हा खेळ बाहुल्यांचा! - भाग ५

Submitted by अज्ञातवासी on 15 June, 2019 - 15:10

भाग ४
https://www.maayboli.com/node/70257

IMG_20190606_211522.jpg

...माझ्या समोरच गाठोडं पडलं होतं!!!
माझ्या छातीत एक जीवघेणी कळ आली. भीतीने माझा अंग जागच्या जागी थिजलं. मला हलता येत नव्हतं. 
सगळी गात्रे त्या जीवघेण्या शक्तीने गोठवून टाकली आहेत, असा मला भास होत होता.
क्षणभरच मला माझ्यातल्या शक्तीची जाणीव झाली, आणि मी बाहेर पळालो.
अजूनही छाती धडधडत होती. 
कितीतरी वेळ मी वाड्याच्या पायरीवर उभा होतो. माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. काय करावं तेच सुचत नव्हतं.
मात्र त्या अंधारात दोन डोळे माझ्याकडे निरखून बघत होते. हळूहळू दोनाचे चार, चाराचे आठ, अशी त्यांची संख्या वाढू लागली.
लांडग्यांच्या कळपाने वेळ साधली होती. इकडे आड आणि तिकडे विहीर या संकटात मी सापडलो होतो.
तो कळप माझ्या फारच जवळ येत होता, त्यातील एका लांडग्याने माझ्या अंगावर झडप घातली...
...मी गर्र्कन मागे वळलो, आणि दरवाजा उघडून वाड्याच्या आत घुसलो.
दरवाजावर जोरजोरात धडक मारण्याचा आवाज येत होता.
मी सुन्न होऊन दरवाजाजवळ बसून होतो. माझ्या समोरच गाठोडं होत.
बाहेर लांडग्यांचा आवाज अजूनही ऐकू येत होता. 
मी पूर्णपणे कोरडा झालो होतो. काय करावं ते सुचत नव्हतं. मला वरही जाता येत नव्हतं. न जाणे त्या अभद्र शक्तीने माझ्यावर वार केला असता, तर मला पळूनही जाता आलं नसतं!
म्हणून मला दरवाजाजवळ राहणं सयुक्तिक वाटत होतं. पण मी पळून कुठे जाणार होतो?
लांडग्याच्या कळपासमोर? 
भीतीने माझी अवस्था वाईट झाली होती, पण दिवसभरच्या घडलेल्या विचित्र प्रकारामुळे मला ग्लानी येत होती.
मी झोपू शकत नव्हतो. पण मला जागवतही नव्हतं.
आणि शेवटी न घडायचं तेच घडलं. मला झोप लागली.
दुसऱ्या दिवशी मला केव्हा जाग आली ते कळलं नाही. सूर्य पूर्ण माथ्यावर आला होता, मात्र पाऊसही सुरु होता. निसर्गाची ही किमया मी अनुभवत होतो. मात्र सगळ्यात मोठी गोष्ट...
...मी जिवंत होतो. त्या अमानवीयाने मला अपाय केला नव्हता!
म्हणजे, म्हणजे त्यात अमानवीय असं काही नव्हतं?
नाही, नाही, त्यात नक्की काहीतरी होतं...
आणि जे नव्हतं व्हायचं तेच घडलं. ते गाठोडं जसकाही मला त्याच्याकडे खेचू लागलं. 'उघड मला!' म्हणून माझ्या मनात ओरडू लागलं.
तक्षकाने जसा बोरात अळी बनून प्रवेश केला होता, तसा गाठोडं उघडण्याच्या विचाराने माझ्या मनात प्रवेश केला होतो.
माझं डोकं विचारांनी भंजाळून गेलं!
...आणि शेवटी मी ते गाठोडं उघडण्याच्या निर्णय घेतला.
मी हळूहळू त्याच्याकडे सरकलो, एखाद्या निपचित पडलेल्या सापाला हात लावावा, तसं मी त्या गाठोड्याला हात लावला...
...धडधडधडधडधडधड...
त्या आवाजानेच मी तीन फूट मागे सरकलो... माझ्या छातीचा भाता आता फुटून बाहेर येण्याच्या बेतात होता.
मात्र थोड्याच वेळात मला जाणीव झाली. दारावर कोणी वाजवत होतं.
"साहेब मी पवार, उघडा."
पवार हा माझा असिस्टंट. चांगला माणूस होता.
मी घाबरतच दरवाजाजवळ गेलो, आणि दार उघडलं.
क्षणभर पवार माझ्या अवताराकडे बघून चपापला, पण सावरून तो म्हणाला.
"साहेब आज दुपारी हेड ऑफिसहून क्लर्क येणार आहे, कागदपत्र घ्यायला. तासभर राहिलाय, तुमची सही झाली नाही तर हेड ऑफिसमधून मेमो येईल. म्हणून मी आलो. ब्रांचवर येऊ शकाल ना?"
"हो, तुम्ही व्हा पुढे, मी येतो पंधरा मिनिटात." मला कुठल्याही परिस्थितीत ते गाठोडं त्याच्या नजरेस पडू द्यायचं नव्हतं.
तो निघून गेला. मी पटकन दार लावलं, आणि गाठोडं उचलून मेजावर ठेवलं.
क्षणभर मलाच ते गाठोडं थरारल्याचा भास झाला.
मी अंघोळ केली, कपडे केले, आणि ब्रांचवर निघालो,
...मात्र दार लावत असताना मला ते गाठोडं हलत असल्याचा भास झाला...
---------------------------------------
गाठोडं बाजूलाच पडलेलं होतं.
अचानक त्यात थोडीशी हालचाल झाली...
हं...हं...हंहंहं...
माणूस घुमतो, तसं गाठोडं घुमू लागलं...
उड्या मारतो तसं उड्या मारू लागलं...
वाडाभर उड्या मारत गाठोडं पुन्हा आधी पडलेल्या जागी शांत झालं...
-----------------------------------
बऱ्याच सह्या बाकी होत्या, मला एकदा कागदपत्रे नीट नजरेखालून घालायची होती. आज रामराव नसल्याने शिपाई म्हणून कुणी नव्हतंच. शेजारचा दीपक चहावाला चहा देऊन गेला होता.
क्लर्क कागदपत्रे घेऊन गेला. मीही दुसऱ्या कामांना बिलगलो. बरीचशी लोनची प्रकरणे जमा झाली होती. त्यांचा अभ्यास करताना उशीरच झाला.
मी संध्याकाळी अंधार पडल्यावर निघालो. पाऊस पुन्हा जोराचा चालू झाला होता. मात्र आज अंधार नव्हता...
पौर्णिमेचा चंद्र डोक्यावर येत होता.
मी नदी ओलांडली, क्षणभर कुणीतरी माझा पाठलाग करतंय, असा मला भास झाला.
मी लगबगीने पावले टाकत वाड्याजवळ पोहोचलो...
वाड्याजवळ पालापाचोळा उडत होता, गेटची खटकी काढताच ते सताड उघडलं गेलं. दारही सोसाट्याच्या वाऱ्याने लगेच उघडलं गेलं.
हूँ हूँ हूँ हूँ हूँ... असला काहीतरी आवाज वारा करत होता...
...समोरच गाठोडं पडलं होतं...
उघड...उघड... शेकडो आवाज मला ऐकू येऊ लागले...
संमोहन केल्यासारखा मी त्या गाठोड्याजवळ गेलो...
त्याच्या गाठी अक्षरशः सापासारख्या लिबलिबित होत्या...
गाठोडं आता थरथरू लागलं होतं, बहुतेक माझेच हात थरथरत होते...
...की माझ्या स्पर्शामुळे ते थरथरत होतं?
...शेवटी त्या संमोहनाने भीतीवर विजय मिळवला...
...मी गाठोडं उघडलं आणि...
...मी किंचाळून दरवाजाजवळ पळालो...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Grt....

हाही भाग जमलाय.. वर्णन खूप भारी केलय समोर चित्र उभं राहिलं, अस वाटलं की माझ्या समोरच घडत आहे सगळं. ट्विस्ट वाढत आहे म्हणून कथा अजून रंगणार आहे असं वाटतंय.. आणि उत्सुकता अजूनच वाढत आहे..

मागील भागात काही टाइपो असले तरी छान पकड़ घेतली होती...पण ह्या भागात कथेचा टेंपो सुटल्या सारखा वाटला Sad
मनावर भयाच्या साम्राज्याचा अश्वमेध पसरण्याच्या आड कदाचित उपमां - प्रतिकांचा एकसुरीपणा येतोय असे वाटते. हेमावैम. पुढील भाग अधिक उत्कंठापूर्वक होण्यास शुभेच्छा !

बाहूल बाहेर आलं.
आता किती बळी पडतील काही सांगता येत नाही.
keep it up.