दान

Submitted by विनीता देशपांडे on 13 June, 2019 - 09:42

लाड कारंजावरुन येऊन जयवंतला एक आठवडा झाला होता. बाबांचा चेहरा डोळ्यापुढून जात नव्हता. कसे असतील? काय करत असतील? आई शिवाय त्यांचं जगणं ही कल्पना त्या क्षणी त्याला असह्य होत होती. आईच्या अचानक जाण्याने समस्त नाईक कुटुंब शोकाकुल होतं. आईच्या इच्छेप्रमाणे तिचे दिवस वार न करता ठराविक रक्कम लाडकारंजाच्या मठात देऊन तो नाशिकला परतला होता. बाबांना आग्रह करुनही कारंज्याहूनच ते अकोल्याला परतले.
आई ..... आठवणीने जयवंतचे डोळे भरुन आले.
"जयवंत ... हे घे चहा." शर्वरीने त्याच्या हातात कप दिला आणि ती ही टेरेसवरुन खाली बगिच्यात खेळणार्‍या मुलांकडे बघू लागली.
"बाबांची काळजी वाटतेय न?" शर्वरी
"हो गं, बाबा एकटे कसे रहातील, कसं सगळं मॅनेज करतील हाच प्रश्न आल्यापासून सतावतोय." जयवंत
"आणि किती हट्टी आहेत बघ ना, यायला ही तयार नाहीत नाशिकला" जयवंत
"अरे आपल्या रहात्या घरात एक ओढ असते, तिथे रुजलेल्या नात्यांना जो जिव्हाळा असतो न तो माणसाला यायला भाग पाडतो."
"आई-बाबांच सहजीवन तिथेच सुरु झालं, रुजलं, अंकुरलं, बहरलं....त्या आठवणी तो अनामिक बंध कसं सोडून येतील ते. तू थोडं समजून घे ना रे." शर्वरी
"अगं हो, मान्य मला सर्व. पण आपलाही विचार करावा न त्यांनी." जयवंत
"ही वेळ त्यांना व्यवहार कळावा अशी नाही, अर्थात थोडा काळ जाऊ दे. त्यांना स्वत:ला सावरु दे, तू ही सावर स्वत:ला" शर्वरी
आईच्या आठवणीनं जयवंत कासावीस झाला. तो चाहाच्या वाफेच्या वलयात हरवला.

आई-बाबा आणि तो, तिघांच छोटसं विश्व. तिघांनाही फिरायची हौस. बाबांनी एल.टी.सी घेऊन सगळा भारत पालथा घातला होता.
खूप धार्मिक नसले तरी देवावर श्रद्धा होती. आई फारसे सणवार करत नसे. मात्र सगळ्यांच्या मदतीला धावून जात असे. त्यांच्या कॉलनीत आई-बाबांबद्दल सर्वांनाच आदर होता. आईच्या सल्लामसलतीशिवाय शेजारील कुठल्याही घरात कार्यक्रम ठरत नसे. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा आईचा स्वभाव. त्यालाही वाटत असे की हिला कधी कोणाचा राग येत नसेल कां? पण आई होतीच तश्शी...
आईच्या अशा अचानक जाण्याने तो खचला होता. आत्ताशा कुठे आई नातवांमध्ये रमत होती. आयुष्याची सेकंड इनिंग सुरु होताच आई गेली. बाबा ... त्यांना त्या क्षणी एकटं सोडायला नको, हे कळत असुनही नाईलाजाने तो नाशिकला परतला होता. पुढे काय करायचं ? हा तर न सुटणारा प्रश्न होता. शर्वरी म्हणते तसं थोडा वेळ जाऊ देत. मग ठरवू काय ते.

आई जाऊन महिना झाला होता. बर्‍यापैकी गाडी रुळावर आली होती. रोज रात्री बाबांशी बोलतांना दोघांनाही गहिवरुन येत होतं. मित्रांसार्खे गप्पा मारणारे बाबा हल्ली विचारलेल्या प्रश्नांचीच उत्तरे देत होते.
जयवंत आणि शर्वरी दोघेही त्यांच्या रोजच्या आयुष्यात गुंतलेले, अधूनमधून बाबा यायचे पण आठवडाभरातच कामाचं निमित्त साधून अकोल्याला परत जात असे. असं बरेच दिवस चाललं. त्यांना नाशिकला थांबवायची हिम्मत जयवंतला कधीच झाली नाही.
मुलांच्या शाळेच्या ग्रॅंडपॅरंट्स डे साठी बाबा आले होते. या वेळेस बाबा जरा उत्साही वाटले. नातवाच्या कौतुकाने भारावलेल्या बाबांकडे जयवंत आणि शर्वरी कौतुकाने बघत होते.
"परवा निघीन म्हणतो" बाबा
"काय घाई आहे?" जयवंतने नेहमीप्रमणे विचारले
"बाबा, आलाच आहात तर थांबा न, जयाकाकूची एकसठ्ठी आहे दहा दिवसांनी, ते करुन जा." शर्वरी
"घरचाच कर्यक्रम आहे बाबा, सर्वांच्या भेटी होतील. थांबा न" त्यांना न थांबवण्याचा निशब्द करार मोडत जयवंतने आग्रह केला.
फारसे आढेवेढे न घेता बाबाही थांबले. मग काय सोहम खुष, त्याची तर मज्जाच मज्जा. आता रोज आबा बस स्टॉपवर येणार या विचाराने गडी खुष झाला. रोज झोपतांना नवी गोष्ट ऐकायला मिळणार या आनंदात तर आज होमवर्क पण पटकन आटोपला होता.

जयाकाकूकडचा कार्यक्रम मस्तच झाला. बाबांही आधीसारखे उत्साही वाटले.
झालं आता बाबांची जायची गडबड सुरु होईल. या विचारानं जयवंतने संभाषण टाळत लगबगीनं ऑफिसला निघाला.
बाबांनाही कळत होतं. गालातल्या गालात हसत ते म्हणाले जया, संध्याकाळी बोलू रे. निघ आता.

"बाबा आता बरेच नॉर्मल झाले होते. आईशिवाय जगणं त्यांनी स्वीकारलं होतं. कधी कधी मला रागही येत असे, असं कसं हे आईशिवाय जगू शकतात? जे वास्तव होतं ते स्वीकारण्याशिवाय पर्याय ही नव्हता त्यांच्याजवळही आणि माझ्याजवळही..." जयवंत विचार करत होता
"बाबा, सोहम आज पाळणाघरात जाणार नाही." शर्वरी
"हो, हो. माहिती ग मला. मी जाईन बसस्टॉपवर त्याला घ्यायला. काळजी नको करु" बाबा
"बाबा, जेवण मायक्रोवेवमध्ये गरम करुन घ्याल. कोशिंबीर फ्रीजमध्ये आहे. दुध थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवाल का? प्लीज" शर्वरी
"निघ तू. उशिर होईल बॅंकेत पोहचायला. मी आवरतो बाकीचं" बाबा
"डब्बा आणि पाण्याची बॉटल घे ग...." बाबा
"शर्वरी, हे घे फाईन बसायचा नाहीतर." बाल्कनीतून हेल्मेट आणत बाबा म्हणाले.
"अरे हो. घाईत विसरलेच मी." शर्वरी
"आणि हो. सोहमला दुपारी सेब नाही तर केळ द्याल हं" शर्वरी
"मी येतेच सहा पर्यंत" शर्वरी

आजची संध्याकाळ तशी रोज सारखीच होती. बाबांनी तिघांसाठी मस्त आल्याचा चहा केला होता. त्यांना आमच्याशी काही बोलायच आहे हे लक्षात आलं होतं. सोहमला टी.वी लावुन दिला. तिघेही बाल्कनीत आले.
"बोला ना बाबा. तुम्हाला काल पासून काही सांगायचं आहे." जयवंत
"हो रे. तुम्हा दोघांना सांगायचय. कशी सुरवात करु कळत नाहीया." बाबा.
शर्वरीला कळेचना काय सांगायच आहे बाबांना...कशा बद्दल....दुसरं लग्न?...नाही नाही...प्रॉपर्टी....ती स्वत:शीच तर्क करत होती.
"काय झालं बाबा? काही पैसे वैगरे हवे आहेत काय?" जयवंतनी काळजीनं विचारलं
"नाही रे. मी तरतूद केली होती सगळी. पैसे नकोत. थोडी मदत आणि सल्ला हवा आहे." बाबा
"तुमचं या बाबतीत काय मत असेल मी बाप असूनही तर्क काढू शकत नाहीया रे." बाबा
"नक्की काय झालं आहे बाबा?" शर्वरीची उत्सुकता तिला स्वस्थ बसू देत नव्हती.
"अकोल्याचं आपलं घर आहे ना. तिथे आदिवासी मुलांसाठी आश्रम करायचा ठरवत होतो." बाबा
"हे काय नवीन बाबा." जयवंत
"नवीन नाही रे. तुला आठवतं का? तुझी आई एका संस्थेत काही गरीब मुलांना शिकवायला जायची." बाबा
"आठवतं नं." जयवंत
"त्यापैकी मोठी मुलं, बाराव्वी झालेली, त्यांची ऍडमिशन आम्ही इंजिनीअरींग, तर काही कंप्युटर इंजिनीअरींगला केली. प्रश्न येतो ते त्यांच्या रहाण्याचा. होस्टेल किंवा खासगी रुम त्यांना पडवडणार नाही रे. तुझी आई त्यांची काही सोय होते का बघत होती. ती अचानक गेली. हा प्रश्न सुटलाच नाही. मध्यंतरी मी ही लक्ष दिले नाही. एक दिवस गवळी काका भेटायला आले होते. आईच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्यक्रम होता ज्येष्ठ नागरिक मंडळात त्याचं निमंत्रण घेऊन. सध्या ती मुलं आमच्या मंडळाच्या ऑफिसमधेच रहात आहेत." बाबा
"मी विचार केला, आपण वर एवढा मोठा हॉल आणि किचन बांधलं. तू तर कधी तरी येतोस अकोल्याला. ते जर तिथे राहिलेत तर मलाही सोबत होईल आणि त्यांनाही मदत होईल." बाबा
"सगळा विचार केला आहे ना बाबा तुम्ही. ती मुलं कोण, कुठली, कशी याची शहानिशा करुन मगच ठेवा त्यांना आपल्या घरी" जयवंत
हे ऐकून बाबांना खूप आनंद झाला. त्यांनी जयवंतला मिठीच मारली.
"आज मला कसं मोकळं मोकळं वाटतय. मला कल्पना होतीच. तू काही नाही म्हणायचा नाही यासाठी." बाबा
"बाबा, चांगलं काम आहे हे. नाही म्हणायचा प्रश्नच नाही. आईंची हीच इच्छा होती ना." शर्वरी
"अरे, घराचा मालक तो आहे." बाबा हसत म्हणाले
"काय बाबा. लोनसाठी आपण ते माझ्याही नावावर केलं होतं. ते तर केव्हाच फेडलं आपण" जयवंत
"तुमचं घर आहे ते. तुम्हाला हवं तेव्हा हवं त्या व्यक्तिला तुम्ही देऊ दान शकता." जयवंत
"अगदी आपल्या आईसारखं बोलतोस तू. एक सांगू. दान तर मी घेतलं रे तुझ्या आईकडून. गरजूंना मदत करायच्या वृत्तीच.
दान दिलं वैगरे तिला आवडायचं नाही हं. मदत केली म्हण हवं तर." बाबा

मी तर आईच्या आठवणीनं फक्त व्याकूळ होतो. बाबा मात्र आईचा वसा पुढे चालवत होते.

"बाबा, फोन करुन कळवा गवळी काका आणि साने काकांना. एक तारिख निश्चित कारायला सांगा. एखादा चांगला दिवस बघून त्यांना अपल्या घरी शिफ्ट करा. तेव्हा मी ही येईन अकोल्याला. कोण? कुठली? काय शिकतात? मी ही एकदा भेटूनच घेतो सर्वांना." जयवंत
"बाबा, त्यांच्या जेवणाचं काय? एखादी स्वंयपाकीण बघा ना. तुमचीही जेवायची सोय होईल" शर्वरी
"गच्चीवरील फुलझाडांच्या कुंड्या तिथेच राहू द्याल..........आईने लावलीत सगळी झाडं. माळीकाका पाणी घालत असतील न रोज" जयवंत
"जया, परवा निघीन म्हणतो....." बाबा
"सोहमच्या गॅदरींगला येईनच न मी परत." जयवंतचा उतरलेला चेहरा बघून बाबा लगेच म्हणाले
"बाबा, मागे अजून एक हजार लिटरची पाण्याची टाकी बसवून घ्या. आपल्या अकोल्याला पाण्याचा नेहमीचाच प्रॉब्लेम आहे. आणि हो जिन्यात ग्रिलगेटही करुन घ्या
त्या बापलेकाच संभाषण शर्वरी कौतुकानं ऐकत होती.
"दान....नाही मदत..".एक मोलाची शिकवण तिला मिळाली होती.

विनीता श्रीकांत देशपांडे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users