जोडीदार 'गेल्या'नंतर.....

Submitted by साद on 19 August, 2019 - 03:20

बहुसंख्य भारतीय लग्न करतात आणि वैवाहिक जीवन जगतात. आता लग्न म्हणजे तडजोड आलीच. प्रेम, संवाद, वाद, कलह हेही या जीवनाचे पैलू. जे लोक विवाह दीर्घकाळ यशस्वी करतात त्यांच्या बाबतीत एक बाब जाणवेल. ती म्हणजे - जोडीदाराच्या नसलेल्या पण स्वतःच्या असलेल्या एखाद्या आत्यंतिक आवडीला मुरड घालणे. हे पती-पत्नीत दोघांकडून होत असते. यात खाणे- 'पिणे', छंद, अस्तिकता- नास्तिकता, खर्च / काटकसर ….असे अनेक मुद्दे असू शकतात. पण आपले वैवाहिक जीवन यशस्वी करायचे या उद्देशाने असे लोक यांसारख्या छोट्यामोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. कधीमधी जोडीदाराला न आवडणारी आपली एखादी आवड चोरून देखील पुरी करतात !

आपल्यापैकी बरेच जण विवाहित असतील. आपलीही अशा प्रकारे काही बाबतीत कुचंबणा होत असेल. आता एका अटळ सत्याला आपणा सर्वांनाच कधीतरी सामोरे जायचे आहे आणि ते म्हणजे मृत्यू. आता आपल्या बाबतीत दोन शक्यता संभवतात :
१. स्वतःचा मृत्यू प्रथम होणे, किंवा
२. आपल्या जोडीदाराचा मृत्यू आधी होणे .

आता वरील मुद्दा आपल्या संदर्भात पाहू. आपली एखादी अत्यंत आवडीची गोष्ट आपल्याला जोडीदाराच्या नावडीमुळे मुक्तपणे करता येत नसेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे कधीतरी आपल्या मनात असा विचार येऊ शकतो, " जर का आपला जोडीदार आपल्याआधी 'गेला', तर त्याच्यामागे आपण ती गोष्ट अगदी मुक्तपणे करू शकू !"
( मात्र जर का आपणच आधी मरण पावलो, तर हा प्रश्नच उद्भवत नाही.)

मला खात्री आहे की प्रत्येक विवाहिताच्या मनात अशी एखादी तरी इच्छा नक्की असते. फक्त आपण ती बोलून दाखवत नाही.
एव्हाना या धाग्याचा उद्देश तुमच्या लक्षात आला असावा. समजा, वर उल्लेखिलेल्या दोन शक्यतांपैकी दुसरी आपल्या बाबतीत खरी झाली, तर पुढे आपण अशा कुठल्या आवडी/इच्छा मनसोक्त पूर्ण करू, हे इथे लिहावे. केवळ स्वप्नरंजन म्हणून लिहा; कुठलाही अपराधी भाव मनात न आणता. भविष्यात पुढे काय होईल हा भाग वेगळा, पण आता तर थोडी गंमत म्हणून लिहा.

जे लोक इथे टोपण नावाने आहेत आणि ज्यांचा जोडीदार इथे फिरकतही नाही, त्यांनी तर बिनधास्त लिहावे !

जर तुमच्या सर्व इच्छा अगदी मनसोक्त पुऱ्या झाल्या असतील तर तसेही लिहा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users