कादंबरीकार!

Submitted by अज्ञातवासी on 16 May, 2019 - 12:18

'रुळाजवळ त्याचा देह कित्येक वेळापासून पडून होता, अचेत, निष्प्राण!!!
एक दोनदा काही कुत्री त्याला हुंगून गेली, जिवंतपणाचं काहीही लक्षण दिसत नव्हतं.
कचरा गोळा करणारी पोरं त्याच्यापाशी आली, त्यांनी त्याच्या खिशात कुणी आपल्याला बघत नाही तर नाही ना, असं बघून हात घातला.
पाकिटातल्या दोन हजाराच्या चोवीस नोटा बघून तर त्यांना लॉटरी लागल्यासारखच झालं. त्यावरून त्यांची मारामारी चालू झाली.
प्रत्येकाची काही स्वप्ने होती, आणि या नोटा त्यांची चावी.
बाजूला पडलेले कागद मात्र कुणालाही उचलावे वाटले नाहीत...'
रॉयल प्रकाशनच्या पिंगेलनी पुस्तक खाली ठेवलं.
समोर श्रीधरराव सिगारेटचे झुरके घेत निवांत रेलले होते.
"श्रीधरराव मानलं, मानलं तुम्हाला श्रीधरराव... मागच्या दोन कादंबऱ्या फ्लॉप गेल्यावर सालं वाटलं नव्हतं तुम्ही इतकं जबरदस्त कमबॅक कराल, अपेक्षा नव्हती. आणि काय लिहलंय, जबरदस्त... कथेत कथा, आयुष्यभर फिरून लेखक पुस्तकाचा शेवट करतो काय, आणि सेम टू सेम त्याचाही शेवट होतो. वा!"
श्रीधरराव मंद हसले. त्यांनी अजून एक सिगारेट पेटवली.
"पिंगेल, काय आहे, या नवलेखकांच्या लाटेत श्रीधर संपला, किंबहुना संपवायचाच, असा घाट घातला होत्या त्या साल्या विकाऊ समीक्षकांनी! आता बसलेत मूग गिळून!"
"कादंबरीच तशी आहे, नायक श्रीकांत पाटील, त्याच्या कादंबरीच्या नायकाचा शेवट तो रुळाच्या बाजूला मरून पडला असा करतो, आणि त्याचाही शेवट तसाच होतो. गूढ, थ्रिलर, वा, आणि कादंबरीच नावही जबरदस्त, 'कादंबरीकार!'"
"बस प्रकाशकसाहेब, फक्त कौतुकच करणार आहात की..."
"अहो, असं कसं," म्हणत पिंगेलनी बावन्न हजार रुपये त्यांच्या हातावर टेकवले.
"चला निघतो मी."
ट्रेनमध्ये श्रीधरराव स्वतःशीच विचार करत बसले.
"सालं नशीब भारी आहे आपलं. सरस्वतीपुत्रच आपण, काय कमी असणार? पण महिनाभरापूर्वी रहमानच्या जुन्या रद्दीच्या दुकानात हे बाड सापडलं नसतं तर..."
श्रीधररावानी लगेच हा विचार झुरळासारखा झटकून टाकला.
ट्रेन अचानक थांबली. कितीतरी वेळ झाला, तरी सुरू व्हायचे नाव घेईना
'अर्धा किलोमीटरच तर आता घर असेल. चला चालत जाऊयात,' म्हणून श्रीधरराव ट्रेनमधून खाली उतरले.
चालता चालता रुळाजवळच्या एका दगडाची त्यांना ठेच लागली.
आणि त्यांचा देह रुळाजवळ कोसळला!!!
रुळाजवळ त्यांचा देह कित्येक वेळापासून पडून होता, अचेत, निष्प्राण.
एक दोनदा काही कुत्री त्यांना हुंगून गेली, जिवंतपणाचं काहीही लक्षण दिसत नव्हतं.
कचरा गोळा करणारी पोरं त्याच्यापाशी आली, त्यांनी त्याच्या खिशात कुणी आपल्याला बघत नाही तर नाही ना, असं बघून हात घातला.
पाकिटातल्या दोन हजाराच्या २६ नोटा मोजून तर त्यांना लॉटरी लागल्यासारखच झालं.
बाजूला पडलेली कादंबरी मात्र कुणालाही उचलाविशी वाटली नाही!!!
-----------------------------------
महिनाभरापूर्वी.....
तो अतिशय खुशीत होता, त्याची पहिली कादंबरी प्रकाशित करण्याचं त्याला आर्त प्रकाशनाकडून लेटर मिळालं होतं.
त्याचेच पन्नास हजार घेण्यासाठी तो आज ऑफिसला आला होता. मात्र त्याला प्रकाशक रावसाहेब मोहिते सुटीवर असल्याने त्याच्या दुसऱ्या कादंबरीच बाड त्यांना दाखवता आलं नाही.
तो खुशीत ट्रेनमध्ये बसला. थोडं दूर जाऊन ट्रेन एका ठिकाणी थांबली. कितीतरी वेळ झाला तरी ट्रेन सुरू व्हायचं नाव घेईना.
'चल आता इथून उतरून पडावं. पाच दहा मिनिटं चाललं तरी रिक्षा मिळेल. तिथून घरी जाता येईल,' असा विचार करून तो खाली उतरला.
आणि रुळाजवळच्या एका दगडाची ठेच लागून तो खाली पडला!!!
रुळाजवळ त्याचा देह कित्येक वेळापासून पडून होता, अचेत, निष्प्राण.
एक दोनदा काही कुत्री त्याला हुंगून गेली, जिवंतपणाचं काहीही लक्षण दिसत नव्हतं.
कचरा गोळा करणारी पोरं त्याच्यापाशी आली, त्यांनी त्याच्या खिशात कुणी आपल्याला बघत नाही तर नाही ना, असं बघून हात घातला.
पाकिटातल्या दोन हजाराच्या पंचवीस नोटा बघून तर त्यांना लॉटरी लागल्यासारखच झालं. त्यावरून त्यांची मारामारी चालू झाली.
बाजूला पडलेल बाड मात्र कुणालाही उचलावसं वाटलं नाही!

Group content visibility: 
Use group defaults

अप्रतिम.. डोक्याला खुराक मिळाला. खरं सांगायचं झाल्यास कथा वाचून मन प्रसन्न झालं.. आणि कमी शब्दांमध्ये थ्रिलर horror कथा लिहीन फारस सोपं नसतं पण तुम्हाला ते जमलंय.. येऊ द्या अजून अशाच कथा Happy

उर्मिला थँक्स.
एमी थँक्स.
@मीरा - नाही, ती नोटांची संख्या आहे, कथा कुठल्या स्टेपला आहे, हे दाखविण्यासाठी... ती हींट होती एक, कथा समजण्यासाठी. धन्यवाद!
धन्यवाद शुभांगी, तुमचा प्रतिसाद बघून नेहमी मन प्रसन्स होतं.

Pages