मॅरेज Mystique ! ( भाग १७ )

Submitted by र. दि. रा. on 19 May, 2019 - 12:11

भाग १६ चा धागा : https://www.maayboli.com/node/70000

भाग १७ :

केदार पहिल्या रुममध्ये जाऊन झोपला.पण त्याला कितीतरी वेळ झोप येईना .मिनाक्षी का आली असावी या बद्दल तो तर्क वितर्क करत होता.ती आली म्हणजे त्याला घेऊन जाण्यासाठीच आली असावी. दुसरे काही कारण नव्हते. सकाळ होताच तो लवकरच हॉलमध्ये आला. थोडा वेळ वाट पाहिल्यावर मिनाक्षी bag घेऊन खाली आली.त्याच्या समोरच्या सोफ्यावर बसली. तो म्हणाला “अचानक आलीस .तुला बघून मी चाटच पडलो “

“हो अचानक आले .कळवायला वेळच मिळाला नाही.”

“माझ्या बद्दल काही चर्चा आहे का?”

”तुमच्या बद्दल काय चर्चा करायची आहे?”

तेवढ्यात शिवराम चहा घेऊन आला.दोघे काही न बोलता चहा घेऊ लागले.तोच वहिनीसाहेब आल्या तिच्या जवळ बसल्या...

“झोप लागली का. कधी कधी नवीन जागी झोप येत नाही.”

“पण मला नवीन वाटलेच नाही.आपल्या घरी आल्या सारखेच वाटले.”

“बरोबरच आहे .हे तुझे माहेरच आहे.”

शिवराम पाट घेऊन आला त्याने वहिनीसाहेबाना विचारले...

“कुठे मांडू?”

“इकडे मांड. पूर्वेकडे तोंड असले म्हणजे झाले”

दरम्यान एक झायलो गाडी येऊन पोर्चमध्ये थांबली. तोवर शिवरामने ओटीचे साहित्य साडी वगैरे आणले वहिनीसाहेब म्हणाल्या...

“ये बैस इथे”

मिनाक्षी उठली पण म्हणाली...

“साडी कशाला?”.

”माहेरवाशीण ओटीला नाही म्हणते का?”

ओटीचा कार्यक्रम झाल्यावर वाहिनीसाहेबानी बऱ्याच नोटा तिच्या हातात ठेवल्या.

ती म्हणाली “आई पैसे कशाला ?”

“अग अश्वीनला ड्रेस घे”.
सगळे पोर्चमध्ये जमले.रेवती शर्मिष्ठा गीता शिवराम सगळ्यांनी मीनाक्षीला निरोप दिला .झायलो रवाना झाली.सगळे बंगल्यात गेले. केदारला आत जावेसे वाटेना.बंगल्याच्या कम्पाउन्डला नाथा माळी हेजचे कटिंग करत होता.ते पहात केदार बसून राहिला.तासाभराने रेवती आली.ती म्हणाली...

“अरे इथे का बसला आहेस ? .रुममध्ये जा.अंघोळ वगैरे उरक.”

“ ह !”

रेवती शुटींगला रवाना झाली. केदार रुममध्ये आला पण तो खूप अस्वस्थ झाला. मिनाक्षी म्हणते...

"तुमची कसली चर्चा करायची ?"

केदारचा काही प्रॉब्लेम आहे हेच ती विसरली. याचा अर्थ अण्णासाहेबांनी रचलेल्या चक्रव्युहात तो पुरा अडकला होता.या कल्पनेने त्याच्या कानशिलावरची शीर ताडताड उडायला लागली.त्याच्या डोक्यात सणक आली..तो डोके दाबत खाली बसला.त्याच्या नाकपुडीत रक्ताचा थेंब जमा झाला.त्याने बेसिन वर जाऊन तोंड धुतले. डोक्यावर गार पाणी मारले. तो बेडवर पडला. थकव्याने त्याला झोप लागली.

----------------------------------------------------------------------------------------

केदार झोपेतून उठला तेंव्हा सायंकाळचे ६ वाजले होते.दुपारचे जेवण झाले नसल्याने तो भुकेने व्याकूळ झाला.तो खाली आला....

“शिवराम काहीतरी खायला आण. फार भूक लागली.”

शिवरामने त्याला दही,थालीपीठ लोणचे असे दमदमीत खाणे दिले. चहा घेऊन तो बागेत आला. नाथाभाऊनी हेजचे कटिंगचे काम पूर्ण केले होते. ते बाकावर बसून विश्रांती घेत होते.

केदार म्हणाला...

”नाथाभाऊ सगळे कटिंग एक दिवसात पुरे केलेत की?”

“एकदा सुरु केल्यावर संपवूनच थांबायचे असते.कारण उद्या कात्री हातात धरू शकत नाही. बावळे दुखायला लागतात.”

“पण छान कटिंग केलेत.”

“मला बागेतल्या कामाची पहिल्या पासून आवड आहे” थोडा वेळ दोघेही गप्प होते. नंतर नाथाभाऊनी विचारले...

“वहिनीची दागिन्याची खरेदी झाली का?”

केदारला प्रश्नाचा संदर्भ कळला नाही. मीना कशाला दागिने खरेदी करेल? पण जी गोष्ट नाथाभाऊना माहिती आहे तीचा आपल्याला गंधसुद्धा नाही ही फारच नामुष्की झाली. तो म्हणाला...

“ अजून माझा फोन झाला नाही.”

पण मनातून तो अस्वस्थ झाला.तो लगेच रुममध्ये आला त्याने मीनाक्षीला फोन लावला .

”हॅलो ,पोहोचलीस का भद्रावतीला?”

“हो आत्ताच पोहोचले “.

”तू मुंबईला दागिने घ्यायला आली होतीस?”

“हो”

“तुला दागिने कशाला हवेत ?”

“अग बाई .रेवती तुम्हाला बोलली नाही का?”

“ते लोक मला काही सांगत नाहीत.”

“अहो दागिने म्हणजे दुकानात विक्रीला लागणारे दागिने .फॉर्मिंग ज्युवेलरी. गैरसमज दूर झाला का ?”

“आणि तू इथे घरी का आली होतीस ?”

“सांगते.दागिने निवडण्यात खूप वेळ गेला.त्यामुळे मुक्काम करण्याची पाळी आली .मालक म्हणाले हॉटेलात राहूया. वेगवेगळ्या खोल्या घेऊ.पण मला ते प्रशस्त वाटले नाही म्हणून मी रेवतीला फोन केला तर ती मला घ्यायलाच आली. झाले का सगळे क्लीअर ? मला वाटले रेवती तुम्हाला फोनवर बोलली असेल.”

“ते लोक मला काहीही सांगत नाहीत.पण तू माझ्याशी बोलत बसायला हरकत नव्हती.”

“अहो आता तुम्ही तिचे आहात.मी तुमच्या पुढे पुढे करणे शोभत नाही”.

“काही तरी बडबडू नकोस.स्टेशनवरच्या वेटिंग रूम मध्ये राहावे तसा मी इथे राहतोय.”

“काहीतरी बोलू नका .मला तरी ती माणस खूप चांगली वाटली.आणि आई तर किती दिलदार आहेत.तुम्ही का तक्रार करता तेच कळत नाही.”

“ठेवतो”.

-----------------------------------------------------------------------------------

केदार सकाळ पासून हॉलमध्ये घुटमळत होता. आज अण्णासाहेबाना गाठायचे आणि या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा असे त्याने ठरविले होते .खर म्हणजे अण्णासाहेबांशी पंगा घेतला तर रेवती नाराज होणार हे त्याला ठाऊक होते. पण आपल्या मनाची घुसमट थांबविण्याचा हा एकच मार्ग होता त्याला फार वेळ वाट पहावी लागली नाही.अण्णासाहेब हॉलमध्ये आले. पण ते अगदि सूटबूट घालून आले होते .म्हणजे ते काही महत्वाच्या कामासाठी बाहेर निघाले होते. अश्या वेळी आपण त्यांना हटकावे की नको या संभ्रमात तो पडला. पण अण्णा साहेब कोचावर निवांत बसले. ते बहुधा कोणाचीतरी वाट पाहत असवेत. शेवटी सगळी हिम्मत एकवटून तो म्हणाला...

“अण्णासाहेब थोडा वेळ आहे का ? मला बोलायचे होते.”

घड्याळाकडे पाहून अण्णासाहेब म्हणाले...

“हा बोला. अर्धा पाऊण तास तरी आहे”

”तुम्ही रेवतीचे माझ्याशी लग्न का लावले ?”‘

थोडा पॉज घेऊन अण्णासाहेब म्हणाले...

“मी किंवा रेवा कोणीच अंधश्रध्द नाही.फक्त मी दबावाला बळी पडलो एवढच. मी तुम्हाला सगळ सविस्तर सांगतो .पूर्वी पुराणात एक कथा सांगत.एक राजा होता त्याला मुलगी झाली .ज्योतिषानी तिला जंगलात सोडून या असे सांगितले. आमचाही तसाच प्रकार झाला. आम्हाला ज्योतिषांनी सांगितले की तुम्ही आणि रेवती एका घरात राहू नका .हा सल्ला मुंबईसारख्या शहरात परवडणारा नव्हता .शिवाय रेवती एकटी रहायला लागली तर तिच्या बद्दल नाही नाही त्या वावड्या उठल्या असत्या . मग त्यावर उपाय सांगितला की लग्नानंतर मुलगी परक्याची होते. ती तुमची मुलगी रहात नाही. हा सल्ला ऐकून आम्ही तिच्या लग्नाचा घाट घातला .आता तुम्ही प्रश्न विचाराल की या भाकड कथेवर विश्वास का ठेवला ? .तर ज्यांनी आम्हाला हा सल्ला दिला ते वयाने , मानाने ज्येष्ठ होते.आमच्यावर त्यांचे उपकार होते . त्यांना आम्ही दुखवू इच्छित नव्हतो. तरीही मी या प्रकाराला विरोध केला.पण ते म्हणाले करून पाहायला काय हरकत आहे ? म्हणून आम्ही त्यांच्या दबावाला बळी पडलो आणि रेवतीच्या लग्नाचा उपद्व्याप केला . पण नंतर एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असे निराळेच गुंते होत गेले. आम्ही लग्नाचा प्रयोग करून चुकल्यानंतर एक जाणकार म्हणाले लग्नाचा खटटोप कशाला केला.? मुलगी दत्तक दिली असती तर साधेसोपे झाले असते. पण ही पश्चातबुद्धी झाली. आता असे वाटते की त्यावेळी आमच्या हातून घिसाड घाई झाली.”

“अण्णासाहेब मी मान्य करतो की कारणपरत्वे आपण देवदेवस्कीच्या आहारी जातो. पण जग्गूसाहेब म्हणाले होते की हे सगळे गोपनीय राहील.मग रेवतीने मिटींगमध्ये येऊन लग्न झाल्याचे जाहीर का केले. उलट मी तिला सोडून निघून गेलो असा कांगावा केला”

“मी तुम्हाला सगळे सविस्तर सांगतो.तुम्ही आम्ही गुप्तता पाळायचा पूर्ण प्रयत्न केला .पण नोकर मंडळीनी एकाने दुसऱ्याला सांगत गेल्यामुळे बातमी सगळीकडे पसरली. फिल्म इंडस्ट्रीत बियाणी म्हणून एक बडी असामी आहे .त्यांनी रेवतीला बोलावून विचारले की तू लग्न केल्याची बातमी लपवून का ठेवलीस त्यामुळे तुझ्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण होतो . तू पत्रकार परिषद घेऊन लग्न डिक्लेअर कर. आता पत्रकार परिषद घ्यायची तर वधू वर दोघे पाहिजेत. मग तुम्हाला विनंती करून, पत्रकार परिषदेला राजी करावे म्हणून आम्ही चौकशी केली तेंव्हा कळले की तुम्ही विवाहित आहात म्हणजे तुम्ही पत्रकार परिषदेला येण्याची शक्यता नाही.असा घोटाळा झाला.”

“आणि कोर्ट केस करण्याचे कारण काय ?”

“तो एक निराळा घोटाळा आहे. तुम्ही विवाहित आहात हे कळल्यावर रेवती जग्गुला म्हणाली तू काय चौकशी केलीस ? माझ्या साठी बिजवर निवडलास ? झाले ,जग्गुला राग आला.तो केळकर वकीलाकडे गेला. म्हणाला आम्हाला केदारने फसविले आहे म्हणून केस करायची आहे..केळकर वकील म्हणाले त्याला केस करायचा अधिकार नाही .केस फक्त कर्णिक कुटुंबातील व्यक्ती करू शकते. केळकर वकीलासह जग्गू आमच्या घरी आला. आम्ही जग्गुला पटवण्याचा प्रयत्न केला की केस करायची गरज नाही. नाहीतरी लग्न खोटे खोटे आहे.मग प्रथम वर काय आणि बिजवर काय ? काय फरक पडतो.?”

“पण कोर्ट केस तर तुम्ही केलीच ना ?”

“ जग्गूची समजूत काढण्याचे भरात मी बोलून गेलो की केदार बिजवर आहे हा काही प्रॉब्लेम नाही. लग्न डिक्लेअर कसे करायचे हा खरा प्रॉब्लेम आहे.”

केळकर वकील म्हणाले केदारवर फसवणुकीची केस न करता नांदवत नाही अशी केस करू या. म्हणजे केदारला शिक्षा काही होणार नाही .दोन तारखा चालवून तडजोड करून केस मिटवून टाकू. आणि कोर्टातच पत्रकार परिषद घेऊन लग्नाला पब्लीसिटी देऊन टाकू .पब्लीसिटी हा शब्द ऐकताच जग्गू नाचायला लागला .त्याला ही कल्पना फारच आवडली. आणि झालेही तसेच रेवतीने पत्रकार परिषद चांगली घेतली. रेवतीबद्दल जनमत चांगले झाले

“अहो,अण्णासाहेब हे तुम्ही मला बोलला असतात तर माझा मनस्ताप वाचला असता”

“ छे:छे: बोलतोय कसले.? एखाद्या कलाकाराने न्याय संस्थेचा पब्लीसिटीसाठी वापर करणे हा मोठाच गुन्हा आहे.रेवतीला या बद्दल शिक्षा होईलच, पण त्याआधी मेडिया वाले तिची छी:थू करतील. आत्ता सुद्धा मी बोलणार नव्हतो.पण आता मला तुमच्याबद्दल विश्वास वाटतोय म्हणून सांगितले.”

“आणखी एक शंका राहिली.विचारू का ?”

अण्णासाहेबांनी घड्याळाकडे पाहून म्हटले...
“विचारा”

“आईसाहेबांचा माझ्यावर राग का आहे ?”

“तुमच्या शालेय भाषेत उत्तर देतो.याला कार्यकारणभाव असे शास्त्रीय नाव आह .म्हणजे आपल्या अंगावर फांदी पडली तर आपण झाड तोडायला निघतो. फांदी का पडली तर ती झाडाला होती म्हणून !. तसे रेवतीने हे लग्न का केले तर या खोट्या लग्नाला तुम्ही होकार दिला म्हणून ? ती स्व:तच्या मुलीचा राग करू शकत नाही. त्यामुळे तो राग तुमच्यावर निघतोय “ .

“अण्णासाहेब किती कॉम्पलीकेटेड झालय सगळ ? यातून बाहेर पडायचा मार्ग कोण आणि कसा काढणार ?”

“आहे माझ्या लक्षात..मी जे केलंय ते मी निस्तरीन. मी या गोष्टीवर सतत विचार करत असतो . जरा चांगला पर्याय सापडेल म्हणून मी वाट पाहतोय. आणि सध्या कामाचा व्याप फार आहे त्यातून जरा उसंत मिळूद्या .मी करतो तरी.”

एवढ्यात एक मध्यम वयीन दाम्पत्य घरात आले.

“नमस्कार अण्णासाहेब .आम्हाला उशीर झाला का ”.

“चालते हो .पंधरावीस मिनिटे इकडे तिकडे होणार.”

“चला मग निघूया “

“ चहा तरी घेऊ ,मग निघू “

“चहा नको. आपल्यामुळे उशीर नको.आता निघूया ”

ती मंडळी त्यांच्या कामाला रवाना झाली.

केदार विचारात पडला.अण्णासाहेब काही खरे काही खोटे बोलत होते हे स्पष्ट दिसत होते. हे प्रकरण इतके साधे सोपे नसणार.

----------------------------------------------------

केदारने वरळीच्या स्मॉल फिगर्स कंपनीत फोन लावला...

“Hallow madam, मी केदार रानडे बोलतोय. मी टीम लीडर पोस्टसाठी अर्ज केलाय.जरा बघता का ?”

“तुमचा बायोडाटा अक्सेप्ट झालाय .पण तुम्ही इमेल अड्रेस दिलेला नाही.मोबाईल नंबर नाही.मी कळवणार कसे ?”

“sorry madam .मला इंटरव्हयूला बोलावलेय का?”

“हो चौदा तारखेला अकरा वाजता या”

“thank you madam”

केदार सटपटला. त्याच्या हाताशी फक्त पाच दिवस होते.आता दररोजची वर्तमानपत्रे नीट वाचली पाहिजेत जेणेकरून current topics वर काही विचारले तर सांगता आले पाहिजे सूट ड्रायक्लीन करून आणला पाहिजे. जे आजवर टाळले ते त्याला आज करावेच लागणार होते .ते म्हणजे रेवतीकडे पैसे मागावे लागणार होते. बरोबर आणलेले पैसे किरकोळ गोष्टीवर खर्च झाले होते. तरीही त्याला उल्हसित वाटत होते कारण ही नोकरी मिळाली तर तो अण्णासाहेबांच्या पंज्यातून सुटणार होता.

----------------------------------------------------------------------------------------

रेवतीचे लवकर आवरले म्हणून ती आईला भेटायला किचनमध्ये गेली.आई म्हणाली...

“रेवा किती दगदग करतेस? जीवाला काही विश्रांती हवी का नको.”

“अजून चार पाच महिने धावपळ आहे. नंतर कोणतेही नवीन contract sign केले नाही. हे संपल्यावर दोन महिने आराम करणार आहे.”

“बरोबर आहे.गेल्या सहा महिन्यात तुझी फार ओढाताण झाली”

“जग्गू बियाणी सराना शब्द देवून बसला .त्यामुळे मला तिसरी फिल्म करावी लागली.”

“बाकी बर चाललय ना”.

”हो.काम खूप आहे.पण मजाही येतेय”

“केदारचे बरे चाललय ना?”

“ह.खर म्हणजे त्याचे सगळे ठीक आहे . पण त्याला unhappy रहायची सवय आहे. बऱ्याचदा वैतागलेला असतो “

“काय करायच?”

थोडे थांबून त्या म्हणाल्या...

“रेवा मी काय म्हणते नाहीतरी तुझे केदारशी लग्न झालेले आहेच .तर आता त्याला स्वीकारायला काय हरकत आहे?”

“हे तुला शमाने सांगितले वाटत”

”शमा म्हणते म्हणून नाही.मला सुद्धा तसच वाटत.नाही तर हा गुंता कसा सोडवणार आहात?”

“हे सगळे अण्णांनी निस्तरायचे आहे . नवऱ्याबद्दल माझ्या खूप अपेक्षा आहेत. इतक्या सामान्य माणसाबरोबर मी संसार करू शकणार नाही”.

”बरोबर आहे बाई तुझे . पुन्हा नाही सुचवणार”

----------------------------------------------------------------------

( क्रमश: )

Group content visibility: 
Use group defaults

बरोबर श्रद्धा.
नेक्स्ट एपिसोड मध्ये रेवतीची फॅमिली हा मॅटर डिसकस करतेय असा दाखवा. केदार ला नाही किमान वाचकांना तरी कळू द्या काय चालूये ते.

श्रद्धा +१११११११
सुरुवातीला एक मोठं षडयंत्र असेल असं वाटून खूप उत्सुकता वाढली होती, पण...
हळूहळू विरस व्हायला लागला. युवराज आल्यावर अपेक्षा थोड्या पल्लवित झाल्या, पण पुन्हा एक सासू सून ड्रामाटाईप वाटायला लागलं.
असो, आता पाणी न घालता कथानक संपवण हेच उत्तम.
तरीही शेवटी धागे कसे जुळतात याची उत्सुकता आहेच.
अवांतरः काही भागापासून केदारच कॅरेक्टर गंडतय असं वाटत होतं, पण काहीतरी ट्विस्ट असेल म्हणून वाट बघत होतो.
आता गंडलेलं आहेच असं समजावं काय? त्याबरोबर आज मिनाक्षीही गंडलेली वाटली.

"ही कथा कादंबरी स्वरूप म्हणजे बऱ्यापैकी मोठी म्हणजे पंधरा ते सोळा भागांची आहे. तसेच ही एक " गूढ कथा " आहे. "

१७ भाग तर झाले. अजून किती भाग शिल्लक आहेत.

संपवा लवकर. रटाळ होउ लागलिये. रोज एक भाग नेमाने टाकत आहात त्याबद्दल मात्र अभिनंदन. मायबोलिवर क्रमश: सुरु करुन अर्धवट सोडुन दिलेल्या अनेक कथा आहेत. कृपया ही कथा पुर्ण करा. शेवट काय आहे याची उत्सुकता आहे.