चांदणी रात्र - ८

Submitted by निरंजन कुलकर्णी on 15 September, 2019 - 05:48

कॉलेज संपताच राजेश आणि संदीप फ्रेश होण्यासाठी राजेशच्या घरी पोहोचले. संदीपने सकाळीच पार्टीला घालायचे कपडे बरोबर घेतले होते. दोघेही आवरून घरातून बाहेर पडले. तासाभरात ते मनालीच्या घरी पोहोचले. मनालीचा बंगला एखाद्या पॅलेसपेक्षा कमी नव्हता. मनालीचे वडील एका नावाजलेल्या कंपनीचे मालक होते. बंगल्यासमोर मोठं लॉन होतं. तिथे टेबल खुर्च्या मांडल्या होत्या.

राजेश आणि संदीप जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांच्या वयाची पंधरा वीस मुलं-मुली तिथे होती. त्यांच्या वर्गातल्या काही मुलीदेखील आल्या होत्या. थोड्या वेळाने मनाली तिथे आली. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये ती फार सुंदर दिसत होती. संदीपची नजर तर तिच्यावरून हाटतच नव्हती. एवढी गर्दी आणि झगमगाट पाहुन तो थोडा बुजला होता. या सगळ्याची त्याला बिलकुल सवय नव्हती. पण मनालीला पाहताच तो सर्वकाही विसरला होता. त्याला आता फक्त मनालीच दिसत होती.
एक नोकर आतून केक घेऊन आला. सर्व मुलं मुली टेबलाजवळ उभे होते. मनालीने बाजूच्या प्लेटमधली सूरी उचलली व केक कापला. “हॅप्पी बर्थडे टू यु” च्या गजरात मनालीचा वाढदिवस साजरा झाला. आता एकेकजण येऊन मनालीला केक भरवू लागले. पहिल्यांदा मनालीची बेस्ट फ्रेंड रसिकाने तिच्या तोंडात केकचा एक तुकडा कोंबला. मग राजेशने पण तेच केलं. पण मनालीचं लक्ष मात्र दुसरीकडेच होतं. तिने संदीपकडे अपेक्षेने पाहिलं पण संदीपला संकोच वाटत होता, हे तिला जाणवलं.
जेवणासाठी पावभाजी ऑर्डर केली होती तसेच मनालीच्या आईने स्वतः बिर्याणी बनवली होती. पावभाजी यायला अजून बराच वेळ होता. मुलांनी दमशेराज सुरू केला. दमशेराज झाल्यावर गाण्याच्या भेंड्या सुरू झाल्या. मुलांची टीम विरुद्ध मुलींची टीम. संदीप सोडून सर्व मुलं-मुली अगदी उत्साहाने सहभाग घेत होते. प्रत्येकजण आपल्याला जमेल तसं कधी सुरत तर कधी बेसूर गायनाचा आनंद घेत होते. संदीपला शांत बसलेला पाहून राजेश त्याला म्हणाला, “तुला काय वेगळं आमंत्रण द्यायला हवं का? एवढा छान आवाज आहे तुझा.” यावर संदीप नुसता हसला. “संदीप, म्हण ना एखादं गाणं.” मनाली संदीपला म्हणाली. तसा संदीपच्या अंगात एखाद्या शक्तीचा संचार झाल्याप्रमाणे तो गाऊ लागला. तो अरिजित सिंगचं ‘फिर ले आय दिल’ हे गाणं गाऊ लागला. त्याची नजर मनालीवर होती. मनालीसुद्धा अगदी तल्लीन होऊन गाणं ऐकत होती. त्याच्या सुरेल आवाजावर ती फिदा झाली होती. संदीपचं गाणं संपलं. सगळेजण तब्बल एक मिनिट टाळ्या वाजवत होते. एवढं संदीपचं गाणं त्यांना आवडलं होतं. मनाली तर त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडली होती. गाणं जरी संपलं असलं तरी तिच्या कानात अजूनही संदीपचा आवाज घुटमळत होता. सर्वात जास्त आश्चर्य राजेशला वाटत होतं. त्याला संदीपनं गाणं गायलं यावर विश्वासच बसत नव्हता. पण संदीपच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे संदीप खरच खूप छान गायला होता.
गाणं संपल्यावर संदीप भानावर आला. आपण एवढ्या लोकांसमोर गाणं गायलो यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. गाण्यांच्या भेंड्याची सांगता संदीपच्या सुरेल गाण्याने झाली होती. थोड्याच वेळात गरमागरम पावभाजी आली. मुलांनी पावभाजी व बिर्याणीवर जोरदार ताव मारला. मनाली व तिच्या आईचा निरोप घेऊन सर्व मुलं-मुली आपापल्या घरी निघाले. वाटेत असताना राजेश संदीपला म्हणाला, “काय सुंदर गातोस तू मित्रा. अरे ती मानालीतर इतकी फिदा झालीय तुझ्यावर. मी तर म्हणतो उद्याच तिला प्रपोज करून टाक.” “गपरे.” एवढं बोलून संदीपने विषय थांबवला. राजेश पुढे काहीच बोलला नाही. आता त्याचं काम संपलं होतं.

X X X X X X

वृषालीचा चेहेरा पाहून राजेशला आता जवळजवळ पंधरा दिवस झाले होते. पण तीची तब्येय ठीक असल्याचं व अजून थोड्या दिवसांनी ती कॉलेजला परत येणार असल्याचं राजेशला मनालीकडून समजलं होतं. मनाली आणि संदीपमधलं प्रेम आता चांगलंच बहरलं होतं. कॉलेजमधून घरी येताच त्यांचं मोबाईलवर तासनतास चॅटिंग चालायचं. मनालीच्या आग्रहाखातर संदीपने कॉलेजच्या कार्यक्रमात गायनाच्या स्पर्धेसाठी नावसुद्धा नोंदवलं होतं. त्याचं प्रॅक्टिस पण जोरदार सुरू होतं. राजेशचा धावण्याचा सराव सुद्धा छान चालला होता. सरावासाठी संभाजी उद्यान योग्य जागा होती. पण तिथे राजेशला जरा एकटं एकटं वाटायचं. कारण कर्वे उद्यानात वृषाली दिसायची.

राजेश आता वृषाली परत आल्यावर तिच्याशी ओळख कशी वाढवायची याचाच विचार करत होता. त्याला एक कल्पना सुचली व दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाताच त्याने ती मनालीला सांगितली. वृषाली आणि मनालीमध्ये चांगली मैत्री झाली होती. त्यांच्या मैत्रीचा उपयोग राजेशला नक्कीच होणार होता. आता राजेशसमोर रविवारी काय करावं हा प्रश्न होता. खरंतर मागच्या काही दिवसात राजेशचं आभ्यासाकडे जरा दुर्लक्षच झालं होतं. म्हणून राजेशने रविवारचा दिवस घरी आभ्यासातच घालवायचा ठरवलं. त्यानिमित्ताने रावीचीही भेट होणार होती. अर्थात रवी घरी थांबला तर.

पाहता पाहता आठवडा संपला व रविवारचा दिवस उजाडला. राजेश सकाळी लवकरच धावण्याचा सराव करून आला व अंघोळ, नाष्टा वगैरे आटोपून तो अभ्यासाला बसला. सकाळचे दहा वाजले होते. अजूनही रवी झोपेतून उठला नव्हता. शेवटी दुपारी बारा वाजता जेव्हा राजेश जेवण करायला घरातून बाहेर निघाला तेव्हा रवी जागा झाला. जेव्हा राजेश जेवण आटोपून परत घरी आला तेव्हा रवी चहा पित टीव्ही पहात बसला होता. राजेशला पाहताच रवीने त्याला विचारलं, “आज काय प्लॅन आहे तुझा?” राजेशने दिवसभर आभ्यास करणार असल्याचं रवीला सांगितलं. रवी त्याला म्हणाला, “तू अन तुझा तो मित्र आयुष्यभर नुसता आभ्यासच करा. आयुष्य एन्जॉय कधी करणार लेकानो तूम्ही.” राजेशला हसू आलं. त्याला मनालीकडे पाहात बिंदास्तपणे गाणं गाणारा संदीप आठवला. त्याचा अभ्यासू मित्र त्याच क्षणी बदलला होता. पूर्वी भेटल्यावर नुसता आभ्यासाबद्दल बोलणारा संदीप आता मनालीशिवाय दुसरं काहीच बोलत नव्हता. राजेशने रवीला मनालीच्या बर्थडे पार्टीत घडलेला किस्सा सांगितला. रवीचा तर विश्वासच बसत नव्हता. तो संदीपला एकदोनदा भेटला होता. संदीपसारखा लाजरा-बुजरा मुलगा असं काही करू शकतो हे रवीला खरं वाटत नव्हतं. त्याने राजेशला विचारलं, “राजे, तुमच्या राणीसाहेब आल्या की नाही परत?” राजेशने नुसती मान हलवली.

दुसऱ्या दिवशी राजेश आणि संदीप कॉलेजात पोहोचले. ते त्यांच्या नेहमीच्या बेंचवर बसले. थोड्याच वेळात मनाली वर्गात आली व तिच्या पाठोपाठ वृषाली सुद्धा आली. वृषालीला पाहताच राजेश खुश झाला. पण त्याचा आनंद थोडाचवेळ टिकला. वृषालीच्या चेहेऱ्यावरची कळाच गेली होती. ती अतिशय निस्तेज आणि अशक्त दिसत होती. वृषालीची ही अवस्था राजेशला पाहवत नव्हती.

रात्री घरी आल्यावर राजेशने मनालीला फोन लावला व वृषालीबद्दल चौकशी केली. तिच्या बॉयफ्रेंडच्या मृत्यूमुळे ती मनातून खचली होती. तसेच ती कॉलेजला गेल्यावर चारचौघांमध्ये मिसळली की तिला जरा बरं वाटेल या आशेने तिच्या इच्छेविरुद्ध घरच्यांनी तिला कॉलेजला पाठवलं होतं. मनालीची एक मैत्रीण वृषालीच्या घराच्या जवळच राहात होती. तिच्याकडूनच मनालीला हेसगळ समजलं होतं. वृषालीबद्दल हे सर्व ऐकून राजेशला फार वाईट वाटत होतं. खरंतर त्यांच्यात आजून साधी ओळखसुद्धा झाली नव्हती. तरीसुद्धा तिच्याबद्दल आपल्याला एवढी आपुलकी का वाटावी हे त्याला समजत नव्हतं.

X X X X X X

वृषालीला झालेल्या एक्सिडेंटला आता बरेच दिवस लोटले होते. पण आजूनसुद्धा वृषाली त्यातून पूर्णपणे बाहेर आली नव्हती. मध्येच केव्हातरी तिच्या मनात त्या दिवशीच्या कटू आठवणी जाग्या व्हायच्या व नुसत्या विचारानेच तिच्या अंगावर काटा यायचा. सुमितवर वृषालीचं खरच खूप प्रेम होतं. माझा सुमित आता परत कधीच दिसणार नाही या विचारानेच तिला गहिवरून यायचं.

कॉलेजला जायची तिची खरंतर इच्छा नव्हती पण इतके दिवस हॉस्पिटलमध्ये असताना व आता घरीसुद्धा तिला बिलकुल करमत नव्हतं. आपल्या एकुलत्याएक मुलीला अशा अवस्थेत पाहून तिच्या आई-वडिलांच्या काळजाचं पाणी पाणी व्हायचं. डॉक्टरांनी देखील त्यांना वृषालीला लवकरातलवकर कॉलेजला पाठवण्याचा सल्ला दिला होता. चार मुलामुलींच्यात मिसळल्यावर आपोआपच तिच्या मनाची गाडी रुळावर येईल याची त्यांना खात्री वाटत होती. आईवडिलांनी आज तिला तिच्या इच्छेविरुद्ध कॉलेजला पाठवलं होतं. तिच्या बाबांनी स्वतः तिला गाडीतून कॉलेजला सोडलं होतं. आज कॉलेजमध्ये वृषाली तशी गप्पगप्पच होती. कोणी काही विचारलं तरी अगदी तोडकमोडक उत्तर देत होती. पण घरच्यापेक्षा इथे तिला जरा बरं वाटत होतं. घडलेली दुर्दैवी घटना विसरण्याचा ती प्रयत्न करत होती, शिवाय सायकॅट्रिस्टने दिलेली औषधे अजून ती घेत होती.

सलग पाच दिवस वृषाली कॉलेजात आली होती. तिची तब्येत आधीपेक्षा बरी वाटत होती. कॉलेजच्या आभ्यासात स्वतः चं मन जास्तीतजास्त गुंतवायचा ती प्रयत्न करत होती. गेल्या विसबावीस दिवसातला आभ्यास तिला भरून काढायचा होता. इतर कोणत्याही विषयापेक्षा तिला मॅथसचं जास्त टेन्शन होतं. “कोणत्या मुलीला मी मॅथसच्या क्वेरीज विचारू?” वृषालीने मनालीला विचारलं. मनालीला आयती संधी मिळाली. ती म्हणाली, “मुलीला कशाला, माझा एक चांगला मित्र आहे. तो आपल्या वर्गातला मॅथस एक्सपर्ट आहे. तो सांगेल तुला सगळं.” “कोण आहे तो?” वृषालीने मनालीला विचारलं. मनालीने राजेशकडे बोट दाखवलं. “तुझी हरकत नसेल तर मधल्या सुट्टीत आपण त्याच्याशी बोलू.” मनाली म्हणाली. वृषाली “चालेल” म्हणाली व हसली. तिने राजेशला ओळखलं. त्या दिवशी जॉगिंगसाठी जात असताना आपण ज्याच्यावर हसलो होतो तोच हा मुलगा आहे हे तिच्या लक्षात आलं व त्या दिवशीचा प्रसंग आठवून तिला पुन्हा एकदा हसू आलं. कितीतरी दिवसांनी वृषाली अशी मनसोक्त हसली होती.

दुपारच्या सुट्टीत मनालीने वृषाली व राजेशची ओळख करून दिली. येत्या रविवारी तिघांचं मनालीच्या घरी भेटायचं ठरलं. सर्वकाही राजेशच्या प्लॅनप्रमाणेच होत होतं. राजेश अर्थातच खूप खुश होता. त्याचा धावण्याचा सरावही खूप छान चालू होता. वृषालीसुद्धा खूप छान गाते व तीही मनालीच्या आग्रहाखातर गायन स्पर्धेत सहभागी घेणार असल्याचं त्याला मनालीकडून समजलं होतं.

ठरल्याप्रमाणे रविवारी राजेश मनालीच्या घरी पोहोचला. वृषाली तिथे आधीच पोहोचली होती. राजेशने पाठीवरची बॅग बाजूला ठेवली व तो सोफ्यावर बसला. मनाली व वृषालीच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या व ती कॉफी बनवण्यासाठी आत गेली. आता त्या भव्य हॉलमध्ये राजेश आणि वृषाली दोघेच होते. बराचवेळ कोणीच काही बोललं नाही. “तुझ्या एकसिडेंटबद्दल मनालीकडून समजलं. कशी आहे आता तब्येत?” राजेशने सुरुवात केली. “बरी आहे आता.” आशा मोजक्याच शब्दात वृषालीने उत्तर दिलं. तिला बोलतं कसं करायचं याचा राजेश विचार करत होता. पण वृषालीशी काय बोलावं हेच त्याला सुचत नव्हतं. खरंतर वृषालीशी एकांतात बोलता यावं यासाठीच त्याने मनालीला कॉफी बनवण्यासाठी आत पाठवलं होतं. पण बोलायला काहीच सुचत नव्हतं व वृषालीसुद्धा काहीच बोलत नव्हती. त्यामुळे राजेशला खूप अवघडल्यासारखं झालं होतं. मनाली कधी एकदाची कॉफी आणते असं राजेशला वाटत होती. “तुझं मॅथस खूप चांगलं आहे असं मनाली सांगत होती.” एवढं बोलून वृषालीने शांततेचा भंग केला आणि राजेशचं मन परत उत्साहित झालं. तो फक्त हसला. “खरंतर ज्यांना मॅथस जमतं त्यांचं मला फार कौतुक वाटतं. मला तर मॅथसची भीतीच वाटते.” वृषाली पुढे म्हणाली. “त्यात काय घाबरायचं! आणि आता तर मी आहेच की!” राजेश बोलून गेला. त्याच्या बोलण्याचं वृषालीला हसू आलं, ती काहीतर बोलणार होती तेवढ्यात मनाली कॉफी घेऊन आली.

कॉफी पिउन झाल्यावर वृषालीने बॅगेतून वही काढली व क्वेरीज विचारायला सुरुवात केली. राजेश वृषालीला समजेल अशा पद्धतीने अतिशय सोप्या सरळ भाषेत समजावून सांगत होता. वृषालीला अशा पद्धतीने मॅथस यापूर्वी कोणीच शिकवलं नव्हतं. अगदी कॉलेजमधल्या गद्रे सरांपेक्षा पण सोप्या भाषेत राजेश सांगत होता. वृषालीने विचारलेल्या सगळ्या शंकांचं निरसन राजेशने केलं होतं व मध्येच एखादा जोक मारून तो तिला हसवत सुद्धा होता.

वृषालीच्या अजूनही काही क्वेरीज बाकी होत्या पण आता बराच वेळ झाला होता. त्यांनी पुढच्या रविवारी पुन्हा भेटण्याचं ठरवलं व एकमेकांचा मोबाईल नंबर शेअर करून ते दोघे मनालीचा निरोप घेऊन निघाले. आज राजेश फार खुश होता. मैत्री ही प्रेमाची पहिली पायरी असते व तो ही पायरी चढला होता.
वृषाली घरी पोहोचली. तिच्या चेहेऱ्यावर आज एक वेगळीच लाली चढली होती. तिला बऱ्याच दिवसांनी एवढी खुश पाहून तिच्या आईलापण बरं वाटलं. “स्वारी खुशीत दिसतीये आज.” वृषालीची आई तिला म्हणाली. “मग काय खुश पण नाही व्हायचं का मी?” वृषाली लाडात येऊन म्हणाली. “मग काय? जमलं का मॅथस?” तिच्या आईने विचारलं. “एका दिवसात कसं जमेल? एवढ्या दिवसांचा गॅप आहे.” वृषाली म्हणाली. “आणि शिकवणारा कसा होता?” वृषालीला चिडवण्यासाठी तिची आई म्हणाली. वृषाली यावर चिडून काहीतरी म्हणेल असं तिच्या आईला वाटलं होतं. पण वृषाली अगदी प्रांजळपणे म्हणाली, “खूप छान समजावतो राजेश आणि खूप फनी बोलतो तो. फार हुशार मुलगा वाटला मला.” “आच्छा, म्हणूनच एवढी खुश आहे आमची पिंकी!” पुन्हा चिडवण्याच्या उद्देशाने वृषालीची आई म्हणाली. आता मात्र वृषाली चिडली व “गप्प बस ग आई!” असं म्हणून ती तिच्या रूममध्ये गेली. वृषालीच्या आईने तिच्या मनात काय चालू आहे ते बरोबर ओळखलं होतं.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users