अनुभव ऋतूंचे

Submitted by प्रतिक सोमवंशी on 24 May, 2019 - 07:19

आयुष्याच्या वाटेवर चालताना अनेक चांगले वाईट अनुभव येतात. ज्याला लाडाने आपण खट्टे मिठे सुद्धा म्हणतो आणि खरच असतात ते तशे. काही अनुभव शरद ऋतूतील चांदण्यांप्रमाणे असतात, अगदी अल्लड, नाचतच येतात आपल्या भेटीला सुखद धक्के घेऊन. काही खूपच अंधरलेली असतात अगदी शिशिरातल्या काळ्या रात्री सारखे, एकदा आले की तेवढा काळ अंधार सोडून आपल्याला काहीच दिसत नाही. ओढल्या जातो आपण त्या अंधारलेल्या रात्रीच्या भयाण शांततेत, जेंव्हा आपल म्हणायला अस चांदण ही उरत नाही. काही अनुभव ढगाळलेले असतात आषाढातील आसमंताप्रमाणे, नभांसारखे दाटून आलेले असतात पण कधी बरसून एकदा रिते होतील आपल्याला पण माहीत नसते. मन जड झालेले असते पण जेव्हा ते वर्षा ऋतूतील अवखळ पाऊसाप्रमाणे बरसते तेंव्हा मनाच्या मेघखंडातील ताण हळूच हलका झालेला भासतो. काही अनुभव वसंतातील इंद्रधनुप्रमाणे असतात, विविध रंगानी नटलेले, नानाविध छटांचा वर्षाव केलेले आणि त्यांना अनुभवन मनाला एक वेगळाच आनंद देऊन जात, मन प्रफुल्लित होऊन जात, त्याच्या रसिकतेत अचानक भर पडते. काही अनुभव ग्रीष्मातील उष्णतेप्रमाणे खूप चटके देऊन जातात ज्यांचा दाह कमी होतो पण व्रण मनावरन पुसल्या पुसत नाहीत ऋतूप्रमाणे हे अनुभव बदलत जातात पण त्यांना अनुभवन एक वेगळाच अनुभव देऊन जात. यातच तर आपण जगतो आणि जगायला शिकतो.
गालिबने खूब कहा है,
“हर रोज गिरकर भी मुक्कमल खडे है
ये जिंदगी मेरे हौसले तुझसे भी बुलंद है ”
©प्रतिक सोमवंशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users