सारे काही मुक्याने..

Submitted by अ'निरु'द्ध on 4 August, 2019 - 01:31

सारे काही मुक्याने...

०१.. अपरिपक्व मी आततायी
बेताल उद्रेक माझा
परि शांत राहुनि ती
तोल साधते मुक्याने…

०२.. होताच भांडणे ती
अद्वैत विस्कटे आमूचे
नाही चकार शब्द
ती द्वैत सांधे मुक्याने...

०३.. प्रत्येक विवादा अंति
जाति ताणली नाती
शतशब्द व्यर्थ माझे
ती जिंकते मुक्याने…

०४.. ऐकून सर्व या बाबी
मी भासे तुम्हांस पापी
या आशेने भांडतो मी
ती भांडते मुक्याने…

०५.. कधी गोष्ट घडे एक न्यारी
तिची चिडचिड होई भारी
मी योजुनी तिचीच युक्ती
तिज शांत करी मुक्याने...

०६.. धावता जगाच्या पाठी
कधी अपयश मजसी गाठी
मी विझुनी निराश होता
ती आस पेटवी मुक्याने...

०७.. कधी कामांच्या त्या राशी
साचूऽऽनी येऽती उराशी
कंटाळुनी मी जाता
ती रिझवी मला मुक्याने

०८.. कधी शांत निवांत राती
भावना उमलूनी येती
आवेग भावनांचे
ती चेतवे मुक्याने

०९.. उद्रेक मना मनाचे
ती शमवी मुक्या मुक्याने
मौनम् सर्वार्थ साधनम्
हे पटवी पुन्हा मुक्याने…

१०.. विभिन्न आहो आम्ही
वेगळेची असती पिंड
परि नाते अबोल गहिरे
जे बहरले मुक्याने...

११.. ती अबोल असली जरी
बोलके विलक्षण विभ्रम
सहजीवन सुंदर होई
ती बोले सारे मुक्याने...

१२.. शब्द होती जेव्हां मुके
तेव्हां मुके बोलके होती
अन् कहर सुखाचा होई
सारे सारे काही मुक्याने...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशांकजी, पहिल्या वहिल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद... _/\_...
चैतन्य रामसेवक, मीरा..,'सिध्दि' , Akku320, अजिंक्यराव पाटील आणि मन्या ऽ : आपल्या सर्वांचेही 'आवडले' हे आवर्जून कळवल्याबद्दल धन्यवाद..