भाषेशी खेळू नका

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 21 June, 2019 - 12:38

भाषेशी खेळू नका
************

भाषेशी खेळू नका कुणी
माझ्या मुशीला जाळू नका कुणी
चार टुकार डोक्यांची
हुशारी पाजळू नका कुणी

कैलासाची लेणे माझे
त्यावरी सिमेंट फासू नका कुणी
इंग्रजळल्या कार्ट्यांसाठी
आईस बाटवू नका कुणी

भाषा तुका ज्ञानेशाची
चांदण्याची वस्त्र ल्याली
चिखलात मूर्खपणाने रे
तिला लोळवू नका कुणी

एकेक अक्षराचा असे
उंच उंच बुरूज इथे
हलवून पाया तिचा
उगा बुजवू नका कुणी

आकड्यांची जोडाक्षरे
फार काही अवघड नाही
पेलण्यास भाषाप्रेम
काय तुमच्यात धाडस नाही

फिरलेल्या डोक्यांचे त्या
ऐकू नका मुळी कुणी
रे ठेचून काढा तयांना
एक्कावन्न नव्व्यांनो म्हणूनी

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख लिहिलंय! पण आपल्या मराठी भाषेत नानाविध भाषेतल्या शब्दांची सरमिसळ अगोदरच झालेली आहे.जी आपण सर्रास आपली मायबोली म्हणुन खुप काळ वापरत आहोत. Happy

51 कोण ?
आमचे काँग्रेसचे खासदार का ?

मन्या ..<>>>..खरे आहे .
चैतन्य >>>>> धन्यवाद........मग सगळीकडेच काढावे लागतील ,आणि त्या कुणी वरच भर आहे कवितेत ,त्यांना कळू देत
BLACKCAT>>>>>> कुणाचे कोण किती काही माहीत नाही . शब्द ठरवून येत नाहीत फारसे >

"इंग्रजळल्या कार्ट्यांसाठी आईस बाटवू नका कुणी"
"ऐकू नका मुळी कुणी रे ठेचून काढा तयांना"

=> वाहवा! टाळ्या वाजवाव्या का? मायबोली हे अमेरिकन संकेतस्थळ आहे. शिवाय लिहिताना इंग्रजीतूनच maayboli लिहावे लागते.

मित्रांनो ,जे आहे ते खरे आहे . मलाही नाइलाजाने इंग्रजीतून एमबीबीएस व्हावे लागले ,ते जर मराठीतून असते तर मला अधिक आवडले असते . अमेरिकेत जावून तुम्ही मराठीशी आपली नाळ जोडून ठेवली आहे त्या बद्दल तुम्हाला लाख लाख नमन .पण तुमची पुढची पिढी मराठी असूनही मराठी असेल का ?मला शंका आहे .

मग कवितेतील शब्द मागे घ्या>>> राहू द्या हो ,तसे ही इथे कोण विचारतो आपल्या मताला ! मुळात मराठी अंकलिपीतील जोडाक्षरे पंचावन्न, पाच पाच असे बोलणे असा उपद् व्याप इथे पहिली दुसरीच्या पुस्तकात सुरू केला गेला आहे,त्यावरून ही कविता सुचली आहे . तुम्हाला जर काही कारणाने आवडली नसेल व त्रास झाला असेल तर क्षमा करा.

पाच पाच नसावे पन्नास पाच असावे बहुदा. तिकोणे सर ज्या आवेशाने कविता लिहिली होती. तोच स्टॅण्ड कायम ठेवा, क्षमा नका मागू. धन्यवाद.

आपण एमबीबीएस आहात. जे होण्याचे आमच्यासारख्या तत्कालीन लाखो विद्यार्थ्यांचे केवळ स्वप्न म्हणूनच राहिले ते आपण प्रत्यक्षात जगत आहात. अर्थात याबद्दल आपण आदरणीयच आहात. पण शिक्षणाने प्रगल्भ झालेल्या अशा व्यक्ती धर्म/जात/प्रांत/भाषा अशा वादांना बळी पडतात तेंव्हा प्रचंड आश्चर्य आणि खेद सुद्धा वाटतो.

"पुढची पिढी मराठी असूनही मराठी असेल का ?मला शंका आहे ."

=> म्हणजे नक्की काय? आताची पिढी मराठी आहे का? मागची होती का? नेमके कधीपासून "मराठी" पिढ्या सुरु झाल्या सांगू शकाल का? पारशी, हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली, अरबी, उर्दू अशा अनेक भाषांतल्या मूळच्या शब्दांनी मराठी बनली आहे ना? किंबहुना कोणतीही भाषा अशीच बनते ना? मग त्यात अजून काही इंग्रजी शब्द आले किंवा चार संख्या म्हणण्याची पद्धती काय बदलली तर अख्खी भाषाच संपली असे कसे म्हणता येईल? बदलली असे मात्र जरूर म्हणता येईल. पण भाषा तशीही बदलत असतेच. ज्ञानेश्वरांच्या काळातली मराठी, शिवरायांच्या काळातली मराठी आणि आजची मराठी ह्यात जमीन अस्मानचा फरक आहे. मराठी "तीच" राहिली नाही. मग मराठी संपली म्हणावे का? असाच फरक इतर सर्वच भाषांत सुद्धा झालेला आहे. जीवशास्त्राशी घनिष्ठ संबंधित विषयात आपण तज्ञ आहात. म्हणून उत्क्रांतीचा नियम माझ्यासारख्याने आपणास सांगणे योग्य नव्हे. फक्त इतकेच कि, तेच तत्व भाषेला सुद्धा लागू पडते इतकीच जाणीव करून द्यावीशी वाटते.

"तसे ही इथे कोण विचारतो आपल्या मताला !"

=> हि भूमिका चुकीची आहे. किंवा असेच असेल तर "वाचकांनी आपल्याला गांभीर्याने घेऊ नये. वेळ जात नव्हता म्हणून असेच टाईमपास करता लिहिले आहे" अशी तळटीप टाकायला हवी होती (यात टाईमपास साठी योग्य तो "मराठी शब्द" टाकून). मग आम्ही प्रतिसाद लिहिण्याची तसदी घेतलीच नसती.

तशीही भाषा बदलत असते मान्य...भाषेत होणारे बदल, शैली, अभिव्यक्तीत होणारे बदल,नवनवीन शब्दांची भर यातून समाजजीवनाचे प्रतिबिंब दिसत असते.
आपण आपल्या समाजाचे कोणते प्रतिबिंब दाखवत आहोत ?
चार संख्या वेगळ्या पद्धतीने बोलल्यावर काय फरक पडतो ? फरक पडतो आणि दूरगामी फरक पडतो....
भाषा शिकतोय ना ...मग अंक शिकायला काय अडचण आहे.
अशीही भाषेची हेळसांड होतेच आहे पण हे असं पंचावन्न ला पन्नास पाच वाचणे म्हणजे अति होतंय...
प्रत्येक भाषेचं स्वतः च असं काही सौंदर्य असतंच की ते जपलं पाहिजे...माझी माय मराठी गुलाबाच्या फुलासारखी आहे;काठिण्य हे तिचे काटे आहेत;पण त्यामुळेही ती अधिकच खुलून दिसते ,आपण जपलं पाहिजे तिला .
परिवर्तन मान्य...पण असं नको.

सुदैवाने आपली भाषा देवनागरी लिपीत लिहिली जाते व प्रत्येक स्वर,व्यंजनाचा योग्य तोच उच्चार वाचून होतो. त्यामुळे जोडाक्षरं आहेत म्हणून वीस एक, वीस दोन बोलणं बरोबर नाही.
मी पहिलीत असताना वीस अन् एक एकवीस, चाळीस अन् चार चौरेचाळीस ( चव्वेचाळीस नाही म्हणत आमच्या कडे) असे ताला सुरात पाढे म्हणावं तसं घोकत एक ते शंभर अंक शिकलो आहे.