भाग १७ चा धागा : https://www.maayboli.com/node/70004#comment-4367444
भाग १८ :
Small Figures च्या वरळीच्या ऑफिसात केदार अकरा वाजण्यापूर्वीच पोहोचला. प्रमाणपत्राची फाइल रिसेप्शानिस्टकडे देऊन तो वेटिंग हॉलकडे गेला.त्याच्यासह पाचजण इंटरव्हयू साठी आले होते.दोघेजण एका कोपऱ्यात बसून हळू आवाजात चर्चा करीत होते.तिसरा पुस्तक वाचण्यात मग्न होता. चवथा मात्र निवांत बसला होता. केदार त्याच्या जवळ बसला. केदारने विचारले...
“इंटरव्ह्युला व्हायव्हा व्होसी सारखे प्रश्न विचातात?”
“विचारू शकतात”
केदार मनातल्यामनात चरफडला.सिलॅबसवरचे प्रश्न विचारतील असे त्याला वाटलेच नाही. त्यामुळे त्याने तसा अभ्यास केला नव्हता. पहिला कॅन्डीडेट इंटरव्हयू देऊन विजयीमुद्रेने बाहेर आला.त्यानंतर केदारचा नंबर आला. केदारने स्टॅटटीक्सचे एखादे पुस्तक वाचून knowledge refresh केले नव्हते त्यामुळे त्याचा इंटरव्हयू समाधानकारक झाला नाही. घरातून निघताना त्याने असे ठरविले होते की इंटरव्हयू झाल्यावर चांगल्या हॉटेलात जेवायचे आणि सिनेमा पाहून सावकाश घरी यायचे. कारण जेंव्हा त्याने रेवतीकडे पैसे मागितले तेंव्हा ती म्हणाली...
“Oh sorry ,तुला पॉकेट मनी लागत असेल हे माझ्या लक्षात कसे आले नाही?”
तिने त्याला डेबिट कार्ड दिले आणि म्हणाली...
“हे तू वापर. या अकौंटला भरपूर शिल्लक असते.मनसोक्त शॉपिंग कर.”
त्याने कार्ड पाकिटात व्यवस्थित ठेवले.ती म्हणाली...
“पासवर्ड नाही विचारलास ?’”
तो म्हणाला “४१४१”. ती खुश झाली होती .
सगळ छान जमून आले होते..पण इंटरव्ह्यू मधल्या सुमार कामगिरीमुळे सगळा विचका झाला..
------------------------------------------------------------------------------------
दुपारी चारचा सुमार होता.केदार हॉलमध्ये निवांत बसला होता.कार्पेट साफ करणारे लोक आले होते. ते व्हॅक्यूम क्लीनरने सोफा गालीचा वगैरे साफ करत होते.फुकटची करमणूक म्हणून केदार ते पहात बसला होता.नेहमीप्रमाणे त्याने शिवरामकडे काहीतरी खायला आण अशी मागणी केली. बराच वेळ झाला तरी खाणे आले नाही म्हणून तो म्हणाला...
“शिवराम तू मला खायला देणार होतास ना?.”
“ते काय डायनिंग टेबलावर मांडलाय की “
“अरे मी इकडे बसलोय आणि तू माझे खाणे तिकडे का ठेवलेस?”
“तुम्ही बसलाय तिथे सोफा साफ करायला ते लोक यायला लागलेत.म्हणून म्हटलं खाता खाता उठायला लागू नये”
“अरे मग तसे सांगायचे ना”
“मी तुमच्या समोरच डीशा मांडत होतो. मला वाटले तुम्ही बघितले असेल”
“तुम्ही मुद्दाम करता का रे असे?.माझ्याशी धड बोलयाचे नाही.माझा निरोप सांगायचा नाही “
“केदारसाहेब, आम्ही असे का करू?”
“हो ना,मग मी पहिल्यांदा इथे आलो ,तेंव्हा तू मी येणार असल्याचे वॉचमनला का सांगितले नाहीस ?.तो मला हाकलून द्यायला लागला. माझी नामुष्की झाली. याला कोण जबाबदार?”
“केदारसाहेब तुम्ही येणार आहात हे मी अण्णासाहेबाना सांगितले होते .अण्णासाहेबांनी लगेचच गेटवर फोन करून सांगितले .अदबीने वाग असे सुध्दा सांगितले. पण तो वॉचमन रात्रपाळीच्या वॉचमनला सांगायला विसरला.”
“हे सगळे तुम्ही ठरवून करता! आता मला सांग .मी येणार आहे म्हणून मी तुला फोनवर बोललो .तू अण्णासाहेबाना विचारून मला येण्याची आवश्यकता आहे की नाही असे कळवायला पाहिजे होतेस .पण तू परस्पर मला या म्हणून सांगून टाकलेस.आता सगळ्याची कुचंबणा झाली ”
केदारचा आवाज चढल्यामुळे अण्णासाहेब खाली आले...
“काय आरडाओरड चालवली आहे रे “
शिवराम म्हणाला...
“केदारसाहेब म्हणतायत मी त्यांना इथे येण्याची गरज नाही असे सांगायला पाहिजे होते”
“केदार,तुम्ही नीट समजून घ्या,तुम्ही इथे रहायला येण्याचा निर्णय घेतला तो योग्यच आहे.आणि तुम्हाला इथे रहायला येऊ नका असे कोणीही म्हणू शकत नाही.कारण तो contempt of the court झाला असता . तुम्ही नोकराशी कटकटी करत जाऊ नका. त्यांच्या understanding ला मर्यादा असतात .आपण समजुतीने घ्यायचे असते.”
केदार म्हणाला...
“पण शिवराम मुद्दाम मला खिजवत असतो.मी इथे आलो नसतो तर सर्व प्रश्न सुटले असते”.
”मी तुम्हाला समजावयाचा प्रयत्न करतोय तर तुम्ही कुठले सहा महिन्या पूर्वीचे उकरून काढताय. मला तर वाटतंय तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय.”
“अर्थात. होणारच ना ?”.
”काय म्हणालात तुमच्या डोक्यावर खरच परिणाम झालाय.?”
“होय. झालाय किंवा होण्यात आहे”
“मग डॉक्टरना दाखवूया का?”
“हो दाखवायलाच पाहिजे.अन्यथा काहीही विपरीत घडू शकते ”.
”इथे मुतालिक म्हणून मानसोपचार तज्ञ आहेत .उद्या त्यांच्याकडे जाउया का?”
”हो .मी सकाळी लवकर तयार होतो.”
केदार मानसोपचार तज्ञाकडे जायचे असे स्व:तहून म्हणेल असे त्यांना वाटलेच नव्हते . त्यांनी मनातल्यामनात परमेश्वराचे आभार मानले.
------------------------------------------------------------------------------------------------------- .
केदार आणि अण्णासाहेब डॉ.मुतालीकांच्या दवाखान्यात पोहोचले तेंव्हा एका पेशंटचे कौन्सिलिंग चालू होते त्यामुळे त्यांना अर्धातास थांबावे लागले .तो पेशंट बाहेर आल्यावर रीसेप्शानिस्टने केदारला आत जायला सांगितले.दोघेही उठले आणि आत जायला निघाले .रिसेप्शानिस्ट म्हणाली...
“काका तुम्ही थांबा .त्यांना एकट्याला जाऊदे.डॉक्टर तुम्हाला नंतर बोलावतील”
केदार एकटा केबिनमध्ये गेला. डॉ.म्हणाले...
“बोला काय त्रास आहे”
“मला वरचेवर अस्वस्थ वाटते .मी अनेकदा विनाकारणच बचैन होऊन जातो .सारख खायला मागत असतो.सारखे वाद होतात.माझे डोकेही फार दुखते.”
“वाद कोणाशी होतात?”
“जास्त करून नोकराशी. वैभव म्हणून नट आहे, त्याच्याशी एकदा वाजले होते .बाकी माझ्याशी कोणी बोलतच नाहीत त्यामुळे त्याच्याशी भांडायचा प्रश्नच नाही “.
“घरातले तुमच्याशी का बोलत नाहीत.?”
“डॉक्टर मी तुम्हाला पहिल्यापासून नीट सांगू का?”
“अर्थातच .मला भरपूर वेळ आहे . सगळ सविस्तर सांगा “
केदारने त्याची “एक होता जग्गू “ ही कहाणी सांगायला सुरुवात केली .बाहेर अण्णासाहेब कंटाळले ते म्हणाले..
“अजून किती वेळ लागेल ?”
रिसेप्शनिस्ट म्हणाली “तास दीडतास लागेल “
“पण मला एवढा वेळ नाही. मला साइटवर जायचे आहे.”
“तुम्ही गेलात तरी चालेल .नंतर येऊन डॉक्टरना भेटा “.
”चालेल “अण्णासाहेब त्यांच्या कामाला जातात .
इकडे केदार त्याच्या कहाणीचा उपसंहार करतो...
“माझे आणि रेवतीचे लग्न का लावण्यात आले याचे खरे कारण मला अद्याप कळले नाही.मला इथे का ठेऊन घेतलय ते मला कळलेले नाही.यात काही काळेबेरे असे मला वाटते. या चिंतेपोटी मी कटकट करतो.”
डॉक्टर म्हणाले...
“तुमचे खूप प्रॉब्लेम आहेत, हे मान्य आहे. तरीपण सगळ्या प्रॉब्लेम्सचा एकत्रित विचार न करता प्रत्येक प्रॉब्लेम सुटासुटा करून सोडवायचा प्रयत्न करू. तुमचा पहिला प्रॉब्लेम म्हणजे घरातले लोक तुमच्याशी अगत्याने वागत नाहीत.त्याचे कारण असे आहे की हल्ली या नवश्रीमंत कुटुंबात अमेरिकन संस्कृतीने शिरकाव केला आहे.जो तो आपल्यापुरते पहातो सगळ्यांनी एकत्र बसून गप्पा मारत चहा घ्यायचा हे आता मागे पडले.आता नवीन घोष वाक्य आहे बी प्रक्टीकॅल डोन्ट बी इमोशनल. तुम्ही सुद्धा हे तत्व स्वीकारावे.आणि आपल्याला मान मिळत नाही या गोष्टीचा बाऊ करू नये. तुमचा दुसरा प्रॉब्लेम आहे की अण्णासाहेबांनी तुम्हाला इथे अडकवून ठेवलय ? म्हणजे ते तुमचा काहीतरी गैरवापर करणार आहेत अशी शंका तुम्हाला भेडसावते आहे.तुम्ही म्हणता ते खरेही असेल.पण जेंव्हा प्रोब्लेम येईल तेंव्हा तो सोडवा .आधीपासूनच लांडगा आला रे च्या आरोळ्या कशाला तुमचा तिसरा प्रश्न आहे इथून निघून गावी परत जावे का? तर ते आता शक्य नाही. कारण मीनाक्षीने तुम्हाला तिच्या आयुष्यातून कटाप केले आहे. तुम्ही भद्रावतीला परत गेलात तर आणखी नवनवीन प्रॉब्लेम निर्माण होतील.
तुम्हाला एक चिंता भेडसावते की तुमचे भवितव्य काय? त्यासाठी तुम्ही नोकरी शोधताय .पुढच्या इंटरव्ह्यूला जाताना नीट तयारी करुन जा.तुम्हाला नोकरी नक्की मिळेल.पण या सगळ्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम आहे तो तुमचा आणि कर्णिकांचा आर्थिक स्तर,आणि सामाजिक स्तर यामधील तफावत. तुम्हाला कितीही मोठी नोकरी मिळाली तरी तुम्ही त्यांची बरोबरी साधू शकणार नाही .आणि ते लोक तुम्हाला त्यांच्या कुटुंबात सामील करून घेणार नाहीत. म्हणून मला वाटते की तुम्ही एखाद्या सामाजिक संस्थेसाठी काम करावे म्हणजे तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा मिळेल . हे नवश्रीमंत लोक आपल्याला सामाजिक जाणीव आहे हे दाखवायला उत्सुक असतात त्यामार्गाने तुम्हाला कर्णिकांशी बरोबरी साधता येईल .आणि मग रेवती तुमचा स्वीकार करेल."
डॉक्टरांचे कौन्सिलिंग केदार मन:पूर्वक ऐकत होता.त्याला ते बरेचसे पटले. त्याने विचारले...
“डोके दुखते ते मानसिक त्रासानेच का?”
“डोके दुखण्याची अनेक कारणे आहेत.मानसिक त्रासानेही दुखत असेल किंवा दुसरेही कारण असेल?.
सध्या मी तुम्हाला औषध लिहून देतो. एक माइल्ड सिडॅटिव्ह आहे ते रोज रात्री एक गोळी महिना भर घ्या . हे दुसरे अन्टीबायोटिक आहे.सकाळ संध्याकाळ एक एक गोळी सात दिवस घ्या मध्ये एकदा येऊन जा.एमारआय करून घेऊ.’”
डॉक्टर मुतालीकांच्या बोलण्यानेआणि नंतर औषधाने केदारला खूपच बरे वाटले.
-------------------------------------------------------------------------------------------------------
अण्णासाहेब आणि पार्टनर काही कामकाज करत त्यांच्या ऑफिसात बसले होते. अनपेक्षित जग्गू तिथे आला.अण्णासाहेब नवलाने म्हणाले...
“क्या बात है जग्गू ?इस वक्त यहॅा कैसे आये”
“राजगुरू आये है”
“कहॉ है”
“ले मेरीडन मे ठहेरे है”
“किस लिये आये है”
“उन्होने संदेश दिया है की कल महाशिवरात्री है और इस अवसरपर केदारके हाथो भगवान शिवजी की पूजा करनी है”
“बापरे. कसे जमणार हो”
पार्टनर म्हणाले...
”का नाही जमणार “
“आधी हीला समजून सांगावे लागणार .मग रेवतीला पटवावे लागणार .केदारला कसे सांगायचे हा प्रश्नच आहे .”
“पूजा तर मांडायची आहे.कोण कशाला नको म्हणेल? तुम्ही सगळ्यांना एकत्र बोलवा .आम्ही दोघेही येतो सगळ्यासमोर विषय काढा.मोकळेपणी चर्चा करू .मला नाही वाटत कोणी नाही म्हणेल?”
तिघेही हॉलमध्ये आले.शिवरामने इंटरकॉमवरून सगळ्यांना बोलावले.सर्वात शेवटी शर्मिष्ठा आली. सगळ्यांना एकत्र पाहून म्हणाली...
“अण्णा,आज एकदम जनरल बॉडी मिटिंग ?काय खास?”
“खास असे काही नाही. उद्या महाशिवरात्र आहे . म्हटलं घरात एखादी पूजा वगैरे करावी”
रेवती म्हणाली...
“काय हो अण्णा .एखादा दिवस आराम करू द्या की”
“तुला काय दगदग होणार आहे?सगळ काम तर मला आणि शिवरामला पडणार आहे.केदार तुम्हाला काय वाटत “
“करूया पूजा.छान वाटत .“
“तुम्ही बसाल का पूजेला म्हणजे पाहुण्याचे स्वागत करायला मी फ्री राहीन.”
सुनंदाबाई म्हणाल्या “म्हणजे पाहुण्यांना बोलवायचे आहे का ?” “
अण्णासाहेब म्हणाले...
“पाहुणे म्हणजे तुझ्या दोन्ही भावाना तरी बोलवायला पाहिजे.माझी ताई आणि प्रकाशराव ,वहिनी आणि पुतण्या एवढे तरी बोलवायला पाहिजेत .”
वाहिनीसाहेब म्हणाल्या...
“हो s हो.,दादा खूप रागावला आहे .त्याला बोलाऊन त्याची समजूत काढली पाहीजे.”
अण्णासाहेब म्हणाले...
“मागच्या महिन्यात यांच्या लग्नाला वर्ष पूर्ण झाले .तेंव्हाच मला वाटले की अनिव्हर्सरीचा कार्यक्रम करावा आणि सगळ्या नातेवाईकांची नाराजी दूर करावी.”
“बोलवा .उद्या सगळ्यांना पूजेला बोलवा”
अण्णासाहेब म्हणाले...
“शिवराम तू पूजा साहित्य अणायला पळ .जग्गू तू केटररला फोन लाव.”
“अहो,उद्या सगळ्याचा उपास असतो लक्षात ठेवा”
“अस का.बरे झाले तू सांगितलेस. जग्गू १०० लोकासाठी फराळाचे सांग.”
रेवती कृतक कोपाने म्हणाली...
“झाले का? कुठे वाजंत्री मिळाली तर तीही वाजवा”.
सगळे गेल्यावर अण्णा म्हणाले...
“पार्टनर तुमच्यामुळे सोपे झाले नाहीतर काय खर नव्हत “
-------------------------------------------------------------------------------------------------------
सकाळी नऊ वाजता केदार सोवळे नेसून अंगावर रेशमी उपरणे पांघरून तयार झाला. तो म्हणाला...
“रेवा आवरले की नाही तुझे .चल लवकर .”
रेवतीचेही आवरलेच होते .ती केस विंचरून पाठीवर विखरून टाकण्यात गुंतली होती. केदार म्हणाला...
“वेणी घाल ना “
“का .तुला मोकळे केस चालत नाहीत का? “
”मला न चालण्याचा प्रश्न नाही .कदाचित राजगुरुना आवडणार नाही”
“कोण राजगुरू?”
“सिलीचूंगचे राजगुरू”
”पूजेसाठी राजगुरू येणार आहेत?”
“हो” .
”तुला काय माहित?”
“मघाशी शिवरामने ड्रायव्हरला ला मेरिडनवर गाडी घेऊन जायला सांगितले ”
“पण राजगुरुना केस मोकळे सोडलेले चालत नाही असे कशावरून”.
”जेष्ठ मंडळीना असे काहीतरी खुसपट काढायची सवय असते .”
“तू खर सांगतोयस का माझी मस्करी करतोयस”
“मस्करी कशी करेन .मी पुढे होतो. तू आवरून ये.”
केदार हॉलमध्ये आला.काही पाहुणे आले होते काही येत होते.सुनंदाबाइंचा रुसलेला दादा आला होता .त्यामुळे त्या खुशीत होत्या.त्यांनी केदारची ओळख करून दिली...
”हा माझा दादा अमेरिकन एम्बासित मोठ्या पोस्टवर आहे.”
दादांनी shakehand साठी हात पुढे केला. केदारने दादावहिनींना वाकून नमस्कार केला.सुनंदाबाई खुश झाल्या .तोच राजगुरू आले. काहीजण त्यांना नमस्कार करायला पुढे झाले.राजगुरू आशीर्वचनपर शब्द पुटपुटत चंदनी पाटावर स्थानापन्न झाले. केदार समोरच्या पाटावर बसला. गुरुजी म्हणाले आचमनियम .केदारला सगळे येतच होते.त्याने केशवायनम: नारायणायनम: पासून सुरुवात करून देवी गायत्री अनुष्टुभ छंद: पर्यंत आणले.तोवर रेवती आली . त्याच्या शेजारच्या पाटावर बसली.गुरुजींनी शंकराचे पिंडीला पंचामृत अभिषेक सुरु केला.पाहुणे मंडळीच्या गप्पांना उत आला होता.शिवराम आणि इतर नोकर पाहुण्यांना कॉफी सर्व्ह करत होते.गुरुजींनी दूध घेतले.नंतर ते म्हणाले...
“अभी मै एक मंत्र पढता हू,आप दोहराइये .ओम त्र्यम्बकं यजामहे सुगंधिम पुष्टी वर्धनम “
“गुरुदेव हमारे घरमे कोई बुढा या बिमार व्यक्ती नही है ,तो महामृत्युंजय मंत्रका क्या प्रयोजन .”
“जो पूजाविधी मै कर रहा हुं उसमे ये मंत्रका पठन आवश्यक है .अगर आपको कोई आपत्ती है तो आप मंत्र पठन मत किजीये “
“भगवान शिव जीका मंत्र है.उसके पठनमे क्या आपत्ती हो सकती है.लेकीन मेरा स्वभाव कुछ ऐसाही है. मै हर शकका समाधान ढूढते रहता हू.”
“अच्छा है,अन्जानेमे करनेसे बेहतर है जान बुझ कर कुछ करना.”
केदारने मंत्र जपायला सुरुवात केली...
“ ओम त्र्यम्बकं यजामहे .सुगंधिम पुष्टी वर्धनम . पुर्वारुखमेव बधनात .मृतोर्मोक्षी माम्मृतात ,”
केदारला महामृत्युंजय मंत्र जपताना पाहून रेवतीला कसनुसे व्हायला लागले.त्या मंत्राचा अर्थ तिच्या मनात झिरपू लागला...
”हे त्री नयना, मी सुगंधी द्रव्य लेपून तुझी पूजा करतो.एखादे पूर्ण पिकलेले वाळूक जसे देठापासून सहज विलग होते.तसे मला मोक्षाप्रती सहज जाऊ दे “.
तिला तो जप ऐकवेना तिने अण्णाच्याकडे पहिले.ते अंगणात फोनवर बोलत होते.ती पुजेमधून उठली आणि अण्णाच्याजवळ जात म्हणाली
“अण्णा थांबवा हे सगळे.मला नाही सहन होत “
तिच्या पाठीवर थोपटत ते म्हणाले...
“तू शांत हो .मी तुला तुझ्या मनाविरुद्ध काहीही करायला लावणार नाही.”
“मला वाटते मी आइचे ऐकायला पाहिजे होते “
“काही हरकत नाही .तुझी आई म्हणेल तसे तू कर..पण शांत हो .त्रास करून घेऊ नकोस.”
तीला पुन्हा पूजेमध्ये जावेसे वाटेना. ती तिच्या रुममध्ये गेली.रुममध्ये एकांत मिळताच तिला भावनावेग अनावर झाला आणि ती रडायला लागली .तिला गेल्या वर्षभारातले एकेक प्रसंग आठवायला लागले. केदारने कधीही तिला दोष दिला नाही किंवा अडचणीत आणले नाही.तो पत्रकार परिषदेत येऊन सगळे सांगून तिचे पितळ उघडे पडू शकला असता .पण त्याने सगळा दोष स्व:तकडे घेऊन तिचे रक्षण केले होते.रेवती कार्तिक नावाचे काल्पनिक पात्र उभे करून तिचा बचाव केला होता. तिला घरचे जेवायला मिळावे म्हणून स्व:त स्वयंपाक केला होता.तिने मनाशी ठरवले आता केदारची घुसमट थांबवायची. इकडे केदारची पूजा संपन्न झाली.राजगुरुनी त्याला देवाला साष्टांग नमस्कार घालायला सांगितला.त्याने देवाला गुरुजीना नमस्कार केला .गुरुजींनी आशीर्वाद दिला...
“आयुष्यमान भव “केदार कपडे बदलायला रुममध्ये आला .
रेवतीने त्याला मिठी मारली ,म्हणाली...
“मला काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे.”
केदार म्हणाला...
“सगळे फराळासाठी थांबलेत.आपण नंतर बोलू”
“मी नाही येणार फराळाला “
“असे म्हणून चालेल का ?आपणच गेलो नाही तर ते आपल्याला सोडून फराळ करतील का ?”
तो तिला घेऊन खाली आला.तिथे सगळे वातावरण चैतन्यमय झाले होते.आत्तेमामे भावांशी हास्यविनोद करण्यात रेवती रमून गेली .केदारही तिच्या जवळ राहून तिचा मूड सांभाळत होता.फराळ झाल्यावर एकेकजण कलटी मारायला लागले. अगदी जवळचे नातलग मात्र रेंगाळत होते. सगळ्यांना निरोप देऊन रुममध्ये यायला केदार रेवतीला रात्रीचे नऊ वाजले.रुममध्ये आल्यावर रेवती केदारच्या निकट जात म्हणाली...
“मी तुला काहीतरी सांगणार आहे. मन घट्ट करून ऐक “
“आपले लग्न झाल्यापासून, तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करावास म्हणून मी वाट पाहतोय ,आणि आता तो क्षण वाया घालवायला मी मूर्ख नाही... “
असे म्हणून केदारने तिला मिठीत ओढले .पण ती बेसावध असल्याने ते दोघे बेडवर पडले .रेवती म्हणाली...
“अरे काय हे मी पडेन ना?”
--------------------------------------------------------------------------
(क्रमशः)
हे काय चाललं आहे?केदार
हे काय चाललं आहे?केदार विवाहित आहे हे विसरून सगळे त्याला रेवती कसा स्वीकार करेल वगैरे च्या आयडिया देतायत.
आता मला कथा हाती घेऊन मीनाक्षी चे प्रेमळ उमद्या ज्वेलरी स्टोअर च्या मालकाशी ऋणानुबंध जुळवावे लागणार असे दिसतेय ☺️☺️☺️
जोकिंग हां.कथा मस्त चालू आहे.आज 2 भाग टाकले म्हणजे पुढचा आता उद्या टाकाल.प्रतीक्षेत.
बहुतेक मुतालिक नी केदार ला दिलेल्या गोळ्यांत विष असेल.
अपेक्षेप्रमाणे पुढे सरकवला हा
अपेक्षेप्रमाणे पुढे सरकवला हा भाग.. good.
@मीअनु सहमत
खूप धन्यवाद भराभर भाग टाकलेत
खूप धन्यवाद भराभर भाग टाकलेत म्हणून. आता उद्या टाकणारे का पुढील भाग?
मस्त आहे आजचा भाग. पु. ले. शु.
ऑ
ऑ

वा.. कथा बरीच पुढे सरकली..
वा.. कथा बरीच पुढे सरकली.. आत्ताच ४ भाग वाचले..

मीनाक्षीचे काही लफडे दाखवता की काय आता ??? आणि युवराजांचे काय??
या केदारचा मर्डर दाखवला,
या केदारचा मर्डर दाखवला, तरीही आता माझी काही हरकत नाही.

मी सुरुवतीपासून या कथेला फॉलो
मी सुरुवतीपासून या कथेला फॉलो करतीये. पण केदारचे कॅरॅक्टर खुप कन्फ्युजिंग वाटतेय. इकडे तर बायको वर प्रेम आहे आणि इकडे तर त्याला रेवती बरोबर पण रहायच आहे. मग तो उगाच ही सगळी नाटक का करतोय ? ग्रे शेडच कॅरॅक्टर दाखवायचय अस असेल तर ते इतक नीट डिफाईन नाह्ही झालय अस वाटतय.
असो. वाचत रहाणारच पुढे . मग कदाचीत क्लीअर होईल.