न सांगितलेली प्रेमकहाणी 2

Submitted by अजय चव्हाण on 2 December, 2017 - 04:36

ही कथा काही भागात नसून प्रिक्वेल सिक्वेल टाईप आहे...
प्रिक्वेल वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर टीचकी मारा.

https://www.maayboli.com/node/57826

दोन वर्ष झाले त्या गोष्टीला पण अजुनही मनातून "आओगे जब तुम साजना" हे जातच नाही..हे गाणं मला इतकं का आवडावं "ती" मला इतकी का आवडावी ह्या प्रश्नांची उत्तरे माझ्याजवळ नाहीत पण हे गाणं आणि "ती" दोन्ही मला खुप आवडतात..

कधी कधी काहीतरी चमत्कार व्हावा आणि तिची आणि माझी भेट व्हावी, नकळत एक ओढ निर्माण व्हावी आणि ओढीतून प्रेम फुलावं आणि आमच्या प्रेमाबरोबरच " मनाच्या अंगणात असंख्य फुले फुलावीत" असं जरी वाटत असलं तरी असले चमत्कार व्हायला माझं आयुष्य हा काही चित्रपट नाही हवी तशी गोष्ट वळवायला पण कुठेतरी मनात हुरहुर आहेच....तब्बल दोन वर्षे तिची वाट पाहीली मी त्याच रूटवर पण नाहीच दिसली मला ती कधी..कित्येकदा ऑफिसला सुट्टी घेऊन मेट्रो स्टेशनवर दिवस काढाला आहे मी पण छे नाहीच कदाचित वरच्याला मंजूर नसावं..

दोन महीने झाले मला ते ऑफिस सोडून.. त्या रूटवर हल्ली जाणं येणं होतच नाही .बदलेललं ऑफिस,बदलेलली माणसं, बदललेला परिसर, बदललेला रूट सारंच बदललयं कदाचित मीही आता बदलावं, मुव्ह ऑन स्वतःशीच म्हणत पुढे जावं असं वाटतयं खरंतर मनातून पण पुढे जावसं वाटतं नसलं तरी जावं तर लागणारच लाईफ गोज ऑन यु नो..

हल्ली घरचेही लग्नाच्या मागे लागलेत पण पहील्याच झालेल्या मुली पाहण्याच्या कार्यक्रमातून (ह्या कार्यक्रमात काय घडलं त्यासाठी ही लिंक पाहा ) https://www.maayboli.com/node/63817 त्यांनी थोडीशी धास्ती घेतलीय सो असल्या रंडोम कांदेपोह्यांला सर्वांचाच नकार आहे मग सगळ्यांनी मिळून जीवनसाथी डाॅट काॅमवर माझं नाव रजिस्टर केलं..खरंतर हे असलं मला काय पटतं नाही पण काय करणार ना? आईबाबांपुढे काय करणार मी बापुडा?

रजिस्टर केल्यानंतर पासवर्ड काय असावा ह्यावरून घरातं "ही" भांडण...आई म्हणायची "मिशन सुन@007" ठेऊया तर बाबा "होणार सुन ह्या घरची@404" (404 आमचा रूमनंबर) शेवटी मीच मध्यस्ती करून "प्यार का पंचनामा"असा पासवर्ड ठेवला..
सगळे डिटेल्स तर भरून झाले होते अगदी कुंडलीपासून ते बारीक सारीक डीटेल्स भरले होते पण फोटो काय टाकला नव्हता आणि त्यातल्या त्यात फोटो असला की प्रोफाईल जास्त पाहीलं जात असा सल्ला तिथल्या एका सल्लागाराने दिलेला त्यामुळे फोटो हवाच असा अट्टाहास हा होताच..आता माझ्याकडे एकही चांगला फोटो नव्हता म्हणजे होते ते सगळे सेल्फीच.. पाऊट केलेले.. आता पाऊट केलेल्या सेल्फीवरून आऊट होण्याची रिस्क कोण घेणार म्हणून माझं एक चांगल फोटोशेसन करायला हवं असं सगळ्यांच मत पडलं...तर फोटोसेशन म्हटल्यावर सगळ्यांनाच एक प्रकारचा हुरूप आलेला...त्यातही भांडणे म्हणजे आईबाबांचीच..आईच म्हणणं असं होत की मुलगा माॅर्डन वाटावा म्हणून माॅर्डन कपडे घालून त्यात गाडीवर फोटो काढला तर श्रीमंतीच प्रदर्शन करता येतं असं मत तर बाबांच त्या उलट त्यांच असं म्हणणं की, मुलगा कल्चरल आणि सोबर वाटावा म्हणून कुर्ता पायजमावरचा व एक फाॅर्मल वर फोटो असावा.. शेवटी एक माॅर्डन,एक कल्चरल व एक फाॅर्मल फोटो असे तीन फोटो काढायचं ठरलं...त्यासाठी कपड्यांची वेगळी खरेदीचा व सलूनचा वेगळा खर्च आला हे वेगळे सांगायला नको.. तर एका संडेला मी तयार होऊन निघालो सोबत आईबाबा होतेच..सारखं सारखं चीझ म्हणून शेवटी माझ्या त्या चीझच "चीज" झालं हे नशीब ..हौस म्हणून आईनेही सहावारीमध्ये बाबांना बळेच घेऊन टायटॅनिक पोझ मध्ये फोटो काढून घेतला ..आता तो फोटो कसा आला असेल हे न सांगितलेलचं बरं..

प्रोफाईलवर फोटो टाकल्यापासून रोज कोण ना कोण view करायचं आणि आई मग view . केलेल्या मुलींचे डिटेल्स व फोटो पाहायची मग रात्रीच्या जेवणावर त्याची चर्चा व्हायची...ही मुलगी कशी "शनाया"असेल ती मुलगी कशी "राधिका" असेल ह्याच लाॅजीक मांडल जायचं...एकदा तर गम्मंतच झाली आईने एका मुलीचे डीटेल्स घेऊन फेसबुकवर चेक केलं..जीवनसाथीवरचा साडी व गजरातला फोटो तिला खुप आवडला एकच फोटो होता तो म्हणून फेसबुकवर चेक केलं तर वाॅलवर वनपीस फोटो आणि कॅप्शनमध्ये "mom and dad's princess" असं स्टेटस वाचल्यावर ही प्रिन्सेस काय भांडी घासणार ?म्हणून तिला रिजेक्टच केल..

रोज रोज त्याच चर्चा व्हायच्या आणि मला ह्यात काही इंटरेस्टच नव्हता म्हणून एके रात्री मीच माझा लाईफ पार्टनर शोधायचं ठरवलं आणि बसलो..क्रायटरिया सेट केला आणि सर्च बटण दाबलं तब्बल पन्नास एक प्रोफाईल पाहील्यानंतर एक ओळखीचा चेहरा दिसला...अरे ही तर तीच "लाईफ इन अ मेट्रोवाली" कसला आनंद झाला मला काय सांगू रात्री तीन वाजता मी "याऽऽऽहूऽऽ कोई मुझे जंगली कहे" असं मोठ्याने गात उड्या मारायला लागलो तेवढयातच बेडरूमची लाईट ऑन झाली "जंगलीच आहेस तु मेल्या.. कशाला केहनेका.. झोपो अब गुपचुप" असं म्हणून आई लाईट बंद करून गेलीसुद्धा..

रिक्वेस्ट पाठवावी की नको ह्या पेचात असताना शेवटी डोळे बंद करून पाठवलीच..पाठवल्यानंतरही मनात धाकधुकही होतीच

तिने मला ओळखलं असेल का? माझी रिक्वेस्ट बघून काय वाटलं असेल तिला असे अनेक प्रश्न मनात रूंजी घालत होते पण तरीही काही का होईना " ती" भेटल्याचा खुप आनंद झाला होता...
त्यादिवशी मला गोड झोप लागली.. .

तीन दिवस झाले रिक्वेस्ट पाठवून कसलाच रिप्लाय आला नाही..प्रत्येक मिनिटाला रिफ्रेश मारून चेक करायचो पण छे सारेच व्यर्थ...मंगळवारी सिध्दीविनायकला पायी जाऊन नवससुद्धा करून आलो पण हल्ली माझे गार्हाणे कुणी ऐकतच नाही त्यात बाप्पाला असले गार्हाणे करोडोच्या संख्येने येत असतील त्यात माझा नंबर कितवा हे बाप्पाच जाणे पण एकेदिवशी फायनली रिक्वेस्ट अक्सेप्ट झाल्याची नोटीफिकेशन माझ्या संगणकावर येऊन धडकली...बाप्पाने माझं गार्हाण ऐकलं होतं तर...त्यादिवशी आईला सांगून 21 मोदकाचा नैवेद्य दाखवला बाप्पाला..

रिक्वेस्ट तर अक्सेप्ट झाली पुढे बोलायचं काय आणि बोलायचं कसं? हा प्रश्न मनात होताच.. रात्री जेवण झाल्यानंतर परत मी चेक केलं तर तिचा "हाय"असा मॅसेज येऊन धडकलेला..
मी ही लगेच काही सेकंदाच्या आत "हॅलो" असं पाठवलं..खरंतरं त्या हॅलो पलीकडेदेखिल मला खुप काही बोलायचं, विचारायचं होतं पण मी सावरलं स्वतःला..मी हळू हळू जायचं ठरवलं..

"कसे आहेत तुम्ही? तुमचा फोटो पाहीला मी ..तुम्हाला आधीही कुठेतरी पाहील आहे असं वाटून मी रिक्वेस्ट अक्सेप्ट केली.."

हीला खरंच आठवत नाही..मला कुठे पाहील आहे ते? मग ती बोलकी नजरं, त्या नजरेतलं ओळखीच हसू ,काय होत ते सारं..का नुसतचं दाखवायचं नाही म्हणून विचारतेय..असा विचार करून मी मख्खपणे "मी मजेत.. हो पाहील असेलं तुम्ही कुठेतरी मला मी खुप प्रवास करतो आणि तुम्ही कशा आहात?" रिप्लाय सेन्ट केला..

ती -"ओह दॅट्स ग्रेट..मलाही प्रवासाची खुप आवड आहे..अजुन काय काय आवडत तुम्हाला ? आय मिन तुमच्या हाॅबीज काय आहेत?"

मी - "मला बरंच काही करायला आवडतं. कविता,कथा,लेख लिहणं, वाचन, जुने काॅईन्स व पोस्टकार्डस जमवणं,फोटोग्राफी,डान्सिंग,गाणे ऐकणे,गाणे,वाॅचिंग मुव्हीज,मिमिक्री करणे, चित्र काढणे, बर्ड वाॅचिंग, ट्रॅव्हलिंग,कुकींग वैगेरे वैगेरे.."

ती- "बापरे इतक्या हाॅबिज...तुम्हाला मिमिक्री करता येते..कुणा कुणाची करता येते?"

मी - "हो शिकलो असाच काॅलेजमध्ये असताना,मला सनी देओल,सुनिल शेट्टी,संजीव कुमार,दिपक शिर्के,कुलभुषण खरबांदा,ओमप्रकाश आणि लता मंगेशकर यांची मिमिक्री जमते..आणि शाहरूखचा फक्त एक डायलाॅग बर्यापैकी त्याच्या आवाजात बोलता येतो."

ती- "बापरे तुम्ही तर ग्रेटच आहात आणि शाहरूखचा तो डायलाॅग कुठला?"

मी -"मुझे माफ कर दो सीमाऽऽ आणि त्यानंतरचा धाड् असा आवाजही काढता येतो. "

ती - "यु आर टू फनी..तुमच्याशी मैत्री करायला आवडेल मला..
आणि हो मला तुम्हाला एक सांगायचं होतं..

काहीतरी सांगायचयं तिला असं वाचल्यावर एक हुरहर मनात निर्माण झाली आणी मनातल्या बॅकग्राऊंडवर गाणं वाजु लागलं..

"यु तो बंजरसा था मेरा आशियाॅ...मेहफिल आपके आनेसे सजी..
वक्त बेवक्त मेरे ये हालात है. आपका हुस्न जश्न ऐ सेहलाबजी"

आणि त्याच धुंदीत मी "बेझिझक कहीये.." असा रिप्लाय पाठवला..

ती - "राग नका मानू..हे प्रोफाईल माझं नाही माझ्या बहीणीचं आहे तिच गेल्या महीन्यात लग्न झालंय..घाईगडीबडीत इथलं अकाऊंट डिलिट करायचं राहून गेलं होतं .. तुम्ही रिक्वेस्ट पाठवल्याचा तिला मॅसेज आला आणि तिने मला हे अकांऊट डिलीट करायला सांगितलं..मीच उघडलं होत ना म्हणून आणि मी डीलीटच करणार होते तेव्हा पण तुमचा फोटो पाहीला आणि कुठेतरी पाहील्यासारखं वाटलं म्हणून बोलून बघूया असं वाटलं म्हणून बोलायला सुरूवात केली..रिअली साॅरी हा...तुम्ही वेगळ्या इंटेशनने बोलत असणार हे माहीत आहे मला पण तुमच्याशी मैत्री करायला आवडेल मला"

वरचा रिप्लाय वाचून माझ्या मनातलं गाणं "यु तो बंजरसा था मेरा आशियाॅ" ह्या ओळीवरच एखादी कॅसेट अडकावी तसं अडकलं..
पुढे काय लिहावं, काय बोलावं काहीच कळतं नव्हतं ..

लेट झालं मला...मनातल्या भावना तेव्हाच सांगितल्या असत्या तर परत परत हे घडलंच नसतं..

लॅपटाॅपवरच्या स्क्रिनवर एकटक पाहतचं राहीलो मी आणि नकळत मनात काही शब्द उमटले..

"एक कदम बढाने की हिंमत ना थी.
जब हिंमत आ गयी तब तुम्हे फुरसत ना थी..
हालात बदलते रहे और हम उसी मौंडपर.
सपने देखे हमने तुम आओगी ये सोचकर. "

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

होणार सुन ह्या घरची@404" (404 आमचा रूमनंबर)
<<<<<
हाच मुख्य प्रॉब्लेम आहे.
Error 404 म्हणजे 'not found' error. नायिका सापडत नाही याचे कारण हेच. हा रूम नंबर आहे की फ्लॅट नंबर? कथानायकाच्या रूमचा असेल तर थोडे सोपे आहे, तो 405 करून घ्या. नाहीतर फ्लॅटचा असेल तर शांती करावी लागेल. बिल्डरने कथानायकाच्या फॅमिलीला अशा नंबरचा फ्लॅट विकून खूप अन्याय केलाय. त्याच्याकडून नुकसानभरपाई म्हणून स्टॅम्प ड्यूटी परत मागतो कथानायक, असा एक प्रसंग टाका. अन्यायाचे परिमार्जन व्हायला पाहिजेच.

ते व्हीव्ह सुधारून घ्याल का? View की weave चटकन कळत नाही.

धन्यवाद.

छान लिहिलंय
घाबरू नका तुमच्या आंबुस- पिवळ्या पंजाबी सुटवालीच्या जुळ्या बहिणीचं अकाउंट आहे हे. तीच लग्न झालाय Wink

@श्रद्धा.. धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल..

तुम्ही सांगितल्यानुसार बदल केला आहे..

आणि हो 404 हा फ्लॅटनंबर आहे..रूमची शांती करावी लागणार आहे कथानायकाला.

@आऊ...तिच म्हणजे नायिकाच लग्न झालयं...

नायिकेच लग्न झालयं म्हटल्यावर....प्रश्नच मिटला...आता पुढे काय ?

हे नंतरचा भाग काढायचा ठरवला तर लिहेन...पार्ट 3

छान लिहिलंय...
जर कथेत सत्याचा अंश असेल तर लावा नंबर बहिणीवर. निदान मग ती मेट्रोवाली तुमची आधी घरवाली तरी बनेल Happy
आणि तसेही जेव्हा दोन बहिणींमध्ये एकीचे लग्न होते तेव्हा पुढचे दोन चार महिने दुसरीला पटवायचा सर्वोत्तम काळ असतो - लवगुरू ऋन्मेष

पण हे काय मी वाचतोय
""" वाॅलवर वनपीस फोटो आणि कॅप्शनमध्ये "mom and dad's princess" असं स्टेटस वाचल्यावर ही प्रिन्सेस काय भांडी घासणार ?म्हणून तिला रिजेक्टच केल.. """"
>>>>>>>>
तुम्हाला सून हवीय की मोलकरीण? आणि वनपीस घातला म्हणून मुलगी कौटुंबिक नसतेच हा शोध कोणी लावला?? मुलींना कपड्यावरून जज करायचा अधिकार तुम्हाला दिलाच कोणी??? यावर तर एक वेगळा धागाच काढला असता.... पण साला हा विषय चावून चोथा झालाय म्हणून सध्या राहू दे Happy

ऋन्मेऽऽषभाऊ कथा पुर्णपणे काल्पनिक आहे...फक्त पहिला भाग काही अंशी खरा आहे..

आणि प्रश्न मुलीच्या कपड्याचा नाहीये तर स्टेट्सचा आहे...जर मुलगी हाय प्रोफाईल असेल तर तिला भांडी घासणं कमीपणाच वाटू शकतं आणि त्यातल्या त्यात जर ती खुप लाडात वाढलेली असेल तर मग पुढे त्यांना घरकामाची सवय करून घ्यायला कठीण जात...
इथे मोलकरीणचा प्रश्न येतच नाही..

बहुतेक सासूना गृहकर्तव्यदक्ष सून हवी असती आणि अरेंजमॅरेंजमध्ये आधी फोटो आणि इतर माहीतीनुसार असेच तर्क लावून शाॅर्टलिस्ट किंवा रिजेक्ट केलं जातं..

इथे सासूना घरात थोड तरी काम करायला हवं अशी सुनेकडून अपेक्षा आहे...

अजय लोड घेऊ नका. ते गंमतीत लिहिलेय.

प्रत्यक्षात जे स्वत: काही गैर वागतात सोशलसाईटवर त्याचा बोभाटा करत नाही. ईथे सारे आदर्शवादीच असतात Happy

छान लिहिलंय
वधू परिक्षेसाठी काढलेलाच फोटो इथे पण डकवलेला दिसतोय.

किट्टू21 प्रतिसादाबद्दल धन्यवाद..

वधुपरीक्षेसाठी वेगळे फोटो आहेत...हा फोटो 1 वर्षापुर्वीचा आहे ..खास मित्राच्या साखरपुड्यात चुकुन चांगला आलेला...

खुप मस्त......
काही आठवणी आठवल्या.

Pages