ढोलीझम - एक उन्माद

Submitted by मुरारी on 14 September, 2019 - 02:54

ढोलीझम - एक उन्माद

आपल्या महाराष्ट्राच्या संस्क्ुतीत ढोल ताशां चे महत्व अनेकशे वर्षांपासून आहे, युद्धात असो, स्वागतयात्रेत असो किंवा उत्सवांमध्ये असो, महाराष्ट्राची खास ओळख या ढोलताशांमुळे होती/आहे. मात्र हे फक्त काही ठराविक भागांपुरतेच मर्यादित राहिलेले होते. गेल्या दहा- बारा वर्षात हळूहळू तरुणाई गुढीपाडवा म्हणा, दिवाळी म्हणा,गणेशोत्सव म्हणा सोशली सेलिब्रेट करायला लागली आणि या ढोल-ताशा पथकांचे महत्व एकदम लक्षात आले.
५०-१०० वादकांसह समूहवादन करणारे मराठमोळे तरुण तरुणी, त्यामागे चक्क नववारी त्यावर फेटा घालुन बुलेट चालवणाऱ्या स्त्रिया , हजारोंनी यंग जनरेशन, काही एन जी ओ, त्यांचे सामाजिक संदेश देणारे ट्रक वरचे सेटप अशा स्वागत यात्रा गुढीपाडव्याला निघायला लागल्या, ते पहायला सुद्धा आलोट गर्दी व्हायला लागली ,अभिमान, मराठी बाणा टिकलेला पाहुन सर्वांनाच आनंद झाला.
मी पहिल्यांदा जेव्हा डोंबिवलीतल्या फडके रोड वर ढोलपथकाचे वादन एकले तेव्हा चक्क अंगावर काटा आलेला, प्रचंड ओरिजनल बास, वादनातली अचुक सुसूत्रता, इतक्यां वादकांच्या एकत्रिकरणातुन तयार होणारा तो भन्नाट माहोल, जामच मजा आली. मी कॅमेरा घेऊन असल्याने, वादकांचे फोटो पण भन्नाट मिळाले. मध्ये तर इटली च्या रस्त्यांवर मराठी ढोलताशा वादन पाहुन छाती अभिमानाने भरुन गेलेली होती.
वर्षे हळुहळु जात गेली, पुर्वी बोटावर मोजण्याइतकी असणारी ढोलताशा पथके अचानक पावसाळ्यात उगवणार्या भुछत्र्यांसारखी वाढायला लागली. म्हटले चला बरय आपली मराठी संस्कृती टिकतेय.
पुर्वी फक्त गुढीपाडवा,दिवाळी, गणपतीत होणारे वादन आता अनेक सणांमध्ये दिसायला लागले. त्यातही प्रकार आले , नाशिक ढोल,पुणे ढोल, कोल्हापूर ढोल, सातारा ढोल. मुंबईत उत्सवात आधी पासुन ही पथके ट्रकभरभरुन यायला लागली. इथवरही माझा आभिमान कायम होता.
त्यानंतर जनता अजुन वाढली, पुर्वी फक्त प्रोफेशनल वादक होते आता नव आयटी पब्लीक पण त्यांना जाॅईन झाले, त्यात सेलिब्रेटी घुसले, उद्देश फक्त फोटोसेशन, ढोल वादन करायला जी एनर्जी, जे स्किल लागते ते हळूहळू हरवायला लागले. ढोल वादकांपेक्षा त्यांचे फोटो काढणारेच जास्त झाले, मग नेमेचि सोशल मिडियावर अपलोडींग वेग्रे वेग्रे
क्वांटीटी जशी वाढत गेली तशी क्वालिटी त्याच रेशो म्ध्ये उतरायला लागली. ब्रांडेड पथकांचे वादन परवडत नाहीत मग बोलवा गल्लीतले हाैशी कलाकार आवाज जोरदार झाला पाहिजे, आपले मंडळ आहे शेवटी, मग एकाच गल्लीत दोन गणपती असतील तर समोरासमोर वादन, वादन हळूहळू बाजूलाच राहून बडवणे सुरु झाले, अतिप्रचंड आवाजातला गोंगाट प्रत्येक गल्लीत सुरु झाला,
हळूहळू माझा मराठी बाणा वाकायला लागला, हे काही निट सुरु नाही हे जाणवायला लागले, ३०-४० वादक असायचे आता १००-२०० कितीही वाढत चालले, एकत्रित परिणाम म्हणजे फक्त कोलाहल, छातीत धडकी भरेल अशा डाॅल्बीच्या भिंतीसारखा आवाज.
मी अजूनही पहिल्यांदा एकलेल्या वादनाशीच याची तुलना करत होतो.एक टक्का देखिल क्वालिटी नसलेली पाहुन हळुहळू या प्रकाराबद्दल चिड यायला लागली. कोणाला काही बोले्े की लगेच तथाकथित संस्कृती रक्षक अंगावर वास्सकन धाऊन यायला लागले.
"तुला काय कळणार त्यातली झिंग ,एकदा हातात घेऊन वाजवून बघ"
अरे पण तुझ्या उन्मादासाठी बाकी जनतेला का वेठीस धरताय? लाखो डबे एकत्र वाजवल्यासारखा आवाज येतोय यात काहीच कला दिसत नाही फक्त उन्माद दिसतोय. हा अभिमान नसुन माज आहे, पण अता टॅगलाइन पण तिच केली " मराठी असल्याचा अभिमान नाही माज आहे" हारलोच यापुढे.

असो,हा उन्माद इतक्यात थांबेल असे वाटत नाही, ढोल बडवले म्हणजे आपण आपली संस्कृती जपली इतके साधे सोपे समीकरण झाल्यावर यापुढे काय बोलायचे. ढोलीझम हा धर्म झालाय आणि धर्माच्या विरूद्ध जाणार्याला ठेचले जातेच

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वच 'उत्सव' चौक-रस्त्यावरून पुन्हा घरात नेण्याची वेळ येऊन ठेपली आहे.>>>> 100% सहमत. गेल्या वर्षी सोसायटी गणपती मीटिंग मधे मी म्हणाले होते की टिळकांनी चालु केलेल्या सार्वजनिक गणपतीचा purpose संपला आहे, आता आपणही बंद करू. पण ढोल ताशांचा गोंधळ, स्पीकर लावुन आरती, अधुनमधुन गाणी असा गोगांटभरा गणपती उत्सव चालु आहेच. माझा निषेध म्हणुन मी वर्गणी देणं आणि कार्यक्रमांना जाणं बंद केलं आहे.

आता तर मी या उत्सवाचा तिरस्कार करायला लागले आहे ( कमीत कमी 200 कारण लिहू शकते)
सेम हियर

सार्वजनिक गणेशोत्सवात समाजकारण कमी व अर्थकारण व राजकारण जास्त असते. त्यामुळे परस्पर हितसंबंध जोपासले जातात. सश्रद्ध मनाने गणपती बसवणारे घरगुती गणपती बसवतात. सोसायट्यांमधे सार्वजनिक उत्सवात गेटटुगेदर, मनोरंजन, हौस मौज हा भाग असतो. तिथेही आता ढोलपथके बोलावतात.
गणपती नुसता नावाला
चैन पाहिजे आम्हाला

लेखाशी १००% सहमत. वादनापेक्षा नऊवार्‍या, गॉगल, रंगीबेरंगी कपडे आणि संख्या ह्यालाच जास्त महत्व आले आहे. ह्या सगळ्या प्रकाराचा लोकांना वैताग येईल, त्यातले नाविन्य संपेल आणि मागणी घटली की हा गोंगाट जाउन दुसरा गोंगाट सुरु होईल. अनेक लोकांनी वर म्हटल्याप्रमाणे "सार्वजानिक" उत्सवाचा हा परिणाम आहे.

लेखाशी सहमत आहे. जरी मी स्वतः ढोलवादक असले तरीही.
भारतातल्या पथकांबद्दल जे लिहिलंय जे खरं आहे. पायलीला पन्नास पथके, गोंगाट, काँपिटिशन, दिखावा या सगळ्यात खरोखरची ढोल ताशा वादनाची आत्मियता हरवत चालली आहे.
मी लहान असताना पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनी या पथकाची खूप मोठी फॅन होते/आहे. एकदम शिस्तबद्द्ध असं ढोल, बर्ची, लेझीम, ध्वजपथक बघायला मिळायचं. त्यांना बघून अक्षरशः स्फुरण चढायचं. आजही काही विडीओ बघायला मिळाले आणि सुखावले की अजून तिथे काही बदललं नाहीये.
तसं कुठेतरी माझ्या डोक्यात होतं इथलं पथक जॉईन करताना. सुरवातीला काही वर्ष इथे लेझिम ग्रुप लिड केला. पण त्यातही कोणाला स्टेप्स, शिस्त, तालबद्ध हालचाली यापेक्षा नऊवारी, फोटो, मिडीया कवरेज यातच इंट्रेस्ट दिसून आला. ३-४ वर्ष डोकेफोड केल्यावर तो नाद सोडुन दिला. तिथेच ढोल शिकावासा वाटला म्हणून शिकले केवळ माझ्या आनंदासाठी.. कारण मला वादन, संगीत, ताल ,लय खूप आवडतं. इथेही आता जसजसे मेंबर वाढत आहेत तशी क्वालिटी म्हणावी तशी ठेवू शकत नाही. पण निदान भारतातल्या एवढी संख्या अजून तरी नसल्याने गोंगाट नाहीये.

एकदा एका ढोलबडव्याचे मनोगत सकाळ मुक्तपीठात आले होते. शेवटी त्याने लिहिले होते की त्याच्या कानात दोष निर्माण होऊन बहिरेपण आले पण द्यवाची शेवा केल्याचे समाधान मिळाले

सेवा केल्याचे समाधान तेव्हाच सेवेकर्‍याच्या खात्यात जमा होते जेव्हा सेवा घेणारा सेवेबद्दल संतोष प्रकट करतो.

आता काय बोलुन फायदा? सेवेकरी ऐकणार कसा? आता सेवेकरी जोमात आणि देव कोमात…. Lol

"सेवा केल्याचे समाधान तेव्हाच सेवेकर्‍याच्या खात्यात जमा होते जेव्हा सेवा घेणारा सेवेबद्दल संतोष प्रकट करतो."
लाख मोलाचे वाक्य.
एका प्रार्थनेतले शब्द खूप आवडतात. : ' तुला प्रिय जे, ते मला प्रिय व्हावे। जगी नित्य सांगाती माझ्या असावे ।।'

"सेवा केल्याचे समाधान तेव्हाच सेवेकर्‍याच्या खात्यात जमा होते जेव्हा सेवा घेणारा सेवेबद्दल संतोष प्रकट करतो."
लाख मोलाचे वाक्य. + 1

नाद आणि गोंगाट यातला फरक कधीच डूंबून गेलाय.
मुळात हे ढोलकरी अगदी शिवरायांचे मावळे असून हातात तळपणार्या तलवारी घेऊन फिरल्यागत वावरतात.

तुझ्या बाबांना ऐकूं येत नाहीं याचा सूड म्हणून आतां ते स्वत:चं ढोल पथक काढणार आहेत?
20220916_234146.jpg

Pages