डाळगंडोरी

Submitted by भानुप्रिया on 7 August, 2019 - 06:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव जुडी आंबटचुका
७-८ हिरव्या मिर्च्या
पाव कप तूर डाळ
१ टे-स्पू तेल
--
मसाला / फोडणी साहित्य

५-६ लसूण पाकळ्या
पाव कप किसलेलं सुकं खोबरं
१ छोटा कांदा
अंगठ्याच्या नखाएवढं आलं
मूठ्भर कच्चे शेंगदाणे
३-४ टे-स्पू तेल
मोहरी, जिरं, हिंगं इत्यादी चिल्लर मंडळी
हळद (डोळे फिरवणारी बाहुली)
काळा मसाला (गोड्या मसाल्याची अगोड वर्जन)
फार आंबटशौकीन असाल तर लिंबु, आपापल्या झेपेबिलिटी प्रमाणे

क्रमवार पाककृती: 

ह्या प्रकाराला डाळागंडोरी का म्हणतात ह्याची उकल मला गेल्या २० वर्षांत एकदाहि झाली नाही. पण हा प्रकारच इतका अप्रतीम आहे, कि नावाच्या व्युत्पत्तीशी आपल्याला काय करायचंय असा विचार आल्यावाचून रहात नाही.

तर, पाकृ:

वन मॅन मील साठी आयडीयल असणार्‍या कूकरमध्ये वरती नमूद केलेलं १ टे-स्पू तेल तापवायला ठेवा.
तेल तापलं की त्यात बरिक चिरलेल्या हिरव्या मिर्च्या, स्वच्छ धुवुन, बरीक चिरलेला चुका घाला आणि चुक्याचा रंग बदलेपर्यंत परतून घ्या.
रंग बदलला असं वाटलं की लागलीच धुतलेली तूर डाळ त्यात घाला, एक दोन मिनिटं परता आणि मग अंदाजाने पाणी घालून ३-४ शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या.

तुम्ही एकदा का कूकरचं झाकण बंद केलंत, की पुढचं शिजवायचं काम कूकर स्वतः करणार आहे, त्यामुळे तुम्ही मसाला करण्याच्या तयारीला लागा, कूकरचं तोंड बघत बसून काहि-एक मिळत नाही. (हो, स्वानुभव!)

तर, आता जे जास्तीचं तेल घेतलंय आपण, ते एखाद्या कढईमध्ये गरम करून घ्या.
तेल तापलं की त्यामोसगळे चिल्लर आयटम घाला (मोहरी वगैरे!)
छान तडतडलं कि त्यात लसूण, हवी असल्यास अजून थोडी हिरवी मिर्चि घाला आणि थोडा वेळ परतून घ्या.
लसूण चांगला सोनेरी झाला की त्यात बरीक चिरुन घेतलेला कांदा घाला आणि त्यालाहि सोनेरी होईपर्यंत तेलात परतून काढा.
ह्यानंतर सेम टु सेम करायचंय खोबर्‍याला.
कच्चे शेंगदाणे हे स्वैपाक करताना चाळा म्हणून तोंडात टाकायला घेतलेले नसून, त्यांचा ह्या पाकृ मध्ये उपयोग करायचा आहे.
शेंगदाणे कच्चेच मिक्सर मधून भरड वाटून घ्या आणि खोबरं परतून झालं की त्यात घाला, आता पुन्हा परतून घ्या.
एव्हाना ४-५ शिट्ट्या होउन, प्रेशर उतरून कूकर उघडण्यायोग्य झाला असेल.
उघडून बघा, आतला भाजी-वरणाचा गोळा हाटून घ्या.
हाटलेला हा गोळा मगातपासून परतत असलेल्या कढईमध्ये घाला आनि मसाल्याबरोबर छान एकजीव करून घ्या. आता थोडं (तुम्हाला हि डिश जितकी पातळ हवी असेल त्या प्रमाणात) गरम प्रमाणात), मीठ घाला आनि एक झक्कास उकळी येउ द्या.

डाळगंडोरी तयार आहे.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणांना पुरु शकेल!
अधिक टिपा: 

शक्यतो हि भाकरी किंवा पोळीबरोबर खावी, भातापेक्षा ह्या दोहोंबरोबर हिची चव अधिक खुलते.
(भाकरी तरिही प्रेफर्ड!)
खातांना वरून कच्चं तेल (शेंगदाण्याचं) घालायची पद्धत आहे, तिखट सहन व्हायला मदत होते!
बरोबरीने कच्चा कांदा न खाल्यास पाप लागतं.

माहितीचा स्रोत: 
आमची पर्सनल अन्नपूर्णा, अर्थात आई.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

सस्मित, हो!!!
मला त्या नावाचा कंटाळा आला, अन् तसंहि इथे कोण मेलं मिस करतंय! Lol

फटू बिटू टाकायचा नव्हं? मला वाटलं खानदेशी प्रकार आहे. तिकडे भरपूर हिरव्या मिरच्या घालून अशीच एक डाळीची रेसीपी आहे बहुतेक ‌.

फटू बिटू टाकायचा नव्हं? मला वाटलं खानदेशी प्रकार आहे. तिकडे भरपूर हिरव्या मिरच्या घालून अशीच एक डाळीची रेसीपी आहे बहुतेक ‌.

नवीन Submitted by चैतन्य रामसेवक

देवाशप्पथ खरं सांगते, इच्छा फार फार होती, फोटो टाकायची, पण खाण्यापुढे काही सुचेल तर ना!

आणि हि मी तरी बुलडाण्यात सगळ्यात जास्त खाल्ली, म्हणून वैदर्भीय!

थोडेसे अवांतर.
टाटा ची तुरडाळ साधारण एकशे वीस रुपये किलो दराने मिळते. छान शिजते व चवदेखील फार मस्त आहे.

हो क्का?

मला तर आमच्या घरातलं तिखटंहि अनझेपेबल असतं!
त्यामानाने एकूण ८-१० मिरच्या म्हणजे माझ्यासाठी संपूर्ण आठवड्याचा मिरच्यांचा कोटा!

मस्स्त !! Happy
पण मुळात त्या अंगठ्याच्या नखाएवढ्या आल्याच्या तुकड्याचं करायचंय तरी काय ! ?
आलं घातल्याचं माझ्या वाचनात आलं नाही Light 1

मस्तयं चुक्याची डाळ!

आलं घातल्याचं माझ्या वाचनात आलं नाही>>>>>

मसाला परतताना २-४ शेंगदाणे खाता खाता आले पण खाल्ले दिसतेय ! Wink Light 1

पण मुळात त्या अंगठ्याच्या नखाएवढ्या आल्याच्या तुकड्याचं करायचंय तरी काय ! ?
आलं घातल्याचं माझ्या वाचनात आलं नाही Light 1

अय्या, हो क्की!

मी स्वतः घालत नाही जनरली, त्यामुळे विसरले!

लसणाबरोबरच ठेचून घाला, हाय काय अन् नाय काय!

मस्त आहे पाकृ! मलकापूर, बुलढाण्या भागातली खास पाकृ आहे ही पण त्यात वांगे मस्ट आहे....

मस्त कृती. आंबट्चुका असतांना लिंबाच काय प्रयोजन?

मंजूताई, मलकापूर, बुलढाणा, अकोला भागांत याचं जरा वेगळं वर्जन करतात.
किलोभर पालकाला एक जुडी आंबटचुका आणि पाव किलो हिरव्या मिरच्या घेतात. या मिरच्यांतल्या मूठभर किंवा जरा जास्तही मिरच्या बाजूला करून त्याऐवजी तिकडेच मिळणार्‍या लवंगी मिरच्या (या इथे पुण्यामंबईत मिळणार्‍या गर्द हिरव्या पेक्षा जरा लहान असतात आकारात आणि रंग काळपट असतो अजून; तिखटपणा मात्र चौपट असतो) वापरतात. मिरच्या (दोन्ही प्रकार वापरून) पाव किलो ला कमी नको. जास्त जरूर चालतील.
यानंतर प्रमाणात तुरीची डाळ, शेंगदाणे आणि सुक्या खोबर्‍याअचे काप.
डाळ, भाज्या मिरच्या एकत्र शिजवून शेंगदाणे न खोबर्‍याच्या फोडणीवर पात़ळसर भाजी करतात.
साध्या मिरच्यांमुळे फ्लेवर तर त्या तिखट मिरचीचा तिखटपणा येतो. मस्त जहाल असते ही भाजी. पट्टीचे लोक वाटी-वाटी भर पितातही ही भाजी.

मस्त रेसिपी. इथे आंबटचुका मिळणार नाही तेव्हा त्याला कोणत्या पालेभाजीने रिप्लेस करता येईल हे बघावं लागेल.
(अवांतर- रेसिपी आणि लिहिण्याला थोडे जास्त मार्क.
>>शक्यतो हि भाकरी किंवा पोळीबरोबर खावी, भातापेक्षा ह्या दोहोंबरोबर हिची चव अधिक खुलते.>> पोळीसोबत्/दोहोंसोबत न लिहिता बरोबर लिहिलंत म्हणून. सोबत वाचून तिडीक जाते डोक्यात.)

मिरच्या (दोन्ही प्रकार वापरून) पाव किलो ला कमी नको. जास्त जरूर चालतील>> बाई गं !! दुसऱ्या दिवशी काल काय खाल्लंय याची चांगलीच आठवण होत असेल Wink
आणि याच्या उलट माझ्या माहेरी आई कुठल्याही पालेभाजीत मिरची फोडणीत टाकते आणि मग भाजी फोडणीत टाकायच्या आधी आई मिरची काढून घेते.. रंगामुळे दिसत नाही मग चुकून दाताखाली अली तर ब्रह्मांड आठवतं म्हणून Lol