चिरतरुण

Submitted by दत्तात्रय साळुंके on 18 July, 2019 - 07:51

चिरतरुण
तो येतो दारावर परिचित दस्तक देत
मी दार उघडतो
बघतो तर हा चिरतरुण, नखशिखांत
ओलाचिंब
कानात अत्तराचा फाया, नजरेत नशीला सुरमा , पायात मस्तवाल मोराची चाल, ओठावर थेंबांची सरगम
मला म्हणतो चल
मी म्हणतो वय झाले सर्दी होईल
तो खट्याळ पोरासारख्या उड्या मारतो
छपरांवर , पागोळ्यांवर, रस्त्यावर
बघता बघता वयात येतो
छत्रीतून जमेल तशी अंगचट करतो
कधी व्रात्यपणाने छत्री उडवतो
बागेतला ओलेता प्रणय पाहतो
थेंबात प्राण ओतून तिला चुंबतो
नशेत भेलकांडत केसातून
पाठीवर रोमांच रेखतो
ती सुस्नात, सल्लज्ज ,शरणागत
तो धुंदितच तिच्यासाठी प्राजक्ताच्या
पायघड्या घालतो
भेगाळल्या भूईचं
हिरवं हिरवं गाणं‌ होतो

मी ही पावसाचा थेंब होऊन
गातो गर्द हिरव्या पानांतून
वाहतो मृदगंधातून
खळखळा हसतो झ-यांतून
होतो चिंब भिजलेला पाऊस
चिरतरुण

© दत्तात्रय साळुंके
५-७-२०१९

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users