केस, उंदीर आणि बॅट

Submitted by रमणी on 21 August, 2019 - 03:36

आज पहाटे तीन वाजताच्या साखरझोपेत अस्मादिक बिनघोरी घोरत असताना, माझ्या विपुल केशसंभाराशी ( उच्च लिखाणासाठी घेतलेली स्वायत्तता... मराठीत सिनेमॅटिक लिबर्टी हो! बाकी प्रत्यक्षात त्या दिल से मधल्या ' तू तो नही है मगर, तेरी आहटे है' असा भास माझ्या घरच्यांना देण्याचा चंग बांधल्यागत इथे तिथे पण माझं डोकं सोडून सगळीकडे स्वतःला टाकून घेणाऱ्या केसांचं काय करावं हा प्रश्न मला छळतो. पण ते असो.) तर माझ्या विपूल केशसंभाराशी कुणीतरी खेळत आहे असा भास झाला. 'अग्गोबाई, इतकी कसली आता लाडीगोडी!' असा विचार करत हलकेच डोळे किलकिले करत, ओठांवर अर्धोन्मिलीत का काय म्हणतात तसे स्मित आणण्याचा प्रयत्न करत पाहिले! शेजारी नवरा घोरतच पडला होता.

अरेच्चा! हा नाही? मगकोण? म्हणून मान वर वळविली तर...किलकिले डोळे विस्फारले आणि अर्धोन्मिलीत संपून गर्भगलित भाव चेहऱ्यावर आले. माझे सुरेख कुंतल (पुन्हा एकदा स्वायत्तता) एक छोटेसे मूषकराज कुरतडत होते, ते चटकन पळून लेकीच्या खेळण्याच्या ढिगाऱ्यात लुप्त होताना मी पाहिले.

खाडकन झोप उडाली! आता काय करावं? झालं असं होतं, की उन्हाळ्याच्या दिवसांत बेडरूम मध्ये फार उकडतं म्हणून आमच्या गच्चीला (हो! आमच्या पुण्यामध्ये 4फूट बाय 4 फूट अशी छोटीशी छप्पर नसलेली जागा फ्लॅटला चिकटून असली की तिला 'गच्ची'च म्हणतात, किंवा मराठीतून 'टेरेस'!) तर आमच्या गच्चीला लागून असलेल्या हॉलमध्ये छान पश्चिमेचा वारा येतो (मला त्या रवींद्रनाथ टागोरांची बाई कमालच वाटते. पश्चिमेच्या वाऱ्या ऐवजी दक्षिणेच्या वाऱ्या असं म्हणून गीत लिहिलं आहे, तेच ... पुलंनी भाषांतरित केलं होतं ते! नाहीतर पुल बहुतेक अर्थ लावताना हुकले असावेत. मी कधीही दक्षिणेकडून वाहणाऱ्या वाऱ्यात झोपलेले नाही. कुणी जाणकार असतील त्यांनी सांगावं. बहुतेक पश्चिमेच्या बंगालकडे हे गौडबंगाल होत असावं आणि वारे दक्षिणेच्या बाजूने वाहत असावेत. असो! फारच विषयांतर.) तर पश्चिमेच्या वाऱ्यासाठी म्हणून तिकडे खाली गाद्या घालून झोपण्याचा प्रकल्प आम्ही कालच रात्रीपासून राबवायला काढला होता. हवेच्या अतिहावेपोटी मी सगळ्या खिडक्या तर उघड्या ठेवल्याच पण आमच्या गच्चीचं दारही उघडं ठेवलं. आता गच्चीत छान मोगरा फुलला होता, म्हंटल त्याचा मंद सुवास येईल. पण कुठे एवढं व्हायला... त्या मंद सुवासाऐवजी मेला नेमका एक चपळ उंदीर आला आणि माझ्या मंदपणाबद्दल मला ऐकून घ्यावं लागणार ह्याची खात्री मला पटली.

कुणालाही (पक्षी: नवरा) जागं न करता ह्याला कसं हकलावं (पक्षी: उंदीर) हे काही मला कळेना. मग शेवटी ह्याला (पक्षी: नवरा) हाक मारलीच. आता त्याला सुषुप्तीच्या महासागरातून ओढून जागृतीच्या किनाऱ्याला लावणं हे अत्यंत अवघड काम. बरं एकदम ओरडावं तर दचकून उठून लहानगं कन्यारत्न मोठ्या प्रमाणावर मोलाची मदत करेल ह्याची पक्की खात्री.

इकडं उंदीर, तिकडं नवरा आणि मध्ये कन्या अशी कोंडी पडलेली. कोणत्याही मुत्सद्दी योद्ध्याला संभ्रमात पाडेल अशीच परिस्थिती. त्यातून माझ्याकडे कुठे भगवान कृष्ण आलाय समजवायला? शेवटी मीच निर्णय घेतला.

अगदी हळू आवाजात त्याच्या कानांशी (पक्षी: नवरा) म्हणले, "अरे उठ ना! तो आलाय!"
"आं! हां. कचरपेटी बाहेर ठेवलीय. झोप मग"
"अरे झोप काय? केस कुरतडत होता!"
" क्काय? कुणाचे?"
" *माझे!*"
तो टकटकीत जागे होत, "कचरेवाला तुझे केस कुरतडत होता?" ; त्याच्या चेहऱ्यावर वच्याक भाव.
"कचरेवाला?" माझ्याही चेहऱ्यावर वच्याकच.
"कोण आलं?"
"उंदीर!"
"क्काय? कुठे?"
मग मी सर्व कथा ऐकवली. पण तो ह्या उघड्या दारातून आला हे सत्य मात्र लपवले.(नरोवा कुन्जरो वा स्टाइल!) त्याऐवजी एक पॉईंट सर करण्यासाठी म्हणाले, "हा चिट्टूच्या खेळण्यांचा ढीग नीट आवरायचं म्हणून गेले 5 दिवस ह्या खोलीत घातला आहेस, मलाही आवरू देत नाहीस आणि स्वतः उरकतं घेत नाहीस, त्यात लपला आहे तो!"
अजून त्याचा मेंदू नीट सुरू न झाल्याने म्हणा, उंदीर मारण्याच्या कामगिरीवर त्याचीच नेमणूक होणार आहे हे सत्य आकलन झाल्याने म्हणा किंवा ही कामगिरी कशी पार पाडावी ह्याचा विचार करत असल्याने म्हणा, तो उघड्या दरवाजाचा पॉईंट सर करायचं विसरला. थोडी सरशी झाल्याने मी मुद्दा रेटला.
" आता तो खेळण्यांत लपलाय, मी अंथरूण उचलते आणि चिट्टूला आत आज्जीपाशी टाकते. मग तू उंदीर मार!"
" अरे, मार काय मार? कसा मारू?"
" मला काय माहीत! तू बघ आता."

मग यथावकाश साहेबांनी स्पोर्ट शूज चढवले, एका हातात मोपस्टिक (तीच हो खाली बोळा बांधलेली काठी) एका हातात झाडू घेऊन सज्ज झाला. नाही म्हटलं तरी हिम्मत दाखवली पठ्ठ्याने. मला जरा कौतुक वाटलंच. शूरपणा म्हणजे दुसरं काय हो? हेच!

मग आवाज ऐकून विशाखा - माझी धाकटी बहीण बाहेर आली. तिने परिस्थितीचं गांभीर्य जाणून स्वतःला सबला बनविण्याकरता त्या खेळण्यात पडलेली प्लॅस्टिकची बॅट उचलली. आणि मग, युद्धासाठी आम्ही व्यूहरचना करू लागलो.
"हे बघ कोणत्याही परिस्थितीत गनीम सोफ्याखाली लपायला नको. आणि हो स्वयंपाकघरात शिरू नाही म्हणून ते बंद करायला हवंच."
"मी ही कोठी इथे आडवी लावते."
"छान!"
"सोफ्यापाशी कॅरम, खोकी आणि पुठ्ठ्याच्या बांधणीची पुस्तकं लावावीत"
"अगं विशाखा, ते उलट लाव!"
"पण तो खोका नको, हा उंच आहे!"
" अगं, इथे कुठे? तो अंगावर आला तर मीच पडेन!"
" तुम्हा लोकांना साधी उंदरासाठी मोर्चेबांधणी करता येत नाही? काय स्वतःला मराठी म्हणवताय!" नवरोजी.
"काये, आम्ही दोघींनी उंदीरमार युद्धकलेचे प्रशिक्षण घेतलेलं नाहीये!" मी.
" आगाऊपणा पुरे! ही भांडायची वेळ आहे का?"
"ताई, जीजू, अरे एक व्हा. गनीम अजून लपून आहे." विशाखा
"हा! होहो!" सगळी भांडणं आणि मोर्चेबांधणी झाली तोवर 4.30 वाजले होते.

खरं सांगायचं तर ह्या प्रत्यक्ष लढाईची मला भीतीच वाटत होती. पण असं बोलून दाखवून मला पॉईंट गमवायचा नव्हता. मी हळूच स्वयंपाक खोलीच्या दाराशी सरकले. हॉलमधून उचललेल्या खेळण्यांचा ढीग तिथे आत घातला होता आणि दाराशी कोठी. आणीबाणीच्या क्षणी चटकन कोठीवरून उडी मारून न धड़पडता आत जाता येईल अश्या मोक्याच्या जागी मी उभी. पण डोक्यावर अदृश्य केसरिया बांधलेले ते दोघे मात्र आक्रमक पावित्रा घेऊन उभे झाले.

ह्याने समानाला काठीनं थोडं ढोसलं आणि गनीम जोरात बाहेर आला तो विशाखाच्या दिशेने! आमचे साहेब त्याला मारण्याकरता त्वेषाने दौडत खाली वाकले तोच,"आई गं!" माझ्या भगिनींनी मूषकराजांवर केलेला बॅटचा जोरदार वार त्यांच्या डोक्यावर! अरेरे! आमचा बिनिचा शिलेदार युद्ध उघडतानाच जायबंदी!

" तू कुणाच्या बाजूने आहेस विशाखा?" इति कळवळणारे, डोकं धरून कोठीवर बसलेले आमचे हे.
" हे बघा, मी तुमच्या भांडणात नाहीच! मला ओढू नका. आणि ही काय वेळ आहे का बहुमताचं राजकरण करण्याची?" विशाखा. गुणांची ग माझी बाय!
" अगं ए, तिच्या माझ्यातलं भांडण म्हणत नाहीये! उंदराच्या बाजूने की माणसांच्या?" हा
" अच्छा ते होय! तुमच्याच!" विशाखा

मग बॅट अशी वर आकाशात न धरता जमिनीजवळ कशी धरावी आणि उंदीर आल्यास आपल्या बाजूच्या मावळ्यांना घायाळ न करता कशी हाणावी ह्याचे धडे झाले. पण तिला काही केल्या खाली बॅट पकडून उंदीर मरेल ह्यावर विश्वास बसेना आणि त्याला आपल्याला फितूर असलेले गारदी युद्धात घुसल्याच्या भीतीने युद्ध लढवेना. आता 5 वाजत आले होते.

इथे माझ्यासारख्या मुत्सद्दी नेत्याची देशाला गरज तयार झाली आहे असा ठाम समज (केवळ माझा) झाल्याने, मी स्वयंपाक घरातून बाहेर आले. आणि धोरणीपणे त्यांना शस्त्रांची अदलाबदल करायला लावली. आता त्याच्या हातात मोपस्टिक आणि बॅट, तिच्या हाती झाडू. माझ्या हाती दुसरा झाडू (पण स्थान तेच आधीचं! चढाईपेक्षा पळाईला साजेसं.)
आता मात्र तुंबळ युद्ध पेटलं.
"तो बघ तिकडे पळाला, ती पिशवी खेच."
"ह्या बॉक्स मध्ये शिरलाय मी पाहिलं."
"माझे आई जरा मागे घे तो झाडू माझ्या कानात जातोय."
"जीजू, मारा फटका तो तिथे पळतोय...."
असं करत करत एकदाची एक बॅट त्या उंदराच्या वर्मी बसली आणि दुष्मन चारिमुंडया चीत झाला.
पण आम्ही श्रीरामाचे, शिवाजीचे वंशज असल्याचं आम्ही विसरलो नाही. अरे शत्रुत्व मृत्यूपर्यंतच. तद्नंतर केवळ माणुसकी. त्याला उचलून आमच्या टेरेस गार्डनच्या एका मोठ्या कुंडीत त्याला मूठमाती देण्यात आली.

आणि अस्मादिक? त्या विजयी वीरांकरिता चहा आणि कालच 'अन्नपूर्णावर' रेसिपी मिळविलेला गुळाचा सांजा करण्यासाठी वळती झाल्ये.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच .. Lol

वेलकम बॅक रमणी.. खूप वर्षांनी दिसलात.

खुशखुशीत Lol

मग शेवटी ह्याला (पक्षी: उंदीर) हाक मारलीच. >> पक्षी : नवरा हवंय ना इथे??

विनिता, थांकु. सुधारलं.
अनघा, हो! बर्याच वर्षांनी येते आहे इथे!
पहिला विनोदी लेखन प्रयत्न आहे.
धन्यवाद सगळ्यांना!

Pages