कादंबरीकार!

Submitted by अज्ञातवासी on 16 May, 2019 - 12:18

'रुळाजवळ त्याचा देह कित्येक वेळापासून पडून होता, अचेत, निष्प्राण!!!
एक दोनदा काही कुत्री त्याला हुंगून गेली, जिवंतपणाचं काहीही लक्षण दिसत नव्हतं.
कचरा गोळा करणारी पोरं त्याच्यापाशी आली, त्यांनी त्याच्या खिशात कुणी आपल्याला बघत नाही तर नाही ना, असं बघून हात घातला.
पाकिटातल्या दोन हजाराच्या चोवीस नोटा बघून तर त्यांना लॉटरी लागल्यासारखच झालं. त्यावरून त्यांची मारामारी चालू झाली.
प्रत्येकाची काही स्वप्ने होती, आणि या नोटा त्यांची चावी.
बाजूला पडलेले कागद मात्र कुणालाही उचलावे वाटले नाहीत...'
रॉयल प्रकाशनच्या पिंगेलनी पुस्तक खाली ठेवलं.
समोर श्रीधरराव सिगारेटचे झुरके घेत निवांत रेलले होते.
"श्रीधरराव मानलं, मानलं तुम्हाला श्रीधरराव... मागच्या दोन कादंबऱ्या फ्लॉप गेल्यावर सालं वाटलं नव्हतं तुम्ही इतकं जबरदस्त कमबॅक कराल, अपेक्षा नव्हती. आणि काय लिहलंय, जबरदस्त... कथेत कथा, आयुष्यभर फिरून लेखक पुस्तकाचा शेवट करतो काय, आणि सेम टू सेम त्याचाही शेवट होतो. वा!"
श्रीधरराव मंद हसले. त्यांनी अजून एक सिगारेट पेटवली.
"पिंगेल, काय आहे, या नवलेखकांच्या लाटेत श्रीधर संपला, किंबहुना संपवायचाच, असा घाट घातला होत्या त्या साल्या विकाऊ समीक्षकांनी! आता बसलेत मूग गिळून!"
"कादंबरीच तशी आहे, नायक श्रीकांत पाटील, त्याच्या कादंबरीच्या नायकाचा शेवट तो रुळाच्या बाजूला मरून पडला असा करतो, आणि त्याचाही शेवट तसाच होतो. गूढ, थ्रिलर, वा, आणि कादंबरीच नावही जबरदस्त, 'कादंबरीकार!'"
"बस प्रकाशकसाहेब, फक्त कौतुकच करणार आहात की..."
"अहो, असं कसं," म्हणत पिंगेलनी बावन्न हजार रुपये त्यांच्या हातावर टेकवले.
"चला निघतो मी."
ट्रेनमध्ये श्रीधरराव स्वतःशीच विचार करत बसले.
"सालं नशीब भारी आहे आपलं. सरस्वतीपुत्रच आपण, काय कमी असणार? पण महिनाभरापूर्वी रहमानच्या जुन्या रद्दीच्या दुकानात हे बाड सापडलं नसतं तर..."
श्रीधररावानी लगेच हा विचार झुरळासारखा झटकून टाकला.
ट्रेन अचानक थांबली. कितीतरी वेळ झाला, तरी सुरू व्हायचे नाव घेईना
'अर्धा किलोमीटरच तर आता घर असेल. चला चालत जाऊयात,' म्हणून श्रीधरराव ट्रेनमधून खाली उतरले.
चालता चालता रुळाजवळच्या एका दगडाची त्यांना ठेच लागली.
आणि त्यांचा देह रुळाजवळ कोसळला!!!
रुळाजवळ त्यांचा देह कित्येक वेळापासून पडून होता, अचेत, निष्प्राण.
एक दोनदा काही कुत्री त्यांना हुंगून गेली, जिवंतपणाचं काहीही लक्षण दिसत नव्हतं.
कचरा गोळा करणारी पोरं त्याच्यापाशी आली, त्यांनी त्याच्या खिशात कुणी आपल्याला बघत नाही तर नाही ना, असं बघून हात घातला.
पाकिटातल्या दोन हजाराच्या २६ नोटा मोजून तर त्यांना लॉटरी लागल्यासारखच झालं.
बाजूला पडलेली कादंबरी मात्र कुणालाही उचलाविशी वाटली नाही!!!
-----------------------------------
महिनाभरापूर्वी.....
तो अतिशय खुशीत होता, त्याची पहिली कादंबरी प्रकाशित करण्याचं त्याला आर्त प्रकाशनाकडून लेटर मिळालं होतं.
त्याचेच पन्नास हजार घेण्यासाठी तो आज ऑफिसला आला होता. मात्र त्याला प्रकाशक रावसाहेब मोहिते सुटीवर असल्याने त्याच्या दुसऱ्या कादंबरीच बाड त्यांना दाखवता आलं नाही.
तो खुशीत ट्रेनमध्ये बसला. थोडं दूर जाऊन ट्रेन एका ठिकाणी थांबली. कितीतरी वेळ झाला तरी ट्रेन सुरू व्हायचं नाव घेईना.
'चल आता इथून उतरून पडावं. पाच दहा मिनिटं चाललं तरी रिक्षा मिळेल. तिथून घरी जाता येईल,' असा विचार करून तो खाली उतरला.
आणि रुळाजवळच्या एका दगडाची ठेच लागून तो खाली पडला!!!
रुळाजवळ त्याचा देह कित्येक वेळापासून पडून होता, अचेत, निष्प्राण.
एक दोनदा काही कुत्री त्याला हुंगून गेली, जिवंतपणाचं काहीही लक्षण दिसत नव्हतं.
कचरा गोळा करणारी पोरं त्याच्यापाशी आली, त्यांनी त्याच्या खिशात कुणी आपल्याला बघत नाही तर नाही ना, असं बघून हात घातला.
पाकिटातल्या दोन हजाराच्या पंचवीस नोटा बघून तर त्यांना लॉटरी लागल्यासारखच झालं. त्यावरून त्यांची मारामारी चालू झाली.
बाजूला पडलेल बाड मात्र कुणालाही उचलावसं वाटलं नाही!

Group content visibility: 
Use group defaults

मस्त
त्या नोटांच्या संख्येत काही pattern आहे का? 25, 24 आणि 26?

मस्त कथा. हस्तलिखित 'सापळ्याचे किंवा चाऱ्याचे' काम करतेय वाटते. भारी. आवडली कथा.
महत्वाचे म्हणजे तुमची ही कथा समजली. माझे बटरफ्लाय नाही झाले. Wink
(पिक्चर आठवत नाही पण अशीच एक डायरी समुद्रावर वाळूत पडलेली असे.)

सुंदर कथा, मला तुमची ही कथनशैली नुसते संवादातून कथा साकारण्यापेक्षा जास्त भावली.

मन्याऽ बरोबर. लक्षात येत नव्हते.

अज्ञातवासी, नातीगोतीचा पुढील भाग येऊद्या लवकर. मी वाचतोय तो.

एक च नंबर !
भारीये हा ट्रॅप... Wink
शाली दा, मला पण ती च ष्टोरी आठवलि, दस कहानिया मधली

@L Lawliet - प्रतिसादासाठी धन्यवाद. २४, २५, २६ आणि कागद, बाड, कादंबरी हा क्रम वाचला, तर नक्कीच लक्षात येईल. Wink पुन्हा एकदा वाचून बघा, बरेच गुंते टाकलेत, अजून मजा येईल.
@चरप्स - धन्यवाद.
@सिद्धी - तसलं काहीही नाही आहे हो या कथेत. Lol प्रतिसादासाठी धन्यवाद.
@ मन्या - थांकू
@श्रद्धा - थँकू
@ शालिदा - हस्तलिखित, की अजून काही? Wink धन्यवाद
आणि नातीगोतीआधी पाटील पूर्ण करतो, ती अंतिम टप्प्यात आहे. मग मला काही आठवत नाहीये आणि नातीगोती संपवतो. पुढचा प्लॅन यु नो (महाकादंबरी Wink
दस कहानिया चित्रपट ऐकून होतो, २६ कलाकारांचा मल्टिस्टारर चित्रपट अशी जाहिरात करण्यात आली होती. चांगला आहे का? बघावा वाटतोय.
@प्रसन्न - धन्यवाद!

चांगला आहे मुवी पण साउथ सारखा जबरदस्त नाहिए.
वेगवेगळ्या 10 स्टोरी आहेत.ज्यांचा एकमेकींशी अजिबातच संबंध नाही,यामुळं कदाचित तुला बोर होऊ शकतं.

चांगला आहे मुवी पण साउथ सारखा जबरदस्त नाहिए.
वेगवेगळ्या 10 स्टोरी आहेत.ज्यांचा एकमेकींशी अजिबातच संबंध नाही,यामुळं कदाचित तुला बोर होऊ शकतं.

Submitted by मन्या ऽ on 17 May, 2019 - 13:57
>>>>>
बोर होण्याची शक्यता वर्तवल्यामूळे बघण्याचा विचार बाद.

धन्यवाद पद्म!

"..वेगवेगळ्या 10 स्टोरी आहेत.ज्यांचा एकमेकींशी अजिबातच संबंध नाही,यामुळं कदाचित तुला बोर होऊ शकतं"....... ह्म्म !!!
कहि काहि गोष्टी बोअर आहेत, किंवा मी म्हणीन त्यांची मांडणी बोअर आहे किंवा फसली आहे. पण काहि काहि गोष्टी फारच जमुन आल्या आहेत..
लव्ह्डेल, पूरनमाशी, गुब्बारे, राइस-प्लेट आणि ही अशीच ष्टोरी असलेली मला वाटतं सेक्स ऑन दी बीच नाव आहे त्या कथे चं ह्या एकदम जमल्या आहेत.
@अज्ञातवासी बघा तुम्ही, आवड्तील तुम्हाला १० कहानिया !

लव्ह्डेल, पूरनमाशी, गुब्बारे, राइस-प्लेट आणि ही अशीच ष्टोरी असलेली मला वाटतं सेक्स ऑन दी बीच>>>
धन्यवाद प्रसन्न. एवढ्याच बघतो, जर नावे असतील सुरुवातीला....
राइस-प्लेट - अशीच काहीतरी गोष्ट वाचलेली वाटतेय. एक माणूस हॉटेलात जातो, तर त्याच्याच ताटात दुसरा माणूसही जेवायला येऊन बसतो. हा खुप चिडतो, पण दया म्हणून त्या माणसाला थोडी पोळी भाजी देतो.
तो माणूस ती खाऊन हसून निघून जातो, पण नंतर कळतं की त्याची ऑर्डर आलीच नव्हती, तर ती प्लेट त्या माणसाची होती.
अशीच काहीतरी होती!

अज्ञातवासी -
- कथा तर आहेच ना ही पण व्यथा यासाठी म्हणाले,
पाकिटातल्या दोन हजाराच्या पंचवीस नोटा बघून तर त्यांना लॉटरी लागल्यासारखच झालं. त्यावरून त्यांची मारामारी चालू झाली.
बाजूला पडलेल बाड मात्र कुणालाही उचलावसं वाटलं नाही!

- काही होवो जिथे तिथे आपला स्वार्थ बघने हिच तर समाजाची व्यथा आहे.

अज्ञा,तो मुवी 'एकदाच बघावा' टाईपचा आहे.तुला साऊथच्या मुवी सारखा अँक्शन मसाला यात अजिबात बघायला मिळणार नाही म्हणून कदाचित बोर होऊ शकत.पण 10 हि स्टोरीज खुप चांगल्यात.

ही कथा मी तीनचार वेळा तरी वाचली. पण २४,२५,२६ मागचा गुंता काय कळला नाय.

कथा वाचताना व्हॉल्डेमॉर्टच्या डायरीची आणि दुसर्‍या कथेतल्या AI वाल्या फोनची आठवण झाली.

आवडली कथा, छान लिहिली आहे. मलाही दस कहानिया मधली sex on the beach कथा आठवली, पण तुमची कथा त्या कथेपेक्षा जास्त इंटरेस्टिंग वाटली.

अज्ञातवासी -
- कथा तर आहेच ना ही पण व्यथा यासाठी म्हणाले,
पाकिटातल्या दोन हजाराच्या पंचवीस नोटा बघून तर त्यांना लॉटरी लागल्यासारखच झालं. त्यावरून त्यांची मारामारी चालू झाली.
बाजूला पडलेल बाड मात्र कुणालाही उचलावसं वाटलं नाही!
- काही होवो जिथे तिथे आपला स्वार्थ बघने हिच तर समाजाची व्यथा आहे.
Submitted by 'सिद्धि' on 17 May, 2019 - 16:29
>>>>>>>
सिद्धी हा अँगल लक्षातच आला नव्हता माझ्या... चला, माझ्या लेखणीत हीसुद्धा ताकद आहे की Wink धन्यवाद...

लई भारी
Submitted by urmilas on 17 May, 2019 - 16:28
>>>>>>>
धन्यवाद उर्मिला.

अज्ञा,तो मुवी 'एकदाच बघावा' टाईपचा आहे.तुला साऊथच्या मुवी सारखा अँक्शन मसाला यात अजिबात बघायला मिळणार नाही म्हणून कदाचित बोर होऊ शकत.पण 10 हि स्टोरीज खुप चांगल्यात.
Submitted by मन्या ऽ on 17 May, 2019 - 18:13
>>>>
मन्या स्टोरीज चांगल्या असतील तर बघायला हरकत नाही. कास्ट बघून बरीचशी दगडे आणि थोडीशी रत्ने दिसतायेत Wink

ही कथा मी तीनचार वेळा तरी वाचली. पण २४,२५,२६ मागचा गुंता काय कळला नाय.
कथा वाचताना व्हॉल्डेमॉर्टच्या डायरीची आणि दुसर्‍या कथेतल्या AI वाल्या फोनची आठवण झाली.
Submitted by भरत. on 17 May, 2019 - 18:31
>>>
भरत धन्यवाद. सोडवतो गुंता

मलापण नाही कळलं ते 24,25,26 Uhoh
Submitted by मेघा. on 17 May, 2019 - 19:52
>>>>>
मेघा इज बॅक. धन्यवाद

खूप आवडली. मस्त जमलीये
Submitted by रोहिणी निला on 19 May, 2019 - 11:41
>>>>>
धन्यवाद रोहिणी

आवडली कथा.
Submitted by प्रविण राऊत on 19 May, 2019 - 17:16
>>>>
धन्यवाद प्रवीण

आवडली कथा, छान लिहिली आहे. मलाही दस कहानिया मधली sex on the beach कथा आठवली, पण तुमची कथा त्या कथेपेक्षा जास्त इंटरेस्टिंग वाटली.
Submitted by मीरा.. on 19 May, 2019 - 21:40
>>>>
धन्यवाद मीरा. दस कहानिया बघावा लागेलच आता.

मलापण नाही कळलं ते 24,25,26 + १
तसेच कागद, कादंबरी आणि बाड असा फरक आहे.
Submitted by आसा. on 19 May, 2019 - 23:23
>>>>
धन्यवाद आसा, पुढील प्रतिसादात समजावतो.

माझं स्पष्टीकरण:

जॉनर - निओ नॉयर हॉरर थ्रिलर.
प्रेरणा - प्रेरणा नाही, पण लिहून झाल्यावर इनसेप्शन आठवला. कॉमिक बुक मध्ये ब्रेकिंग द फोर्थ वॉल नावाचा प्रकार असतो, म्हणजे कथानकात वास्तवात घडणाऱ्या घटनांची सरमिसळ, त्यावरून हे कथानक लिहिलं.

आता कथा समजून घेऊयात...

या कथेत मुळात चार स्टेप आहेत.
१. श्रीधरची कादंबरी 'कादंबरीकार'
२. श्रीधरला सापडलेलं कादंबरीच बाड, जे कुणी दुसऱ्याने लिहिलंय.
३. कादंबरीचा नायक श्रीकांत पाटील जो स्वतः एक लेखक आहे.
४. त्याने चितारलेल्या कादंबरीच्या नायकाचा शेवट. रुळाच्या शेजारी पडून वगैरे.

आता ४-३-२-१ प्रमाणे याची संगती लावूयात.

४. श्रीकांतने लिहिलेल्या कादंबरीच्या नायकाचा शेवट रुळाच्या बाजूला ठेच लागून पडून होतो.
३. श्रीकांतचाही कादंबरीत तसाच शेवट होतो. (कागद - २४ नोटा)
२. ही कादंबरी अज्ञात माणसाने लिहिली त्याचाही तसाच शेवट होतो. (त्याने कादंबरीत कादंबरी लिहिली. आता २५ नोटा. एक स्टेप वाढली. कागदाच बाड तयार झालं.)
४. आणि ज्या माणसाच्या नावावर ही कादंबरी प्रकाशित होते त्याचाही तसाच शेवट होतो. (श्रीधरराव - आता २६ नोटा. अजून एक स्टेप वाढली. बाडाची कादंबरी होऊन प्रकाशित झाली.)
ही अमानवीय ताकद बाडात किंवा कादंबरीत नाही, तर माणसाच्या शेवटाच वर्णन करणारे शब्दांमध्ये आहे. ज्याच्या नावावर हे शब्द लिहिले जातात, हे शापित शब्द त्याचा ह्याच प्रकारे जीव घेतात.

म्हणून कुणीही हे लिखाण लेखकाची परवानगी न घेता आपल्या नावावर पुनर्मुद्रण करू नये....
Wink
आपला नम्र - अज्ञातवासी!

म्हणून कुणीही हे लिखाण लेखकाची परवानगी न घेता आपल्या नावावर पुनर्मुद्रण करू नये....
Wink>> Lol
पण मस्त explain केलं.

Pages