ढोलीझम - एक उन्माद

Submitted by मुरारी on 14 September, 2019 - 02:54

ढोलीझम - एक उन्माद

आपल्या महाराष्ट्राच्या संस्क्ुतीत ढोल ताशां चे महत्व अनेकशे वर्षांपासून आहे, युद्धात असो, स्वागतयात्रेत असो किंवा उत्सवांमध्ये असो, महाराष्ट्राची खास ओळख या ढोलताशांमुळे होती/आहे. मात्र हे फक्त काही ठराविक भागांपुरतेच मर्यादित राहिलेले होते. गेल्या दहा- बारा वर्षात हळूहळू तरुणाई गुढीपाडवा म्हणा, दिवाळी म्हणा,गणेशोत्सव म्हणा सोशली सेलिब्रेट करायला लागली आणि या ढोल-ताशा पथकांचे महत्व एकदम लक्षात आले.
५०-१०० वादकांसह समूहवादन करणारे मराठमोळे तरुण तरुणी, त्यामागे चक्क नववारी त्यावर फेटा घालुन बुलेट चालवणाऱ्या स्त्रिया , हजारोंनी यंग जनरेशन, काही एन जी ओ, त्यांचे सामाजिक संदेश देणारे ट्रक वरचे सेटप अशा स्वागत यात्रा गुढीपाडव्याला निघायला लागल्या, ते पहायला सुद्धा आलोट गर्दी व्हायला लागली ,अभिमान, मराठी बाणा टिकलेला पाहुन सर्वांनाच आनंद झाला.
मी पहिल्यांदा जेव्हा डोंबिवलीतल्या फडके रोड वर ढोलपथकाचे वादन एकले तेव्हा चक्क अंगावर काटा आलेला, प्रचंड ओरिजनल बास, वादनातली अचुक सुसूत्रता, इतक्यां वादकांच्या एकत्रिकरणातुन तयार होणारा तो भन्नाट माहोल, जामच मजा आली. मी कॅमेरा घेऊन असल्याने, वादकांचे फोटो पण भन्नाट मिळाले. मध्ये तर इटली च्या रस्त्यांवर मराठी ढोलताशा वादन पाहुन छाती अभिमानाने भरुन गेलेली होती.
वर्षे हळुहळु जात गेली, पुर्वी बोटावर मोजण्याइतकी असणारी ढोलताशा पथके अचानक पावसाळ्यात उगवणार्या भुछत्र्यांसारखी वाढायला लागली. म्हटले चला बरय आपली मराठी संस्कृती टिकतेय.
पुर्वी फक्त गुढीपाडवा,दिवाळी, गणपतीत होणारे वादन आता अनेक सणांमध्ये दिसायला लागले. त्यातही प्रकार आले , नाशिक ढोल,पुणे ढोल, कोल्हापूर ढोल, सातारा ढोल. मुंबईत उत्सवात आधी पासुन ही पथके ट्रकभरभरुन यायला लागली. इथवरही माझा आभिमान कायम होता.
त्यानंतर जनता अजुन वाढली, पुर्वी फक्त प्रोफेशनल वादक होते आता नव आयटी पब्लीक पण त्यांना जाॅईन झाले, त्यात सेलिब्रेटी घुसले, उद्देश फक्त फोटोसेशन, ढोल वादन करायला जी एनर्जी, जे स्किल लागते ते हळूहळू हरवायला लागले. ढोल वादकांपेक्षा त्यांचे फोटो काढणारेच जास्त झाले, मग नेमेचि सोशल मिडियावर अपलोडींग वेग्रे वेग्रे
क्वांटीटी जशी वाढत गेली तशी क्वालिटी त्याच रेशो म्ध्ये उतरायला लागली. ब्रांडेड पथकांचे वादन परवडत नाहीत मग बोलवा गल्लीतले हाैशी कलाकार आवाज जोरदार झाला पाहिजे, आपले मंडळ आहे शेवटी, मग एकाच गल्लीत दोन गणपती असतील तर समोरासमोर वादन, वादन हळूहळू बाजूलाच राहून बडवणे सुरु झाले, अतिप्रचंड आवाजातला गोंगाट प्रत्येक गल्लीत सुरु झाला,
हळूहळू माझा मराठी बाणा वाकायला लागला, हे काही निट सुरु नाही हे जाणवायला लागले, ३०-४० वादक असायचे आता १००-२०० कितीही वाढत चालले, एकत्रित परिणाम म्हणजे फक्त कोलाहल, छातीत धडकी भरेल अशा डाॅल्बीच्या भिंतीसारखा आवाज.
मी अजूनही पहिल्यांदा एकलेल्या वादनाशीच याची तुलना करत होतो.एक टक्का देखिल क्वालिटी नसलेली पाहुन हळुहळू या प्रकाराबद्दल चिड यायला लागली. कोणाला काही बोले्े की लगेच तथाकथित संस्कृती रक्षक अंगावर वास्सकन धाऊन यायला लागले.
"तुला काय कळणार त्यातली झिंग ,एकदा हातात घेऊन वाजवून बघ"
अरे पण तुझ्या उन्मादासाठी बाकी जनतेला का वेठीस धरताय? लाखो डबे एकत्र वाजवल्यासारखा आवाज येतोय यात काहीच कला दिसत नाही फक्त उन्माद दिसतोय. हा अभिमान नसुन माज आहे, पण अता टॅगलाइन पण तिच केली " मराठी असल्याचा अभिमान नाही माज आहे" हारलोच यापुढे.

असो,हा उन्माद इतक्यात थांबेल असे वाटत नाही, ढोल बडवले म्हणजे आपण आपली संस्कृती जपली इतके साधे सोपे समीकरण झाल्यावर यापुढे काय बोलायचे. ढोलीझम हा धर्म झालाय आणि धर्माच्या विरूद्ध जाणार्याला ठेचले जातेच

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडंसं पटलं.पण पुढच्या वर्षी माय लेक बहीण ढोल पथक जॉईन करायचा विचार असल्याने पूर्ण पटलं असंही वाटत नाही ☺️☺️
बाकी ढोल वाजवणं कमी फोटो सेशन जास्त हे पूर्ण खरं.कौतुकाच्या क्षणाचे फोटो काढणे कोणालाही वाटणारच. फोटो बघून कौतुकही वाटतं.पण हे कौतुक 'क्षणचित्रे' स्वरूपात न राहता 'सारख्याच पोझ मध्ये फेसबुकवर 50 फोटो अपलोड' मध्ये बदलतं तेव्हा घाबरायला होतं.
आयटी वाल्या शिकाऊ उमेदवार ढोल पथकात गणपती पूर्वी एक आठवडा एक एलिमीनेशन राउंड, खरोखरच मेहनत करणाऱयांना आणि चांगलं वाजवणाऱ्यानाच फायनल मध्ये संधी असं काही करता येईल.

प्रसन्न, हा तर अगदी माझाच चिडचिडाट आणि संताप. मी जर लेख लिहिला असता तर ओळ अन ओळ हीच लिहिली असती.
मी लक्ष्मी रोडवर ऐकलेली नादब्रह्म, शिवगर्जना सारखी पथकं ऐकून इतकी प्रभावित झाले होते, पण नंतर इथे तिथे हौशागवश्यनी चालू केलेली पथक, पथकातल्या सदस्यांची वाढणारी संख्या आणि स्किल्स नसल्यामुळे होणार कर्कश्य गोंगाट याने वैतागले. आणि म्हणूनच की काय या वर्षी सोसायटीतल्या मराठी आईबापांना त्यांच्या मराठी असण्याचा माज दाखवावा अस वाटलं. सोसायटीच्या मंडळाने ढोल ताशे विकत आणले आणि एक महिनाभर अख्ख्या सोसायटीने छळ सहन केला, जो शेवटी परवा संपला. आता तर मी या उत्सवाचा तिरस्कार करायला लागले आहे ( कमीत कमी 200 कारण लिहू शकते)

गणपतीचे 11 दिवस ढोल असणार पण त्याआधी महिनाभर कुठेतरी पुलाच्या खाली वगैरे कोपचित उभे राहून प्रॅक्टिस करणारे लोकही भरपूर आहेत. त्यामुळे इतरेजनांना भरपूर त्रास होत असणार.

मला गेले काही वर्षे मोठा आवाज अजिबात सहन होत नाही. त्यामुळे गणपतीदर्शन, विसर्जन, गरबा वगैरे सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे बंद केले. आमच्या कॉलनीत कुठल्याही सणाला अजिबात आवाज नसतो, दिवाळीचे फटाकेही नसतात हे माझे भाग्य.

खरं तर मला या प्रॅक्टिस बघायला खूप आवडतात.खास करून नाशिक ढोल.लोक बाजूला कार थांबवून आपले आपले नाचतात पण.
पण एखादा दिवस जाऊन प्रॅक्टिस बघणे वेगळे आणि ते सतत सक्तीने कानाशी मारले जाणे वेगळे.

काही गोष्टी पटल्या तर काही नाही.. मी स्वतः शाळेच्या पथकात 3 वर्ष होते.. त्यामुळे असेल.. Happy
पण शिवगर्जना - नादब्रम्ह सारखी पथक फुटली आणि त्यांच्यातल्या काही वादकांनी ढोलपथकांची पिलावळ वाढवायला सुरवात केली.. त्यांची संख्या दरसाल वाढत चाललीये..
त्यात भर म्हणुन गावागावातली छोटी पथक असतातच..
त्यात पुण्यातली परशुराम, ज्ञानप्रबोधिनी, नादब्रम्ह, शिवगर्जना ही काही पथक आजही ऐकत राहावी अशीच आहेत. Happy

लेझीमचा काही संबंध नाही. लेख Dhol-ism (ढोलीझम - ढोल-वाद किंवा सोप्या अर्थाने, काही झाले की ढोल बडवत सुटण्याची वाढती वृत्ती/ चळवळ आणि त्यामागच्या विचारसरणीबद्दल) आहे.

नेटीझम सारखे ढोलीझम
लेझीमचा नाद छान असतो. कशीही वाजवा. जसे आरती करताना टाळ घंटी वगैरे लहान पोरांच्या हातात दिली तरी चालते. पण ढोल मात्र चांगले वाजवणारयाच्याच ताब्यात दिला जातो. नाहीतर अवघड होते. पण हं, जर सुंदर तरुणी नटून थटून वाजवत असतील तर मात्र ते दृश्य प्रेक्षणीय होते. त्याचा एडवांटेज देऊ शकतो. कारण मग तो साउंड अनवॉन्टेड वाटत नाही. अर्थात हे एका पुरुषाच्या दृष्टीकोनातून झाले. बाकी या ढोल बडवणारयांबर कायदा बनवायलाच हवा. रोडवर वाजवत असतील तर सरळ ट्राफिकच्या वाढलेल्या दंडाचे एखादे कलम लावायचे.

लोकं काय ती शांताबाई बाबुराव मुंगळा वगैरे हीन गाणी लावून अंगविक्षेप करत नाचतात; त्याऐवजी आपण त्यांना ढोल ताशा लेझीम वगैरे शिकवू लय ताल शिस्त, शेवटी आपली संस्कृती आहे ती <- म्हणून हे चालू झालं असेल. आणि आता त्याचाच त्रास होतोय.

त्या दुसऱ्या धाग्यावर लिहलं तसं - प्रॉब्लेम गाणी किंवा ढोल नसून आवाज आणि सार्वजनिक गणेशोत्सव आहे.

‘उन्माद’ या शब्दाशी १०० टक्के सहमत!
गणपतीचे 11 दिवस ढोल असणार पण त्याआधी महिनाभर कुठेतरी पुलाच्या खाली वगैरे कोपचित उभे राहून प्रॅक्टिस करणारे लोकही भरपूर आहेत. त्यामुळे इतरेजनांना भरपूर त्रास होत असणार.>>>

हो. हा ढोलवादनाच्या सरावाचा त्रास खरोखरीच असह्य असतो आणि तो गणेशोत्सवाच्या किमान एक महिना आधीपासूनच सुरू होतो. एका वर्षी सुट्टीसाठी गेले असताना पुण्यात बहिणीकडे या दिवसात वास्तव्य होते. घराच्या सगळ्या दारे - खिडक्या बंद करूनसुद्धा आवाजाची तीव्रता इतकी होती की वेड लागेल की काय असे वाटत असे.
काही वर्षांपूर्वी एका पुणेकर स्त्रीने तिच्या वृद्ध सा बा या सततच्या ढोलवादनाच्या आवाजाने कशा सैरभैर होत असत आणि सरतेशेवटी मानसिक स्वास्थ्य बिघडून त्यांचे निधन झाले त्याची करूण कहाणी वृत्तपत्रात लिहिली होती.
आनंद साजरा करण्याच्या आपल्या पद्धतीचा इतरांना त्रास होऊ नये इतक्याच समजूतदारपणाची अपेक्षा आहे. ती पूर्ण होणे दिवसेंदिवस कठीणच दिसतेय.

हा केवळ ध्वनीप्रदूषणाशी संबंधीत भाग नाही तर तो नशेशी संबंधीत आहे.हा नार्कोटिक्स मधे टाकायला हवा. अशा नशेला सांस्कृतिक व सामाजिक परंपरा असते. पण त्याकाळात असणारा या चित्राचा कॆनवास व आत्ताचा कॆनवास यात फरक आहे. कॆनवास बदलला की चित्राचे आकलनही बदलते. जरी तेच चित्र कायम ठेवले तरी. अंगात माझिया भिनलाय ढोलिया या गीतात ती नशा चित्रित झाली आहे. टिळकांनी त्याकाळात सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सावाचा हेतु समाज जागृती व समाजप्रबोधनाचा होता.आज ते स्वरुप दुर्दैवाने राहिले नाही. केवळ धार्मिकतेच्या नावाखाली केलेला समूहउन्माद अशा स्वरुपात आज ते दिसते आहे. समूह उन्मादात सारासार विवेक व विचार नष्ट झालेला असतो.अशा काळात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलोस यंत्रणेला जिकिरीचे बनते. माध्यमांनी गणेशोत्सवाचे उदात्तीकरण करताना त्यातील अनिष्ट प्रथांना ग्लॆमर मिळणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे.ढोलपथकांचा उपद्रव कमी करण्यासाठी त्यावर तातडीने निर्बंध घालणे आवश्यक आहे. समूह उन्माद हा नेहमी गुन्हेगारीला निमंत्रण देतो. पण सकाळा सारखी वृत्तपत्रे उघडपणे ढोलिझम चे समर्थन करतात व त्याला प्रोत्साहन देतात.

यावर्षी आमच्या सोसायटीच्या गणपती विसर्जनसाठी बोलावले ढोल पथक. मी स्वतः पहिल्यांदाच नीट अनुभवलं.
जाम मजा आली. मी आणि लेक पूर्णवेळ ताल ,ठेका , त्यांच्या साईन्स , सुसूत्रता याच निरीक्षण करत होतो.
त्यानंतर प्रत्येक इतर मिरवणूक गोंगाट वाटत होती. बेंजो आणि डीजे नकोसे झाले.
बघूया पुढे काय होतयं ते.

टवणे सर आयुष्यात विसरणार नाहीत आईने अकबरी >> कसली आठवण काढलीत Lol

ती काय विसरण्यासारखी गोष्ट नाही Happy

तथाकथित संस्कृती रक्षक अंगावर वास्सकन धाऊन यायला लागले. >> Lol अगदी अगदी. ते मोहर्रमच्या वेळेस बरं चालवुन घेता, हा डायलॉग नाही फेकला का?

पण एखादा दिवस जाऊन प्रॅक्टिस बघणे वेगळे आणि ते सतत सक्तीने कानाशी मारले जाणे वेगळे-> माझी एक चुलत बहीण सिन्हगड रोड जवळ रहायाला आहे..तिथे ही पथके आधी प्रॅक्टिस करतात. जेव्हा ती म्हणाली होती की हा खुप वैताग आहे ..खुप आश्चर्य वाटलेले. मला तर खुप आवडते. पण असे पण असु शकते.

आपल्या सारख्यांच ठिक आहे. आपण करु सहन.पण म्हातार्या माणसांच काय. घराजवळ असल्यामुळे त्यांनाच जास्त त्रास होतो ना.

पुर्वी हा प्रकार मर्यादित होता. आता त्याच पेव फुतलय. हा केवळ ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा नसून तो नशेचा मुद्दा आहे. ही सामूहिक नशा आहे.अंगात माझिया भिनलायं ढोलिया या काव्य पंक्ती ढोलवादनातून मिळलेल्या नशेची दखल घेतात झुंडीचे मानसशास्त्र - विश्वास पाटील वाचलंत का?हे म्हणजे ते विश्वास पाटील नव्हे. हे नवक्षितिजकार
त्यात बरच विश्लेषण आहे या प्रकारच्या नशेच. प्रथम सामूहिक उत्साह नंतर सामूहिक उन्माद त्यानंतर सामूहिक वेडाचार. त्या पुढे संघटित गुन्हेगारी कडे प्रवास
https://www.amazon.in/-/hi/Vishwas-Patil/dp/B08FGTN61H

लेख पटला आहे.

आपल्या देशातील गोंगाटप्रेम आणि सर्वकालीन कल्लोळ बघता सर्वच 'उत्सव' चौक-रस्त्यावरून पुन्हा घरात नेण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

तसे होईल तो सुदिन !

हीरा, एकूण परिस्थिती पहाता निराशाजनक विचार येतात खरे पण विचार मांडत राहिले पाहिजे. प्रबोधन फार मंदगतीने होत असते. आशावाद ठेवला तर काही तरी शक्यता तरी आहे लोकांनी विचार करण्याची.

Pages