लव्ह इन ट्रबल भाग - १५

Submitted by स्वरांगी on 5 July, 2019 - 07:52

लव्ह इन ट्रबल भाग – १५
अभिजीतला आलेलं पाहताच अनुने धावतच जाऊन अभिजीतला मिठी मारली..
“ मला वाटलं की आज तुम्ही येणारच नाही!!” अनु म्हणाली..अभिजित शांतपणे उभा होता..
“ आय लाईक यु!! मला तुम्ही आवडता सर!!” अनु तिच्या मनातलं बोलून गेली…अभिजितने सुस्कारा सोडला आणि म्हणाला,
“ डोन्ट लाईक मी!!” हे ऐकून अनुच्या डोळ्यातून अश्रू ओघळला..तिचं हृदय जोरात धडधडत होतं…तिने हळूहळू अभिजितभोवतीचे हात सोडले आणि त्याच्यापासून लांब झाली..तिचे डोळे पाण्याने डबडबले होते..
“ का??” अनुने विचारलं..
“ ह्याचं कारण ती..” अनु बोलणार एवढ्यात, ती स्वतःच थांबली..
“ जाऊदे.. खरं तर मला आत्ता खूप प्रश्न पडलेत!!” अनू अभिजीतकडे पहात म्हणाली..
“ पण तुम्ही त्यांची उत्तरं देणार नाही..हो ना?!!” अनुने शांतपणेअभिजीतला विचारलं..अभिजितने तिच्याकडे पहात सावकाश मान डोलावली…अनुने मान खाली घातली..तिने मोठा श्वास घेतला..
“ आता मला तुम्हांला माझ्या फिलिंग्स सांगितल्याचं वाईट वाटतंय!!” अनु अभिजीतकडे पहात कसंनुसं हसत म्हणाली..
“ मी स्वतःला थांबवलंय, कारण मला याच सुरवातीची भीती वाटतेय..” अभिजित मनातल्या मनात म्हणाला..तो तिच्याकडेच पहात होता..
“ पण मला तुमच्यावर प्रेम केल्याचं दुःख नाहीये!!” अनु डोळे पुसत म्हणाली..
“ मी तुमच्याकडे काही मागू शकते?? मला एकदा..फक्त एकदा मिठी माराल??” अनुने काकुळतीने विचारलं..
“ मी जास्त तर मागत नाहीये ना??” अनुच्या डोळ्यातुन घळाघळा अश्रू वहात होते.. “ मला माहितेय की हे सगळं एकतर्फी…” अनु काही बोलणार एवढ्यात अभिजितने तिला जवळ ओढलं आणि मिठीत घेतलं… अभिजीतचे डोळे पाणावले होते..आता अनुने तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.. आणि अभिजित तिला शांतपणे थोपटत राहिला..
अनु तिच्या रूमचा दरवाजा उघडून घाईघाईतच आत शिरली आणि तिने आतून दार लावून घेतलं..जे झालं त्याचा विचार करत ती बेडवर बसून राहिली..तिला खरं तर मनातून खूप मोठ्याने ढसाढसा रडायचं होतं..पण बाहेर अभिजीतला आवाज जाईल म्हणून तिने आवाज दाबून ठेवला…रडणं थांबवण्यासाठी तिने हाताच्या मुठी आवळल्या..पण तिला आता राहवेना..तिने मुसमुसतच रडायला सुरवात केली..तिने दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेतला..आणि मनातलं दुःख अश्रूंच्या रुपात बाहेर पडू लागलं..
अभिजित पाय ओढतंच त्याच्या रूमकडे निघाला..जिना चढताना त्याने एकदा वळून अनुच्या रूमकडे पाहिलं..अनु आतमध्ये तोंड दाबून रडत होती..आणि रडत रडतच तीने स्वतःला बेडवर झोकून दिलं.. अभिजित त्याच्या रूममध्ये आला..त्याने हातातली बॅग सोफ्यावर टाकली..आणि तसाच बेडवर आडवा झाला…विचार करून करून तो थकला होता.. त्याने आपला हात, हाताची घडी करून डोळ्यांवर ठेवला सावकाशपणे आपले डोळे मिटून घेतले…
सकाळी अभिजित आळस देत देतच खाली आला आणि किचनमध्ये शिरला..ओट्यापाशी खालीच अनु उकिडवी बसली होती..तिला बघून अभिजित दचकलाच…अनुचं लक्ष गेलं त्याच्याकडे ,तशी ती उठली.. दोघही थोडा वेळ काहीच बोलले नाहीत..त्यांच्यात अजूनही अवघडलेपण होतं..
“ माझे डोळे सुजलेत थोडे, झोप जास्त झाल्यामुळे..म्हणून मी डोळ्यांना गार पाणी लावत होते..जरा बरं वाटतं..” काहीतरी बोलायचं म्हणून अनु म्हणाली..तिचे डोळे रडून रडून सुजले होते हे अभिजीतला वेगळं सांगायची गरजच नव्हती..ते कळलंच होतं त्याला..
“ थांब..मी तुला रुमालात गुंडाळून बर्फ देतो डोळे शेकवायला..तुला बरं वाटेल..” असं म्हणून अभिजित लगबगीने फ्रिजकडे जायला निघाला..
“ नका करू असं..” अनु शांतपणे मान खाली घालून म्हणाली..
“ जर तुम्हाला वाटत असेल की, मी तुम्हाला माझ्या मनातून काढून टाकावं तर माझ्याशी एवढं चांगलं नका वागू सर…नाहीतर माझा गैरसमज होईल..अनु स्पष्टपणे म्हणाली..
“ मला मदत करा..मी तुमचं ऐकायचं ठरवलंय..तुम्हाला विसरायचं ठरवलंय..पण तुम्ही असंच वागत राहिलात तर माझ्यासाठी हे सगळं खूप कठीण होऊन बसेल!! मी भूतकाळात जायचं ठरवलंय जिथे तुम्ही माझ्यासाठी फक्त माझे सिनियर होतात!!” अनु अभिजीतकडे पहात ठामपणे म्हणाली…अभिजित तिच्याकडे पहातच राहिला..
“ म्हणून म्हणतेय..नका वागू असं माझ्याशी..” अनु शेवटचं म्हणाली..अभिजितने तिच्याकडे पाहिलं..ती जे म्हणाली ते त्याला पटलं..
“ ठीक आहे..मी नाही करणार काही तुझ्यासाठी..” अभिजित थोडा विचार करून ठामपणे म्हणाला..अनुने त्याच्याकडे एकवार पाहिलं..आणि थँक यु म्हणून ती तिच्या रूमकडे वळली.. ती जाताच अभिजितने मोठा सुस्कारा सोडला..आणि जोरात डोकं खाजवलं..असं वागावं लागणार असल्याने तो खूप वैतागला होता..
आज सगळे वेळेत हजर झाले होते.. दुपारी अभिजितने सगळ्यांना डायनिंग टेबलापाशी एकत्र बोलावलं..अभिजितने आज सगळ्यांसाठी जेवण केलं होतं..बटाट्याची भाजी, पोळी, आमटी, भात, कोशिंबीर, गाजराचा हलवा असा बेत होता..
“ रात्री नीट झोप लागली नाही का??” एवढा स्वयंपाक पाहून झेंडेंनी काळजीने अभिजीतला विचारलं..अभिजित आणि अनु दोघेही गप्प होते..
“ आज काही स्पेशल आहे का?? “ पुष्करने आश्चर्याने विचारलं..
“ मला माहितेय काय स्पेशल आहे ते!! काय चाललंय तुमच्या दोघांत??” बर्व्यांनी अनु आणि अभिजितकडे बोट दाखवत दरडावून विचारलं..अनु आणि अभिजितने चोरुनच एकमेकांकडे पाहिलं..
“ काल मी माझं काम संपवण्यासाठी उशिरापर्यंत थांबलो होतो..जरा आराम करावा म्हणून मी वर आरामखुर्चीत जाऊन बसलो..बसल्या बसल्या मला तिथेच झोप लागली..जाग आली तेव्हा रात्र झाली होती..मी घरी जायला गेटमधून बाहेर पडणार तोच मला समोर हे दोघं असं करताना दिसले!!” असं म्हणून बर्व्यांनी घट्ट मिठी मारल्याची action करून दाखवली..ते पाहून सगळ्यांचे डोळे विस्फारले..झेंडे आणि पुष्कर आळीपाळीने या तिघांकडे आश्चर्याने पहात होते…अभिजीतला काय बोलावं ते सुचेना….
“ तुम्ही काहीतरी चुकीचं पाहिलंय…” अनु शांतपणे म्हणाली..
“ काय??” बर्व्यांनी जोरात विचारलं..
“ वय वाढलं की असे प्रॉब्लेम होतातच…” अनु सहज म्हणाली..अनुच्या बोलण्यावर अभिजितने मान डोलावली..
“ मी या माझ्या दोन डोळ्यांनी बघितलंय तुम्हा दोघांना!! सांगा मला!! नक्की काय चाललंय तुमचं?!!” बर्वे अभिजित आणि अनुवर खेकसले..
“ अनघा बरोबर बोलतेय…” परिस्थितीचा अंदाज घेत अभिजित म्हणाला..झेंडे आणि पुष्कर शांतपणे सगळं पहात होते..कोण खरं बोलतंय हे दोघांनाही माहीत होतं…
“ तू काय मस्करी करतोयस माझी?? तुमच्या दोघांचं नक्कीच काहीतरी चालू आहे..” आता बर्वे चिडले होते..
“ नाही!! आमचं काही सुरू नाहीये…”
“ नाही…आमच्यात तसं काही नाहीये..” अनु आणि अभिजित दोघही एकदम म्हणाले आणि डोळ्यांच्या कोपऱ्यातून एकमेकांकडे पाहिलं…
“ खरंच?!! म्हणजे मला जे दिसलं ते चुकीचं होतं??” आता बर्वे आश्चर्यचकित झाले..
“ हो…” “हो!!!” अनु आणि अभिजित दोघं एका सुरात म्हणाले.. त्या दोघांना पाहून बर्वे चक्रावले..
“ अरे, मला माझे डोळे तपासून घ्यायला हवेत की काय?!!” बर्व्यांनी न राहवून झेंडेंना विचारलं..त्यावर झेंडेंनी शांतपणे होकारार्थी मान हलवली…
“ तसं मी डबा घेऊन आलोय..पण मी आता ताव मारणार या जेवणावर..” झेंडे लगबगीने खुर्चीत बसत म्हणाले..
“ सर..तुम्ही नका काळजी करू!! होईल सगळं नीट…हाहाहा!!!” बर्व्यांचं एवढंस झालेलं तोंड पाहून पुष्कर म्हणाला..अनु आणि अभिजितने एकवार एकमेकांकडे पाहिलं आणि तेही त्या तिघात सामील झाले..

“ मिसेस शहांनी मंदारवर मि. शहांच्या खुनाचा आणि चोरी केल्याचा आरोप केलाय.. चोरी करता यावी, मध्ये कुणाचाही अडथळा होऊ नये म्हणून हा खून केला गेलाय..” अभिजित आणि बाकी सगळेच एकत्र बसून केस डिस्कस करत होते..
“ या केसमध्ये एक साक्षीदार मिळालाय ज्याने खून झाला त्याच दिवशी मंदारला त्या घरातून बाहेर पडताना पाहिलं… घटनास्थळी मंदारचे फुटप्रिंट्स आणि त्याच्या शर्टचं तुटलेलं बटण मिळालंय..” अभिजित बोलता बोलता त्याच्या लॅपटॉपवर सगळ्यांना फोटो दाखवत होता..
“ मंदारच्या पास्ट रेकॉर्डबद्दल काही कळलं??” अभिजीतने विचारलं..
“ हो… यापूर्वी मंदारच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केलेली होती.. त्याने एका मुलीला वाचवण्यासाठी दोघा जणांना मारहाण केली होती जेव्हा ते तिची छेड काढत होते...तेव्हा पोलिसांनी त्याला समज देऊन सोडून दिलं..” अनुने माहिती दिली..
“ पण हत्याराचं काय??” पुष्करने विचारलं..
“ हत्यार अजूनही मिळालेलं नाही..पण हत्यार १३ सेंटिमीटर लांब आणि ३.५ सेंटिमीटर रुंद आहे असे results मिळालेत…” झेंडेंनी माहिती पुरवली.. हे ऐकताच अभिजित थबकला…आणि त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं..
“ म्हणजेच मंदार दोषी आहे असा एकही पुरावा अजून सापडलेला नाही..” अनु शांतपणे म्हणाली..
“ पण मंदार निर्दोष आहे हे सिद्ध करणारा ठोस पुरावाही अजून आपल्याला मिळाला नाहीये…त्यामुळे तो पूर्णपणे निर्दोष आहे असं नाही म्हणू शकत आपण…” अभिजित अनुला समजावत म्हणाला..
“ मी शोधून काढेन पुरावा!! मी ते कपल शोधून काढेन,जे खून झाला त्या दिवशी हॉटेलमध्ये होतं, जिथे मंदार त्याचवेळी होता..” अनु ठामपणे म्हणाली..तिने हॉटेलमध्ये बोर्डवर त्यांच्या फोटोखाली स्टीकी नोट लावली होती.. “ प्लिज कॉन्टॅक्ट मी!! इट्स इम्पोर्टंट!!!” आणि त्याखाली स्वतःचा मोबाईल नंबर अनुने लिहून ठेवला होता..अनु तिच्या मतांवर ठाम होती…

इकडे प्रिया आणि मोनिकासुद्धा केसवर काम करत होत्या..
“ मंदारचा चोरी करण्यामागचा उद्देश स्पष्ट होता!! त्याने खूप महिन्यांचं राहत्या जागेचं भाडं दिलं नव्हतं.. “ प्रिया म्हणाली..
“ हा महत्वाचा मुद्दा आहे…त्याला पैशाची गरज होती..” मोनिका तिला दुजोरा देत म्हणाली..
“ हा खून नक्की मंदारनेच केलाय!! मला १००% खात्री आहे!!!” प्रिया ठामपणे म्हणाली.. प्रिया जेव्हा मंदारला भेटायला गेलेली.. बोलून झाल्यावर प्रिया जायला निघाली..तेव्हा तिची पाठ फिरल्यावर मंदार तिच्याकडे पहात उपहासाने हसत होता..प्रियाला हे डोळ्याच्या कोपऱ्यातून स्पष्ट दिसलं..पण जेव्हा तिने त्याच्याकडे वळून पाहिलं, तेव्हा मात्र तो साधाभोळा चेहरा करून बसला..आणि आत्ता हेच प्रियाला आठवलं..
“ हम्म..बाकी काहीही असो..पण मला मात्र कसंही करून त्या अनघाला हरवायचंय!!” मोनिका विचार करत म्हणाली..
“ हो पण तुम्ही जास्त कामाचा स्ट्रेस घेऊ नका..आत्ताच आजारातून बऱ्या झालायत तुम्ही..” मोनिका प्रियाला समजावत म्हणाली..
“ हम्म..मी बरी आहे ..पण आता स्वस्थ बसून चालायचं नाही!!” प्रिया हसून म्हणाली..मोनिकाही हसली..आणि दोघी आपापल्या कामाला लागल्या..

इकडे अनु गेटबाहेर उदास होऊन उभी होती..तोच तिथे पुष्कर आला..
“ इथे काय करतेयस??” पुष्करने विचारलं..
“ मी बाहेर येऊन थांबलेय कारण मला कुलकर्णी सरांसमोर रडायचं नाहीये..स्वतःला एवढं तरी कंट्रोल करता आलं पाहिजे मला..” अनु रडवेली होत म्हणाली..
“ त्यापेक्षा तू पूर्णपणे रडून मोकळी का होत नाही??” पुष्करने सुचवलं.. अनुने एकदा त्याच्याकडे पाहिलं..आणि तिला खरंच रडू आलं..
“ मला तर वाटतंय की माझं सगळं आयुष्यच संपून गेलंय..” आता अनु ओक्साबोक्शी रडू लागली..पुष्करने उसासा सोडला आणि शांतपणे तिच्यासमोरच उभा राहिला..

अभिजित लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता..तोच झेंडे त्याच्या टेबलापाशी आले..नक्की कुठून बोलायला सुरवात करावी हे झेंडेना कळेना..म्हणून त्यांनी फक्त जोरात घसा खाकरला..
“ बोला काय बोलायचंय ते!!” अभिजित लॅपटॉपवर काम करता करता झेंडेना म्हणाला..
“ तुमचं आणि अनघाचं नक्की काय चालू आहे? हे असं जे बर्व्यांनी करून दाखवलं ते काय होतं?!!” मिठी मारल्याची action करत झेंडेंनी भोळ्या चेहऱ्याने विचारलं..अभिजितने निर्विकार चेहऱ्याने मान वर करून झेंडेंकडे पाहिलं..
“ तुम्ही दोघ आज एकमेकांशी एवढया थंडपणे का वागताय?” झेंडेंचे प्रश्न संपतच नव्हते..
“ सॉरी!! पण मला सगळं नीट समजलं नाही तर माझं कामात लक्ष लागणार नाही..” झेंडे दात काढत म्हणाले..अभिजितने थोडा विचार केला आणि बोलायला सुरुवात केली..
“ मि.शहांच्या घराच्या गल्लीत कुठेही CCTV कॅमेरा नाहीये ना??” झेंडेंनी हसून आता अभिजित काय बोलणार या उत्सुकतेने नकारार्थी मान हलवली..
“ तिथे जवळपास अजून कुठे CCTV कॅमेरे असतील तर ते चेक करा.. मि. शहा यांच्या रिलेटेड सगळे डॉक्युमेंट्स चेक करा..” आता झेंडेंच्या चेहऱ्यावरचा उत्साह हळूहळू मावळू लागला..
“मि.शहांचं रेस्टॉरंट, त्यांचा सगळा स्टाफ, त्यांच्याबद्दल असलेल्या अफवा किंवा चर्चा जे मिळेल ते स्टडी करा..” अभिजित नॉनस्टॉप बोलत होता..आता झेंडेंचा चेहरा उतरू लागला..
“ आणि हो!! चोरीला गेलेल्या वस्तूंचं काय झालं ते बघा परत एकदा..” अभिजितने आठवण करून दिली..
“ नका सांगू मला!!” न राहवून झेंडे म्हणाले..
“ मला अजिबात इंटरेस्ट नाहीये तुमच्या दोघांत काय चाललंय हे जाणून घेण्यात!!” झेंडे चरफडत म्हणाले..
“ खरंच!!” झेंडे खोटं हसून म्हणाले..
“ ठीक आहे!! एवढंच बोलायचं होतं मला.. खरंच!!” अभिजित शांतपणे म्हणाला आणि पुन्हा आपलं काम करू लागला..झेंडे हिरमुसुन तिथून निघून गेले..त्यांना जाताना अभिजीतने पाहिलं आणि कपाळावर जोरात हात मारला..

थोड्या वेळाने अभिजित बाहेर पडला तेव्हा गेटबाहेर उभं राहून पुष्कर अनुला समजावत होता.. त्यांना एकत्र बघून अभिजीतचं तोंड वाकडं झालं..आणि त्या दोघांना लांब ठेवण्यासाठी तो चालत येऊन त्यांच्यामध्ये उभा राहिला..
“ काय टाइमपास चाललाय तुमचा बाहेर येऊन??” अभिजितने आवाज चढवून विचारलं..
“ सॉरी अभिजित..” पुष्कर ओशाळून म्हणाला..
“ तुम्ही कुठे जाताय का??” अनुने अभिजितकडे न पाहताच विचारलं..
“ हो.. मी मि. शहांच्या घरी जातोय तपासणी करायला..” अभिजित शांतपणे म्हणाला..
“ मीपण येते तुमच्यासोबत..” अनु चटकन म्हणाली..पुष्करला आश्चर्यच वाटलं..
“ लवकर ये!! उशीर झाला तर मी थांबणार नाही तुझ्यासाठी..” एवढं बोलून अभिजित गाडीकडे निघाला..
“ कमॉन अनु!! यु कॅन डू इट!!” अनु स्वतःलाच धीर देत म्हणाली..पुष्करने तिला अंगठा दाखवून ऑल द बेस्ट ची खून केली..आणि अनु त्याला बाय करून गाडीकडे निघाली..
अनु आणि अभिजित मि.शहांच्या रेस्टॉरंटमध्ये चौकशी करून आले पण त्यांना काही विशेष माहिती मिळाली नाही.. मि.शहांच्या घराजवळ असलेली गल्ली आणि जवळपास असलेली घरं पालथी घातली पण महत्वाची अशी कोणतीच माहिती हाती लागली नाही..बघता बघता ते त्यांच्या घराजवळ असलेल्या एका दुकानात शिरले..तिथून बाहेर पडताना अभिजितचं लक्ष तिथल्या कॅमेराकडे गेलं..
“ एविडन्सच्या लिस्टमध्ये हा कॅमेरा इनक्लुड केला का??” अभिजितने अनुला विचारलं..
“ नाही!! मला आठवत नाहीये हा कॅमेरा पाहिल्याचं..” अनु विचार करत म्हणाली…
“ मग हापण त्यात ऍड कर आणि स्टडी कर..” अभिजित म्हणाला..
आता अभिजित आणि अनु दोघही मि. शहांच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला आले होते..पोलिसांनी बंगला बंद करून ठेवला होता..आणि नो एन्ट्री म्हणून सगळा एरिया सील करून ठेवला होता..
“ तुम्ही खूप मेहनत घेताय या केससाठी..” अनु म्हणाली..
“ मंदार निर्दोष आहे हे कन्फर्म झाल्याशिवाय मी कॉन्फिडंटली पुढे जाऊ शकणार नाही...उगाच गैरसमज करून घेऊ नकोस!! मी हे सगळं माझ्यासाठी करतोय..” अभिजित स्पष्टपणे म्हणाला..
“ ओके..चल अनघा आत जा इथून!!” अभिजितने नो एंट्रीची रिबीन वर उचलून तिला वाकून जायला जागा करून दिली..
“ काय??” काय करावं हे न कळून अनु म्हणाली..
“ आपल्याला घरात घुसायचंय ना!! जा मग आत!!” अभिजित सहजपणे म्हणाला..
“ मी????” असा चेहरा करून अनुने अभिजितकडे पाहिलं…त्यावर अभिजित खोटंच हसला..अनुने सुस्कारा सोडला आणि ती बंगल्याकडे निघाली… अनुने सगळी मागची बाजू पालथी घातली..तिने किचनची खिडकी तपासून पाहिली..त्याचं एक झडप जरा उघड वाटलं म्हणून तिने जोर लावून ते झडप उघडलं आणि खिडकीवर चढून कशीबशी ती आत घुसली.. अनुने बंगल्याच समोरचं दार उघडून पाहिलं तर दारातच अभिजित उभा होता..अनु धापा टाकत होती आणि केस पूर्ण विस्कटलेले होते..
“ हम्म..असंच करायचं असतं स्टाफने बॉससाठी..” अभिजित शांतपणे म्हणाला आणि कुणी बघत नाहीये ना हे पाहून आत घुसला..यावर अनुने एकवार त्याच्याकडे पाहिलं आणि दार बंद करून तीही आत शिरली.
आतमध्ये अभिजित आणि अनघा सगळीकडे कुठे काही मिळतंय का ते पाहू लागले..घरातल्या वस्तू अस्ताव्यस्तच पडलेल्या..जिथे मि.शहा यांची डेड बॉडी जिथे पडली होती तिथे मार्क करून ठेवलेलं होतं..अभिजित आणि अनु सगळीकडे नीट चेक करत होते..अभिजित बेडरूममध्ये आला समोरच भिंतीवर चौकोन दिसत होता जिथे मि. अँड मिसेस. शहांची फ्रेम लावलेली असायची..जी आत्ता तिथे नव्हती..चोरीला गेली होती..
“ तुला काय वाटतं? फ्रेम का चोरली असेल चोराने??” अभिजितने विचार करता करता अनुला विचारलं..त्याच्या बोलण्यावर अनुही विचार करू लागली…मधूनच तिला काहीतरी आठवलं आणि ती म्हणाली,
“ बाय द वे…आपण इथे चोरून आत शिरलोय म्हणून आपल्यावर चार्ज तर लागणार नाही ना??” अनुने साशंकतेने विचारलं…
“ इथे घुसून तपास केल्याबद्दलही चार्ज लागेल आपल्यावर..” अभिजित शांतपणे म्हणाला..तोच बाहेर चपलांचा आवाज आला..ते ऐकून अनु आणि अभिजित धावतच जाऊन कपाटामागे लपले..
अनुचं हृदय धडधडत होतं..अभिजित कानोसा घेत होता..तोच त्याच्या खांद्यावर हात पडला..आणि कुणीतरी त्याची कॉलर धरून त्याला बाहेर काढलं..अभिजितने आपल्या कॉलरवरचा हात सोडवला आणि त्याने वळून पाहिलं…ती प्रिया होती….तिघेही एकमेकांकडे आश्चर्याने पहात होते…
“ तुम्ही?! तुम्ही इथे काय करताय??” प्रियाने आश्चर्याने विचारलं…
“आम्ही इथे आरोपीचे वकील म्हणून तपास करायला आलो होतो…चल अनघा निघुया…” अभिजित म्हणाला, तसं अनु त्याच्या मागोमाग चालू लागली..
“ तिथेच थांब अभि!! मला बोलायचंय तुझ्याशी…अनघा गेली तरी चालेल..” प्रिया म्हणाली.. अनुच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं..अभिजितने एकदा मागे वळून पाहिलं आणि परत चालू लागला..
“थांब तिथेच नाहीतर मी अरेस्ट करेन विथ वॉरंट!! अनघाला.” प्रिया अनुकडे बोट दाखवून म्हणाली..अभिजीत तिथेच थांबला…त्याने मागे वळून पाहिलं..
“ का ?? फक्त मला एकटीला अरेस्ट का करायला लावणार??” अनुने न कळून आश्चर्याने विचारलं..
“ माझी मर्जी!!” प्रिया बेफिकिरीने म्हणाली..
“ काय करू?? टाकू का आत हिला??” प्रियाने अभिजीतला ब्लॅकमेल केलं.. अभिजित यावर काहीच बोलला नाही..
“ मला फक्त १० मिनिटं दे तुझी..” प्रिया शांतपणे म्हणाली..
“ ५ मिनिटं..” अभिजित कोरडेपणाने म्हणाला..
“ ओके.. पण मला तुझ्या एकट्याशी बोलायचंय..” प्रियाचा रोख अनुकडे होता.. अभिजीतने अनुकडे पाहिलं आणि अनु काय समजायचं ते समजून गेली..अनु समोरच्या दारातून बाहेर पडली..तिने एकदा मागे वळून पाहिलं आणि हताशपणे सावकाश चालू लागली…

“ अजूनही घटनास्थळी जाऊन चेक करायची तुझी सवय तशीच आहे..” प्रिया म्हणाली..
“ तुसुद्धा आलीच आहेस ना?!!” अभिजित म्हणाला..
“ हम्म..हे सगळं तुझ्याकडूनच तर शिकले मी!! आपण एकत्रच लॉ complete केलं असलं तरी तू अनुभवाने मोठा आहेस माझ्यापेक्षा..” प्रिया म्हणाली..
“ तुझा वेळ संपत चाललाय!!” अभिजित घड्याळात बघत म्हणाला..प्रियाने एकवार त्याच्याकडे पाहिलं..
“ तुला मंदार जाधवच्या पास्ट रेकॉर्डबद्दल माहिती आहे??” प्रियाने मुद्द्यावर येत विचारलं..
“ हो..” आता अभिजित लक्ष देऊन ऐकू लागला…प्रियाने पर्समधून काही फोटो काढून अभिजीतच्या हातात ठेवले..
“ मंदारने मारामारीत फक्त त्याचे चेहरे नाही , तर त्यांची काही हाडं पण मोडलीयत!!” प्रियाने माहिती दिली..अभिजित एकेकाचे फोटो पहात होता..चेहर्यावर मारून मारून खूप जखमा झालेल्या..
“ जर तिथे आजूबाजूला बघायला माणसं नसती तर मंदारने जीवच घेतला असता त्यांचा…” प्रिया गंभीरपणे म्हणाली..अभिजितने चमकून प्रियाकडे पाहिलं..आता तोही गंभीर झाला..
“ पूर्वी अशा लोकांना गजाआड झालेलं पाहून तू समाधानी व्हायचास…मग आता तूच त्याची वकिली का करतोयस??” प्रियाने न राहवून विचारलं..अभिजित यावर निरुत्तर झाला…

अभिजित मंदारसमोर बसला होता..प्रियाशी बोलून निघाल्यावर तो थेट मंदारला भेटायला गेला होता..
“ व्हाईट शर्ट तुम्हाला खूप सूट होतो सर!! गेल्या वेळी पण तुम्ही फॉर्मल व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्टमध्ये होतात.. तुम्ही खूप हँडसम दिसता यात!!” मंदार अभिजीतला म्हणाला..
“ खरंच??” अभिजितने स्माईल देत विचारलं..
“ हो सर!! तुम्हाला स्काय ब्लू आणि नेव्ही ब्लू पण मस्त दिसेल!!” मंदार अभिजीतला चढवत म्हणाला..
“हम्म..बरेच जणांनी कॉम्प्लिमेंट दिली मला अशी..सुरुवात करायची आपण बोलायला?!!” अभिजितने मूळ मुद्यावर येत विचारलं..आता मंदार सावरून बसला..
“ मला आजच काही गोष्टी नव्याने कळल्या..” अभिजित शब्दांची जुळवाजुळव करत म्हणाला..तो अतिशय शांतपणे बोलत होता..
“ मला अशी माहिती मिळालीय की तू मारामारी करताना एकाला जवळजवळ ठार मारलं होतंस..इतकी इजा झाली होती त्या व्यक्तीला…” अभिजित आपल्याकडचा एक एक फोटो त्याच्या समोर टाकत म्हणाला..
मंदार शांतपणे ते फोटो पहात होता..
“ म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की मी पूर्वी मारामारी केली होती, माझ्याविरुद्ध याआधी पोलीस कंप्लेंट झालीय, म्हणून मि.शहांचा खूनही मीच केलाय?!!!” मंदारने विचारलं..
“ नाही..मी तुझ्या पास्ट रेकॉर्डमुळे तसं म्हणत नाहीये!! पण तरीही मला तुझ्या तोंडून ऐकायचंय…तू असं काही केलं होतंस की नाही?!!” अभिजित शक्य तितक्या शांतपणे मंदारच्या कलाने घ्यायचा प्रयत्न करत होता…
“ हे बघ मंदार, रेकॉर्डमध्ये असं आहे की तुझ्या हातून हे नकळतपणे घडलं किंवा अपघाताने घडलं..पण हे फोटो बघून मला तरी असं वाटलं, की हे कृत्य तुझ्याकडून नकळत किंवा अपघाताने घडलेलं नाही…” अभिजित आता गंभीर झाला..
“ कुणालाही इतकं बेदम मारण्यासाठी काहीतरी ठोस कारण असावं लागतं..हेतू असावा लागतो..” अभिजित मंदारच्या मनात काय चाललंय याचा अंदाज घेत होता..मंदार थंडपणे ऐकत होता..
“ किंवा असावी लागते जबरदस्त इच्छा!! समोरच्या व्यक्तीला जीवे मारण्याची!! त्याचा खून करण्याची!!” अभिजितने थेट मंदारच्या वर्मावर बोट ठेवलं..
“ बरोबर बोलताय तुम्ही…मी त्याला ठार मारायचा प्रयत्न केला!!” आता मंदार बोलता झाला..
“ कुलकर्णी साहेब!! तुम्ही कधी तुमच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला हर्ट झालेलं पाहिलंय??” मंदारने अभिजितकडे रोखून पहात विचारलं..
“ मी पाहिलंय!! मला तिला वाचवायचं होतं…एक मुलगी होती जिला मी वाचवू शकलो नाही…” मंदारचा आवाज आता कापरा झाला होता..
“ तेव्हा माझ्या मनात आलं की ,त्यावेळी मी जर मोठा असतो, स्ट्रॉंग असतो तर मी तिची मदत करू शकलो असतो!! जे तिच्या बाबतीत झालं, ते कुणाच्याही बाबतीत होऊ नये!! खरंच खूप त्रास झाला तिला!!” मंदार कळवळून म्हणाला..
“ हाच तो नालायक!!!” मंदारने दात ओठ खात अभिजित समोर फोटो सरकवला..आता त्याच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या..त्याने त्या फोटोवरच दोन तीनदा जोरात हात आपटले..त्याने हातातला फोटो चुरगळुन टाकला..
“ हा नालायक साला!! भो***!!! चू****!! त्याने एका मुलीवर जबरदस्ती केली!!!” मंदारचे डोळे आता पाणावले होते आणि चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत होता..
“ तुम्हाला काय वाटलं?? काय कारण असेल त्यामागे?? काहीही कारण नव्हतं त्याच्याकडे!!! तुम्ही मगाशी म्हणालात तसं हे त्याच्याकडून नकळत किंवा अपघाताने घडलेलं नाही!! त्याने फक्त स्वतःची मजा मारण्यासाठी केलं हे…आणि त्यावेळी मला जे योग्य वाटलं, तेच मी केलं!!” मंदारचा आवाज आता वाढला होता.. तो तावातावात अभिजीतकडे रोखून पहात म्हणाला…आणि त्याचे डोळे आग ओकत होते…
“हे बघ मंदार तू आधी शांत हो प्लिज!!” त्याचा हा अवतार पाहून अभिजित त्याला समजावत म्हणाला..अभिजितच्या डोक्यात आता खूप विचार सुरू होते..मंदारचे त्याला न दिसलेले रंग त्याला आत्ता दिसू लागले होते..
“अरे फोटो का चुरगळलास तू..च्.. ठीक आहे… आपण असं म्हणूया की तू त्यावेळी जे केलंस ते बरोबर होतं…ओके!! तू जे वागलास ते अगदी योग्यच होतं!!” अभिजित टेबलवरचे फोटो उचलत म्हणाला..
“ पण तू जे केलंस ते गुन्हा थांबवण्यासाठी नव्हतं…ती त्यांना दिलेली शिक्षा होती!!! बरोबर बोलतोय ना मी??” अभिजितने मंदारकडे रोखून पहात ठामपणे विचारलं..मंदारने अभिजीतकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला..
“ मग काय चुकीचं आहे त्यात??” मंदारनेच अभिजीतला उलट प्रश्न विचारला..आता मात्र अभिजित हाताची घडी घालून मागे खुर्चीला टेकून बसला..मंदारच्या मनात जे खदखदत होतं ते आत्ता बाहेर पडलं होतं..
अभिजीतचा चेहरा पाहून मात्र मंदार आता भानावर आला..रागाच्या भरात आपण काय बोलून बसलो हे त्याला आत्ता कळलं..
“ सॉरी!!! आय अॅम सो सॉरी!!!” मंदार सारवासारव करत म्हणाला…
“ रागाच्या भरात मी आत्ता…पण त्यावेळी मी जे केलं ते चांगल्या हेतूने केलं!! आणि मला तुम्हाला हेच सांगायचंय की मि. शहांचा खून मी नाही केला!! काहीच कारण नव्हतं असं करण्याचं…मी कारणाशिवाय उगाचच काही करत नाही..खरंच सॉरी!! माझं जरा अतीच झालं..” मंदार शांत होत म्हणाला…
“ इट्स ओके!! इट्स ओके!!” अभिजित खोटं स्माईल देत म्हणाला..

अभिजीत शून्यात नजर लावून बसला होता..तोच बर्वे हातात कॉफीचे कप घेऊन आले..
“ काही झालंय का??” बर्व्यांनी समोर बसता बसता विचारलं..
“ मला वकिली करायचा कंटाळा आलाय!! माझे क्लाएंट निर्दोष नाहीयेत…पण क्लाएंट निर्दोष असले तरी मला त्रास होतो..त्यांना न्याय मिळवून देता येईल की नाही याचं टेन्शन असतं..” अभिजित वैतागुन म्हणाला…
“ तुझे बाबाही असेच होते..त्यांना नेहमी हीच काळजी असायची की त्यांच्यामुळे कोणत्याही निरपराध माणसाला शिक्षा होऊ नये!! आणि कोणताही गुन्हेगार सुटून जाऊ नये…” बर्वे अभिजीतला समजावत म्हणाले…अभिजितने बर्व्यांकडे एकवार पाहिलं,आणि हसून कॉफीचा कप उचलला..

दुसऱ्या दिवशी सगळे शांतपणे अभिजितच्या टेबलसमोर उभे होते..अभिजित हातातली कागदपत्र चाळत होता..झेंडे, पुष्कर आणि अनु खाली मान घालून एकमेकांकडे चोरून पहात होते..काल अनु मि.शहांच्या घरून निघाली त्यानंतर पुष्कर, झेंडे आणि अनु तिघे मिळून जेवायला हॉटेलला गेले होते..हातातली कामं टाकून काहीही न सांगता त्यांनी बाहेर जायचा प्लॅन केला होता…
“ झेंडे मी काल तुम्हाला खूप काही करायला सांगितलं होतं..पण तुम्ही फक्त हे चार पेपर आणून माझ्या समोर ठेवलेत?!!” अभिजित डॉक्युमेंट्स चाळत म्हणाला..
“ ते…मला सगळ्यात लक्ष घालायला वेळ नाही मिळाला…” झेंडे चाचरत म्हणाले..
“ आणि तुम्हांला बाहेर हॉटेलमध्ये जाऊन टाइमपास करायला वेळ आहे!!!” अभिजित हातातली फाईल टेबलवर आपटत म्हणाला…
“ मि. शहांबद्दल जी काही माहिती मिळेल ,ती सगळी हवीय मला!! कुठूनही शोधून काढा, पण काढा..सोशल मीडियावर ज्या पोस्ट असतील त्या सगळ्या चेक करा..मि.शहांची कचराकुंडी पण सोडू नका!! आणि त्या फोटोफ्रेमचं काही कळतंय का ते बघा!!! कळलं?!!अभिजीत खेकसला..झेंडेंनी मान डोलावली…
“ आणि रेस्टॉरंटचं!!” असं म्हणत अभिजित पुष्करकडे वळला…त्याने प्रश्नार्थक नजरेने अभिजीतकडे पाहिलं..
“ हो तूच!!! तू जायचं मि.शहांच्या रेस्टॉरंटमध्ये आणि चौकशी करायची…” अभिजित दरडावून म्हणाला..
“ का?? मी का?? मी ऑलरेडी बाकीच्या केसेसवर काम करतोय!! मला अजिबात वेळ नाहीये यासाठी!!” पुष्कर म्हणाला..
“आणि तुझ्याकडे हॉटेलात हादडायला जायला वेळ आहे ना??” अभिजित टेबलवर हात आपटत म्हणाला..पुष्कर गप्प झाला..आता फक्त अनु उरली होती..ही मोठी लाट आपल्यावर कधी फुटतेय याचीच ती वाट बघत होती. तिने अभिजितकडे पाहिलं..आता अभिजितचंही तिच्याकडे लक्ष गेलं..तो तिच्याकडेच रोखून पहात होता..
“ आपल्याला ज्या CCTV च फुटेज मिळालंय ते चेक कर आणि जे काही मिळेल ते लगेच दाखवायचं मला!!” दात ओठ खात अभिजित म्हणाला..
“ आणि जर काही मिळालं नाही तर??” अनुने शंका काढली..
“ नाही मिळालं तरी काहीतरी करून शोधायचं!!! काहीतरी मिळालंच पाहिजे तुला त्यातून!!!बघत राहा!!!” अभिजित जोरजोरात ओरडत होता… “बघत रहा जोपर्यंत बघून बघून तुझे डोळे बाहेर येत नाहीत!!”अनुने कशीबशी हो हो करून जोरजोरात मान हलवली…अभिजित आता सगळं बोलून शांत झाला..अभिजितने सुस्कारा सोडला…
“ तुझ्यामुळे ही केस घेतलीय आपण..तू सिरीयस असायलाच हवंस या बाबतीत..” अभिजित शांतपणे म्हणाला…
“ हो सर..” अनु गंभीरपणे म्हणाली..अभिजितने तिघांकडे पाहिलं..
“ तुम्ही सगळ्यांनी माझी फर्म फक्त टाईमपास करण्यासाठी जॉईन केलीय!!” अभिजित पुन्हा दात ओठ खात फाईल आपटून म्हणाला आणि तिथून वर निघून गेला.. थोडया वेळाने अनु लॅपटॉप घेऊन वर आली..अभिजित कामच करत बसला होता..
“ सर मला ते फुटेज बघायचंय पण ते तुमच्या लॅपटॉपमध्ये आहे..” अनु चाचरत म्हणाली..अभिजितने लॅपटॉपवर पासवर्ड टाईप केला आणि लॅपटॉप अनलॉक झाला..
“ थँक यु सर!!” एवढं म्हणून अनु खाली निघून गेली..अभिजीतने ती जाताना तिच्याकडे एकदा पाहिलं आणि तो कामात व्यस्त झाला…सगळेच जण जोरात कामाला लागले होते..अनु फुटेज बघण्यात व्यस होती आणि काही क्लू मिळतोय का ते पहात होती..झेंडेही त्यांच्या कामाला लागले होते..पुष्कर दोन वेळा पुन्हा त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन आला होता पण काहीच हाती लागलं नव्हतं..आज पुन्हा पुष्कर तिकडे जाऊन आला..झेंडे,अनु,अभिजित आणि पुष्कर चौघे मीटिंग रूममध्ये बसले होते..
“ मला असं कळलंय की मि. शहा एक नंबरचे चालू होते..स्पेशली बायकांच्या बाबतीत!!” पुष्कर म्हणाला..
“ एवढंच??” अभिजितने विचारलं..
“ नाही रे!! हे बघ, जेव्हा एखादी व्यक्ती वाईट काम करते तेव्हा त्याच्या जवळचं कुणीतरी एक असं असतं जे त्याला वाचवण्याचा, त्याची चूक लपवण्याचा प्रयत्न करतं!! मि. शहांच्या जवळचं कोण?!!” पुष्करने विचारलं..
“ त्यांची बायको!!” अभिजित म्हणाला..पुष्करने चुटकी वाजवली..
“ सगळ्यात आधी त्यांनीच मि. शहांची डेड बॉडी पहिली ना!!”अनुने विचारलं..
“ म्हणजे आता मिसेस शहा आपलं टार्गेट आहेत तर!!” झेंडे म्हणाले..
आता तपासाला वेगळी दिशा मिळाली होती.. एकदा अनु फुटेज चेक करत होती तेव्हा त्यात तिला काहीतरी सापडलं..
“ सर!! मिळाला!! क्लू मिळाला!!” अनु जोरातच हात वर करून ओरडली..अभिजित धावतच तिच्या टेबलापाशी गेला..अनुने नोट्स काढलेल्या त्यात आणि लॅपटॉपमधे त्याने आळीपाळीने पाहिलं..आणि तो खुश झाला..
“ शाब्बास अनु!! शाब्बास!!” अभिजितने आनंदाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला..अनुही जाम खुश झाली..दोघेही आपल्याच नादात होते..पण मधूनच अनुच्या आणि अभिजितच्या लक्षात आलं आणि दोघेही ओकवर्ड झाले..अभिजितने घसा खाकरला..
“ गुड जॉब अनघा…” एवढंच शांतपणे म्हणून तो निघून गेला…

आज या केसची पुढची तारीख होती..सगळेजण कोर्टात वेळेत हजर झाले आणि कामकाजाला सुरवात झाली..
“ युअर ऑनर हेच ते पुरावे ज्याने हे सिद्ध होतं की आरोपी ‘मंदार भावे’ हा घटनास्थळी खुनाच्या वेळी तिथे होता..घटनास्थळी त्याच्या बुटांचे ठसे मिळालेत..” मोनिकाने फोटो दाखवले…
“ तसंच कार्पेटवर एक शर्टचं बटण मिळालं आहे जे मंदारच्याच शर्टचं होतं हे फिंगरप्रिंट मॅच झाल्यामुळे कन्फर्म झालंय..” मोनिकाने पुरावे judge साहेबांकडे सुपूर्द केले..
“ हे बरोबर आहे की घटनास्थळी मिळालेलं शर्टचं बटण हे माझे अशील मंदार जाधवचं आहे, पण ते बटण खून झाल्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच १९ मे २०२० रोजी तिथे पडलं..” अभिजितने मोनिकाचं म्हणणं खोडायला सुरवात केली..
“ माझे अशील जेव्हा कुरियर पोचवण्यासाठी मि.शहांच्या घरी गेले तेव्हा मि. शहा सोफ्याखाली काहीतरी शोधत होते..मंदारने मदतीचं विचारल्यावर त्यांनी मंदारला सोफा एका बाजूने उचलायला सांगितलं..ते उचलताना मंदारच्या शर्टाच्या मनगटाचं बटण तुटून तिथेच खाली पडलं..त्यामुळे ते बटण मि.शहांची मदत करताना तिथे पडलं याची शक्यता नाकारता येणार नाही..” अभिजितने स्पष्ट केलं..
“ पण युअर ऑनर ते बटण आदल्या दिवशी पडलं असावं हा फक्त अंदाज आहे!!” मोनिकाने तिची बाजू मांडली..
“ हो!!! पण ते बटण खून झाला त्याच दिवशी पडलं हाही अंदाजच आहे ना तुमचा advocate मोनिका?!!” अभिजित ठामपणे म्हणाला..यावर मोनिका गप्प झाली…

साक्षीदार म्हणून शिंदे आजी पिंजऱ्यात उभ्या राहिल्या होत्या…
“ तुम्हीच आरोपी मंदार जाधवला मि. शहांच्या घरातून दिनांक २० मे २०२० रोजी ३ च्या सुमारास बाहेर पडताना पाहिलं..बरोबर??” मोनिकाने आजींना विचारलं..
“ हो मीच पाहिलं त्याला बाहेर पडताना..दुपारची झोप झाल्यावर मी गॅलरीत बसले होते..तेव्हाच मी बघितलं त्याला बाहेर पडताना!!” आजी ठामपणे म्हणाल्या..
“ तुम्ही खात्रीपूर्वक सांगू शकता? की तो हाच माणूस होता??” मोनिकाने मंदारकडे बोट दाखवत विचारलं..
“ हो तर!! हाच होता तो!! मला अगदी चांगलं आठवतंय!!” आजी आत्मविश्वासाने म्हणाल्या..
“ दट्स ऑल युअर ऑनर!!” एवढं बोलून मोनिका आपल्या जाग्यावर जाऊन बसली..
“ साक्षीदाराला काही प्रश्न विचारायचे असल्यास आरोपीचे वकील विचारू शकतात..” judge साहेब म्हणाले..अभिजित समोर येऊन उभा राहिला..
“ नमस्कार आजी!! मला सांगा, तुम्ही तशा वयस्कर आहात..पण तरीही तुम्हाला एवढं लांबचं दिसलं?!” अभिजितने आश्चर्याने विचारलं..
“ हो!! पण माझं वय झालं असलं तरी माझी दृष्टी अजून चांगली आहे..अजूनही चष्मा न लावता सुईतून दोरा ओवता येतो म्हंटलं मला!!” शिंदे आजी ठसक्यात म्हणाल्या..अभिजित हसला..
“ अरे वा आजी!! तुम्ही तर CCTV कॅमेराच आहात!!” अभिजित गंमतीने म्हणाला..
“आजी, तुम्ही ज्या व्यक्तीला मि. शहांच्या घरातून बाहेर पडताना पाहिलं तिचं वर्णन करू शकाल तुम्ही??” अभिजितने मुद्यावर येत विचारलं..
“ वर्णन??” आजींनी विचारलं..
“ हो!! म्हणजे उदाहरणार्थ, त्याने त्यावेळी कसे कपडे घातले होते?!!” अभिजितने विचारलं..
“ अच्छा!! त्याने त्यावेळी एकदम काळे कपडे घातले होते..काळं जॅकेट, काळी टोपी..त्याने हॅण्डग्लोव्हजपण काळे घातले होते, एवढ्या कडक उन्हाळ्यातसुध्दा!!!” आजी म्हणाल्या..
“ हम्म..बरं मला सांगा त्यावेळी त्याच्या हातात बॅग वैगरे काही होती का??” अभिजितने विचारलं..
“ नाही!! बॅगबिग काही नव्हती त्याच्याकडे..” आजी आठवत म्हणाल्या..
“ तुम्हाला नक्की आठवतंय ना??” अभिजितने परत खात्री करत विचारलं..
“ हो!! माझी स्मरणशक्ती शाबूत आहे चांगली!!” आजी म्हणाल्या..
“ ओके!! आता मला सांगा त्याची शरीरयष्टी कशी होती?? म्हणजे अंगाने जाडा होता की बारीक होता?!!” अभिजितने पुढचा प्रश्न विचारला..
“ तो बारीक होता..तुझ्यासारखाच होता अंगाने..” आजींनी माहिती दिली..
“ मग मंदारने मि. शहांच्या घरातून एवढा सगळा ऐवज कसा चोरून नेला? जो त्याने त्याच्यासोबत नेला असा आरोप आहे त्याच्यावर..” अभिजितने उलट प्रश्न विचारला..आजी विचारात पडल्या..
“ युअर ऑनर, मि.शहांच्या घरातून ह्या गोष्टी चोरीला गेल्या..लॅपटॉप, सोन्याचे दागिने, चांदीची भांडी,दहा लाख कॅश, DSLR कॅमेरा, कॅमेरा लेन्सेस,ट्रॉफी, महागडी रिस्ट वॉच आणि एक मोठी फोटोफ्रेम..” अभिजितने यादी वाचून दाखवली..तोवर अनुने समोर एक बॅग आणून ठेवली..
“ युअर ऑनर, या बॅगमध्ये त्याच सगळ्या वस्तू आहेत ज्या या लिस्टमध्ये दिलेल्या आहेत..या सगळ्या वस्तू एकत्र करून एवढी मोठी बॅग भरलीय..आणि एक फोटोफ्रेम जी या बॅगमध्येही बसवू शकत नाही..” अभिजितने बॅग सर्वांना दाखवली..
“ मग आताच जसं या साक्षीदार म्हणाल्या की त्या व्यक्तीच्या हातात बॅग नव्हती..आणि त्यांनीच सांगितल्याप्रमाणे ती व्यक्ती बारीक होती..म्हणजेच त्या वस्तू कपड्यात लपवूनही नेलेल्या नाहीत..बरोबर advocate मोनिका?!” अभिजितने मोनिकाला विचारलं..मोनिका यावर काहीच बोलली नाही..
“ युअर ऑनर, तुम्ही हेही लक्षात घ्या की चोरीला गेलेला ऐवज अजूनही मिळालेला नाही..” अभिजित म्हणाला..
“ पण युअर ऑनर!!अशीही शक्यता आहे की मंदार पुन्हा तिथे आला असावा चोरीचं सामान न्यायला!!” मोनिका अभिजितकडे पहात म्हणाली..
“ येस!!ऑफ कोर्स!! पण जर माझे अशील पुन्हा त्या ठिकाणी चोरीचं सामान न्यायला आले असते तर घटनास्थळी डुप्लिकेट फुटप्रिंट मिळाले असते!! राईट मिस मोनिका??” अभिजितने उलट प्रश्न केला..आता मात्र प्रिया अवाक झाली..अभिजित मंदारवरचे सगळे आरोप खोडून काढत होता..अनु खूप खुश होती..आणि मंदारच्या चेहऱ्यावर मोनिका गप्प बसल्यावर कुत्सित हसू पसरलं…अनु अभिजितने काढलेले पॉइंट्स मार्क करत होती..आता साक्षीदाराच्या पिंजऱ्यात मिसेस शहा उभ्या होत्या..
“ तुम्हीच पहिली व्यक्ती आहात जिला मि. शहांचा मृतदेह सर्वांत दिसला..हो ना?” अभिजीतने विचारलं..
“ हो..” मिसेस शहा शांतपणे म्हणाल्या..
“ तुम्ही खून झाल्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मि. शहांना मृतावस्थेत पाहिलंत..हे खरं आहे??” अभिजितने विचारलं..
“ हो..हे खरं आहे..” मिसेस शहा म्हणाल्या..
“ मग मिस्टर शहांना अशा अवस्थेत पाहिल्यानंतर,तुम्ही अजिबात वेळ न दवडता पोलिसांना कळवलं आणि अॅम्ब्युलन्सही बोलावली..बरोबर??”
“ हो..मी लगेचंच हालचाल करून पोलिसांना कळवलं..” मिसेस शहांनी उत्तर दिलं..यावर अभिजितने एक फोटो प्रोजेक्टरवर डिस्प्ले केला..
“ युअर ऑनर, हे CCTV फुटेज मि. शहांच्या घराजवळच्या गल्लीतल्या दुकानातलं आहे..या फोटोत आपल्याला एक कार स्पष्ट दिसतेय जिचा नंबर आहे 3077.. ही तुमचीच गाडी आहे ना मिसेस.शहा??” अभिजीतने मिसेस शहांना विचारलं..त्यांचंही लक्ष समोरच्या फोटोकडे गेलं..
“ हो!! ही माझीच कार आहे!!” मिसेस शहांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं…
“ या फोटोत वरती उजव्या बाजूला आपल्याला त्या फुटेजची तारीख आणि वेळ स्पष्ट दिसतेय..ती वेळ होती खुनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून तेरा मिनिटं.. याचा काय अर्थ होतो मिसेस शहा??” अभिजितने मिसेस शहांना विचारलं..आता मिसेस शहा सावरून बसल्या..त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले..
“ दिलेल्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही असं खात्रीपूर्वक सांगितलंय की ,तुम्ही एक वाजता घटनास्थळी पोचलात..हो ना??” अभिजित आता त्यांच्याकडून खरं काढून घ्यायचा प्रयत्न करू लागला..
“ हो बहुतेक..” मिसेस शहा चाचरत म्हणाल्या..
“ अकरा वाजता की एक वाजता?!!” अभिजीतने ठामपणे विचारलं..मिसेस शहा काही बोलायला तयार होईना..
“ मी तुम्हाला विचारतोय!! तुम्ही नक्की किती वाजता घरी पोचलात??” अभिजितने दरडावून विचारलं..
“आठवत नाही..” त्या थंडपणे म्हणाल्या..
“ आत्ता थोड्या वेळापूर्वी तर तुम्ही अगदी ठामपणे सांगत होता की तुम्ही एक वाजता पोचलात!! मग आता का आठवेनासं झालं?!!” अभिजित खोटं हसून म्हणाला..
“ ऑब्जेक्शन युअर ऑनर!! Advocate कुलकर्णी माझ्या अशिलावर स्टेटमेंट बदलण्यासाठी दबाव आणतायत!!” मोनिका उद्गारली..
“ मी फक्त त्यांना स्पष्टपणे प्रश्न विचारतोय कारण त्यांनी दिलेलं स्टेटमेंट चुकीचं आहे!!” अभिजितने मोनिकाला गप्प केलं..
“ऑब्जेक्शन ओव्हररुल्ड!!” judge साहेबांनी अभिजितला पुढे बोलायची परवानगी दिली..
“ थँक यु युअर ऑनर!! माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मिसेस शहा!!” अभिजितने पुन्हा विचारलं..
“ मी म्हटलं ना मला नाही माहीत!! नाही आठवत मला!!” आता मिसेस शहांचा आवाज वाढला..
“ मी आठवण करून देऊ तुम्हाला?? खरं हेच आहे ना?? की तुम्हीच तुमच्या नवऱ्याचा खून केलाय?!!” अभिजीतने मिसेस शहांवर सरळ सरळ आरोप केला..
“ नाही!! हे खोटं आहे!!” आता मिसेस शहा बिथरल्या..

“ तुम्ही मिसेस शहांवर खुनाचा आरोप करणार आहात??” अनुने आश्चर्याने विचारलं..
“ हो!! मिसेस शहांकडून खरं काय ते वदवून घेण्यासाठी मी त्यांच्यावर खुनाचा आरोप करणार…आरोप केल्यावर त्या बिथरतील..चुकीचा आरोप झाल्यामुळे त्या चिडतील किंवा घाबरतील..याचाच फायदा घेऊन मी त्यांच्यावर दबाव आणणार आणि त्या जे लपवतायत ते बाहेर येणार!!” अभिजित अनुला समजावत होता.. आणि आत्ता हेच अनुला आठवलं..
“ नाही!! मी काहीही केलेलं नाही!!” मिसेस शहा थरथरत्या आवाजात म्हणाल्या..
“ युअर ऑनर!! आम्हांला मिळालेल्या माहितीनुसार मिस्टर अँड मिसेस शहा यांच्यात खूप दिवसांपासून वाद होते..मिस्टर शहांचं बाहेर अफेअर असल्याची चर्चा होती..आणि म्हणूनच याच रागातून मिसेस शहा यांनी आपल्याच नवऱ्याचा खून केला!!!हो ना मिसेस शहा?!!” अभिजित ठामपणे म्हणाला..
“ मी सांगितलं ना मी काहीही केलेलं नाही!!!” मिसेस शहा जोरात ओरडल्या..
“ मिसेस शहा!!!” आता अभिजीतचाही आवाज वाढला..त्याचा तो आवेश पाहून मिसेस शहा गप्प झाल्या..
“ प्लिज बोला मिसेस शहा!!!” अभिजित त्यांच्यासमोर उभं राहून शांतपणे म्हणाला. आता मिसेस शहांचा बांध फुटला…
“ मी फक्त यांची इमेज वाचवण्यासाठी केलं हे सगळं!!” मिसेस शहा रडून बोलू लागल्या..
“ मी फक्त माझ्या फॅमिलीची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी केलं हे!!” मिसेस शहा दुखावल्या गेल्या होत्या..
“ मी जेव्हा घरी पोचले तेव्हा आधीच यांचा खून झालेला होता..हे रक्ताच्या थारोळ्यात माझ्यासमोर पडले होते..समोर टीव्हीवर ह्यांनी जे घाणेरडं कृत्य केलं त्याचा व्हिडिओ लावलेला होता.. त्यांनी एका मुलीवर केलेल्या अत्याचाराचा प्रत्येक पुरावा मी नष्ट केला!! हा सूडबुद्धीने केलेला खून नसून, चोरीसाठी केलेला खून वाटावा म्हणून मी घरातल्या गोष्टी अस्ताव्यस्त करून ठेवल्या!! आणि मीच घरातल्या सगळ्या किमती वस्तू तिथून गायब केल्या!!” मिसेस शहांनी सगळं खरं खरं सांगून टाकलं..
“ पण मी हे सगळं माझ्या फॅमिलीची बदनामी टाळण्यासाठी, आणि माझ्या नवऱ्याची इमेज सांभाळण्यासाठी केलं..मग यात काय चुकलं माझं?? तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं?!!” मिसेस शहांनी अभिजीतला जाब विचारला..
“ मग त्या मुलीची इमेज कोण सांभाळणार?!! जी तुमच्या मिस्टरांनी पायदळी तुडवली!!!” अभिजित गंभीरपणे म्हणाला..यावर मिसेस शहा गप्प बसल्या..मंदारही हे ऐकून गंभीर झाला..
“ आपल्या नवऱ्याच्या चुकांवर पांघरूण घालून मिसेस शहांनी स्वतःच मोठी चूक केली..आणि या सगळ्यात एका निरपराध माणसाला मात्र, त्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागली!!!” अभिजित judge साहेबांना उद्देशून म्हणाला..
“ मंदारवर झालेल्या अन्यायाला जबाबदार कोण?!!” अभिजितने प्रश्न विचारला…यावर सगळेच शांत झाले..मोनिका काहीच बोलू शकली नाही..प्रिया जे झालं त्यावर विचार करत राहिली..अनुने गंभीरपणे मंदारकडे पाहिलं..मंदारही शांत बसला..अभिजितने आळीपाळीने मंदार आणि अनुकडे पाहिलं..अनु त्याच्याकडेच अभिमानाने पहात होती..

अनु आणि अभिजीत दोघेही दमून घरी आले तेव्हा रात्र झाली होती..अभिजित केस जिंकला होता हे वेगळं सांगायची गरज नव्हती.. अभिजित आला तो थेट वर गेला..अनुही आपलं आवरायला रूममध्ये गेली..अभिजितने वर जाऊन सोफ्यावर अंग टाकलं..तो खूप दमला होता..मागचे काही दिवस तर या केसवर त्याचं दिवसरात्र काम सुरू होतं..अनु चेंज करून बाहेर आली..वरून काहीच आवाज नाही म्हणून अनु वर गेली..समोर अभिजित सोफ्यावर शांत झोपला होता..
“ अरे!! झोपले पण!!” अनुला आश्चर्य वाटलं...अभिजित अवघडूनच झोपला होता..
“ निदान पांघरूण तरी घ्यायला हवं होतं…गारठा आलाय हवेत पाऊस पडल्यामुळे..” अनु स्वतःशीच म्हणाली..
ती सावकाश बेडरूममध्ये गेली आणि आतून पांघरूण घेऊन आली..ते उलगडून अलगद तिने अभिजीतवर पांघरलं..अनु खुश झाली..तोच अभिजीतला जाग आली..त्याने अनुकडे पाहिलं..अनुही तो अचानक जागा झाल्यामुळे बावरून मागे झाली..अभिजित अजूनही तिच्याकडेच पापणीही न मिटता पहात होता..
“ मी काही नाही केलं सर!! म्हणजे मला असं म्हणायचंय की मी फक्त तुम्हाला पांघरूण घातलं गारवा वाटत होता म्हणून..” अनु चाचरत म्हणाली..
“ सॉरी सर!!असं पुन्हा नाही होणार..” एवढं बोलून अनु शांतपणे तिथून निघून जाऊ लागली..तोच अभिजीने तिचा हात पकडला..
“ सॉरी अनघा.. फक्त पाच मिनिटं थांब माझ्यासोबत..प्लिज..” अभिजित
शांतपणे म्हणाला..अनुने त्याच्याकडे एकवार पाहिलं..आपला हात त्याच्या हातातून सावकाशपणे सोडवला..आणि काहीही न बोलता त्याच्यासमोर येऊन बसली..अभिजित सोफ्यावर बसला होता आणि तिथेच खाली त्याच्या पायाशीच मांडी घालून अनु बसली..तिला बसलेलं पाहून अभिजितने हळूहळू डोळे मिटून घेतले..आणि अनु तिथेच त्याच्याकडे एकटक पहात बसून राहिली…

दुसऱ्या दिवशी झेंडे घाईघाईतच वर आले पण समोर जे दिसलं ते पाहून ते चकित झाले आणि दबकत दबकत पावलं टाकत खाली उतरले..ते जाम खुश झाले होते..
अभिजित सोफ्यावर डोकं टेकून झोपला होता आणि त्याच्या मांडीवरच डोकं ठेऊन अनु त्याच्या पायाशीच बसून शांतपणे झोपली होती..आदल्या रात्री अनु अभिजितला सोबत म्हणून त्याच्यासमोर बसली, पण दिवसभर दमल्यामुळे तिला कधी झोप आली कळलंच नाही आणि ती तिथेच तिच्या नकळत अभिजीतच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपी गेली…आणि हेच पाहून झेंडेंना खूप आनंद झाला होता…झेंडे जिन्यात अर्ध्यातच थांबले होते..
“ मी बघून येतो अभिजीतला..” असं म्हणून पुष्कर जिना चढू लागला..पण झेंडेंनी त्याला चढुच दिलं नाही..
“ नाही जायचं वर!!” हीच टेप लावून बसले झेंडे..
“ थांब!! मी जातो!! बाजूला हो रे वाटेतून झेंडे!!!” असं म्हणून बर्वे वर जाऊ लागले पण त्यांनाही हाताला धरून खाली रेटलं झेंडेंनी..
“ तुला काय झालंय झेंडे?!!!” बर्व्यांनी आश्चर्याने विचारलं..
“वर जायचं नाही सांगितलं ना एकदा!!” झेंडे खेकसले..” नो मिन्स नो!!” असं म्हणून झेंडेंनी त्या दोघांना गप्प केलं..त्यांचे चेहरे पाहून झेंडेना हसू आलं.. तर इकडे बर्वे आणि पुष्कर दोघही बुचकळ्यात पडले..

त्या दिवशी रात्री सगळे हॉटेलमध्ये डिनरला गेले होते..अभिजित,अनु ,पुष्कर,झेंडे, बर्वे आणि मंदार..पहिली केस जिंकल्याबद्दल आणि मंदार निर्दोष सुटल्याबद्दल बर्व्यांनी पार्टी दिली होती..सगळेजण मजा मस्करीच्या मूडमध्ये होते..तोच बर्व्यांनी अनुला गाणं म्हणायला सांगितलं..
“ नको म्हणू तू गाणं!!” अभिजित अनुला म्हणाला..
“ का??” सगळेच एकसुरात ओरडले..
“ बरं ठीक आहे..म्हण!!” एवढं बोलून अभिजित गप्प बसला..बाकी सगळ्यांनी अनुसाठी टाळ्या वाजवल्या..आता अनु गाणं म्हणायला उभी राहिली.. हातात माईक म्हणून चमचा घेऊन तिने गाणं म्हणायला सुरवात केली..आणि सगळेच बिथरले..अनु खूप वाईट गात होती..बर्व्यांना तर तिला कुठून गाणं म्हणायला सांगितलं असं झालं..तिचं गाणं ऐकून अभिजीतला हसू फुटलं..मंदारही आपलं हसू दाबत होता…ह्या सगळ्या गोंधळात अनुचा मोबाईल व्हायब्रेट होत होता याकडे कुणाचं लक्षच नव्हतं..तिचा मोबाईल वाजून बंद झाला तोच अभिजीतचा मोबाईल वाजला..कॉल घेण्यासाठी तो बाहेर आला..
“ हो!! बोलतोय!!
………………
पण ती केस तर क्लोज झालीय!!
………………
बरं ठीक आहे मी पोचतो तिकडे..” एवढं बोलून अभिजित काही महत्वाचं काम आहे हे सांगून बाहेर पडला..तो त्याच हॉटेलमध्ये शिरला जिथे अनु मंदार खरं बोलतोय की नाही हे पाहायला गेली होती..अभिजित पोचला तेव्हा एक जोडपं त्याची वाट पहात होतं..त्यांनी अनुचा स्टीकी नोटवरचा मेसेज पाहून अनुला कॉल केला होता..तिने उचलला नाही म्हणून अभिजीतला कॉल केला..अभिजीतच्या हातात त्यांचा अॅनिव्हर्सरीचा फोटो आणि त्याखाली अनुने लिहिलेली नोट होती..
“ मला आठवतंय की एक तरुण आमच्या मागच्या बाजूला एकटाच बसलेला..आठवलं तुला??” बायकोने तिच्या नवऱ्याला विचारलं..
“ हो !! सगळे ग्रुपने किंवा जोडीने डिनर करत होते..फक्त हाच माणूस एकटा बसला होता त्यामुळेच माझ्या चांगला लक्षात राहीला..” नवरा म्हणाला..
“ अरे आपल्याकडे तो व्हिडिओ आहे ना केक कट करतानाचा तो दाखव की यांना!!” बायकोने आठवण करून दिली..अभिजितने तो व्हिडिओ पूर्ण बघितला..त्यात या दोघांच्या मागेच बसलेला आणि त्यांच्याकडेच पहात असलेला एक तरुण स्पष्ट दिसत होता..पण तो मंदार नव्हता..
“ याच्यासोबत नंतर कुणी जॉईन झालं का??” अभिजितने विचारलं..
“ नाही!! आम्ही खूप वेळ होतो इथे!! त्याच्यासोबत कुणीच नव्हतं तेव्हा..” नवरा उत्तरला..
“ असं कसं होऊ शकतं!!” गोंधळून अभिजीत स्वतःशीच म्हणाला..
त्यांच्याशी बोलून झाल्यावर अभिजित तो फोटो पुन्हा होता तिथे लावायला गेला..त्याने पिन टोचून बोर्डवर फोटो लावून टाकला..तो तिथून निघणार तोच त्याची नजर अख्या बोर्डभर फिरली…बऱ्याच जणांनी त्यांच्या आठवणी किंवा दिवसभरात केलेली कामं, स्पेशल गोष्टी तिथे नोट डाऊन करून लावून ठेवलेल्या…त्या पाहता पाहता अभिजीतला बागेत फुगे घेऊन खेळणाऱ्या मुलांचा फोटो दिसला..
“ त्या दिवशी climate मस्त होतं म्हणून मी बागेत गेलेलो..तिथे छोटी छोटी मुलं खेळत होती..फुगेवाला पण होता तिथे!!” अभिजीतला मंदारचं वाक्य आठवलं..आता अभिजीतची नजर बोर्डवर फिरू लागली..एक कोपऱ्यात त्याला रंपाट पिक्चरचं पोस्टर दिसलं..
“ थेटरला रंपाट लागला होता म्हणून मी गेलो होतो..पण सगळे शो हाऊसफुल्ल होते..” मंदार म्हणाला होता..आता अभिजित घाईघाईत सगळ्या नोट्स वाचू लागला..एका कोपऱ्यातल्या चिटोऱ्यावर त्याचं लक्ष गेलं..
“ मी त्या दिवशी दुपारी जेवण न घेता मस्त गाडीवरची पाव भाजी खाल्ली..तेही पोटभर..” मंदारचं वाक्य होतं हे..
“ रात्री मी हॉटेलात गेलो…तिथे एक कपल अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करत होतं..त्यांनी मोठा केक पण मागवलेला!!” मंदार म्हणालेला.. अभिजितला खूप मोठा धक्का बसला होता..
“ म्हणजे खून झाल्याच्या दिवशी मंदारने काय काय केलं त्या सगळ्या गोष्टी मंदारला इथून मिळाल्यात!!” अभिजित मनात म्हणाला..अभिजीतला खूप मोठा शॉक बसला होता..
“ मंदार सराईतपणे खोटं बोललाय!! एवढं खोटं बोलून त्याला नक्की काय लपवायचं होतं?!!” अभिजित गंभीरपणे विचार करत होता..
“ जे घडलं,ते कदाचित अशा प्रकारे घडलं असेल..खून झाल्यानंतर काही वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी तो हॉटेलमध्ये आला..त्याने हा फोटो आणि या सगळ्या नोट्स बघितल्या..त्याने या सगळ्या गोष्टी पक्क्या लक्षात ठेवल्या..म्हणूनच अचानक अटक होऊनही त्याने न चुकता, न अडखळता त्या दिवसाचं अक्ख शेड्युल अगदी व्यवस्थित सांगितलं!!” अभिजितचं मनातल्या मनात विचारचक्र सुरू झालं..या मास्टर प्लॅनचा उलगडा झाल्यावर अभिजितला काहीच सुचेना…

हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर सगळे बडीशेप चघळत बसले होते..
“ अनघा, तू गाण्याचा क्लास लाव म्हणजे तुझे सूर जरा चांगले लागतील!!सुधारतील!!”पुष्कर तिला चिडवत म्हणाला..
“ अरे तिला वरपासून खालपर्यंत पूर्णच सुधारायची गरज आहे..” बर्वे अनुला
आणखीनच चिडवू लागले..
“ मला बाकी कोणतंही गाणं नीट येत नसलं तरी एक गाणं चांगलंच येतं!!” अनु हिरमुसून म्हणाली..मंदार त्यांची गम्मत पहात होता..
“ कोणतं?!! ते खुनी वालं??” झेंडेंनी विचारलं..त्यावर अनुने होकारार्थी मान डोलावली.. “ ऐका..” असं म्हणून तिने खामोशियाँ गाणं म्हणायला सुरवात केली..आणि ते ऐकून मंदार गंभीर झाला..
त्याला आठवलं..कोर्टातुन बाहेर पडल्यावर गाडीत चढताना अनुला खामोशियाँ गाणं ऐकू आलं होतं..ते ऐकणारा दुसरा तिसरा कोणी नसून मंदार होता!!!
अनु जेव्हा भिंतीवर शुभमच्या खुनाबद्दल माहिती देण्याचं पोस्टर चिकटवत होती..तेव्हा तिला लांबून भिंतीआडून पाहणारा मंदार होता!!!
त्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या तरुणासोबत रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेल्या मि.शहांना पाहून खुश होणारा मंदार होता!!!
पोस्टर गिफ्ट पॅक करून अनुच्या ऑफिसमध्ये ठेवणारा आणि अनुला धमकी देणारा दाराआडचा आवाज म्हणजे मंदार होता!!!
ज्याच्या मागे अनु धावली होती..आणि नंतर जो गर्दीत गायब झाला म्हणून अनु निराश झाली..तो मंदार होता!!!
आणि रात्री दूध घेऊन घरी जाताना तिला सायकलवरून खामोशियाँ गाणं ऐकत जाताना दिसलेला, काळे कपडे घातलेला माणूसही मंदारच होता!!!!
आणि हेच सगळं त्याला आत्ता आठवलं..आणि तो कुत्सितपणे हसला..
“ मस्त झालं गाणं!!” टाळ्या वाजवून त्याने अनुला complement दिली..
“ पण बाकी काहीही असो..माझ्या आयुष्यात एकच ध्येय आहे..ते म्हणजे त्या खुनीला पकडणं!!” अनु गंभीरपणे म्हणाली..यावर मंदार फक्त तिच्याकडे पाहून हसला..थोड्या वेळाने मंदार हॉटेलमधून बाहेर पडला आणि चालू लागला..

“ जे गुन्हेगाराला निर्दोष सिद्ध करून त्याला सोडून देतात ते सगळेच अपराधी असतात!!”
“ म्हणजे गुन्हेगाराला निर्दोष सिद्ध करणारा वकील, आरोपीविरुद्ध ठोस पुरावे गोळा न करणारा वकील, न्यायाधीश सगळेच जबाबदार असतात यासाठी!!” अभिजित मनातल्या मनात विचार करत होता..जे झालं ते चांगलं झालं नव्हतं..अभिजित हॉटेलमध्ये परत जात होता..तोच त्याला समोरून मंदार येताना दिसला..त्याला पाहून अभिजित जागच्या जागी थांबला...
मंदारचंही लक्ष अभिजीतकडे गेलं आणि तोही तिथेच थांबला..मंदार अभिजीतकडे पाहून हसला..अभिजित मात्र मंदारकडे रोखून पहात होता..
“ मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एका गुन्हेगाराला सोडवण्यासाठी मदत केली..आणि त्याला निर्दोष ठरवलं!!!”अभिजित विचार करत होता..आता मंदार आणि अभिजित दोघेही समोरा समोर उभे ठाकले होते…
“ इट्स यु मंदार!!!” अभिजित मनातल्या मनात म्हणाला..

क्रमशः

Group content visibility: 
Use group defaults

कदाचित पुढचे भाग कधीच येणार नाहीत. आणि आता २ वर्षांनन्तर आले तरी कथेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी सगळे भाग परत वाचून काढावे लागणारच. म्हणजे परत तेवढा वेळ द्यावा लागणारच.

Pages