तिचे त्याच्या जीवनात डोकावणे

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 21 July, 2019 - 10:11

तिचे त्याच्या जीवनात डोकावणे
म्हणजे बागेत भटकणे असते
चार घटका थिजल्या जगात
एक स्पार्क पेटवणे असते

ते चार शब्द मैत्रीचे
ते चार शब्द प्रेमाचे
यातून खरतर
काहीच निष्पन्न होणार नसते
तरीही ते रिझणे मनाचे
हुरहूरणे क्षणांचे
देह मनास मिळणारे
एक संजीवन असते

कदाचित जग त्याला
एक उद्दीपनही म्हणेल
खच्चून मारलेल्या कश सारखे
त्या धुरात त्या क्षणात
हरवून जाते वर्तमान
विसरते सर्व भान
अस्तित्व गुदमरून टाकणारे

तसा तर तोही जळत असतो
प्रत्येकवेळी प्रत्येक श्वासाबरोबर
त्या सिगारेटच्या टोकावरील
लालबुंद निखाऱ्यागत
पण ते ओठ
दूर सारायचे विचार
त्याच्या मनातही येत नाही

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
Http://kavitesathikavita.blogspot.in

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users