मण्यांची टोपी (भाग-२)

Submitted by विनीता देशपांडे on 17 June, 2019 - 03:18

मण्यांची टोपी
(भाग-२)

"सुखदा. अंतरा......." जयेशने कण्हत आवाज दिला
"डॉक्टर.....डॉक्टर.... " रत्ना ने जोरात हाक दिली. तशी सिस्टर धावत आली.
जयेश शुद्धीवर आला खरा. त्याला काहीच कळत नव्हतं. जड झालेले डोळे कसेबसे उघडत त्यानं आजूबाजूला नजर टाकली.
हॉस्पिटलमध्ये असल्याची जाणीव झाली. आत्ता तर ते दिवेआगरहून निघाले होते.
डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं. त्याला परत गुंगी आली.
"डॉक्टर..." रत्नाने आवंढा आवरत आवाज दिला.
"ही इज आऊट ऑफ डेंजर. आम्ही प्रयत्न करतोय. खूप मार लागलाय. वेळ तर लागेलच." डॉक्टर
"डॉक्टर, सुखदा आणि अंतरा कसे आहेत?" रत्ना
"न्य़ुरॉलॉजिस्ट येत आहेत. प्रकृती गंभीर आहे. सगळे रिपोर्ट्स येईपर्यंत काहीच सांगू शकत नाही. वी वील डू अवर बेस्ट" डॉक्टर
"जस्ट प्रे." सीस्टर

"आत्या, आत्या," परेशच्या हाकेनी रत्ना भानावर आली.
"कसा झाला ग हा अपघात" परेश
"पोलिस येतील एवढ्यात. मला त्यांनीच कळवलं. ताम्हणी घाटाच्या आसपास झाला. जवळच्या दवाखाण्यात नेलं होतं आधी. नंतर इथे मंगेशकरमध्ये आणलं." रत्ना
"कसा झाला याचा तपास करत आहेत ते." रत्ना
"जयेश उत्तम गाडी चालवतो रे. मग हा अपघात कसा झाला असेल?" रत्ना

"आत्या, कॉफी घ्या दोन बिस्कीटं खा. बरं वाटेल." पूर्वा
"तुम्ही घरी जाता का थोडा वेळ. मी आहे इथे." पूर्वा
"नको ग, मी इथेच थांबते. जयेश शुद्धीवर आला की सांगेल सगळं" रत्ना
"जयेशच्या ऑफिसमधून त्याचे मित्र आले होते. ते गेलेत पौडच्या पोलिस स्टेशनवर. ते ही येतीलच एवढ्यात. कसं, काय झालं काही माहित नाही बघ. निघतांना मला फोन केला होता. घरी येऊन जेवणार होते दोघं. अंतराही बोलली माझ्याशी. आणि थोड्यावेळात हा अपघाताचा फोन आला." रत्ना

"आत्या, जयेशचे आई बाबा सुरतवरुन निघालेत. पोहचतील थोड्यावेळात." परेश
"रत्ना काकू... इनश्यूरन्स डिपार्टमेंटमध्ये बोलवलय. पाचव्या मजल्यावर आहे." स्वरा
"तुम्ही जाऊन येता का? मी थांबते इथे." स्वरा
"पोरं शुद्धीवर येतीलच हो इतक्यात. ते न्यूरॉलॉजिस्ट येणार आहेत न" रत्ना
"ते काय म्हणतात, काय ट्रीटमेंट देतात...." रत्नाने हुंदका दाबत म्हंटले
"आत्या, आत्या... स्वरा थांबेल इथे आणि आलेच शुद्धीवर तर फोनकरुन कळवेल आपल्याला. चल, इनश्यूरन्सचं काम करुन येऊ." परेशने रत्नाला उठवत म्हंटलं

"तसं ऑफिसच्या लोकांनी फॉरमॅलिटि पुर्ण केल्या आहेत. तुम्हाला औषधांसाठी काही अडचण आली तर सांगा. इथे सही करा" ती गुलाबी ऍप्रन घातलेली बाई म्हणाली.

काम आटपून परेश तिला बळजबरीने कॅन्टीनमध्ये घेऊन गेला.
"काय रे ही पोरं, रोजचं धावपळीचं आयुष्याला कंटाळून चार दिवस फिरायला गेले आणि हे काय होऊन बसलं." रत्ना
"होईल सगळं नीट. काळजी नको करुस. त्यांना सावरायला तू धडधाकट हवीस न. दोन घास खाऊन घे" परेशने आग्रह केला.

आय सी यूत दोघही परत आले तेव्हा जयेशचे ऑफिसचे मित्र जमले होते.
"जयेशच्या ऑफिसमधून पौड चौकीवर कोणी जाऊन आलं होतं ना रे त्यांच्याकडून काही कळलं का? रत्ना

"अपघाताच्या वेळेस दुसरं कुठलंही वाहन जवळपास नव्हतं. जवळच चहाची टपरी आहे. त्या चहावाल्यानेच दूरुन बघितलं. तोच सांगत होता. वळणावर एकाएकी ब्रेक दाबला आणि गाडी झाडावर आदळली. त्यानेच पोलिस व जवळच्या गावातल्या लोकांना बोलवलं.
इतर वाहन किंवा कोणी लोकं रोडवर नव्हतीच." शुभांकर
"कशामुळे अचानक ब्रेक लावला हे काही कळलं नाही." दिनेश
"गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. रस्त्यावर जे सामान पडलं होतं ते तुम्हाला पाठवलय म्हणे. इतर सामान चेक करायला पोलिस स्टेशनवर बोलवलय." शुभांकर
"गाडीतही काही बिघाड नाहीया" दिनेश

जयेश एवढा निष्णांत ड्रायवर, गाडीतही बिघाड झाला नव्हता. रस्त्यावर इतर वाहन, व्यक्ती वा प्राणी कोणीच नसतांना असा अपघात होईलच कसा...ताबा सुटायला भांडण वैगरे काही.....जमलेला घोळक्याचे तर्क वितर्क चालले होते. आणि रत्ना मनोमन तिघांच्या आयुष्यासाठी देवाला आळवत होती.
ग्लोवबॉक्सवर जोरात आदळल्यामुळे अंतरा आणि सुखदा दोघींना जब्बर मार लागला होता. त्या अजूनही शुद्धीवर आल्या नव्हत्या. अनेक टेस्ट...ट्रीटमेंट सुरु झाली होती.
तेवढ्यात आकाश पाटिलचा ऑफिसच्या एका कलिगच्या मोबाइलवर फोन आला.
"हॅलो, काकू...मी आकाश....कसे आहेत तिघही....मी पोहतोच उद्दा" आकाश

सुन्न झालेल्या आकाशला काहीच कळत नव्हतं. उमगत नव्हतं.
"साळीचा अपघात झाला म्हणून मला दिवेआगरला जाता आले नाही." आकाश
"काल आमचे दिवेआगरचे शेजारी नारुअण्णांना फोन केला होता. तेव्हा त्यांच्याकडून काही गोष्टी कळल्यात. त्याचा अपघाताशी काही संबध आहे का माहित नाही." आकाश
का रे, काय झालं? मी तर रोजच बोलत होते तिच्याशी. ते तिथे असतांना सगळं काही ठीक होतं. कितीतरी फोटो पाठवलेत त्यांनी मला." रत्ना
आणि तुझ्या नारु आण्णानेच तर कमल नावाच्या मुलीला पाठवले होते न, खूप मदत केली तिने या दोघांना." रत्ना

"नारु अण्णा पाठवणार होते. अचानक ती कमल नावाची मुलगी आजारी पडली. ती येऊ शकली नाही. हेच जयेश आणि सुखदाला निर्मलाकाकूंनी निघतांना सांगितलं." आकाश
"कसं शक्य आहे. मला आठवतय, प्रत्येक वेळेस सुखदा मला तिच्याबद्दल सांगायची. तिच्या सोबत कुमुद नावाची लहान मुलगी पण यायची. ती आमच्या अंतरासोबत खेळायची" रत्ना
"नारुअण्णाचा निरोप घेतल्यावर मला सुखदाचा फोन होता. म्हणजे तोवर सर्व व्यवस्थित होतं. मग आता ही कमल काय भानगड आहे." रत्ना
रत्नाचं अवसान गळालं होतं. तिला काहीच कळत नव्हतं. आकाशनी दिलेली ही धक्कादायक माहिती. नक्की काय होतयं त्या क्षणी तरी हे एक कोडच होतं.

"काकू पोलिस आलेत. कारजवळ जे सामान सापडलं त्याची ओळख पटवुन द्दायची आहे." स्वरा

पोलिसांनी एक पुडकं दिलं. त्यातल्या एक एक वस्तू परेश टेबलवर काढत होता. सुखदाचं घड्याळ, अंतराचा रुमाल, जयेशचा फुटलेला मोबाईल, सोन्याची चेन, गॉगल, पर्फ्युम, अंतराची बॅग बघताच रत्नाला रडू आवरलं नाही. पूर्वाने त्या बागेतून एक मण्यांची टोपी काढली आणि ती बघता क्षणी रत्नाला जो धक्का बसला. नाही नाही हे शक्य नाही करत ती चक्कर येऊन पडली.

"सुखदा....अंतरा...." रत्ना कण्हत उठली
"आत्या, काय झालं?" परेशनं काळजीनं विचारलं
"ती परत आली...चिनुला बोलव." रत्ना
"हो हो, बाबा पोहचतीलच एवढ्यात." परेश
"काय झालं रत्ना ताई? " जयेशच्या आईने विचारले
"गर्दी करु नका त्यांच्या जवळ. ऑलरेडी त्या टेन्स आहेत. प्लीज वेट आऊट साईड" सीस्टर
"कोणी एकच जण थांबता का प्लीज" सीस्टर
"पूर्वा, जा बाबा खाली गेटवर आहेत. तू घेऊन ये त्यांना" परेश

"चिनू ......ती परत आली रे..... माझ्या सुखदाला घेऊन जायला" रत्नाने चिन्मयला बघताच ओरडून म्हंटलं
"ताई, सगळं ठिक होईल." चिन्मयने रत्नाला जवळ घेत म्हंटलं
"तरी मी सुखदाला सांगत होते नको जाऊस. ऐकलं नाही रे पोरीनी" रत्नाचे हुंदके थांबत नव्हते
"काळजी नको करु. मी बघतो." चिन्मय
"बाबा, काय झालं आहे नक्की. सांगाल का प्लीज. त्या टोपीकडे पाहून आत्या एवढी अस्वस्थ का झाली" परेश
"बाबा, प्लीज. आम्ही सगळेच काळजीत आहोत. तुम्ही काही सांगितलं तर काही उपाय शोधता येईल आपल्याला." पूर्वा

"साधारण अठ्ठावीस- तीस वर्षापुर्वी घडलं होतं हे. ताई भावजी आणि इतर भावंड आम्ही आमच्या एका मावस भावाच्या लग्नाला दिवेआगरला गेलो होतो. सुखदा तेव्हा जेमतेम तीन सव्वा तीन वर्षाची असेल. तिथे मुलीची एक दूरची वहिनी आली होती. रंजना तिचं नाव, ती जवळच्याच गावातून लग्नघरात घरकामासाठी आली होती. तिची मुलगी कुमुद आणि सुखदाची छान मैत्री जमली. दोन दिवस त्या खूप खेळल्या.
मी गोव्यावरुन सुखदासाठी आणलेली एक मण्यांची टोपी होत.त्या टोपीला कोणालाही हात लावू देत नसे.
वरातीच्या वेळेस सुखदाने ती टोपी घालायचा हट्ट केला. त्या दिवशी सकाळ पासूनच त्या दोघींचा अंगणात खूप धिंगाणा सुरु होता. वरात निघतांना त्या अंगणातंच खेळत होत्या. याच मण्याच्या टोपीवरुनं त्यांच भांडण झालं. . त्यात वरातीची गडबड, रडणं, या सर्व गोंधळात त्या दोघी भांडत भांडत मागच्या अंगणात केव्हा गेल्या कळलच नाही. सुखदाचा धक्का लागला आणि कुमुद टाकीत पडली.
टाकी खोल नसली तरी आम्ही पोहचेपर्यंत वेळ लागला. तिला दवाखाण्यात नेण्यात आलं. नंतर आम्ही पुण्याला निघून आलो.
काही दिवसांनी कळलं तिचा प्राण वाचला. आमच्या जीवात जीव आला. पण काही दिवसातच परत निरोप आला की ती गेली. निमोनिया झाला होता तिला. रंजनाचा नवरा एका अपघातात गेला होता. त्याच्यानंतर त्या दोघीच एकमेकींचा आधार होत्या. रंजना स्थानिक रिसोर्ट आणि गरज पडेल तिथे घरकाम करुन आपलं व तिच पोट भरत होती. आधी नवरा मग लेक, वर्षभरातच झालेले हे आघात रंजना सहन करु शकली नाही. तिनेही आत्महत्या केली."
हे प्रकरण संपल असं समजून आम्ही झाला तो प्रकार सुखदाला कधीच न सांगण्याचा निर्णय घेतला. खर तर झाला होता तो एक अपघात होता. परंतु या अपघातामुळे रंजनाचं आयुष्या उध्वस्त झालं हे ही खरच होतं. या बाबतीत आम्ही काहीही करु शकत नसल्याची खंत रत्नाला नेहमीच त्रस्त करत असे."

"नाही.....आपण काही तरी करु शकलो असतो चिन्मय. आपण कुमुदला मोठ्या दवाखाण्यात नेऊ शकलो असतो. कदाचित ती वाचली असती. आपण रंजनालाही वाचवू शकलो असतो. आपण कुमुद गेल्यावर तिला भेटायला सुद्धा गेलो नाही. आपण तिला सावरु शकलो असतो. तिला इथे पुण्यात आणू शकलो असतो. तिला दुखातून सावरायला हवं होतं आपण. आपण चुकलोच रे. चुकलोच आपण.
हा अपघात झाला तेव्हा निर्णयाच्या वेळेस एक पाऊल मागे घेण्याऐवजी पुढे घेतले असते तर आज माझी सुखदा मृत्युच्या दारात नसती रे. " रत्ना रडून रडून सांगत होती.
"आपण पळून गेलो, हेच आपलं चुकलं आणि आत्ता जे भोगतोय ती त्या चुकीची शिक्षा आहे चिन्मय" रत्ना

आयुष्यात पुढे असं काही होईल याची कल्पना आपल्याला नव्हती रत्ना. कोण चुक...कोण बरोबर....हा न्याय की अन्याय.....काहीच सांगू शकत नाही. यावर उपाय काही आहे का? हे ही ठाऊक नाही."
"मी ही मण्यांची टोपी कशाला विकत घेतली. सगळ काही या टोपीमुळेच झालं. याचा मात्र आज पश्चाताप होतोय, हे ही खरच" चिन्मय ओक्साबोक्शी रडू लागला.

"बाबा, या सगळ्या प्रकरणात चुक कोणाचीच नाहीया. यावर काही तरी तर उपाय नक्की असणार." मण्यांची टोपी हातात घेत पूर्वा म्हणाली.
"परेश, मधुमंजिरी आठवतेय. ती अश्विनच्या पार्टीत आली होती. ती पॅरनॉर्मल अक्टिवीटीसवर रिसर्च करत आहे. अश्विनकडून नंबर आणि पत्ता घे तिचा. ती नक्की मदत करेल." पूर्वा
पूर्वाचं बोलणं रत्ना, स्वरा, चिन्मय, परेश, जयेशचे आई-वडिल सर्वांनाच धीर आला. सर्वच सुखदा-अंतरा-जयेशसाठी प्रार्थना करु लागले. रत्ना आत्या, बाबा यांनी त्या वेळेस जे केलं ते चूक की बरोबर यावर चर्चा करत बसण्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकत यावरचा उपाय पूर्वानं शोधायचं तिनं ठरवलं. पूर्वा मधुमंजिरीकडे मण्यांची टोपी घेऊन निघाली...

क्रमश:.....

वाचा मण्यांची टोपी भाग १
https://www.maayboli.com/node/70286

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह !! मस्त एकदम Happy सरळ, सोपी, सुटसुटित लिहिलेली पण तितकीच उत्कंठावर्धक आहे. लवकर टाका पुढचे भाग

तुमची लेखन्शेली मला खुप आवड्ते, जुन्या कथा परत वाचायला ही आवडते. ही पण मस्त चालु आहे.

कथा म्हणुन चांगली आहे.
पण त्या दोघी घरी येत राहिल्या. रंजना मदत करत राहिली. ते का म्हणुन?
तेव्हाच बदला घेता आला असता ना.