व्यंकटेश माडगूळकर: भरभरून जगणे शिकवणाऱ्या प्रतिभावंताचे पुण्यस्मरण

Submitted by अतुल. on 28 August, 2019 - 23:25

ठरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे. परदेशातल्या एका खूप मोठ्ठ्या शहरातील मध्यवर्ती भागात माझे ऑफिस होते. भारतातून येऊन केवळ काहीच दिवस झाले होते. ऑफिसात एकटाच भारतीय होतो. करीयर आणि चार पैसे मिळवायच्या नादात आपला देश आपली माणसे सोडून पार हजारो किलोमीटर अंतरावर परक्या मुलखात येऊन पडलो होतो. एकटेच राहणे व काम करणे. जिथे दूरदूरवर मराठी तर राहोच भारतीय सुद्धा फार क्वचित कोणीतरी दिसत असे. हे सगळे नंतरच्या काळात अंगवळणी पडले खरे पण सुरवातीचा काळ फारच मानसिक त्रासाचा गेला. सकाळ आणि इतर दैनिकांच्या इंटरनेट आवृत्त्या सुरु झालेल्या होत्या. त्यामुळे रोज मराठी बातम्या वाचून इकडचे हालहवाल कळत असे तेवढाच एक दिलासा. अठरा वर्षांपूर्वी ईसकाळची वेबसाईट उघडली आणि बातमी वाचायला मिळाली "ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर यांचे निधन".

माडगुळकर गेले. म्हणजे ज्या लेखकाने मला मराठी वाचनाची गोडी लावली तो माझा अत्यंत आवडता लेखक गेला. आज जी काही लिहायची थोडीफार कला अवगत झाली आहे तीचे प्रेरणास्थान गेले. शाळा कॉलेजात असताना जेंव्हा केंव्हा एकटा असायचो तेंव्हा पुस्तकातून माझ्याशी बोलणारा गोष्टीवेल्हाळ साहित्यिक गेला.

कधी पाचवीला कि सहावीला होतो तेंव्हा मनाला पहिली भुरळ घालणारे त्यांचे लिखाण. लिखाण नव्हतेच ते. ते बोलणे होते. ते वाचताना ते आपल्याशी बोलत आहेत असेच वाटायचे. कॅसेट रेकॉर्डरला सुद्धा लाजवेल इतके जिवंत बोलण्याची किमया माडगुळकर केवळ लेखणीच्या सहाय्याने साधत. शंकर-जयकिशन यांचे संगीत आणि माडगूळरांचे लिखाण. या दोन गोष्टी लहानपणीच आत्यंतिक प्रिय झाल्या. नंतरच्या आयुष्यात त्यांची गोडी व उस्तुकता कमी होण्याऐवजी वाढतच गेली. इतकी दुनिया बघितली तरीही आजतागायत ती गोडी कमी नाही झाली. कॉलेजात असताना लायब्ररीमधून माडगूळकरांची दिसेल ती पुस्तके घेऊन अधाशासारखा वाचत सुटायचो. किती ओघवते लिखाण. आणि केवढी ती प्रतिभा. एकच व्यक्ती लेखक असते, चित्रकार असते, निसर्गाची गाढी अभ्यासक असते, ग्रामीण जीवनाशी तादात्म्य पावलेली असते, पक्षी-प्राणी यांची अभ्यासक असते, आकाशवाणीवर नभोनाट्य लिहिण्यापासून चित्रपटांच्या कथा लिहिण्यापर्यंत त्यांच्या प्रतिभेचा आवाका असतो. हे सगळे जाणवून मन अक्षरशः थक्क थक्क व्हायचे.

लिखाण सुद्धा साधे असे. अलंकार नाही, शब्दजाल नाहीत, अनावश्यक नाट्य निर्माण करण्याचा आग्रह नाही, वाचकाच्या भावना उद्युक्त करण्याची निष्फळ धडपड नाही, काहीतरी सिद्ध करायचा अभिनिवेश नाही, शब्दांचे अकांडतांडव तर नाहीच नाही. काही नाही. पण किती जिवंत. कारण ते नैसर्गिक असायचे. मला तरी वाटते लिहिल्यानंतर माडगुळकर वाक्यांची वा शब्दाची फेरतपासणी अथवा पुनर्रचना कधीच करत नसावेत. जे जसे लेखणीतून आले ते तसे बस उतरवून छापायला देत असावेत. म्हणूनच ते इतके सहजसुंदर आणि ओघवते व्हायचे. त्यातला जिवंतपणा जाणवायचा.

समकालीन लेखक आणि प्रख्यात कथाकथनकार शंकर पाटील यांच्या बरोबर केलेल्या एका बस प्रवासाचे वर्णन माडगूळरांनी एका कथेत केले आहे. अगदी साधा "यट अनादर" प्रवास. काही म्हणजे काहीही विशेष घडलेले नाही त्यात. पण कथेच्या शेवटी "आणि पाटलांच्या बरोबर केलेला शेवटचा प्रवास संपला" असे अगदी सहजगत्या जेंव्हा ते लिहून जातात आणि कथा संपवतात. तेंव्हा... "काय? शेवटचा? बस एका वाक्यात? झाले? अरे असे कसे? अरे बोला अजून काहीतरी त्याविषयी" अशी मनाची तडफड सुरु ठेवून ते जातात. त्यामुळे तो साधा प्रवास आपल्या मनातसुद्धा सतत रुंजी घालत राहतो. किती साध्या साध्या गोष्टी असतात. पण त्या शेवटच्या घडतात तेंव्हा आयुष्यभर लक्षात राहतात, हेच त्यांनी त्यातून दाखवले जणू. त्याचमुळे तो प्रवास आपल्या मनात सुद्धा तितकाच जिवंत राहतो. असे वाटते कि माडगूळकरांच्या आणि पाटलांच्या बरोबर आपण सुद्धा तिथे होतो. माडगूळकरांनी आपल्या आयुष्यात घडलेल्या घटना वाचकाच्या आयुष्यात घडल्यात असे जाणवून देण्याची किमया आपल्या लिखाणातून अशी असंख्यवेळा साधली आहे.

पुण्यातल्या सकाळ दैनिकाच्या कीबोर्डवर टंकलेल्या एका वृत्ताने उपग्रहातून कि अन्य कुठून कुठून पार इंग्लंडपर्यंत प्रवास केला. माझ्यापर्यंत आले. आणि भावविश्वाचा भाग बनून राहिलेला एक साहित्यिक, माझा लेखनगुरु आता ह्या जगात राहिला नाही ह्याची त्या वृत्ताने जाणीव करून दिली. लिखाणातून बोलायला शिकवणारे माडगुळकर गेले. पुस्तकातून होणारे त्यांचे बोलणे आता कायमचे थांबले. ते आता नव्याने घडणार नव्हते. दीर्घ श्वास घेतला. खुर्चीवर मान मागे टाकून डोळे मिटले. भर ऑफिसात डोळ्यातून पाणी यायला परवानगी नव्हती. "थांब रे थांब. काहीही झालेले नाही. गप्प्प. मूर्ख आहेस का रडायला. काहीही काय. गप्प. गप्प्प बस. एकदम चुप्प्प. गप्प्प..." मनाला बजावत राहिलो. मग उठून तडक रेस्टरूम गाठली. आणि अश्रूंना वाट करून दिली.
---

वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्त्या आल्या तेंव्हा वाटले होते कि बरे झाले ह्या आता कायमच्या राहतील. आता पूर्वीसारखे वर्तमानपत्र जपून ठेवायची गरज नाही. असे वाटून देखील कसे मनात आले कुणास ठावूक. माडगूळकर गेले तेंव्हा ज्या बातम्या आणि लेख आले त्याच्या प्रिंटआउट काढून ठेवल्या. आणि नंतर ते विसरून सुद्धा गेलो. आज ईसकाळ च्या जुन्या आवृत्त्या नेटवरून गायब झाल्या आहे. संकेतस्थळ प्रणाली बदलल्यानंतर जुन्या आवृत्तीमधील बातम्या निघूनच गेल्या त्या कायमच्या. हि बातमी आणि संबंधित लेख सुद्धा उडाले.

परवा जुन्या कागदांची तपासणी करत असताना तब्बल सतरा-अठरा वर्षांनी त्या प्रिंट्स सापडल्या. त्या तशाच स्कॅन करून इथे प्रतिक्रियांमध्ये टाकत आहे. याकरिता ईसकाळ प्रकाशनाची परवानगी वगैरे घेतलेली नाही. पण पूर्वी बातम्यांची कात्रणे मायबोलीवर पाहिली आहेत. म्हणून हे चालेल असे वाटते. तथापि मायबोलीच्या धोरणात बसत नसेल तर या प्रतिक्रिया उडवल्या तरी माझी काही हरकत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख आठणवणी.
माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक.

सुंदर आणि भावस्पर्शी लेख. बातम्यांची कात्रणंही वाचून त्या काळात गेल्यासारखी भावना निर्माण झाली. बातमीत ज्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यापैकीही काही मान्यवर आता या जगात नाहीत हे जाणवून वाईट वाटलं. त्या ५-७ वर्षांत बरीच पडझड झाली. कुसुमाग्रज, पुलं, सुधीर फडके, शांता शेळके असे अनेक दिग्गज त्याच काळात दिवंगत झाले.

व्यंकटेश माडगूळकरांची सत्तांतर, बनगरवाडी, शिकारकथांची पुस्तकं ही सगळी भन्नाट आहेत. वाचकाला समृद्ध करून टाकणारी.

हृदयस्पर्शी लेख आणि कात्रणातल्या आठवणी

परक्या मुलुखात राहणार्‍या लोकांकरता अगदी वरदान आहे इंटरनेट

जबरदस्त लेखक
कात्रणे पाहून नॉस्टॅल्जिक झालो.
अमूल्य ठेवा

@जिद्दु, हो माडगूळकरांना शिकारीचा छंद होता. तो कसा जडला आणि कसा सुटला हे त्यांच्याच शब्दात जाणून घेणे योग्य होईल. "माझा शिकारीचा छंद" या त्यांच्या कथेत त्यांनी याविषयी विस्ताराने लिहिले आहे. जे घडले तसे त्यांनी लिहिले आहे. क्रोंच पक्षाच्या जोडीतल्या नराला मारल्यानंतर त्या मादीने असहायपणे त्याच्या भोवती मारलेल्या घिरट्या, एका भेकराच्या मादीला मारलेला प्रसंग आणि नंतर ती प्रेग्नंट होती असे लक्षात येणे असे प्रसंग लिहून शेवटी ते म्हणतात,
"अशा प्रसंगांची माळ मला सांगता येईल. पण अशा प्रसंगांमुळे बंदूक टाकून मी दुर्बीण हाती घेतली, असे म्हणता येणार नाही. मी मनाने वाढलो आणि हे आपोआप झाले. अवखळ असे वय सोडले तर कोणता चांगला माणूस आपल्यासारख्या जिवंत राहण्याचा अधिकार असलेल्या कोणाही वन्य प्राण्याचा खून करण्याची इच्छा धरील?"

सुदैवाने हे ललित गुगल बुक्स वर इथे संपूर्ण वाचायला मिळेल:

https://books.google.co.in/books?id=RGAyAwAAQBAJ&lpg=PT54&ots=8xAZMCsBAS...

अतुलजी धन्यवाद लिंक बद्दल. बऱ्याच वर्षांपूर्वी सकाळच्या रविवारच्या पुरवणीत दुसऱ्या एका साहित्यकाराने त्यांच्या या शिकारीच्या छंदाचा नामोल्लेख न करता समाचार घेतला होता. त्यात बरेच खाजगी सन्दर्भ होते. वरील लेखातील निंबाळकरांचा देखील संदर्भ होता. दोन तपे उलटल्यावर हे वाईट काम आहे हे त्यांना उमजलं याचं नवल आहे. ते दोघे बंधू जन्मजात सिद्ध आणि श्रेष्ठ लेखक होते यात वाद नाही पण असं लाघवी लिहिणारा व्यक्ती शिकार करून त्याच ओघवतं वर्णन कसं करू शकतो हा प्रश्न कायम पडतो. बाकी तो लेख म्हणजे त्यांनी नन्तर केलेली मलमपट्टीच वाटते तटस्थपणे वाचल्यास.

>> दोन तपे उलटल्यावर हे वाईट काम आहे हे त्यांना उमजलं याचं नवल आहे

शिकार करणे हे त्याकाळात तसे खूप सामान्य होते. जसे सुरवातीला माडगुळकरांनी उल्लेख केलेले पक्षी/प्राणी हे गावकऱ्यांकडून मुख्यत्वे खाण्यासाठी म्हणून मारले जात असंत (गम्मत अथवा छंद म्हणून नव्हे). त्यातूनच पुढे काहींचा तो छंद झाला. शिकार करून घरी आल्यावर नातवाईकांना त्यातला वाटा देणे ह्यात फार पराक्रम वाटत असे. पण साधारणपणे १९७२ च्या आसपास शिकारीवर बंदी आली. बहुदा त्या दरम्यान सामाजिक मानसिकताच बदलत गेली असेल. शिकारीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला (जसा आपण आज विचार करतो आहोत त्याची सुरवात त्या काळात झाली असावी). वीस बावीस वर्षे उलटून गेल्यावर वयानुसार त्यांना आलेली वैचारिक परिपक्वता याबरोबरच हा सामाजिक बदल सुद्धा कारणीभूत ठरला असावा.

हे निरपराध जनावरांची शिकार करायचे तेच आहेत का ?

Submitted by जिद्दु on 29 August, 2019 - 05:55
>>>जिद्दु चांगल्यातलं वाईटच शोधायची सवय जडली आहे तुम्हाला? मागे अण्णा हजारे यांच्या विषयी काही तरी लिहून खोडलं होतं तुम्ही.
https://www.maayboli.com/node/68187 हा लेख सुध्दा तसाच आहे.

बरे ते जाऊ दे. अण्णा हजारे यांच्या विषयी जे काही आहे ते मला सांगाल का प्लीज? खूप उत्सुकता ताणून धरलीय जाणून घेण्यासाठी.

जाऊद्या काय वेगळं सांगणार ? जे साऱ्या पारनेरला माहितेय तेच होतं ते. चुका शोधणे आणि नकारात्मक बोलणे या फरक असतो थोडाफार. मी तर गांधी आणि विनोबांवर पण येणार होतो पण लोक छिद्रान्वेषी आणि काय काय म्हणू लागल्याने धागा कोम्यात गेला. असो, अण्णाजी-मोदीजी-देवेंद्रजींकी जय !
आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे

पण एकच धागा काढून गाशा गुंडाळणं बरं नाही. का एखादा डूआयडी आहे तुमचा. बरं ते कोणत्या लेखकाला भेटायला आवडेल तुम्हाला हे नीट कळलं नाही वो मला. इस्कटून सांगा की राव.
रच्याकने तात्या हे माझेही खूप आवडते लेखक आहे. गांधी हत्येनंतर जाळपोळीच्या संदर्भात खूप सुंदर पुस्तक लिहिले होते त्यांनी.

Pages