आनंदाचे गाणे व्हावे

Submitted by पुरंदरे शशांक on 24 June, 2019 - 22:38

आनंदाचे गाणे व्हावे

माळरानी एकांतात
रानफुले फुललेली
बहुरंगात रंगोनी
मस्त मजेत डोलली

नाही कौतुक कराया
नाही सुगंध लुटण्या
रंग गंध उधळिता
कोणी न ये त्या जाणण्या

अनामिक वाटसरु
जाई पहात तयांस
थबकून पूर्णपणे
वेडावून जात खास

करी नवल मनात
म्हणे कशी ही फुलत
नये कौतुकाला कोणी
वार्‍यावर डोलतात ?

गोंजारुन जाता तया
फुले गोड हसतात
सहजचि उमलोनि
नकळत व्हावे लुप्त

अपेक्षाचि न ठेविता
आनंदाचे गाणे व्हावे
दिस सरता सरता
हळु निघोनिया जावे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी कविता!

अपेक्षाचि न ठेविता
आनंदाचे गाणे व्हावे
दिस सरता सरता
हळु निघोनिया जावे...
अगदी अगदी.