पथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!

Submitted by पाषाणभेद on 22 June, 2019 - 17:58

पथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!

कलाकारः सुत्रधार आणि दोन सहकारी कलाकार (दोघांकडे एक एक वाद्य असेल तर उत्तम.)
(शक्य असल्यास पथनाट्य सादरीकरणाआधी स्थानिक जनतेच्या अवलोकनार्थ, वातावरण निर्मीतीसाठी पाण्याच्या अपव्ययाचे, दुष्काळाचे प्रातिनिधीक छायाचित्रे असलेला फलक लावावा.)

एक सहकारी कलाकार (पाणीवाल्याच्या भुमिकेत ): पाणी घ्या पाणी, पाणी घ्या पाणी!

दुसरा सहकारी (स्त्री भुमिकेत): अरे ए पाणीवाल्या कसे दिले पाणी?

पाणीवाला: शंभर रुपयाचा एक ग्लास पाणी, पाणी घ्या पाणी.

स्त्री:
काय! शंभर रुपयाला एक ग्लास!
अरे बाबा काल तर होते स्वस्त, आज लाव थोडे रास्त.
काल होता ग्लास नव्वदला!
आज अचानक का भाव वाढवला?

पाणीवाला:
बाई, अहो आज मोठ्या मार्केटमध्ये
पाण्याचे टँकर आले होते कमी.
आम्ही तर साधे पाणीविक्रेते,
आम्हाला स्वस्त मिळण्याची कसली हमी?
हे पाणी विकून तुम्हाला
पोटाला मिळायला पाहीजे आम्हाला.

स्त्री:
बरं बरं बाबा दे
चारच ग्लास पाणी दे.
आज कसेतरी घेवू धकवून.
पण उद्या नक्की ये.

सुत्रधार: मंडळी तुम्ही आम्ही पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आताच विकत घेतो. पण ते प्रवास करतांना, बाहेर जातांना. पाण्याची अशीच परिस्थीती असेल तर भविष्यात दररोजच्या वापराचेही पाणी आपल्याला ग्लासच्या मापात अन भाजीसारखे विकत घ्यायला लागेल हे सत्य आहे.

आता मंडळी या बातम्या ऐका.
ए गोंद्या वाच जरा या बातम्या.

(सहकारी कलाकार बातम्या वाचतो)
पाण्यासाठी दोन गावात मारामारी.
जिल्ह्यात पाण्याचे टँकरांची शंभरी गाठली.
पिण्याच्या पाण्यासाठी धरणाचे दरवाजे बळजबरी उघडले.
दुष्काळामुळे गावकर्‍यांचे शहराकडे रोजगाराठी स्थलांतर.
गावात पाण्याचे नळ नसल्याने मुलांची लग्ने होत नाहीत.
गावात पाण्याचे स्त्रोत आटले, विहीरी आटल्या.
५ किमीवरून पाणी आणण्यात महिलांचा दिवस जातो.
३०० लिटर पाणी चोरीची तक्रार पोलीसठाण्यात दाखल.

सुत्रधार: तर मंडळी, या अन अशा बातम्या आपण रोज वाचतो. वाचतो की नाही?
सहकारी (एका सुरात): हो वाचतो
सुत्रधार: रोज टिव्ही वर पाहतो.
सहकारी (एका सुरात): हो पाहतो.
सुत्रधार: दररोज वाचता, दररोज पाहता मग यातून काही बोध घेता का?
सहकारी (एका सुरात): नाही.

सुत्रधार: बघा मंडळी, पाण्याच्या बाबतीत किती उदासीनता आपण बाळगून असतो.
सहकारी एक: अहो या बाई पहा. राहतात वरच्या मजल्यावर अन वरून सडा मारतात खालच्या रत्यावर.
सहकारी दोन: हे गृहस्थ पहा, गाडी सरळ नळाच्या पाण्याला नळी लावून धुवत आहेत.
सहकारी एक: अन या बाई पहा. दररोज सकाळ संध्याकाळ घरासमोरील अंगण धुतात. स्वच्छता पाहीजे त्यांना.
सहकारी दोन: या मावशी पहा, किती तरी पाणी कपडे धुण्यासाठी चुकीचे वापरत आहेत.
सहकारी एक: ते भाऊ पहा, सरळ नदीतच त्यांची जनावरे धुवत आहेत.

सुत्रधार: मंडळी, असे पाणी वाया घालवू नका. पाणी महत्वाचे नैसर्गीक वरदान आहे. सर्व सजीवांना पाण्याची आवश्यकता आहे. जितका मानवाचा पाण्यावर हक्क आहे तितकाच हक्क इतर सजीवांचा पाण्यावर आहे. कित्येक विकसनशील देशांत जनावरे जे पाणी पितात तेच पाणी तेथल्या नागरीकांना नाईलाजाने प्यावे लागत आहे. त्याने तेथील रोगराईदेखील वाढली आहे.

सहकारी एक: पाणी जपुन वापरा, पिण्याचे पाणी इतर कामासाठी वापरू नका.
सहकारी दोन: सडा मारू नका. वाहन कमी पाण्यात धुवा. धुणी भांडी स्वच्छ करतांना पाणी कमी वापरा.
सहकारी एक: नळाच्या तोट्या बंद करा. पाणी वाया जावू देवू नका.
सहकारी दोन: पावसाचे पाणी अडवा, जिरवा. तरच पाण्याची समृद्धी येईल.
सहकारी एक: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!

सुत्रधार: चला मित्रांनो, आज आपण पाणी बचतीचा संकल्प करू. आपल्या मुलाबाळांच्या पुढच्या पिढीसाठी पाणी राखून ठेवू.

(सुत्रधार अन सहकारी रांगेत हात जोडून उभे राहतात अन गीत गातात)

नका वाया घालवू पाणी
वाया घालवाल तर होईल पाणीबाणी || धृ||

नका मारू सडा
होईल राडा रोडा
नका पाणी फेकू
नका शिळे पाणी टाकू
नका धुवू घोडा अन गाडी
तसे केले तर होईल पाणीबाणी||११||

पाणी शिळे होत नसते
पाणी वरदान असते
पाणी जीवन अनमोल
तुम्ही जाणा त्याचे मोल
ऐका तुम्ही पाषाणाची वाणी
वाया घालवाल तर होईल पाणीबाणी ||२||

- पाषाणभेद
२३/०६/२०१९

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!
नाटक म्हणून ठीक पण व्यवहारात कठीण.

@Srd
नाही समजले.
व्यवहारात कठीण म्हणजे नाटक कठीण की पाणीबचत करणे कठीण?

प्रथमत: प्रतिसादबद्दल आपणाला आणि इतरांना धन्यवाद.

माझ्याच धाग्यावर मी प्रतिसाद देत नाही शक्यतो. ( वर आणण्यासाठी!) पण अडचणीची शंका आहे म्हणून विचारतो.

नाटकाचे काही महत्वाचे नाही ते आपलेच आहे.
पण व्यवहारात पाणी बचत केलेच पाहीजे. जे असे करत नाहीत त्यांना जागेवरच दंड केला पाहीजे.

दुष्काळातही ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांची चांगली आणि काहींची वाईट वागणूक अनुभवली आहे. लोक पाणी हे फार ग्रांटेड घेतात. पाण्याच्या अपव्ययाला पायबंद घातला गेलाच पाहीजे.

अगदी शिकले सवरलेलेही पाणी वाया घालवतात. सार्वजनिक मालमत्तेचा आदर्श वापर कसा करावा याची मानसिकता ज्या दिवशी होईल तो दिन सुदिन.