वास्तु ६

Submitted by जयश्री साळुंके on 17 May, 2019 - 00:34

पाचही जण शनिवारी संध्याकाळी गावात पोहचले. त्यांना घ्यायला सईचा भाऊ बस थांब्यावर आलेला. घरी पोहचेपर्यंत अंधार दाटून आलेला. गावाचं रुपांतर जरी तालुक्यात झालेलं असलं तरी संध्याकाळच्या वेळी गावात जास्त कोणी बाहेर दिसत नव्हतं, दोन-चार टवाळकी टाळकी चौकात बसलेली होती, काही जुनी जाणती माणसं जेवणं करून दारात खाटेवर पडलेली होती. शांततेच्या वातावरणात मध्येच काही कुत्री भुंकत होती, भयाण शांततेत रातकिड्यांचा आवाज तर कानांना असह्य होत होता.
तेवढ्यात पार्थच आकाशाकडे लक्ष गेलं, आकाशात चंद्र तर दिसत नव्हता पण चांदण्या भरपूर होत्या. त्यांचा स्वतःचा वेगळा असा मंद प्रकाश आकाशात दिसत होता, शहरातल्या पोरांना त्या चांदण्या बघून मस्त वाटत होतं, प्रवासाचा सगळा शीण अगदी काही मिनिटातच निघून गेला. घरी पोहचून सगळ्यां पोरांचे हात पाय धुवून होईपर्यंत जेवायची तयारी झालेलीच होती. घरातली सगळी माणसं त्यांच्यासाठी जेवायला थांबलेली होती. जेवतांना मुद्दाम सईचा विषय कोणीच नाही काढला. सई त्यावेळेला विहिरीच्या काठी तिच्या पलंगावर बसलेली होती, तिच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते, ना डोळ्यात पूर्वीची चमक दिसत होती, शुन्य नजरेने ती विहिरीकडे एक टक लावून बघत होती. त्या मिनिटाला जर कोणी तिला बघितलं असत तर बघणार्याच्या काळजाचा ठोका निश्चित चुकला असता. तसं म्हणायला एक मोलकरीण कायम तिच्याजवळ असायची, पण आज नेमकं तिची तब्येत खराब असल्यामुळे तिला यायला जमलं नव्हतं, आणि सई एकटीच बसलेली होती. घरच्यांना वाटलं बरेच दिवस ती तिथेच असल्यामुळे काही भीती नाही. पण नेमकं त्या दिवशी अमावस्या आहे हे कोणाच्या ध्यानात नाही आलं. आणि त्यातच सईने विहिरीकडे जायला सुरुवात केली. इकडे सर्वांची जेवणं झाली होती, घरातली काही निवडक मंडळी आणि सईचा मित्र परिवार सईकडे जायला निघाले. ज्या वेळी ते सर्व जण पोहचले त्यावेळी सई विहिरीच्या कठड्यावर उभी होती, नजर विहिरीच्या पाण्यात, आणि अगदी कोणताही चेहरा तसाच मख्ख, कोणतेही भाव नसलेला. सर्वांनी ते दृश्य पाहिलं आणि सईला आवाज दिला, पण तिच्यावर कोणताही परिणाम झाला नाही, जसं आवाज तिच्या कानापर्यंत पोहचला पण आत नाही शिरला. आणि तिने क्षणात विहिरीत उडी मारली. सर्व जण धावत विहिरीपाशी पोहचले, ऋषभ आणि पार्थ दोघांनी तिच्या मागोमाग पाण्यात उडी घेतली, सईला बाहेर काढण्यात आलं, नाका-तोंडातून पाणी आत शिरलं होतं, ते बाहेर काढलं. सईची शुद्ध हरपलेली होती, त्यामुळे तिला घरात घेऊन जाणं जरा सोप पडलं.
त्याच वेळी दोन लोकांचे चेहरे बघण्यासारखे झालेले होते, सौम्य जो अगदी शांतपणे सईकडे आणि विहिरीकडे बघत होता, त्याच्या डोक्यात त्या मिनिटाला एकच विचार होता तो म्हणजे सईला संमोहित करण्यात आलं असावं. आणि दुसरा चेहरा होता तो त्याचा, कारण त्याची बाहुली अचानक जळायची थांबली होती, त्यामुळे तो प्रचंड संतापला होता, इतके वर्ष वाट बघितली होती त्याने, तसं अजुन वाट बघायची तयारी होती त्याची पण सौम्य आता मध्ये पडणार हे कळालं म्हणुन त्याने घाई केली होती, पण हि संधी हातची गमावली गेल्यामुळे त्याचा संताप वाढला होता. त्याला माहित होत कि सौम्य असल्यामुळे त्याच काम शांततेत होऊ शकणार नाही म्हणुन त्याने पुढच्या अमावास्येला करायचं काम एक महिना आधी करायचं ठरवलं होतं, पण नेमकं सगळंच ऐनवेळी बिनसलं, आणि आता महिन्याभरात जर सौम्यला थोडा पण सुगावा लागला त्याच्या ह्या कामाचा किंवा त्याच्या नव्या शरीराचा तर सौम्य आणि त्याची लढाई खुप मोठी होईल. त्याच्याकडे आधीच्या सहा मुलींचा ताबा आणि इतक्या वर्षांच्या तपस्येमुळे शक्ती तर प्रचंड होत्या, पण सौम्यच्या मागच्या जन्माच्या पूर्वसंचितामुळे सौम्यकडे लढाईसाठी किती ताकद आहे याचा अंदाज त्याला काही केल्या बांधता येत नव्हता. तसं गेल्या चार-पाच वर्षात तो सौम्यला बराच ओळखायला लागलेला पण, वरून पाणी बघून त्याची खोली कशी सांगणार ना.
आता महिन्याभर त्याच्याकडे तीन कामं होती, एक म्हणजे सौम्यच्या मनात जे संमोहनचे विचार चालू होते त्यांना खत-पाणी घालणं, दुसरं स्वताची नवी ओळख कोणाच्याही लक्षात न येऊ देणं, जेणे करून त्याला सौम्यच्या आस-पास राहून त्याच्या तयारीचा अंदाज घेता येईल, आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सई, तिला पुन्हा विहिरीजवळ आणणं.
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

क्षमस्व... यापेक्षा मोठे भाग टाकायला मला प्रचंड जड जाईल.. पण नियमित भाग येतील याची शास्वती मी देऊ शकते..