अठरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे. परदेशातल्या एका खूप मोठ्ठ्या शहरातील मध्यवर्ती भागात माझे ऑफिस होते. भारतातून येऊन केवळ काहीच दिवस झाले होते. ऑफिसात एकटाच भारतीय होतो. करीयर आणि चार पैसे मिळवायच्या नादात आपला देश आपली माणसे सोडून पार हजारो किलोमीटर अंतरावर परक्या मुलखात येऊन पडलो होतो. एकटेच राहणे व काम करणे. जिथे दूरदूरवर मराठी तर राहोच भारतीय सुद्धा फार क्वचित कोणीतरी दिसत असे. हे सगळे नंतरच्या काळात अंगवळणी पडले खरे पण सुरवातीचा काळ फारच मानसिक त्रासाचा गेला. सकाळ आणि इतर दैनिकांच्या इंटरनेट आवृत्त्या सुरु झालेल्या होत्या. त्यामुळे रोज मराठी बातम्या वाचून इकडचे हालहवाल कळत असे तेवढाच एक दिलासा. अठरा वर्षांपूर्वी ईसकाळची वेबसाईट उघडली आणि बातमी वाचायला मिळाली "ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर यांचे निधन".
माडगुळकर गेले. म्हणजे ज्या लेखकाने मला मराठी वाचनाची गोडी लावली तो माझा अत्यंत आवडता लेखक गेला. आज जी काही लिहायची थोडीफार कला अवगत झाली आहे तीचे प्रेरणास्थान गेले. शाळा कॉलेजात असताना जेंव्हा केंव्हा एकटा असायचो तेंव्हा पुस्तकातून माझ्याशी बोलणारा गोष्टीवेल्हाळ साहित्यिक गेला.
कधी पाचवीला कि सहावीला होतो तेंव्हा मनाला पहिली भुरळ घालणारे त्यांचे लिखाण. लिखाण नव्हतेच ते. ते बोलणे होते. ते वाचताना ते आपल्याशी बोलत आहेत असेच वाटायचे. कॅसेट रेकॉर्डरला सुद्धा लाजवेल इतके जिवंत बोलण्याची किमया माडगुळकर केवळ लेखणीच्या सहाय्याने साधत. शंकर-जयकिशन यांचे संगीत आणि माडगूळरांचे लिखाण. या दोन गोष्टी लहानपणीच आत्यंतिक प्रिय झाल्या. नंतरच्या आयुष्यात त्यांची गोडी व उस्तुकता कमी होण्याऐवजी वाढतच गेली. इतकी दुनिया बघितली तरीही आजतागायत ती गोडी कमी नाही झाली. कॉलेजात असताना लायब्ररीमधून माडगूळकरांची दिसेल ती पुस्तके घेऊन अधाशासारखा वाचत सुटायचो. किती ओघवते लिखाण. आणि केवढी ती प्रतिभा. एकच व्यक्ती लेखक असते, चित्रकार असते, निसर्गाची गाढी अभ्यासक असते, ग्रामीण जीवनाशी तादात्म्य पावलेली असते, पक्षी-प्राणी यांची अभ्यासक असते, आकाशवाणीवर नभोनाट्य लिहिण्यापासून चित्रपटांच्या कथा लिहिण्यापर्यंत त्यांच्या प्रतिभेचा आवाका असतो. हे सगळे जाणवून मन अक्षरशः थक्क थक्क व्हायचे.
लिखाण सुद्धा साधे असे. अलंकार नाही, शब्दजाल नाहीत, अनावश्यक नाट्य निर्माण करण्याचा आग्रह नाही, वाचकाच्या भावना उद्युक्त करण्याची निष्फळ धडपड नाही, काहीतरी सिद्ध करायचा अभिनिवेश नाही, शब्दांचे अकांडतांडव तर नाहीच नाही. काही नाही. पण किती जिवंत. कारण ते नैसर्गिक असायचे. मला तरी वाटते लिहिल्यानंतर माडगुळकर वाक्यांची वा शब्दाची फेरतपासणी अथवा पुनर्रचना कधीच करत नसावेत. जे जसे लेखणीतून आले ते तसे बस उतरवून छापायला देत असावेत. म्हणूनच ते इतके सहजसुंदर आणि ओघवते व्हायचे. त्यातला जिवंतपणा जाणवायचा.
समकालीन लेखक आणि प्रख्यात कथाकथनकार शंकर पाटील यांच्या बरोबर केलेल्या एका बस प्रवासाचे वर्णन माडगूळरांनी एका कथेत केले आहे. अगदी साधा "यट अनादर" प्रवास. काही म्हणजे काहीही विशेष घडलेले नाही त्यात. पण कथेच्या शेवटी "आणि पाटलांच्या बरोबर केलेला शेवटचा प्रवास संपला" असे अगदी सहजगत्या जेंव्हा ते लिहून जातात आणि कथा संपवतात. तेंव्हा... "काय? शेवटचा? बस एका वाक्यात? झाले? अरे असे कसे? अरे बोला अजून काहीतरी त्याविषयी" अशी मनाची तडफड सुरु ठेवून ते जातात. त्यामुळे तो साधा प्रवास आपल्या मनातसुद्धा सतत रुंजी घालत राहतो. किती साध्या साध्या गोष्टी असतात. पण त्या शेवटच्या घडतात तेंव्हा आयुष्यभर लक्षात राहतात, हेच त्यांनी त्यातून दाखवले जणू. त्याचमुळे तो प्रवास आपल्या मनात सुद्धा तितकाच जिवंत राहतो. असे वाटते कि माडगूळकरांच्या आणि पाटलांच्या बरोबर आपण सुद्धा तिथे होतो. माडगूळकरांनी आपल्या आयुष्यात घडलेल्या घटना वाचकाच्या आयुष्यात घडल्यात असे जाणवून देण्याची किमया आपल्या लिखाणातून अशी असंख्यवेळा साधली आहे.
पुण्यातल्या सकाळ दैनिकाच्या कीबोर्डवर टंकलेल्या एका वृत्ताने उपग्रहातून कि अन्य कुठून कुठून पार इंग्लंडपर्यंत प्रवास केला. माझ्यापर्यंत आले. आणि भावविश्वाचा भाग बनून राहिलेला एक साहित्यिक, माझा लेखनगुरु आता ह्या जगात राहिला नाही ह्याची त्या वृत्ताने जाणीव करून दिली. लिखाणातून बोलायला शिकवणारे माडगुळकर गेले. पुस्तकातून होणारे त्यांचे बोलणे आता कायमचे थांबले. ते आता नव्याने घडणार नव्हते. दीर्घ श्वास घेतला. खुर्चीवर मान मागे टाकून डोळे मिटले. भर ऑफिसात डोळ्यातून पाणी यायला परवानगी नव्हती. "थांब रे थांब. काहीही झालेले नाही. गप्प्प. मूर्ख आहेस का रडायला. काहीही काय. गप्प. गप्प्प बस. एकदम चुप्प्प. गप्प्प..." मनाला बजावत राहिलो. मग उठून तडक रेस्टरूम गाठली. आणि अश्रूंना वाट करून दिली.
---
वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्त्या आल्या तेंव्हा वाटले होते कि बरे झाले ह्या आता कायमच्या राहतील. आता पूर्वीसारखे वर्तमानपत्र जपून ठेवायची गरज नाही. असे वाटून देखील कसे मनात आले कुणास ठावूक. माडगूळकर गेले तेंव्हा ज्या बातम्या आणि लेख आले त्याच्या प्रिंटआउट काढून ठेवल्या. आणि नंतर ते विसरून सुद्धा गेलो. आज ईसकाळ च्या जुन्या आवृत्त्या नेटवरून गायब झाल्या आहे. संकेतस्थळ प्रणाली बदलल्यानंतर जुन्या आवृत्तीमधील बातम्या निघूनच गेल्या त्या कायमच्या. हि बातमी आणि संबंधित लेख सुद्धा उडाले.
परवा जुन्या कागदांची तपासणी करत असताना तब्बल सतरा-अठरा वर्षांनी त्या प्रिंट्स सापडल्या. त्या तशाच स्कॅन करून इथे प्रतिक्रियांमध्ये टाकत आहे. याकरिता ईसकाळ प्रकाशनाची परवानगी वगैरे घेतलेली नाही. पण पूर्वी बातम्यांची कात्रणे मायबोलीवर पाहिली आहेत. म्हणून हे चालेल असे वाटते. तथापि मायबोलीच्या धोरणात बसत नसेल तर या प्रतिक्रिया उडवल्या तरी माझी काही हरकत नाही.
डुआयडी काढून वेगळं काय
डुआयडी काढून वेगळं काय लिहिणारे मी? मी लेखक नाही ना मला कथा-कविता वाचण्यात रस आहे. वर्षभर मेडिकल लिव्ह असल्याने वेळ घालवायला दिवसभर इंटरनेटवर पडून असायचो. अमानवीय धागा सापडल्याने मायबोलीवर आलो. रेडीट, कोरा ,मायबोली, मिपाने वेळ कापायला चांगली मदत झाली. ऑगस्टला परत जॉईन झाल्यावर मायबोली सोडू म्हटलं पण रोजची सवय झाल्याने जमत नाहीये. आता काहीतरी चित्रविचित्र लिहावं असं विचार चालूये जेणेकरून ऍडमिन आयडी उडवतील पण परत विधानसभेच्या धुळवडीसाठी थांबावं म्हणतोय.
ओके माझ्या प्रश्नाचे उत्तर
ओके माझ्या प्रश्नाचे उत्तर टाळ्लं की. बाकी पारनेरी लोकं आदरातिथ्य फारच छान करतात. म्हणजे करायचे. आताचं माहिती नाही.
> लिखाण सुद्धा साधे असे.
> लिखाण सुद्धा साधे असे. अलंकार नाही, शब्दजाल नाहीत, अनावश्यक नाट्य निर्माण करण्याचा आग्रह नाही, वाचकाच्या भावना उद्युक्त करण्याची निष्फळ धडपड नाही, काहीतरी सिद्ध करायचा अभिनिवेश नाही, शब्दांचे अकांडतांडव तर नाहीच नाही. काही नाही. पण किती जिवंत. कारण ते नैसर्गिक असायचे. मला तरी वाटते लिहिल्यानंतर माडगुळकर वाक्यांची वा शब्दाची फेरतपासणी अथवा पुनर्रचना कधीच करत नसावेत. जे जसे लेखणीतून आले ते तसे बस उतरवून छापायला देत असावेत. म्हणूनच ते इतके सहजसुंदर आणि ओघवते व्हायचे. त्यातला जिवंतपणा जाणवायचा. > रोचक.
लेख आवडला.
Pages