निरोप

Submitted by -शाम on 24 July, 2019 - 10:18

*निरोप*

केलीस फार तू निरोप घेण्या घाई
मन:पटलावरचे पुसलेसुद्धा नाही
ही आठवणींची गलबललेली चित्रे
सोडू का माझ्यासोबत कुण्या प्रवाही

चेहरा असा पारा पुसलेला ऐना
ना बिंब कोणते वा काही उमटेना
भवताली रंगबिरंगी सजते दुनिया
अन् मला सफेदीमध्ये या करमेना

काळासोबत गळतील मनाची पाने
ना पुन्हा बहरणे कुठल्या हिरवाईने
देहास फरपटत नेऊ पैलतीराला
की गाऊ माझे गाणे आनंदाने

मी जरा मोकळे बोलू जाता येथे
शब्दांचे धागे दुनिया ओढत नेते
अवघ्या प्रश्नांचा गुंता गुंता होतो
उत्तर पहिले काळीज काढुनी घेते

इतकेच सांग जन्मास कुठे या न्यावे
विसरून तुला दिवसास कसे ढकलावे
मी कशी-बशी निजतेही रात्री संगे
जे आत जागते त्याचे काय करावे

- शाम

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केवळ अप्रतिम...
तुमचे लिखाण झपाटून टाकते.
खूप दिवसांनी अभय आर्विकर आणि तुम्ही मायबोलीला काही सुंदर दिलेत. वाट पहातो पुढच्या कविता, कथा, लेखांची. तुमच्या गैरहजेरीत तुमचे आधीचे लिखाण वाचले.
धन्यवाद पुनरागमनासाठी....

क्या बात है... Happy

खूप महिन्यांनी लिहिताय शामराव !!

वा!