देशोदेशीच्या चवी : भाग २ : ग्रीस : ताझिकी आणि ग्रीक सलाड

Submitted by हजारो ख्वाईशे ऐसी on 23 August, 2019 - 05:13

1C2532BC-33FD-40B9-A241-9DF62E228594.jpegएकदा ब्लू झोनबद्दल वाचत होते. ब्लू झोन म्हणजे जगाचे असे भाग जिथल्या माणसांचं सरासरी आयुष्य इतर जगातल्या माणसांपेक्षा जास्त आहे. जिथं माणसं दीर्घायू आहेत, नव्वदी पार केलेले लोक बरेच आढळतात अशा जगातल्या जागा. या ब्लू झोनमध्ये ग्रीसचा एक भाग आहे.
ब्लू झोनमधल्या लोकांच्या दीर्घायुष्याची जी साधी सोपी रहस्ये आहेत त्यातलं एक आहे भरपूर भाज्या आणि फळांचं सेवन. त्यांच्या आहारात कच्च्या भाज्या आणि फळे मुबलक प्रमाणात असतात.
आजही जे आरोग्यदायी आहाराबाबत जागरूक आहेत त्यांना ग्रीक आहार सुचवला जातो त्याचं कारण हेच असावं.
ग्रीक जेवणातल्या अशाच दोन आरोग्यदायी आणि चविष्ट पदार्थांनी माझं मन जिंकून घेतलं.
पहिलं म्हणजे ग्रीक सलाड आणि दुसरी ताझिकी डिप.

ग्रीक सलाडबद्दल बरंच ऐकून होते, त्यामुळे ग्रीसला पोहोचल्यावर घेतलेल्या पहिल्या जेवणाची सुरुवात या सलाडनेच करायची ठरवलं होतं मी.
ग्रीक सलाडचे घटक अगदी साधे आहेत.
काकडी, टोमॅटो, कांदा, ऑलिव्ह्स आणि एक मोठा गुबगुबीत ग्रीक फेटा चीज क्यूब. वरून चवीपुरतं मीठ, ग्रीक ओरेगॅनो आणि त्यावर शिंपडलेलं ताजं ऑलिव्ह ऑइल.
तसं म्हणावं तर त्यात काही विशेष गोष्टी नाहीत. पण साध्या कलाकारांनी मिळून एखादी सुपरहिट फिल्म द्यावी तसे हे साधे घटक अशी काही भट्टी जमवतात कि मन खुश होऊन जातं.
भाज्यांच्या करकरीतपणाला फेटाचा मऊ दुधाळ स्वाद बरोबर बॅलन्स आउट करतो आणि आपल्याला हे सलाड इतकं का प्रसिद्ध आहे ते कळायला लागतं. कुठलंही ग्रीक जेवण या सलाडशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. काही वेळा ग्रीक लोक फक्त हे सलाड आणि सोबत एखादी मच्छी किंवा चिकनची डिश इतकाच आहार घेतात. आता हे जेवण बऱ्यापैकी कोरडं होतंय असं वाटतंय ना?! आणि तिथेच एन्ट्री होते ताझिकीची.

मराठी माणसाला जशी कोशिंबीर प्रिय आहे तशीच ग्रीक लोकांना ताझिकी. ताझिकी डिप ग्रीक जेवणाला साथ देण्यासाठी असतेच. कोशिंबीर आणि ताझिकी दोन्हीचा मूळ घटक तोच, दही! पण फरक आहे तो चवीत.
ताझिकी मध्ये वापरलं जात ते ग्रीक योगर्ट, ज्याची कंसिस्टंसी अगदी आपल्या चक्क्याइतकी घट्ट असते.
या ग्रीक दह्यात मिसळला जातो तो अतिशय बारीक ठेचलेला किंवा खिसलेला लसूण. आणि खिसून, पिळून पाणी बाजूला काढलेली काकडी. आणि वरून ते बहुगुणी ऑलिव्ह ऑइल.
ज्यांना दही आवडतं आणि जे आपल्या कोशिंबीरीचे चाहते आहेत ते ताझिकी नुसतीहि खाऊ शकतात. ब्रेडला तोंडीलावणं म्हणून हिचा मूळ उपयोग होत असला तरी नुसती ताझिकीही अफलातून लागते.
आम्ही अथेन्सहून सँटोरिनीला गेलो होतो. क्रूझमधून फिरण्याची माझी पहिलीच वेळ. सँटोरिनी निव्वळ वेड बेट आहे. चंद्रकोरीच्या आकाराच्या बेटावर पसरलेली निळ्या पांढऱ्या घरची नक्षी आणि आजूबाजूला पसरलेलं एजिअन समुद्राचं निळंशार पाणी.

मी ग्रीक सलाड आणि ताझिकी पहिल्यांदा चाखली ती सँटोरिनीतच. सँटोरिनीच्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेल्या भूमीवर उगवणाऱ्या आणि गोड चव असणाऱ्या लालचुटुक चेरी टोमॅटोजनी त्या ग्रीक सलाडला बहार आणली होती. सोबत ताझिकी आणि ब्रेड मागवला होता. लोत्झा रेस्तराॅंच्या रुफटॉपवर बसून सँटोरिनीचं सौंदर्य न्याहाळत जेवत होतो. आणि अचानक त्या रेस्तराँमध्ये वाजणार गाणं बदललं.
“तुमको देखा तो ये खयाल आया...
जिंदगी धूप तुम घना साया...”
आम्ही भारतीय आहोत हे बोलता बोलता त्या लोकांना कळलं होतं आणि त्यांनी ते गाणं खास आमच्यासाठी लावलं होतं.
त्या अचानक मिळालेल्या प्रेमाने भारावून गेलो.
ते गाणं. तो जगजितचा स्वर्गीय स्वर आणि सोबत ग्रीक जेवण. आजूबाजूला एजिअन समुद्राचं रूप खुलवणारं चमचमतं ऊन. तो क्षण मनावर तसाच कोरला गेला आहे.
आजही जेंव्हा मी ग्रीक पदार्थ चाखते तेंव्हा तो क्षण तसाच नजरेसमोर उभा ठाकतो. अर्थात तो आठवणीत राहण्याचं श्रेय त्या सुंदर सलाड आणि ताझिकीला.

1C2532BC-33FD-40B9-A241-9DF62E228594.jpeg

Group content visibility: 
Use group defaults

अरे वा
हा ही भाग खूप छान
खूप नवी व इंटरेस्टिंग माहिती मिळतेय
करून पाहायला हवं
ते दुसऱ्या फोटोत नारिंगी रंगाची चटणीसारखी वाटी कसली आहे?

मला खुप आवडति ताझिकी, ते सॅलड, .
तसाच पर्शियन प्रकार मस्त-ओ-खैर आणि नान-ओ-सब्जी.
ग्रीक, पर्शियन पाककृती खुप मस्त आहेत.