न सांगितलेली प्रेमकहाणी -3

Submitted by अजय चव्हाण on 30 August, 2019 - 22:30

आधीचे भाग वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर टिचकी मारा..

भाग 1
https://www.maayboli.com/node/57826

भाग 2
https://www.maayboli.com/node/64647

-----------------------------------------------------------------------------------

"एक कदम बढाने की हिंमत ना थी.
जब हिंमत आ गयी तब तुम्हे फुरसत ना थी..
हालात बदलते रहे और हम उसी मौंडपर.
सपने देखे हमने तुम आओगी ये सोचकर. "

हल्ली मी शायर झालो होतो..गममध्ये इतका बुडालेलो की त्याला गमासारखाच चिटकून बसलो होतो आणि ह्याच गममध्ये मी माझ्या
"ह्या" दोन हाताने (दोन हाताने कसं लिहणारं?) साॅरी ह्या (उजवा हात अभिमानाने वरती) हाताने दुसरी शायरी लिहली.

गम से हम, हम गमसे मिले
पर ये गम ना था मिला ये गम..
गम तो ये था वो गम से भी...
ये गम कम था अब सहू कौनसा गम..

समजून घ्या खूपच गम मिळाला वो ते पण एकदा नाही दोनदा त्यामुळे शायरी आवडली नसेल तर माफ करा पण खरं सांगतो.अगदी ओरिजीनल शब्द आहेत हे..मनाच्या कुठल्यातरी अदृश्य पटलावर तरंगलेले,अनामिक भावनेने ओथंबलेले, अश्रूंच्या नदीतून डुबकी घेऊन आलेले आणि चिंब होऊन तिथेच थिजलेले..
बास अजुन काय सांगू...??

एकदा नाही दोनदा.. असा पचका??कसा पचवणार होतो मी..बहुतेक थोडा मी सरबरीत झालोय त्यामूळे काहीही बरळतोय.

असो त्यादिवशी मला खुप राग आला इतका राग आला की, मी माझं अकांऊटच डिलीट करून टाकलं..नोटपॅडवर तिचं नाव लिहून खुप वेळा काॅपी पेस्ट केलं आणि नंतर डिलिट डिलिट डिलिट मी इतक्या वेळा डिलिट बटण दाबलं की ते डिलिट बटणचं खराब झालं..होऊ दे खराब..इथे माझं आयुष्यच खराब होतयं तिथे ह्या बटणाचं काय?

हे बटण फक्त ह्या विशाल ब्रम्हांडातल्या अणू, रेणू आणि कण याने
बनवलेला एक छोटासा मानवनिर्मित अविष्कार आणि मी? मी पण ह्या भल्यामोठ्या अंतराळतल्या एका छोट्याशा ग्रहावरचा एक उपद्रवी जीव...नाही.. नाही.. इतकाही माझ्या मनावर परिणाम झाला नाहीये..गोष्ट तीच सांगतोय पण ते काय आहे ना हल्ली मी दुःख विसरण्यासाठी "अंतरीक्ष की दुनिया" हे युट्युब चॅनेल पाहायला सुरूवात केली आणि मग मला नविन विचार आणि मानवाचं कोतेपण कळू लागलं..असचं एकदा पाहत होतो..स्क्रीनवर अंतराळातले काही अॅनिमेटेड आणि काही खरे फोटो फिरतायेत..बॅकग्राऊंडला गुढ वाटेल असं संगीत आणि तो निवेदक सांगतोय.."अगर कही प्रकाशवर्ष दूर किसी ग्रहसे इस धरतीपर कोई देख रहा होगा तो उन्हे धरतीपर सिर्फ डायनोसर नजर आयेंगें..हमारी पृथ्वी की रोशनी उनतक पोहचने के लिए कई लाखो साल लग जाते है..हमारा ब्रम्हांड इतना विशाल है के हम इस ब्रम्हांड मे केवल इक बाल के बराबर है"

अरे मग काय करू मी?? केसांना डाय लावणे सोडून देऊ? हा लॅपटाॅप फेकून देऊ? इथे जो माझ्या प्रेमाचा पचका झालाय तो विसरून कमंडलू का काय म्हणतात त्याला ते घेऊन दुर हिमालयात निघून जाऊ??श्या इथे पण निगेटीव्हीटी? म्हटलं प्रेमापेक्षाही काहीतरी मोठं असतं ह्या जगात म्हणून मी हे चॅनेल पाहायला सुरूवात केली तर हे असं...सटवाईला माझं नशिब लिहताना शिंक आली असावी किंवा "मजे लेने के मुड में होगी" असो, अभी क्या कर सकते है??

माझा दुसर्यांदा पचका झाल्यापासून सगळा माझा आत्मविश्वासच गहाळ झाला होता..खुप खुप लागलं होतं मनाला माझ्या..इतका दुःखी झालो होती की, शब्दात त्या दुःखाची व्याप्ती व्यक्तच करता येणार नाही मला.. मनावरचा ताण हलका होईना आणि त्यामुळेच तब्येत थोडी खालावली होती..महिनाभरातच डोळे पार आतमध्ये गेले, डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागली..नाक्यावरची पोर मला "मुकेश" म्हणून हाक मारू लागली..मला कळेचना का अशी हाक मारतायेत नंतर एकाला विचारल्यावर त्यानी तो कॅन्सरचा व्हिडीओ दाखवला..."मैं मुकेश 24 साल का हूॅ .."

अरे बापरे!! खरंच मी इतका निस्तेज आणि हडकुळा दिसायला लागलोय की लोक मला सिगारेट फुंकुन किंवा गुटखा खाऊन कॅन्सर झालेला पेशंट समजयाला लागलेत..मनातल्या मनात
मी स्वतःशीच बोलत होतो आणि बोलता बोलता पटकन
"नही! हे भगवान" असा भररस्यात मोठ्याने रिअॅक्ट झालो..
आतापर्यंत लोकांत अफवा होती आणि आता अशा माझ्या रिअॅक्शनमुळे लोकांना ती कन्फर्म न्यूज वाटली..ज्याने मला व्हिडीओ दाखवला त्याने माझ्या खांद्यावर हलकेच थोपाटलं आणि "टेक केअर" असं बोलून अश्रूभरल्या नयनाने माझं सात्वन केलं.
अरे काय चाललयं हे माझ्या आयुष्यात.. त्या पोराला मी जवळ बोलावलं गच्च अलिगंन दिलं आणि हळूच कानाजवळ "कुठेतरी जाऊन मर भाड्या" असं जोरात ओरडलो..माझ्या अशा ओरडण्याने दचकलाच तो आणि मला दुर ढकलत रडत रडत बोलू लागला.."अरे तु मरणार आहेस..किती स्वप्न पाहीली होती मी..वाटलं होत तु आणि मी... जाऊ दे...किती आवडायचास तु मला..तुझी बाॅडी.. तुझा गोल गरगरीत चेहरा आणि आता बघ.."
इतकं बोलून रडत रडत तो एखाद्या मुलीसारखा पळत पळत घरी गेला..मला शाॅक बसला मी स्तभ झालो..हसावं की रडावं, हसून रडावं की, रडून हसावं काहीच कळायला मार्ग नव्हता..मला पहिल्यांदा कुणीतरी मला तु आवडतोस हे म्हटलं होतं पण एका मुलाने हे सांगाव हे मी कधीच अपेक्षित केलं नव्हतं..जाऊ द्या असतात एकेकाच्या न सांगितलेल्या प्रेमकहाण्या..मला आता सांभाळून राहावं लागेल किंवा लवकरात लवकर लग्न तरी करावं लागेल नाहीतर मी व्यवस्थित आहे हे जर त्या पोराला कळलं तर मग?? नको नको मला कल्पनाच करवत नाहीये..

त्या प्रसंगानंतर मी थोडा सावरलो होतो..सावरलो म्हणण्यापेक्षा आता माझा इश्यू वेगळा होता..मी नाॅर्मल राहू लागलो..जणू काही झालेच नाही किंवा नशिब आपलं असं समजून मी ही आता हळूहळू स्विकारत होतो..तब्येत सुधारत होती..त्यात मी पंधरा दिवस सुट्टी टाकून मस्त शिमल्याला जाऊन आलेलो..त्यामूळे आता सगळं पोझिटीव्ह वाटत होतं..हल्ली ऑनलाईन स्थळे बघण्यापेक्षा मी ऑफलाईन शक्यतो परिचयातून आलेले स्थळे पाहत होतो..

अशाच एका माझ्या दुरच्या मावशीच्या जावेच्या नणंदेची भाची मला सांगून आली..नातं खरचं लांबचं होतं..आई आणि त्या मावशीचं बर्यापैकी चांगलं बाॅडींग होत मग ठरल्याप्रमाणे आई आणि मावशी आधी मुलीला आणि घरच्यांना सहज म्हणून भेटून आल्या..तिथून आल्यापासून आईच त्या मुलीच कौतुकपुराण थांबायला नावचं घेईना..ती कशी सोज्वळ, ती कशी सुंदर, ती कशी सुगरण,ती कशी सिमरन..सिमरन म्हटलो का मी? हो डीडीएलजेमधल्या सिमरनसारखी थोडीशी आहे असं आई म्हणते..तसंही आता प्रेम करून पाहीलं पण नाही मिळालं. आता जी नशिबात असेल ती.."कळकट मळकट कामाला बळकट" असो की, आणखी कशीही असो..

ठरल्याप्रमाणे आम्ही मुलगी पाहून आलो..आई म्हणत होती तशीच सिमरनसारखीच होती..युनीब्रो आणि ब्लॅक ब्युटी..नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता..आईला आवडली ना मग बसं आणि आता प्रेम ठरवूनच करायचं असेल तर हे ही चालेल..साखरपुडा दोन महिन्यानंतर करायचं ठरलं..तोपर्यंत आम्हा दोघांनाही एकमेकांना भेटायला आणि बोलायला परवानगी नव्हती पण हीच आता दिलाची राणी..हीच माझी अर्धागिंनी..मी मनोमन तिला पत्नी म्हणून स्विकारलं होतं..नव्या स्वप्नांच्या धुंदीत हरवलो होतो..
कुठेतरी स्वतःला गुंतवावचं लागतं....

एकेदिवशी ऑफिस सुटल्यावर मला माझी भावी पत्नी अशीच अचानक समोर दिसली..मला आश्चर्य वाटलं....सोबत तिची मैत्रीणही होती...हाय हॅलो केल्यानंतर आम्ही जवळच्याच हाॅटेलमध्ये शिरलो...कोपर्यातला एका टेबलावर बसून मी तीन कोल्ड काॅफी आणि सॅन्डविच ऑर्डर केलं..

थोडसं अवघडतच मी प्रश्न केला..

"तुम्ही अचानक इथे...घरच्यांना माहीत आहे का?"

ती: " नाही..तुमच्याशी महत्वाच बोलायचं आहे म्हणून आले"

मी : बोला ना..हरकत नाही..बरं झालं तुम्ही आलात तसंही लग्नाआधी एकमेकांशी मनमोकळेपणाने बोललं पाहीजे.."

तिने फक्त मान हलवली आणि तिच्या मैत्रीणीला डोळ्यांनीच इशारा केला..

तिची मैत्रीण:
खरंतरं हे आता सांगण चुकीचं आहे पण तुमचं स्थळ नात्यातलं होतं आणि तुम्ही आलात तेव्हा एकांतात तुम्हाला सांगणार होती पण असं बोलायला नाही मिळालं..विचारही करायला वेळ न देता हिच्या मूक प्रतिक्रियेला घरचे हिचा होकार समजले पण हिचं दुसर्यावर प्रेम आहे आणि घरच्यांना हे अजुन सांगितलं नाही पण तुम्ही नकार कळवल्यानंतर सांगेल ती..सो प्लिज तुम्ही नकार कळवाल का?

कोल्ड काॅफीचा घोट घेता घेता मला एकदम ठसकाच लागला..
सिमरनच्या आयुष्यात आधीच राज होता आणि आज पुन्हा एकदा माझा पचका झाला होता आणि आता नेहमीसारखाच मी गममध्ये बुडालेलो..
त्या केव्हाच गेल्या होत्या आणि मी अजुनही तिथेच ..दारू प्यावी तसा मी एकावर एक कोल्ड काॅफी पित होतो..शेवटी वेटरने काॅफी संपली असं खोटं सांगून मला तिथून अप्रत्यक्षपणे जाण्यास सांगितलं...जड मनाने
मी उठलो...बील उचललं आणि काऊंटरवर जाऊ लागलो...जाता जाता मनात एक शायरी उमटली..

मोहब्बत के गमसे जो निकले..
पेहलेसे बेहत्तर निकले..
दोबारा जो जिंदगी से मिले..
सही नही जाती ,अब जान निकले..

********************************************************************
टिप : पुढचा भागासाठी कुणाला कल्पना सुचल्यास जरूर कळवावे..
तुमच्या कल्पनाचे स्वागत आहे तूर्तास सध्यातरी पुढचा भाग लिहण्याच न लिहण्याच अजुन ठरवलं नाहीये...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!