विषवल्ली ! -3

Submitted by अँड. हरिदास on 16 July, 2019 - 05:09

ऍड. जंगमची हकीकत ऐकल्यावर राजेश संभ्रमात पडला. पटवर्धनांचा वाडा सामान्य नव्हता, हे स्पष्ट झालं होतं. त्यामुळे आता काय करावं? हा विचार त्याला बेचैन करत होता. काहीच न सुचल्याने राजेश आपल्या जुन्या घरी आला. गेल्या रात्री झोप पूर्ण झाली नव्हती. त्याचे डोळे चुरचुरत होते. त्यामुळे काही वेळ झोप काढण्यासाठी तो आडवा झाला.

झोप लागली खरी पण आत कोठेतरी खोलवर विचार चालूच असले पाहिजे. त्यामुळे निद्रित मनासमोर स्वप्नं तरळत आली.जागतेपणी त्यास न आठवलेल्या - किंवा त्याने जाणूनबुजून दूर ठेवलेल्या श्रुत-स्मृत-कल्पित अनुभवांची त्यात भर पडत होती..!

“ पलंगाच्या कडेवर 'तो' बसला होता आणि राजेशकडे पाहून ते घाणेरडे हास्य करीत होता. राजेश त्याच्याकडे बघत होता. पण त्याच्यावर नजर स्थिर होत नव्हती. तो कोण किंवा काय आहे याची जाणीव जिवाचा थरकाप करीत होती आणि त्याच्या त्या चेहऱ्यावरून नजर सारखी घसरत होती. त्याच्या अंगात एक बंद गळ्याचा पैरणवजा शर्ट होता, खाली मळकट, धुवट धोतर होतं. चेहऱ्यावर दोन दिवसांची दाढी होती. डोक्यावर किंचित पांढरे झालेले राठ केस होते. सुरकुतलेले हात मांडीवर ठेवून तो राजेशकडे पाहत होता. त्याची नजर सरकत नव्हती. डोळे बारीक पण तापट, लाल वाटत होते. तो काहीतरी बोलत होता पण राजेशला काही समजत नव्हते.
अचानक त्याच्या चेहऱ्यावरचं मांस झडलं, तिथे एक दात विचकणारी कवटी दिसायला लागली..भीतीने काहीतरी वेडंवाकडं ओरडत राजेश जागा झाला. तेंव्हा त्याच्या मनावर शब्द जणू काही कोरल्या गेले होते..!”

“ वाड्यावर ये, तुला माझं काम करायचं आहे! ”

“काही गोष्टी अपरिहार्य असतात..!” असं ऍड. जंगम का म्हणाले होते?, हे आता राजेशला समजले. त्याचा आदेश मानण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही, हे त्याला आता उमगलं”

“आता काय?” च्या विचाराने राजेशला ग्रासलं असतांना त्याला ते नाव आठवलं. “लक्ष्मीताई”
अशाच एका प्रकरणाच्या चर्चेत त्याच्या कार्यालयातील सहकारी गायत्री कडून त्याने हे नाव ऐकलं होतं. त्यांच्या अद्भुत शक्तीच्या चमत्कारांची सुरस वर्णनंही गायत्रीने सांगितली होती. तो तात्काळ बाहेर आला. टेलिफोन बूथ वरून ऑफिस मध्ये फोन करुन त्याने गायत्रीला लाईनवर बोलावले. लक्ष्मीताई बद्दल माहिती विचारताना त्याची चांगलीच फजिती झाली. त्याला काहीच स्पष्टपणे सांगता येईना. त्याचा हा गोंधळ बघून शेवटी गायत्री स्वतः त्याच्यासोबत लक्ष्मीताईकडे यायला तयार झाली. तसे गायत्री आणि राजेशचे सबंध हाय हॅलो पुरतेच. एका ऑफिस मध्ये काम करत असले तरी त्याची फारशी काही घसपीठ नव्हती. दुपारच्या लंच टाइम मध्ये कधी कधी वेगवेगळ्या विषयावर त्यांच्या गप्पा व्हायच्या. पण राजेश कधीच मर्यादा सोडून वागला किंव्हा बोलला नव्हता. सोबतच त्याची नजरही साफ होती. त्यामुळेच गायत्री त्याची अडचण समजून त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार झाली.

दोघेही लक्ष्मीताईच्या घरी पोहोचले. घर कसलं तो तर बंगला होता..! खूप मोठ्या दालनात माणसांची गर्दी झाली होती. उदबत्त्यांचा सुगंध दरवळत होता. ट्यूब-लाईट्सचा झगझगीत प्रकाश होता. दालनाच्या मध्यभागी एक मोठा गालिचा होता. त्यावर मोठी गादी होती. गादीवर लोडाला आरामात टेकून लक्ष्मीताई बसल्या होत्या. अंगात भगव्या रंगाची रेशमी वस्त्र, केस काळेभोर,लांब. चेहरा गोरापान, सतेज होता. डोळे मोठे होते- किंचित घारे होते, कडांना लालसर होते. गायत्री आणि राजेश जरा एका बाजूला बसून समोरचा प्रकार पाहू लागले. यातनेने लाचार, अगतिक झालेले लोक चारचौघांत आपल्या अगदी खाजगीतल्या खाजगी गोष्टी सांगत होते. आणि, ताई त्यावर उपाय सुचवीत होत्या. दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर शेवटी सर्व प्रश्नोत्तरं संपली. बहुतेक मंडळी गेल्यावर राजेश ने ताईंची भेट घेतली. आपली सर्व हकीगत ताईंना थोडक्यात सांगितली. ते ऐकताना ताई ध्यानस्थ बसल्यासारख्या एक ना एक शब्द लक्षपूर्वक ऐकत होत्या. तर, इकडे गायत्रीला प्रत्येक शब्दांगणिक आश्चर्य वाटत होते.
राजेशची हकीगत एकूण घेतल्यावर लक्ष्मी ताईने आपल्या मांडीखालची एक पुडी काढली. त्यात कसलासा अंगारा होता. त्यांनी एका कागदावर त्यातला थोडासा काढून राजेशला दिला. ‘ही पुडी नेहमी तुझ्या खिशात ठेव बेटा..आणि दोन दिवसांनी भेट- मग बघू आणखी काय तजवीज करायची ती.’ शांत आवाजात ताईंनी सूचना केली. राजेशने ती पुडी व्यवस्थितपणे आतल्या खिशात ठेवून दिली आणि बाहेरचा रस्ता धरला.

एव्हाना दिवस माळवायला आला होता..गायत्रीच्या मदतीबद्दल तिचे आभार मानून राजेश वाड्याकडे जाण्याचा विचार करत होता. मात्र गायत्री ने वाडा पाहण्याची इच्छा व्यक्त केली. खरंतर राजेशला वाड्याची भीती वाटत होती..! गायत्रीला आशा ठिकाणी नेने त्याला योग्य वाटत नव्हते. मात्र, ताईंच्या अंगाऱ्यावर तिचा पूर्ण विश्वास होता! तिनेच राजेशला हिम्मत दिली..अन वाड्यात जाण्यासाठी उद्युक्त केले.

“ दहा मिनिटात एक चक्कर टाकून मी निघून जाईल!”

गायत्रीचा आग्रह त्याला मोडता आला नाही. दोघेही वाड्याच्या दिशेने निघाले. सायंकाळचे सात वाजत आले होते..वाड्यात पोहचेपर्यंत अंधार पडायला सुरुवात झाली होती. गायत्री आणि राजेश वाड्याजवळ आले.
'गायत्रीने वाडा दुरुन बघून निघावे', अशी राजेशची इच्छा होती. मात्र, त्याने ती प्रकट केली नाही. दोघेही वाड्यात आले. गायत्री एकेक खोलीत नुसती फिरत होती. राजेश एका खुर्चीवर बसला. त्याला याठिकाणी थांबण्याची इच्छा नव्हती. लवकरात लवकर त्याला वाड्यातुन बाहेर पडायचे होते. पण गायत्रीचा वाडा पाहणे अजून संपले नव्हते. अचानक खुर्चीवर बसल्या बसल्या त्याच्या कानात कुजबुजल्याचा आवाज आला. आवाज कसला? आवाजापेक्षा आवाजाची सूचकताच जास्त होती. गवताची खसखस पानांची सळसळ, पाण्याचा खळखळाट यांच्यासारखा तो एक सूचक आवाज होता.. मनात केवळ शब्दांचे आभास उभे राहिले.

“ व्वा रे बहाद्दर !”

विकट हसण्याचा खदखदाट राजेशच्या कानात उमटला.

"धोका", इथं गायत्रीला धोका आहे!,

मनाची प्रतिक्रिया मेंदूपर्यंत पोहचली. तो उठून निघण्याची तयारी करणार त्याआधीचं त्याचे विचार भरकटले. विचारांची जागा विकारांनी घेतली..वासनेची विषवल्ली मनात घुसली.. कणाकणाने ती वाढत गेली- आधी मन आणि मग त्याच्या आधिपत्याखालचं शरीर- सर्वकाही व्यापलं गेलं. आता त्याचा तो मुखत्यार राहिला नाही. त्या अघोरी शक्तीच्या हाताचं तो बाहुलं बनला होता!

राजेश खुर्चीतून उठला आतल्या खोलीत गेला. गायत्री स्त्रीसुलभ स्वभावानुसार खोलीतलं किमती समान न्याहाळन्यात गुंग झाली होती. राजेश तिच्याकडेच बघत होता. आजवर गायत्रीकडे बघितले की त्याच्या मनात केवळ निष्पाप मैत्रीची भावना उत्पन्न व्हायची. पण, आता त्याची नजर बदलली..तिच्या शरीराकडे तो टक लाऊन पाहत होता. त्याची धारदार नजर जणू तिच्या कपड्यांना चिरत सर्वत्र घसरत होती. त्याच्या मनात विचार आणि विकारांचं द्वंद्व सुरु झालं. तो घाबरला होता की उत्तेजित झाला होता हेच त्याला कळत नव्हते. छाती जोरजोरात धडधडत होती. हात थरथर कापू लागले होते. त्याला आता गायत्रीला आपल्या बाहुपाशात घ्यायची प्रबळ इच्छा होऊ लागली. मनात घुसलेल्या वासनेच्या विषाला पारंब्या फुटू लागल्या. आणि, अकस्मात ती क्रिया झाली. पाठमोरी उभ्या असलेल्या गायत्रीला त्याने करकचून मिठी मारली.

"आs उच!! नालायका!!" विव्हळत तिने स्वतःला त्याच्या मिठीतुन सोडवले आणि त्याच्या गालावर जोरदार थप्पड लगावण्यासाठी तिने हात उगारला. त्याने एका हाताने तिने उगारलेल्या हाताचे मनगट धरले आणि दुसऱ्या हाताने तिला पुन्हा जवळ ओढलं. राजेशच्या अनपेक्षित कृतीने गायत्री भांबावून गेली. तिने त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं; लाल डोळे, विकृत झालेला चेहरा.. त्यात कितीतरी बदल झाला होता! 'हा राजेश नाही' याची खात्री तिला पटली. एखाद्या वेळी राजेश ने प्रेमाने तिला मागणी घातली असती तर, कदाचित तिने त्याचा विचार केलाही असता. मात्र हे राजेशच्या रुपात जे होतं, त्याचीचं तिला जास्त भीती वाटू लागली.. " प्लीज मला जाऊ द्या ना!" थरथरत्या आवाजात ती अजूनही त्याला विनवणी करत होती. मात्र, त्याच्यात जणू कुठलंतरी जनावर घुसलं होतं. एका हाताने तिची वेणी आणखी आवळत आणि दुसऱ्या हाताने तिच्या हनुवटीखाली तिचा गळा धरत त्याने तिचे ओठ आपल्या ओठांसमोर आणले. तिचे डोळे मिटलेले होते, ओठ थरथरत होते. मधूनमधून ती आवंढे गिळत होती. ती थरथर कापत होती. किळस आणि घृनेने तिचं मन भरुन आलं. ती स्वतःवरच चिडली होती. हातांच्या मुठी आवळत तिने संतापाने त्याच्याकडे बघितलं. मनात खोलवर पडलेली संतापाच्या ठिणगीची भडकती ज्वाळा झाली. त्या ज्वाळेत मनातल्या भीती, विषाद, खेद या सर्व भावना पार होरपळून गेल्या. गायत्री भानावर आली.. विवेक जागृत झाला. वातावरणातील झालेला बदल त्याक्षणी तिच्या ध्यानात आला..सभोतालच्या वातावरणानं जणू काही श्वास रोखून धरला होता. खोलीतली हवा भट्टीसारखी गरम झाली होती. विषारी कोळ्याच्या जाळ्यात एखाद्याने पाऊल ठेवावं आणि सावज घशात घालण्यासाठी केवळ एका झडपेचा अवकाश असावा, तशी ती खोली तिला गिळंकृत करु बघत होती..!
" हा साधा प्रकार नाही !", "राजेशच्या अंगात घुसलेला वासनेचा सैतान अमानवी आहे !" वास्तवाची जाणीव गायत्रीसाठी भीतीप्रद होती. मनातल्या मनात तिने देवाचा धावा सुरु केला. कळायला लागल्यापासून इतके स्तोत्रं पठण केले होते.. पण नेमक्या वेळी तिला काहीच आठवेना. तिने लक्ष विचलित होऊ दिले नाही. डोळे घट्ट मिटून घेतले..मनात शब्द उमटू लागले. “जय श्रीगुरुदत्त,
जय श्रीगुरुदत्त...!”
पुढच्या क्षणात कितीतरी गोष्टी झाल्या. अंगाभोवती लगट करणारा राजेश झटका बसल्यासारखा दूर झाला. आसपास धडपडीचे आवाज आले. अमानवी, भेसूर आवाजात हेल काढून रडल्याचा आवाज आला. मग एक विलक्षण शांतता पसरली. गायत्री ने डोळे उघडले तेंव्हा राजेश तिला दिसला नाही. तिने स्वतःला सावरले, कपडे व्यवस्थित केले आणि बाहेरचा रस्ता धरला..!

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

विषवल्ली ! -3 या धाग्यात बलात्कारच रसरशीत, डिटेल वर्णन केलंय आणि त्यात बाईदेखील थोडीफार एक्साईट झालेली दाखवलीय. कोणीच आक्षेप घेतला नाही.

© प्रणयगुण या धाग्यात 'पत्नीने कसे शयनेषु रंभा असायला पाहिजे" वगैरे प्रवचन नणंदकडून मिळायची शक्यता होती पण तसे काही झाले नाही. आधी लग्न झालेल्या जोडप्यातला सेक्स बघून थोडी एक्साइट झालेली बाई नंतर पक्षीपॉर्न बघून नवर्यासोबत सेक्स करायला तयार झाली तर तिथे आक्षेप घेतला गेला.

तुझमे तेरा क्या है - ९ या धाग्यात एकमेकांबद्दल अतिशय शारीरिक आकर्षण असलेले पण लग्न न झालेले जोडपे अतिशय हिटेड सिच्युएशनमधे कपाळावर किस करतायत तर ते 'ओह्ह सो रोमँटिक' वाटतंय.

∆ ही सकाळीसकाळी तजेलदार बुद्धी असतानाची माझी निरीक्षणं.....

वाचक मित्रहो, या भागातील वर्णनात्मक मजकूर काढून टाकावा का??
आपला सल्ला आणि मार्गदर्शन माझ्यासाठी मोलाचे ठरेल, कृपया अभिप्राय द्यावा.

काढून टाकला तर उत्तमच,कारण ती काही कथेची गरज वाटत नाही,बलात्कार होऊ शकण्याआधीचे वर्णन आहे त्यामुळे so called रोमँटिक वगैरे न वाटता मला तरी ते किळसवाणे वाटत आहे

अहो कृपया हलके घ्या लिहायचं राहून गेलं. डोन्ट वरी. राहूदे पण कथानकाची गरज आहे म्हणून लिहायचे असले तरी सुचक भाषेत काही प्रसंग लिहावेत हे सांगतो.

रोमान्सचे वर्णन सोडले तर कथा उत्सुकता वाढवणारी आहे. चौथा भाग येऊ द्या. ही स्टोरी काल्पनीक असली तरी मांत्रिक तांत्रिक अजूनही आहेत की या जमान्यात.

इथे रोमान्स बद्दल वाचले तेव्हा लक्षात आले की सिद्धेश्वर पाटणकर यांच्या ओघवत्या शैलीतल्या रोमँटीक कवितांकडे कोणाचेच लक्ष गेलेले दिसत नाहीये. Uhoh तरी बरं, आता पाटणकर बरं लिहीत आहेत ते. ( म्हणजे शृंगाराकडे पाठ फिरवलीय त्यांनी )

> वाचक मित्रहो, या भागातील वर्णनात्मक मजकूर काढून टाकावा का??
आपला सल्ला आणि मार्गदर्शन माझ्यासाठी मोलाचे ठरेल, कृपया अभिप्राय द्यावा. >
धागा 'बदलेला' दिसतोय पण नक्की काय बदल केला हे जाणण्यासाठी परत सगळे वाचावे लागेल. आतासध्या तेवढा वेळ नाही.

प्रत्येक वाचकाच्या, प्रत्येक अभिप्रायावरून लेखकाने आपले लिखाण बदलू नये. कारण मग ते 'गाढव विकायला घेऊन जाणारे बाप-मुलगा आणि त्यांच्याबद्दल बोलणारे इतर लोक' गोष्टीसारखं होऊन जातं.
पण लिहायच्याआधीच आपण गुन्हा, वाईट चालीरीतीला ग्लॅमराईज करतोय का याचा विचार करायला हरकत नसावी. त्यासाठी तुला पाहते रे- भयंकराचे आकर्षण, एक सामाजिक प्रश्नचिन्ह हा लेख उपयुक्त आहे.

Marathi typing here is too tedious. so texting in English.

Ka kon jane pan, hi katha, Narayan Dharap yanchya "Dast" ya kadambarichya far jawal janari watate ahe.

For some weird reason, this strory has uncanny resemblance to Novel "Dast" by Narayan Dharap.
Some characters who are matching are
Protagonist
the Lawyer (and lawyers speech to the protagonist)
Also the existence of supreme good soul (Laxmi) in Novel y Dharap the character is Gode Guruji.

Similarities may be just coincidence. Or the author may have impact of such novels. Just my opinion.

पुढचा भाग कधी ?

नवीन Submitted by Yogita Maayboli on 23 July, 2019 - 16:05

+ १

Sir please write next part soon. Are you unhappy for the comments on last part. Please go ahead, we are waiting. Thanks.