाने जगली असेल ती? तिच्या मुलीमध्ये तर सापडलं नसेल ते ध्येय आणि धैर्य? खरी गोष्ट आहे म्हणजे .... Sad
_________
संस्कारक्षम म्हणजे संस्कार होउ शकेल असे. लहान मुलांचे मन हे संस्कारक्षम असते. घडविता येते. सुजाता आपल्याला संस्कारी म्हणायचे असेल.

योगिता ,  महाश्वेता,पोर्गेला बाप , ॲमी,सामो धन्यवाद!  सामो  : तुमचे बरोबर आहे , वाक्य दुरूस्त केले आहे . 
 ॲमी  :  मी  Group content visibility: Public - accessible to all site users  असंच  ठेवते , याव्यतिरिक्त काही आहे का ? 

तुमच्या आतापर्यंतच्या सर्व कथांपैकी झाड - २, नलूची गोष्ट आणि सुनेत्रा या तीनच गोष्टी Public आहेत. बाकी सगळ्या फक्त ग्रुपपुरत्या मर्यादित.

प्रांत/गाव: महाराष्ट्र/पुणे
∆ असे निवडलेल्या कथा Public झाल्या नाहीयत. संपादनाची वेळ उलटून गेली नसेल तर ते ब्लँक ठेवून आणि सेव्ह करून बघा.

अजय चव्हाण : धन्यवाद !.. त्यानंतर तिची माझी भेट झाली नाही , मात्र अजूनही ती आणि तिची ती गोड मुलगी तशीच्या तशी डोळ्यासमोर उभी राहते . 

तू बदल केला पण अजूनही या कथा ग्रुपपुरत्या मर्यादितच आहेत Sad
त्या तीन ज्या पब्लिक कथा आहेत त्यात आणि यात वेगवेगळ्या फिल्डस, सेटींगमधे काय फरक दिसतोय तुलना करून पहा.
आणि काही उपाय नाही सापडला तर ऍडमीनना विचारून बघ काय प्रॉब्लेम आहे.

खूपच हृदयस्पर्शी कथा आहे..शेवटचा प्रश्न >>आपण संस्कार संस्कार म्हणतो ते कोणत्या बेसिस वर ठरवायचे ?>> खरंच विचार करायला लावणारा आहे... माणसांना कधी एका तराजूत तोलू नये हेच खरे

सुरेख लिहिल आहेस ग !

आपण संस्कार संस्कार म्हणतो ते कोणत्या बेसिस वर ठरवायचे ?

खर आहे.

ॲमी : अगं  मागे तू म्हटली होतीस त्यानंतर मी अख्ख्या मायबोलीवर फेर फटका मारून आले , तेव्हा इथे पण search  करून झालं , जर नवीन काही comment  असेल तरच त्या कथा 'नवीन लेखन ' मध्ये येतात नाहीतर मागे जातात . असं काहीतरी असावं . पण तू एवढी धडपड केलीस त्याबद्दल खूप मनापासून आभारी आहे !..:-):-)

नाही ग.
तुझ्या कथा https://www.maayboli.com/new4_all इथे दिसत नाहीयत म्हणजे त्या पब्लिक नाहीयत.
फक्त https://www.maayboli.com/new4me_group इथे दिसताहेत म्हणजे त्या केवळ ग्रुपपुरत्या मर्यादित आहेत.

पब्लिक कथांच्या खाली फेसबुक, ट्विटर वगैरेचे आयकन पण येतात बघ.