हा खेळ बाहुल्यांचा - भाग चार

Submitted by अज्ञातवासी on 13 June, 2019 - 04:29

भाग ३ https://www.maayboli.com/node/70202

मानव हा प्राणी स्वतःला प्रचंड हुशार समजतो. आपल्या बुद्धीने तो येणाऱ्या संकटावर मात करतो.
पण काही संकटे अशी असतात, कि त्यापुढे मानव तुच्छ ठरतो. कितीही संकटापासून पळ काढायचा ठरला, तरीही ती संकटे गोल वळून अंगावर येत असतात.
शेपूट तोंडात असलेल्या सापासारखी...
-----------------------------------------
जनार्दनाचा म्हातारा डोळे सताड उघडून उघडाबंब दारात उभा होता!!!
नामदेव आणि रामरावची बोबडीच वळली. दोघांच्याही हातातून गाठोडं खाली पडलं.
वाऱ्याने रौद्ररूप धारण केलं होत. फांद्या कडकड आवाज करत मोडून पडत होत्या...
म्हातारा काहीबाही बडबडत होता. नाचत होता, इकडे तिकडे उद्या मारत फिरत होता.
"... आलीया, आलीया, जीवघेणी आलीया! ये,ये, रगत पी माझं, कर मला मोकळं, सुटव मला. मारून टाक... पिशाच बनव मला, मग मी त्या खैसचा तुकडा पाडीन."
म्हाताऱ्याने गाठोडं उचललं आणि डोक्यावर घेऊन तो नाचू लागला...
जे गाठोडं या दोघांनाही उचललं जात नव्हतं, ते म्हाताऱ्याने सहज उचललं होतं...
"वझं... वझं ... वझं ... कधीच वाहतु वझं... रगत पी, हाडकं चघळ, मोकळं कर मला..." म्हातारा भीषण आवाजात गाणं म्हणत ओझं डोक्यावर घेऊन नाचू लागला.
...आणि पुढच्याच क्षणी म्हातारा ओझं घेऊन सुसाट नदीकडे धावत सुटला...
रामराव आणि नामदेव भीतीने पूर्ण गोठले होते. शुद्ध येताच तेसुद्धा घराकडे धावत सुटले.
-------------------------------------------------------------------------------------------
कालचा दिवस माझ्यासाठी प्रचंड थकवणारा होता. रात्री अक्षरशः संमोहन केल्यासारखी झोप लागली. सकाळी उठलो तर वातावरण एकदम सुरेख होत. लख्ख प्रकाश पडला होता.
रात्रीचा पाऊस जोरदार झालेला दिसत होता. ठिकठिकाणी फांद्या मोडून पडल्या होत्या.
मी ब्रान्चवर निघालो. आज जरा अंमल उशीरच झाला होता.
नदीकाठी मला गर्दी दिसली, म्हणून जरा थांबलो. कुणाचतरी प्रेत नदीकाठी ठेवलेलं होतं. म्हातारा माणूस... टम्म्म फुगलेला... बुडून गेला होता बिचारा.
बुडून गेला कि कुणी घालवला?
क्षणभर माझ्या मनात त्या अमानवियाची भीती तरळून गेली.
मन चिंती ते वैरी न चिंती, हेच खरं...
बँकेत आज रामरावाचा तपास नव्हता. घबाडाच्या प्राप्तीने लगेच आपला प्रताप दाखवला होता. तो पुन्हा कधीही येणार नव्हता. का येईल? धनाच्या राशी पुढे उभ्या असताना का येईल?
तेवढ्यात एक पोरसवदा मुलगा केबिनच्या बाहेर येऊन माझ्यासमोर उभा राहिला.
मी मन वर करून त्याच्याकडे बघितलं.
तो क्षणभर घुटमळला, आणि म्हणाला. "मी रामराव महापेचा पोरगा. बाबाची तब्येत बरी नाही.सकाळपासून सारखा धोशा लावलाय, साहेबाला बोलवा, साहेबाला बोलवा. म्हणून म्हटलं तुम्ही येणार असाल का बघावं."
मला हे पूर्णपणे अपेक्षित नव्हतं, आणि अनपेक्षित सुद्धा नव्हतं. त्या अमानवीयाच्या गर्भातून निघालेलं ते गाठोडं आपला प्रताप दाखवणारच होतं. पण तो चांगला कि वाईट हे मला माहित नव्हतं...
मी त्याच्या पाठोपाठ निघालो. रामरावाचं घर जवळच होतं.
मी जाताच रामरावाचा बाप उभा राहिला, आणि त्याने मला नमस्कार केला. घरात रामराव, त्याचा मुलगा, त्याची बायको आणि त्याचा बाप एवढी मंडळी होती. मोठा मुलगा कुठल्यातरी गावाला तलाठी होता.
पगाराच्या मानाने रामरावाचं घर चांगलं दिसत होत. दुमजली होतं. वरच्या खोलीत रामराव झोपला होता.
ते पोरग मला वर घेऊन मागच्या मागे गायब झालं. रामराव गोधडी पांघरून झोपला होता. मध्येच कण्हणाचा आवाज येत होता.
"रामराव," मी आवाज दिला.
आणि पुढच्याच क्षणी रामराव वळला...
रामरावाचा चेहरा नजरेत पडताच माझं काळीज हललं. निळाजर्द चेहरा, त्यावरच मांस कुणीतरी ओढल्यासारखा!
"साहेब, जवळ या."
मी भीतीनेच जवळ गेलो.
"साहेब ते गाठोडं नव्हतं, ते मयताच आवतन होतं. साहेब, तुम्ही भाग्य नाही, तर मरण दिलंत आम्हाला." रामराव आढ्याकडे डोळे लावून बोलत होता.
"जगायचं असेल, तर निघून जा, निघून जा." रामराव म्हणाला.
मी तिथून निघालो, तेवढ्यात आवाज झाला.
"साहेब चालला कुठं? तू कुठेही जाशील, ती येईल. तुझं मरण तू आमच्यावर ढकललं, पण तू पाताळात जरी गेलास तरी ती तुला खेचून घेऊन जाईल."
...आणि पुढच्याच क्षणी तो डोळे मिटून घोरू लागला.
मी तडक त्याच्या घरातून बाहेर पडलो, आणि ब्रान्चवर पोहोचलो.
(यानंतर तिसऱ्या दिवशी रामराव गेल्याची बातमी आली. आठवडाभरानंतर करवतीने मान कापून कुणीतरी नामदेवाला मारून टाकलं.)
मला वाड्यावर जायचं नव्हतं. सकाळपासून होणाऱ्या घटनांनी मन विषन्न झालं होतं. रामरावाच्या बोळ्याने मनात प्रचंड भीती निर्माण झाली होती.
पण आजच मी काही वेगळं वागलो असतो, तर लोकांच्या मनात संशय निर्माण व्हायची दाट शक्यता होती. मी संध्याकाळी चुपचाप वाड्याकडे निघालो.
उद्यापासून मला नवीन घर शोधायचं होतं. जमलं तर हे गावच सोडून जायचं होतं.
सकाळचा प्रकाश कुठेतरी हरवलाच होता. संध्याकाळची काळोखाची किनार आपलं अधिराज्य गाजवण्यासाठी आतुर झाली होती. आज पाऊस नव्हता. वाऱ्याने मात्र उच्छाद मांडला होता. रस्त्याच्या दोन्हीबाजूनी असलेले वृक्ष हलत होते.
मी वाड्यासमोर उभा होतो. मला गेट उघडून आत जाण्याचीही इच्छा नव्हती.
वादळी वाऱ्याने गेट सताड उघडलं गेलं...
एखाद्या श्वापदाने घास घेण्यासाठी आ वासावा, तसा वाडा मला भासत होता.
मी जड पावलांनी आत शिरलो. कर्रर्रकन आवाज करून दरवाजा उघडला.
...त्याक्षणी माझ्या अंगावर सरसरून काटा आला.
...माझ्या समोरच गाठोडं पडलं होतं!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Nice. lavkar takla bhag Happy

हा भाग आधीच्या दोन भागान्पेक्षा मस्त झालाय. +११

थोड़ेसे टाइपो जाणवले ---
मी ब्रान्चवर निघालो. आज जरा अंमल (अंमळ) उशीरच झाला होता.

रामरावाच्या बोळ्याने (बोलण्याने) मनात प्रचंड भीती निर्माण झाली होती.
आणि
विषन्न --- विषण्ण

संपली का?
चांगली जमली कथा.
<<<<<यानंतर तिसऱ्या दिवशी रामराव गेल्याची बातमी आली. आठवडाभरानंतर करवतीने मान कापून कुणीतरी नामदेवाला मारून टाकलं.>>> रामराव आणि नामदेव मेल्यावर वाड्यावर गाठोडं आलं की रामरावाला भेटुन आल्यावर आलं?

रामरावाला भेटुन आल्यावर तिसर्‍या दिवशी तो गेला आणि आठवड्याने नामदेव. मग एवढे दिवस साहेब वाड्यावर गेले नाहीत असा अर्थ निघतोय.

रामरावाच्या बोळ्याने मनात प्रचंड भीती >>>बोलण्याने

हो, बहुतेक क्रमशः लिहायचे विसरले असतील. त्या प्रतिलिपी वरच्या भुतांच्या सगळ्या कथा मी वाचुन टाकल्या. Proud आता तिथे नवीन काही आहे का ते पण बघावे लागेल.

खूप छान. मजा आली वाचायला.कथा संपूच नाही असं वाटत होतं. भयकथांमध्ये वातावरणनिर्मिती करण खूप महत्त्वाचं आणि कठीण असत, आणि ते तुम्हाला जमलंय.परत कथांमध्ये directly भूत समोर येत अस दाखवलं तर तेवढा प्रभाव पडत नाही आणि भीती वाटत नाही पण या कथेत तस न दाखवता indirectly दाखवलंय म्हणजे लोक मरत आहेत , गाठोडं, तो म्हातारा, यामुळे हवा तसा प्रभाव पडलाय.

अज्ञा जबरदस्त लिहिलंय. तुंबाडच्या म्हातारीनंतर तुझ्या ह्या जनार्दनाच्या म्हाताऱ्याने अंगावर काटा आणला बघ...
तू छोटे भाग टाकतोय यात माझी काहीही तक्रार नाही, पण तू भाग टाकतोय याचाच जास्त आनंद आहे.
Lol
पुभाप्र. पण एकच निरीक्षण, कथा टाकताना एकदा वाचून बघत जा नीट. घाई करू नकोस. बरेच टायपो राहून जातायेत. (Auto correct चा परिणाम)