निसर्गाच्या गप्पा (भाग ३४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 August, 2019 - 06:51

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"

कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.

"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.

निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)

1564837557-picsay.jpg

(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)

आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी

किती चातकचोचीने

प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋतुराज काही दिवसांनी म्हणाल, मोगरा फुलला मोगरा फुलला. शुभेच्छा.

सर्व फोटो मस्त, मी खाली जाम्बचं रोप लावलेले, मोठं झालंय पण बऱ्याच झाडात झाकोळून गेलंय. बाकी खाली मी लावलेले काहींना काही कारणांनी टिकत नाही, अननस रोप छान मोठं झालेलं, गॅस पाईपलाईन टाकताना उखडले गेलं, जरा बाजूने नाही नेता आली. एक आंब्याचे झाड जरा मोठं झालंय. सर्व सोसायटीसाठी लावलंय, ती काही वैयक्तिक जागा नाही पण छान दिसतं ना, बरेच जण लावतात, त्यात मी ही एक.

झाड उंच झालंय माझं पण बाकीची छाटणी करायला मला power नाही, ज्यांनी लावली आहेत त्यांना आवडणार नाही, सोसायटीने छाटली तर बरं होईल, बघते तरी, विचार करते.

एकापेक्षा एक भारी फोटो आणि फुले आणि प्रतिसाद.
खूप पॉझिटिव्ह वाटते या धाग्यावर.
कधीही न भेटलेल्या व्यक्ती पण जवळचे मित्रमैत्रीण वाटू लागतात इथे.

आमच्याकडे हजारी मोगरा उकिरड्यावर वाढतो त्यामुळे त्याचे कोणी कौतुक केले की मला गंमत वाटते.

रच्याकने, उकिरडे आजही आहेत पण हजारी मोगरा खुप कमी झाला. आंबोलीत पावसाचे मोठे ओहोळ नंतर छोट्या ओहोळात रुपांतरीत होऊन जागोजागी दिसायचे. ते अदृश्य झाले तसे काजवे गेले. अजुन कित्येक काय काय गेलेय देव जाणे. एक केवड्याचे मोठे बन होते, आत इतकी ओल की एप्रिलमध्येही तिथे जळवा डसायच्या. हल्लीच रस्ता रुण्द केला त्यात ते अर्धे गेले. तेव्हा लोक घाबरायचे तिथे जायला. साप आणि देवाची जागा म्हणुन. काही जागा भुतांच्या होत्या. ह्या सगळ्या खरेतर अंधश्रद्धा. पण ह्या आंधळ्या श्रद्धेने निसर्गाला सांभाळले होते. आता देव व भुते दोन्ही गडप झाली आणि निसर्ग उघडा पडला. त्याला सांभाळणारा कोणीही नाही.

आता पर्यावरणवाद्यांनी अशा अंधश्रद्धा वाढाव्यात म्हणून प्रयत्न करायला हवेत.
(अजून एक उदाहरण : देवराई)

ऋतुराज , तामण फुले मस्तच . आमच्याकडेही जांभळा फुलू लागलाय. मी फोटो टाकला तो गुलाबी तामण कळ्यांचा होता. तो अजून फुलला नाही.

तामण, रजनीगंधा सुंदर . रोज एका ठिकाणी फिक्कट गुलाबी रंगाची फुलं फुललेली दिसतात. मोठा वृक्ष होत असावा अजून लहान आहे झाड पण फोटो काढणं जमत नाही. तशीच फुलं सारस बागेत दिसतात जानेवारी फेब्रुवारी मध्ये. तुम्हांला कदाचित माहीत असतील ऋतुराज

पण ह्या आंधळ्या श्रद्धेने निसर्गाला सांभाळले होते. आता देव व भुते दोन्ही गडप झाली आणि निसर्ग उघडा पडला. त्याला सांभाळणारा कोणीही नाही>>>>

Sad
पर्यावरणवाद्यांनी अशा अंधश्रद्धा वाढाव्यात म्हणून प्रयत्न करायला हवेत.
(अजून एक उदाहरण : देवराई)
+100

आता पर्यावरणवाद्यांनी अशा अंधश्रद्धा वाढाव्यात म्हणून प्रयत्न करायला हवेत.>>>> खरच.
तशीच फुलं सारस बागेत दिसतात जानेवारी फेब्रुवारी मध्ये. तुम्हांला कदाचित माहीत असतील ऋतुराज>>>>>> मी मुंबईत राहतो Happy फोटो पाठवा.

काय मेजवानी आहे इथे.

सध्या बोगनवेली फुलल्या आहेत पण त्यातही पांढर्‍या बोगनवेलीनं बाजी मारली आहे. पान झाकूझाकू फुलं फुललीयेत त्यावर.

काल एक पुणे ट्रिप झाली तेव्हा जकारांदाची फुललेली झाडं दिसली. उन्हाळ्यात झाडांची रंगपंचमी जबरदस्त असते.

अनिंद्य गुलछडी छान
अश्विनी बेबी अननस सुंदर आहे. असाच असावा सुरुवातीला. माझ्याकडे अजुन फळ आले नाही त्यामुळे माहित नाही नक्की.
मामी मला जकरांदा जवळून पहायचाय. मी अजून पाहिला नाही. बघू कधी योग येतो.
साधना आता तुझ्यामाझ्यासारख्यांनीच आपापल्या परीने निसर्सांग भाळायचा प्रयत्न करायचा. जे तू करतेयस, निरुदा करतायत आपल्या ग्रुप मधले सगळेच करतायत तसच.

पिवळी रातराणी. याला आजीबात सुगंध नसतो. पण दिसायला सुंदर असते.
Screenshot_20250328_112118_Photos.jpg

मामी मला जकरांदा जवळून पहायचाय. मी अजून पाहिला नाही. बघू कधी योग येतो. >>>> तू जकरांदा पाहिला नाहीस हे कसं शक्य आहे?

मामी आग आमच्या एरीयात कुठेच नाही जकरांदा. पुण्यात जाउनच पहायला लागेल. कदंबही नाही. पण आता कदंब एकीकडे रस्त्याला लावलेले दिसले. ते फुललेल पाहिल.

पिवळी रातराणी पहिल्यांदाच पाहिली. वास नसतो हे नवलच ! माझ्याकडे मोतिया रंगाचा सोनटक्का आहे त्यालाही कमी वास आहे पांढऱ्या पेक्षा !!
माझे अजून एक आवडते फुल ... अग्निशिखा
IMG_20250328_121948.jpg

फोटो एकसे बढकर एक. जागु डोंबिवलीत आहेत ताम्हण. अर्थात सोनमोहर, गुलमोहराएवढे नाहीयेत पण आहेत. एक माहेरच्या जवळ आहे (होता झाला नसेल तर कारण बांधकामं सुरु आहेत आजुबाजुला).

अनिंद्य
निशिगंध मस्तच, त्याची गुलाबी झाक मस्तच.
हो, बेबी अननस असच असतो
सिंगापूर हॉली, मस्त. राकट कुठेही वाढत.
मला जकरांदा जवळून पहायचाय. मी अजून पाहिला नाही. बघू कधी योग येतो.>>>> तुम्ही पहिला नाही हे शक्य नाही. मुंबईत अगदी तुरळक झाड आहेत. एक ठाण्यात लुईस वाडीत आहे.
जकरंदा ला ड्राय हवामान लागत ते मुंबईबाहेर. पुण्यात खूप दिसतात.
पिवळी रातराणी मस्तच. पण वास नाही
अग्निशिखा, मस्त. एवढ्या लवकर फुलली पण?

अश्विनी अग्नीशिखा/कळलावी/नागदौणा सुंदर फुल. मलाही आवडत.
अन्जू तामण आमच्याकडे खुप आहे. जकरांदा पहायचाय जवळून.
ऋतुराज मुंबईत कुठे आहे जकरांदा?

जकरांदा पहायचाय जवळून.>>>>ठाण्यात लुईस वाडीत आहे एक झाड.
आणखी एक ठिकाणी आहे. आठवून सांगतो.

Pages