चांदणी रात्र - ३

Submitted by निरंजन कुलकर्णी on 10 September, 2019 - 06:33

राजेशला मात्र एका वेगळ्याच विचाराने ग्रासलं होतं. आज वर्गांत आलेल्या त्या नवीन मुलीबद्दल त्याला एक प्रकारचं कुतूहल वाटत होतं. अजून तो वृषालीला भेटलाही नव्हता पण तिला पाहताच त्याच्या मनात नक्कीच काहीतरी वेगळी भावना जागी झाली होती. हे प्रेम होतं का? हे त्यालाही कळात नव्हतं. पण ज्या व्यक्तीला आज आपण पहिल्यांदाच पाहिलं, जिच्याशी आपली अजून नीट ओळख देखील नाही तिच्याबद्दल आपल्या मनात प्रेमभावना कशा निर्माण होतील? याविषयी संदीपशी बोलावं असही राजेशला वाटलं पण संदीपला प्रेमाबद्दल विचारणं म्हणजे एखाद्या भिकाऱ्याला श्रीमंतीविषयी विचारण्यासारखं होतं. आणि त्याने संदीपला विचारलं जरी असतं तरी त्याने “कशाला असल्या भानगडीत पडतोस अभ्यासात लक्ष दे” असा रुक्ष सल्ला दिला असता. पण राजेश तरी कुठे वेगळा होता. आत्तापर्यंत त्याला कुठली मुलगी आवडली नव्हती असं नाही पण ते केवळ शारीरिक आकर्षण म्हणून त्याने दुर्लक्ष केलं होतं. आताही आपल्याला वृषालीबद्दल जेकाही वाटतंय ते शारीरिक अकर्षणामुळेच आहे अशी स्वतः ची समजूत काढून तो कॉलेजमधून बाहेर पडला. संदीपला घरी सोडून राजेश फ्लॅटवर पोहोचला. घरी येताच राजेशने नेहमीप्रमाणे रवीच्या अंथरूण पांघरूणाची घडी घातली. दुपारी निघताना रवीने जमेल तेवढा पसारा ठेवायचा आणि घरी आल्यावर राजेशने तो अवरायचा असा जणू त्या दोघांमध्ये अलिखित करारच झाला होता. सुरुवातीचे काही दिवस राजेशने रवीला सांगण्याचा प्रयत्न केला पण आपल्या बोलण्याचा रवीवर काहीच परिणाम होत नाही हे समजल्यावर राजेशने माघार घेतली. घर आवरून झाल्यावर त्याने थोडावेळ टीव्ही पाहिला. रात्रीचं जेवण आटोपल्यावर राजेशने नेहमीप्रमाणे आज कॉलेजात जे जे शिकवलं त्याची रिविजन केली. आभ्यास करताना नकळत त्याच्या मनात वृषालीबद्दल विचार येत होते. सहस्रबुद्धे सरांनी करून दिलेली ओळख, तिचं एकेक पाऊल सावकाश टाकत चालणं, तिचा सुंदर चेहरा, आठवून राजेशच्या गालावर लाली आली. मात्र घड्याळाकडे लक्ष जाताच त्याने झोपायचं ठरवलं, कारण आजसारखंच उद्यादेखील पहाटे उठून कर्वे उद्यानात जायचा त्याने निर्धार केला होता. हा निर्धार केवळ निर्धारच राहू नये यासाठी राजेशने पहाटे पाचवाजताचा अलार्म लावला व अंथरुणावर अंग पसरलं.

X X X X X X

वृषाली कॉलेजमधून घरी आली. “कसा गेला कॉलेजचा पहिला दिवस?” घरात पाय टाकताच आईने वृषालीला विचारलं. “अगं आई मला घरात पाय तरी ठेऊदे. आधी मस्त चहा ठेव. चहा पिते आणि मग सांगते तुला सगळं.” वृषाली तिच्या आईला म्हणाली व बेडरूममध्ये गेली.

वृषाली एकुलती एक असल्यामुळे चांगलीच लाडावली होती. तिची आई तर तिच्याशी मैत्रीण असल्याप्रमाणेच वागायची. वृषालीची आई गृहिणी होती व तिचे वडील एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत मोठया पदावर कार्यरत होते. त्यांच्या कंपनीने पुण्यात नवीन प्लांट सुरू केला होता व त्यामुळे त्यांची बदली कंपनीने पुण्यात केली होती. तसे ते एक महिन्यापूर्वीच नाशिकहुन पुण्याला शिफ्ट झाले होते. पण वृषालीला पुण्यात कोणत्याच कॉलेजात प्रवेश मिळत नव्हता पण तिच्या वडिलांचे एक मित्र एका संस्थेत ट्रस्टी असल्यामुळे कसाबसा तिला प्रवेश मिळाला व वृषाली तिच्या आईबरोबर पुण्यात राहायला आली.
वृषाली पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार होती. ग्रॅज्युएशननंतर यूएसला जायची तिची इच्छा होती. तिच्या वडिलांनी आर्थिक परिस्थिती देखील चांगली असल्यामुळे तीला हे शक्य होतं. खरंतर तिला नाशिक सोडायची बिलकुल इच्छा नव्हती. तिचं बालपण नाशिकमध्येच गेलं होतं. तिच्या मनमिळाऊ स्वभावामुळे तिचे शाळेत असताना व आता कॉलेजमध्ये सुद्धा भरपूर मित्र-मैत्रिण होते. काही दिवसांपासून वृषालीला तिच्या कॉलेजमधला एक मुलगा आवडायला लागला होता. त्यांच्यात चांगली मैत्री सुद्धा झाली होती. त्याचं नाव सुमित होतं. रोज कॉलेजमधून घरी आल्यावर त्यांचं मोबाईलवर चॅटिंग चालायचं. पुण्याला आल्यावर आपल्याला सुमितला भेटता येणार नाही या विचारानेच तिला उदास वाटायचं. पण आता तिचा नाईलाज होता.

कपडे बदलून झाल्यावर वृषालीने बॅगेतून मोबाईल काढला. व्हाट्सऍपवर आलेला सुमितचा मेसेज पाहताच वृषालीचा चेहेरा खुलला. “कसा गेला कॉलेजचा पहिला दिवस.” “आम्हाला आता विसरणार तर नाही ना?” सुमित ने मस्करीत विचारलं होतं. “मी नाही विसरणार पण मला वाटलं होतं तू विसरला असशील मला.” वृषालीनेही चेष्टेतच रिप्लाय केला. ती अजून काहीतरी लिहिणार होती तेवढ्यात, “चहा तयार आहे” अशी आईची हाक ऐकून “आईने चहा केलाय, आपण नंतर बोलू, बाय.” असा मेसेज करून वृषाली हॉलमध्ये आली. तिने टेबलावरचा चहाचा कप उचलला व ती सोफ्यावर बसली. तिने टीव्ही चालू केला इतक्यात तिची आईदेखिल तिच्या बाजूला येऊन बसली. तिच्या आनंदी चेहेऱ्याकडे पाहून आई लाडाने म्हणाली, “फार खुश दिसतेय आमची पिंकी आज.” “आई तुला कितीवेळा सांगितलं मला पिंकी नाही म्हणायचं, मी काय आता लहान आहे का?” वृषाली चिडून म्हणाली. “ बर, नाही म्हणणार. पण तुझ्या नवीन कॉलेजबद्दल सांगशील की नाही मला.” वृषालीने सकाळी सहस्रबुद्धे सरांनी करून दिलेल्या ओळखीपासून पहिल्याच दिवशी तिची जिच्याशी चांगली मैत्री जमली त्या मनालीबद्दल सर्वकाही तिने आईला सांगितलं. अर्थात वर्गात प्रवेश करताच वर्गातील मुलांकडून मिळालेलं अटेंशन सोडून. तो विचार मनात येताच तिला स्वतः च्या सौंदर्याबद्दल असलेला अभिमान जागा झाला व वृषाली मनोमन सुखावली. चहा पिउन झाल्यावर वृषालीने थोडावेळ आभ्यास केला. आईने जेवणासाठी बोलावल्यावर वृषाली बाहेर आली. ऑफिसच्या कामासाठी वृषालीचे वडील बाहेरगावी गेले होते व ते आता दोन दिवसांनीच परत येणार होते. त्यामुळे वृषालीच्या आईने त्या दोघींसाठीच स्वयंपाक केला होता. जेवण झाल्यावर वृषाली तिच्या बेडरूममधे आली व तिने तिच्या नाशिकच्या एका मैत्रिणीने भेट दिलेली सुदीप नगरकरची एक रोमँटिक कादंबरी वाचण्यासाठी कपाटातून काढली. पण थोड्याच वेळात सुमितचा मेसेज आला व वृषाली परत चॅटिंगमध्ये मग्न झाली.

X X X X X X

आजदेखील राजेश पहाटे लवकर उठला व बर्वे उद्यानात व्यायामासाठी आला. धावून झाल्यावर तो एका बाकावर बसला. राजेशने ट्रॅकपॅन्टच्या खिशातून इयरफोन काढले व मोबाईलला जोडले. तो गाणी ऐकण्यात मग्न झाला. थोड्या वेळाने त्याने घड्याळात पाहिले व तो उद्यानातून बाहेर पडला. राजेशने समोर पाहिले व त्याच्या हृदयाची धडधड अचानक वाढली व चेहेऱ्यावर हास्य उमटले. ती समोरून येत होती. राजेशने तिला ओळखले. ती काल त्याच्या वर्गात नवीन आलेली मुलगीच होती. त्याच्या कानात मेटॅलिकाचं ‘एंटर सँडमॅन’ हे गाणं वाजत होतं पण तिला पाहताच हृदयात मात्र वेगळंच गाणं वाजू लागलं. पण ज्या क्षणी राजेशला हे समजलं की ती आपल्याकडे पाहून हसतेय तेव्हा गाणं वाजयचं थांबलं. ती हसत हसतच पुढे गेली व तिने उद्यानात प्रवेश केला. राजेशने समोर उभ्या असलेल्या गाडीच्या आरशात पाहिले तेव्हा त्याला वृषालीच्या हसण्याचं कारण समजलं. पक्ष्याची विष्टा राजेशच्या डोक्यावर पडली होती. ते पाहून राजेश देखील हसला. त्या पक्ष्याच्या विष्टेमुळे वृषालीचं लक्ष आपल्याकडे गेलं याचा उलट त्याला आनंद झाला व त्या नादात तो डोक्यावरची घाण न पुसताच तसाच घरी आला. घरी पोहोचल्यावर राजेशने आंघोळ केली व तो वर्तमानपत्र वाचू लागला. पण आज काहिकेल्या त्याचं लक्ष लागत नव्हतं. त्याचं मन वृषालीच्या विचारांनी व्यापलं होतं. ती चालताना वाऱ्यावर उडणारे तिचे लांब केस, तिचं निर्मळ, निरागस हास्य, किती मोकळेपणाने, निरागसपणे ती आपल्याकडे पाहून हसत होती. खरंतर दुसरं कोण आपल्याकडे पाहून असं हसलं असतं तर मला कीती राग आला असता, मग वृषालीच्या हसण्याचा मला राग का नाही आला? उलट तिचं एवढं कौतुक का वाटतंय मला? आणि मी तिच्याबद्दल एवढा का विचार करतोय? “काय प्रेमात बिमात पडलात की काय राजे?” रवीच्या प्रश्नाने राजेशची विचारसमाधी भंग पावली. पाठीमागे उभा असलेल्या रवीकडे पाहून राजेशने विचारलं, “अरे रवी तू केव्हा उठलास?” “मगाशीच तुझ्या समोरतर उठलो. वर्तमानपत्र वाचण्यात तू एवढा मग्न होतास की मी गुडमॉर्निंग बोललेलं तुला ऐकू गेलं नाही. आणि आज पेपरात असा कोणता जोक आलाय, मला पण सांगना.” रवी म्हणाला. “नाहिरे कोणताही जोक नाही आला. असं का विचारतोयस?” राजेश निरागसपणे म्हणाला. “अच्छा जोक नाही आला तर मग या अजय देवगणचा अक्षय कुमार कधीपासून झाला?” रवी मिश्कीलपणे म्हणाला. “अरे असं कोड्यात का बोलतोयस? काय ते स्पष्ट सांग ना!” रवीच्या बोलण्याचा रोख न समजून राजेश वैतागून म्हणाला. “कधीही न हसणारा तू आज खळखळून हसतोयस. म्हणूनच विचारलं कुणाच्या प्रेमात पडला नाहीस ना?” रवी हसत म्हणाला. राजेशला काय बोलावं तेच कळेना. त्याची अवस्था पाहून शेवटी रवीच बोलला, “मी चहा करतोय, तू घेशील ना थोडा?” “घेईन अर्धा कप. तुझ्या हातचा चहा पिण्याचा योग परत येईलच असं नाही.” एवढं बोलून राजेश पुन्हा स्वतः च्या विचारसमधीत गुंतला. आज रवी एवढ्या लवकर कसा उठला हा विचार देखील त्याच्या मनात आला नाही.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचतेय.
डीटेलिंग जास्त वाटतंय.
रहस्यकथा आहे का?

सस्मित, ही प्रेमकथा आहे व रहस्यकथा देखील आहे.
ही लघुकादंबरी असल्यामुळे आहे त्यामुळे तुम्हाला डिटेलिंग जास्त वाटत असेल.

छान लिहिलाय हा भाग..

फक्त चहा पिण्याचा 'योग्य' झालंय त्याऐवजी योग करा..