नाते जन्मांतरीचे

Submitted by स्वाती पोतनीस on 20 July, 2019 - 09:02

स्वाती पोतनीस
नाते जन्मांतरीचे
..१..
ओवीचा हा कंपनीतला शेवटचा आठवडा होता. पुढच्या आठवडयात ती नवीन कंपनीत नोकरीला रुजू होणार होती. तिला साहेबांनी कालच सांगितले होते की तिच्या कामाचा अहवाल देण्यासाठी मुंबईला त्यांच्या मुख्य कार्यालयात जावे लागणार होते. त्यामुळे आज सकाळी सात वाजताच ती घरातून निघाली होती. साडेदहा वाजता ती कंपनीत पोहोचली. पहिला एक तास तर सरव्यवस्थापकांशी बोलण्यात गेला. त्यांनी नोकरी न सोडण्याबद्दल तिचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने मृदू भाषेत नकार देत नवीन कंपनीत तिला काय संधी मिळणार आहे व तिने त्याचा कसा उपयोग केला पाहिजे हे त्यांना पटविले. या मुलीत काय स्पार्क आहे आणि ती आपल्या क्षेत्रात किती पुढे जाऊ शकते हे त्यांना चांगले माहित होते. त्यामुळे त्यांनी शेवटी तिला व्यवस्थापक देशपांडेंना भेटून आपला अहवाल देण्यास सांगितले.
ओवी मार्केटिंग एक्सिक्युटिव्ह म्हणून काम करत होती. कंपनीचे नवीन उत्पादन बाजारात आणण्यापूर्वी बाजार संशोधन करण्याचे काम ती करत होती. आपण नसतानाही आपले काम पुढे चालु रहावे यासाठी तिने आत्तापर्यंतच्या कामाचा अहवाल बनविला होता. त्याची सविस्तर चर्चा तिला देशपांडे सरांशी करायची होती. विचाराच्या नादातच ती देशपांड्यांच्या केबिन मध्ये शिरली. तिथे भलत्याच माणसाला पाहून ती गडबडली. तिने म्हटले, “सॉरी, मला वाटले ही देशपांडे सरांची केबिन आहे.”
तो तरूण म्हणाला, “बरोबर आहे. ही देशपांडे सरांचीच केबिन आहे. मीही त्यांनाच भेटायला आलो होतो. परंतु मला वाटते ते बाहेर गेलेत.” असे म्हणून तो तरूण केबिन मधून बाहेर गेला. तिला क्षणभर कळले नाही काय करावे. बाहेर जाऊन त्यांची वाट बघणे योग्य असा विचार करून ती वळली तेवढ्यात देशपांडे सर आत आले. आणि दोघांचे काम सुरु झाले. सगळे काम हातावेगळे व्हायला दोन दिवस लागले. या दोन दिवसात तो तरूण तिला तीन चार वेळा सामोरा आला. पण तो कोण आहे, काय काम करतो हे काही तिला कळले नाही. आणि ते समजून घेण्याची गरजही तिला वाटली नाही. जसे तिचे काम पूर्ण झाले तसा तिने आपल्या वरिष्ठांचा निरोप घेतला आणि ती पुण्याला यायला निघाली. त्यावेळेस मात्र तिला त्या तरुणाची आठवण झाली. तो तसा लक्षात राहण्यासारखाच होता. सावळा, उंच, प्रभावित करणारे व्यक्तिमत्व. त्याचाही निरोप घ्यावा असे तिला वाटले. पण तो आजूबाजूला कुठेच दिसला नाही. यानंतरचे दिवस खूपच गडबडीचे गेले. तिने नवीन कंपनीत कामाला सुरुवात केली. तिथे ती रमली. त्याला तर ती विसरूनही गेली.
..२..
अमित सकाळपासून तिचाच विचार करत होता. दोन दिवस तो तिला ऑफिसमध्ये पहात होता. त्याला वाटले, कुणीतरी नवीन कामाला लागली आहे. केव्हातरी ओळख होईलच. पण त्याला वाटले अजुन कुणीच कसे आपल्यला सांगितले नाही तिच्याबद्दल. कारण नवीन कुणी आले की त्या व्यक्तीची सर्वांशी ओळख करून दिली जाई. मग हिचीच कशी काय नाही? आज ऑफिसमध्ये गेल्यावर कुणाला तरी विचारायचे असे त्याने ठरवले. तो ऑफिसमध्ये पोहोचला. पण दिवसभरात एकदाही त्याला ती दिसली नाही. तो अस्वस्थ झाला. कुणाला तिच्याबद्दल विचारायचे तरी काय? तिचे नावही त्याला माहित नव्हते. आणि खोदून खोदून विचारणे प्रशस्त दिसले नसते, या विचाराने तो गप्प बसला. यानंतरचे कितीतरी दिवस ती ऑफिसमध्ये दिसेल याची तो वाट पहात होता. पण ती दिसलीच नाही. शेवटी त्याने ठरवले, आपण तिचा विचारच करायचा नाही. तरी सुद्धा मधून मधून त्याला तिची आठवण येई. आपण तेव्हाच ओळख का नाही करून घेतली याबद्दल त्याने स्वतःलाच दुषणे दिली.
..३..
ओवी नवीन कंपनीत कामाला लागली त्याला आता वर्ष झाले. तिला बढती मिळाली. आता आई वडील मुले बघण्यासाठी तिच्या मागे लागले. तिने ठरविले आहे का असेही विचारले. तिने नाही म्हटल्यावर त्यांनी मुले बघायला सुरुवात केली. ते तिला रोज कुणा मुलांचे फोटो दाखवायचे, माहिती सांगायचे पण ती फोटो न बघताच नकार देत होती. लग्नाचा विषय निघाला की तिला त्या मुलाची आठवण व्हायची. आपण त्या मुलात गुंतलोय हे तिच्या लक्षात आले. एक दिवस ती घरी आली तसे तिला जाणवले आई रागावलेली आहे. तिने आईला विचारले तर ती काही उत्तरच देईना. वडीलही घरात नव्हते. तिला कळेना काय झाले. तिने आईची मनधरणी केली तेव्हा ती म्हणाली, “एक स्थळ आले आहे. मुलगा शिकलेला आहे. चांगली नोकरी, पगारदार आहे. तुमच्या पत्रिकाही जुळतायत.” आईला नाही उत्तर देणे शक्य नाही हे तिच्या लक्षात आले. तिने काहीही चौकशी न करता मुलगा पहायला ती तयार झाली. आई वडील आनंदात होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी तिला सांगितले, “उद्याची सुट्टी घे. आपल्याला मुंबईला जायचे आहे. जातोय तर अजून दोन दिवस राहू मावशीकडे.”
“म्हणजे काय? मुलगा मुंबईचा आहे?”
“हो”
“मग तुम्ही हे ठरविलेतच का? माझी नोकरी पुण्यात आहे. ती सोडून मी नाही मुंबईला जाणार.”
“हे बघ आता नवीन काही काढू नकोस. लग्न ठरले तर तुला बदली करून घेता येईल किंवा दुसरी नोकरी शोधता येईल. आम्ही तुला विचारले होते. तू हो म्हणालीस तेव्हाच आम्ही हा कार्यक्रम ठरविला.” आपण चौकशी न करताच हो म्हटले याचा तिला पश्चात्ताप झाला. पण आता नाईलाज होता. तिला जावेच लागणार होते. तिचा चेहरा उतरलेला पाहून वडील तिची समजूत घालायला लागले, “हे बघ, आम्ही काही तुझ्या मनाविरुध्द करणार नाही. तुला मुलगा पसंत पडला तरच आपण पुढे पाऊल उचलायचे.”
आई म्हणाली, “लग्नाच्या गाठी वरतीच बांधलेल्या असतात वगैरे तुम्हाला मुलांना हास्यास्पद वाटत असेल पण काही वेळा ते खरे आहे असेच वाटते. म्हणूनच किती तरी वेळा विजोड जोड्या जुळलेल्या दिसतात. आणि त्यांची लग्न यशस्वीही होतात. नाहीतर आपण होऊन कुणी विरूद्ध स्वभावाच्या माणसाशी लग्न करायला जाणार नाही. पण लग्न जुळवताना पुढे काय होणार हे कुणालाच आधी कळत नाही. त्यामुळे न बघताच नाही म्हणू नकोस. कदाचित तुला मुलगा आवडेलही.”
..४..
दुसऱ्या दिवशी ओवी आई वडिलांबरोबर मुंबईला जायला निघाली खरी पण अजूनही तिच्या मनाची चलबिचल होत होती. शेवटी तिने एक शेवटचा प्रयत्न करायचे ठरविले. मुंबईला उतरल्यावर ती आईला म्हणाली, “आई तुम्ही मावशीकडे जा. मी माझ्या आधीच्या कंपनीत जाऊन येते.”
“आत्ता कशासाठी चालली आहेस तू? संध्याकाळी कार्यक्रम आहे.”
“मी दोन तासात परत येते.”
आईने कुरकुर केलीच पण शेवटी बाबांनी समजावल्यावर तिने परवानगी दिली. ओवी कंपनीत गेल्यावर देशपांडे सरांना भेटली. त्याआधी तो बसायचा त्या केबिन वरून तिने सहजच एक चक्कर मारली. पण केबिन रिकामी होती. एकतर तो सुट्टीवर होता किंवा त्याने कंपनी सोडली होती. नंतर ती सर्वांना भेटली. तिची नजर सगळीकडे भिरभिरत होती. पण तो काही शेवटपर्यंत तिला दिसला नाही. निराश होऊन ती मावशीच्या घरी परतली.
..५..
दिवसभर तिच्या मनात विचार चालु होते. ‘खरंच सगळे म्हणतात तशा लग्नाच्या गाठी आधीच बांधलेल्या असतील का? तो मला भेटणारच नाही का कधी? आज भेटणार आहोत त्याच्याशीच माझे लग्न जमेल का?’
संध्याकाळी तयार होऊन सगळेजण त्या मुलाच्या घरी जायला निघाले. आईने तिला दटावले, “एवढी चेहरा पाडून येऊ नकोस. आम्ही काही तुला कसायाच्या दारात नेऊन नाही बांधत आहोत.” त्यांच्या घरी पोहोचल्यावर मावशीने सगळ्यांची ओळख करून दिली. घर तर चांगलेच होते. मुलाचे आईवडील सुशिक्षित आणि सुसंस्कृत दिसत होते. तिला त्यांचे आडनाव घरावरची पाटी पाहिल्यावरच कळले. आईने जेव्हा मुलाची माहिती सांगितली होती तेव्हा तिने तिकडे लक्षच दिले नव्हते. त्यामुळे तो काय करतो, त्याचे नाव काय हेही तिला माहित नव्हते. थोडे बोलणे झाल्यावर मुलाच्या आईने हाक मारली, “अरे अमित बाहेर ये न.” सगळे अपेक्षेने दाराकडे पहात राहिले. तो दारात येऊन उभा राहिला. आणि ओवीकडे पहातच राहिला. ओवीही तिच्या नकळत उभी राहिली. आणि दोघे एकमेकांकडे बघून ओळख असल्यासारखे हसले.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults

च्यक च्यक! फारच सरधोपट कथानक, बर्याचदा वापरला गेलेला प्लॉट आहे....

या पानावरची एकच मस्त गोष्ट म्हणजे ती फोटोतली झुकझुकगाडी Lol