वास्तु ७

Submitted by जयश्री साळुंके on 22 May, 2019 - 23:49

भाग ६ https://www.maayboli.com/node/69982
भाग ५ https://www.maayboli.com/node/69954

बराच वेळ झाला तरी सई शुद्धीवर नव्हती आलेली. तिच्या अंगात प्रचंड ताप होता, चेहरा फिका पडलेला, आधीचा हसरा खेळकर चेहरा जाऊन त्याच्या जागी आता एक पोक्त पणा सगळ्यांना दिसत होता. कोणाच्याच डोळ्याला डोळा लागत नव्हता. सर्व जण सईच्या खोलीत थांबलेले होते. सौम्य खोलीची पाहणी करण्यात व्यस्त होता, शांततेत त्याने खोली पुर्ण न्याहाळली, सईची खोली घरातली सगळ्यात हवेशीर खोली होती, एका बाजूला कपड्यांच जुनं पण भक्कम कपाट, त्याच्या शेजारी तिच्या पुस्तकांसाठी केलेलं सुंदर लाकडी कपाट, ज्यात मेडिकल ची बरीच पुस्तकं रचलेली होती, सोबतच अवांतर वाचनाची पण पुस्तकं होती. खोलीची एकंदर रचना जुन्या थाटनीची होती, पुस्तकांच कपाट तेवढ फक्त नवीन होतं. एका भिंतीला एक चित्र टांगलेल होतं, तळ्यातुन बाहेर येऊन पडलेल्या माश्याचं. तसं दिसायला वर वर सगळं काही ठीक दिसत होतं पण काही तरी चुकल्या सारखं वाटत होतं सौम्यला. रात्रीच्या अंधारात तो जरा गच्चीवर जाऊन बसला, हळु हळु बाकीचे चौघं पण त्याच्या मागे आलेत. कोणाकडेच बोलण्यासारखं काही नव्हतं. जे काही त्यांनी बघितलं त्याने सर्वांचीच झोप उडालेली होती, सगळ्यांच्या डोळ्यासमोर जुनी सई दिसत होती, कॉलेज मधले दिवस आठवत सगळे शांत बसले होते. प्रज्ञा तर खुप घाबरलेली होती, कॉलेज होस्टेल मध्ये दोघी जणी एकाच खोलीत राहायाच्यात त्यामुळे तिने सईला खुप जवळून बघितलं होतं, तीची हि अवस्था बघून प्रज्ञाला रडायला येत होतं. अचानक प्रज्ञाला आठवलं कि तिने सईच्या खोलीतलं चित्र कुठे तरी पाहिलं आहे, पण नेमकं कुठे ते तिला आठवत नव्हतं. तिने हे सगळ्यांना सांगितलं, सगळे पुन्हा विचारात गढले.
आणि त्याने निश्वास सोडला, त्याला वाटलं होतं कि जर प्रज्ञाला आठवलं कि हे चित्र त्यांनी सोबत असतांना गिफ्ट सेंटर मध्ये बघितलं होतं तर त्याला पुन्हा काही तरी नवीन विचार करावा लागला असता, आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे त्या गिफ्ट सेंटर मध्ये त्याने आत्ता तो वापरत असलेलं नाव वापरलेलं होतं. त्याने सईला हि भेट दिलेली कोणाला माहित नव्हती. पहिला बळी सईबाईंचा घेतल्या नंतर त्याला शेवटचा बळी सुद्धा ह्याच घरातला पाहिजे होता, म्हणजे तसा काही नियम नव्हता पण त्याचा हट्ट होता. आणि हाच हट्ट पुरवण्यासाठी म्हणुन तो हे नवीन रूप घेऊन सईच्या कॉलेजला हजर झाला होता, त्याला सई दुसर्या कोणाच्या प्रेमात पडून काही करेल अशी भीती होती, म्हणुन सईला त्याने स्वतःच्या प्रेमात पाडलं होतं. सईच्या नकळत सई त्याच्या मध्ये इतकी गुंतली होती कि ती त्याच्यासाठी काहीही करायला तयार होती. त्याने सांगितलं होतं तिला कि आपल्यातलं हे नातं अजुन कोणालाच नको सांगायला. आणि सई यावर हो म्हणाली होती. ते चित्र दुकानात असतांना त्यात काही खोट नव्हती, पण त्याने नंतर त्याच्यात थोडासा बदल करून मग सईला दिलेलं.
तेव्हा जर प्रज्ञाला आठवलं असतं कि ते चित्र तिने कुठे बघितलं होतं, तर कदाचित सौम्यचा बराच वेळ वाचला असता. पण हे सगळ माझ्या हातात नव्हतं, मला सगळं दिसत असून पण मी कोणाची मदत करु शकत नव्हतो. माझी प्रचंड इच्छा होती कि मी ती विहीरच बुजवून टाकावी, पण मला ते देखील शक्य होत नव्हतं.
त्या चित्रात पहिल्या नजरेत वाईट काहीच दिसत नव्हतं. पण थोड नीट बघितलं तर एक गोष्ट नक्की दिसत होती, ती म्हणजे तो मासा पाण्याच्या बाहेर आलेला पण त्याची तरफड काही त्या चित्रात दिसत नव्हती, उलट तो मासा शांत होता, जसं तो पाण्याशिवाय सुद्धा जगू शकतो. आणि हाच त्याने केलेला बदल होता, त्याला आधीच शंका होती कि सौम्य इथे येईल म्हणुन त्याने हा सापळा आधीच रचून ठेवला होता. सौम्यच्या डोक्यात संमोह्नाचे विचार येत तर होते पण त्याचा धागा सापडल्या शिवाय तो सगळ्या बाजूने विचार करेल, एवढं त्याने सौम्यला ओळखलं होतं. म्हणुन हि एक छोटीशी खेळी तो खेळला होता, आणि सौम्य त्यात अडकला देखील होता. चित्र पाहिल्या पासुन सौम्यच्या डोक्यात त्या चित्राचेच विचार चालू होते.
ह्या सगळ्यात अर्धी रात्र केव्हाच उलटून गेली होती, सगळ्यांच्या डोळ्यावर झोप यायला लागली. खाली घरातले सगळे पण झोपेच्या आधीन होण्यात होते. थोड्याच वेळात सर्व जण झोपायला गेले, सईजवळ तिची आई आणि प्रज्ञा थांबल्या होत्या. त्यांना पण काही वेळात झोप आली. आणि त्याच वेळी सई शुद्धीवर आली.
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पुढे..पुढे काय झालं? next part कधी येणार याची उत्सुकता वाढलीए.

कथेने जबरदस्त वेग घेतलाय.त्यात तुम्ही एक अनपेक्षित twistपण दिलाय.
पु.ले.शु!