मेथीचे आळण

Submitted by योकु on 29 July, 2019 - 18:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नेहेमी केल्या जाणारा प्रकार आहे हा. मायबोलीवर काही सापडला नाही. क्ष च्या कृतीत टिंब आहेत आणि तिच्या ब्लॉगवर आळण म्हणून जे आहे त्याला आमच्याइथे मेथीची पीठ पेरून भाजी किंवा झुणका म्हणतात. आमच्याइथे आळण म्हणजे पालेभाजी + ताक घालून पिठलं टाईप असतं. ही त्याची कृती. आजची रेस्पी बायडी फेमस आहे. सुपरटेस्टी होते तिच्या हातचं आळण, ही ती रेसीपी.
तर साहित्य -

ओंजळभर मेथी किंवा आवडत असेल तर जास्तही
दोन मध्यम टोमॅटो
वाटीभर साधं दही
अर्धी - पाऊण वाटी चण्याच्या डाळीचं पीठ
हळद
हवं असेलच तर लाल तिखट
मीठ
चिमूट्भर 'च' साखर
दोन-तीन लहान चमचे तेल
चिमूटभर मोहोरी

यांवर वरून फोडणी घातलेली अतिशय सुरेख दिसते आणि अर्थातच अत्यंत चविष्ट लागते सो त्याकरता -
३-४ पळ्या तेल
८-१० लसूण पाकळ्या
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा लाल तिखट
अर्धा चमचा मोहोरी + जिरं

क्रमवार पाककृती: 

लोखडी कढई तापत घालावी आणि मग मेथी धूवून ओबडधोबड चिरून घ्यावी. टोमॅटोही चिरून घ्यावा.
सणकून तापली कढई की त्यात तेल घालून मोहोरी तडतडू द्यावी आणि त्यावर टोमॅटो आणि मेथीही घालावी.
हे प्रकरण दोन तीन मिनिटं मोठ्याच आचेवर चांगलं हडसून खडसून परतावं.
आता आचं जरा मंद करून परतत असतांनाच थोडं थोडं करून दही घालावं. असं केल्यानी दही फाटत नाही.
पूर्ण दही वापरल्या गेलं की चवीनुसार मीठ + चिमूटभर साखर घालून वर दीड कप पाणी घालावं. आता आच मोठी करून पाण्याला उकळी येऊ द्यावी.

पाण्याला उकळी आली की कढईतलं प्रकरण चमच्यानी हाटत असतांनाच त्याला बेसन लावावं. बेसनाची गुठळी होउ द्यायची नाही.
जरा पातळसर असतांनाच पीठ लावणं थांबवून एकदा चांगलं ढवळून वर झाकण घालून चांगलं शिजू द्यावं आळण. या स्टेज ला फारच दाट वाटत असेल तर अजून अर्धा कप पाणी वाढवता येइल.

पिठलं प्रकारची कन्सिस्टन्सी आली आणि पीठ चांगलं शिजलं म्हण्जे आळण तयार आहे. गरमागरम हलक्या पिवळ्या रंगाचं मधून मधून हिरवीगार मेथी डोकावणारं सुपरटेस्टी आळण वर पुढे दिलेली लसणीची फोडणी घेऊन गरमागरम भातासोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबही फार उत्तम लागतं.

फोडणी - वरून घेण्याकरता -
४-५ पळ्या तेल तापत घालावं लहान कढल्यात आणि तापलं की त्यात मोहोरी घालून तडतडू द्यावी.
यावर हिंग फसफसू द्यावा आणि आच अगदी बारीक करून ओबडधोबड चिरलेला लसूण घालून मस्त लाल होऊ द्यावा.
आता आच बंद करून कोरड्या चमच्यात तिखटपूड घेऊन ती तेलात पोळू द्यावी म्हणजे लाल रंग चांगला येइल.
ही फोडणी गरम असतांनाच आळणावर प्रत्येक सर्विंग वर थोडी थोडी घ्यावी.

फटू. लई आळस झटकून काढलाय. मारकं द्या गप आता. लोखंडी कढई पण सणकून तापवलीय सो मारकं अज्याब्बात कापायचे न्हायी.
IMG_20190729_193906.jpg

वाढणी/प्रमाण: 
भाजीप्रमाणे. पण पिठलं कॅटेगरी असल्यानी जरा जास्तच लागतं. या क्वांटीटीनी बनवलेलं दोघांना भरपूर झालं.
अधिक टिपा: 

दही थंड नको, कढईत घालण्यापूर्वी. तसंच ते थोडं थोंड करत परतत परतत च वापरायचंय. नाहीतर फाटेल दही.
टोमॅटो + दही असलं तरी आंबट अजिबात होत नाही
आळणात तिखट वापरलेलं नाहीय पण हवं असेल तर वापरता येइल. फोडणीतच घालायचं.

माहितीचा स्रोत: 
नेहेमीचा प्रकार आहे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही टाॅ घालून पातळ पिठलं असं करतो (मायनस मेथी व ताक) त्यात मुद्दाम गुठळ्या होतील असं पाहतो. त्याला गोळ्याचं पिठलं म्हणतात. ते पण ह्या प्रकारे छान होईल. वरून फोडणीची कल्पना आवडली.

लोखंडाच्या कढईतली फोडणी जबरदस्त चव आणते बाकी. पदार्थाला फार काही लागत नाही मग.

छान! फक्त फोटो काढताना भाजी डिश च्या 'ह्या' साईडला वाढली असती तर आणखी सुंदर आला असता...साईड च्या डिझाईन मुळे ज ss रा रसभंग होतोय !! Happy . बाकी मस्तच !>>>>>> +10000. मला वाटलं मीच उगाच नको तिथे जास्त लक्ष देतेय Happy .
आरामात कधीतरी बनवण्यात येईल

मला त्या डिशचं डीझाईन अजिबात दिसलं नव्हतं, आत्ता जाऊन बघितलं. अर्जुनासारखी नजर लक्ष्यावर Lol

परत बघतानाही डिझाईनपेक्षा मधला पदार्थ दिसला आणि वरची फोडणी दिसली.

ंमस्त रेसीपी. फोटो पण जबरी एकदम.
घरी पालक किंवा चंदनबटव्याची अशी भाजी खाल्ली आहे. दह्या ऐवजी ताक वापरून. पण मेथीची नाही कधी बघितली. आता करून बघेन.

पटकन मारकं द्या गप आता. लोखंडी सळई पण सणकून तापवलीय सो मारकं अज्याब्बात कापायचे न्हायी. असं वाचलं. कापले तर चटका बसवेन?

Pages