लव्ह इन ट्रबल भाग- 4

Submitted by स्वरांगी on 15 May, 2019 - 07:43

लव्ह इन ट्रबल भाग- ४
त्या दिवशी अनु आणि अभि दोघेच रात्री उशिरापर्यंत काम करत होते..काही आठवून अनु म्हणाली, “आता माझे इंटर्नशिपचे फक्त सात दिवस उरले!!मला एकदा तुम्हाला सगळ्यांना ट्रीट द्यायचीय.”
“ हम्म.. उद्या येताना जरा डोक्यावरून अंघोळ करून ये. मला स्वच्छ वातावरणात काम करायला जास्त आवडेल!!” अभि फाइल्स डेस्कमधून काढत म्हणाला. “हं!!तुम्हाला माहितेय सर कधीकधी मला असं वाटतं की तुम्ही माझ्या नजरेसमोरून गायब व्हावं.” अनु वैतागुन म्हणाली.
“मलाही तसंच वाटतं खूप वेळा!!” अभि शांतपणे नोट्स काढत म्हणाला. यावर अनु काहीच बोलली नाही. तीच काम पूर्ण करून ती जायला निघाली तेवढ्यात काही आठवून ती म्हणाली, “ आज तुम्ही माझ्यासाठी जे केलंत त्याबद्दल thank you!! आणि मी दिलेल्या त्रासाबद्दल sorry…”
“ इट्स ओके” अभि एवढंच म्हणाला..
अनु घरी पोचतेय तोच पार्किंगमध्ये तिला शुभम दिसला.
तिचीच वाट पाहत होता.
“ तू मुद्दाम मला दाखवण्यासाठी केलंस ना अस??” शुभम तिच्याकडे येत म्हणाला.
“ काय संबंध??” अनुने उलट प्रश्न विचारला.
“ तुझ्या मनात अजूनही माझ्याबद्दल प्रेम आहे. फक्त तू ते आत दाबून ठेवतेयस..” शुभम ठासून म्हणाला.
“ झालं तुझं??” असं म्हणून अनु वर जायला निघाली तेवढ्यात शुभमने तिचा हात पकडला. तोच अनुने त्याचा हात उलटा फिरवून मुरगळला..
“ इनफ शुभम!! माझ्या मनात तुझ्या लेखी काडीचीही किंमत नाहीये लक्षात ठेव…आणि पुन्हा माझा हात धरायचा वेडेपणा करून नको नाहीतर मीच तो तोडून तुझ्या हातात देईन..” अनुने त्याचा हात जोरात पीळला. शुभम कळवळला..
“ आणि हो! तुझं काही सामान माझ्या घरी पडलंय माझ्या.. हवं असेल तर ते घेऊन जा नाहीतर मी ते कचऱ्यात टाकणारे..” अनु त्याचा हात सोडत म्हणाली आणि त्याच्याकडे न बघता निघून गेली..

घरी जाऊन फ्रेश झाल्यानंतर झोपण्याआधी गार दूध प्यावं म्हणून अनुने फ्रिज मध्ये पाहिलं. दूध संपलेलं. ते आणायला अनु जवळच्या जनरल स्टोअर मध्ये निघाली.. तेव्हा जवळपास ११.३० वाजून गेले होते. अचानक त्या एरियातले लाईट गेले.. स्ट्रीट लाईट पण बंद झाले आणि सगळीकडे काळोख पसरला. काही फ्लॅट्स मधले लाईट सुरू होते आणि चंद्राचाच काय तो उजेड होता. मोबाईल मधला टॉर्च व करून अनघा निघाली.. ती स्टोअर पर्यंत पोचली. आणि तिने दूध पिशवी मागितली. दुकानदाराने तिच्याकडे एकवार पाहिलं आणि त्याने पिशवी आणून दिली. पैसे देऊन अनु घरी जायला निघाली. आज दिवसभराचा विचार करत ती खूप खुश झाली. अभिजितने दिलेला सल्ला आणि त्यानंतर शुभमला तिने दिलेलं चोख उत्तर. तिला सगळ्यातून सुटल्यासारखं वाटलं. ती उड्या मारतच घराकडे निघाली.. ती ज्या एरियात राहत होती तिथे ११ नंतर फारशी वर्दळ नसायची. आत्ता लाईट नसल्याने कुणीच दिसत नव्हतं. ती अर्ध्यातच पोचली तेवढ्यात तिला समोरूनच सायकल वर एक माणूस तिच्याच दिशेने येताना दिसला त्याने चेहऱ्यावर मास्क लावलेला आणि कानात इअरफोन्स अडकवलेले.. वेगाने तो समोर आला आणि अनुच्या बाजूने झपकन निघून गेला. अनुने त्याला बाजूने जाताना पाहिलं. तो खूप जवळून गेल्यामुळे तिला बारीक आवाजात तो ऐकत असलेलं गाणं ऐकू आलं. खामोशीयाँ…..
तिने एकदा मागे वळून पहिलं, त्याला जाताना पाहून तिने खांदे उडवले आणि घराकडे निघाली. तिने latch ला किल्ली लावून दार उघडलं. लाईट नसल्याने आत मिट्ट काळोख होता.. ती दारातून किचनकडे जायला निघाली तेवढ्यात ती खाली पडलेल्या एक वस्तूला अडखळून पडली.. ती कशाला अडखळली हे पहायला तिने मोबाइल टॉर्च ऑन केला आणि तिने पाहिलं.. समोर शुभम जमिनीवर पडलेला!! तिला त्याला अस पाहून धक्काच बसला..मोबाईल बाजूला टाकून तिने हलवून शुभमला उठवण्याचा प्रयत्न केला तोच तिच्या हाताला काहीतरी ओलसर लागलं.. काय लागलं ते पहावं म्हणून तिने टॉर्चसमोर हात धरला..
तिचे हात रक्ताने माखले होते.. अनघाने डोळे विस्फारले गेले..आता तिचे हात कापू लागले.. घाबरत घाबरतच तिने थरथरत्या हाताने टॉर्च जमिनीकडे वळवला आणि तिला रक्ताचे ओघळ जमिनीवरून आलेले दिसले..
शुभमचा तिच्या राहत्या घरीच कुणीतरी खून केला होता..निर्दयपणे छातीवर सुरीने वार करून आणि चाकू पोटात खोलवर खुपसून त्याला ठार मारलं गेलं.. रक्ताने माखलेल्या हातानी अनु शुभमकडे पाहत राहिली. तिने त्याला उठवायचा निष्फळ प्रयत्न केला पण शुभम हे जग सोडून केव्हाच निघून गेला होता!! शुभमच्या रक्ताचे ओघळ आता तिच्या पायापर्यंत आले होते.. ती घाबरूनच कशीबशी सरकत सरकत मागे जाऊन भिंतीला टेकली.. तीच सर्वांग घामाने भिजलं होतं.. ओठ थरथरत होते.. तिच्या तोंडातून शब्दच फुटेना.. ती खूपच घाबरलेली आणि थोड्याच वेळात परिस्थितीची जाणीव होऊन ती भयातिरेकाने जोरात किंचाळली..

अनु पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर गायतोंडेच्या समोर बसली होती. शुभमच्या खुनाच्या आरोपाखाली मुख्य संशयित आरोपी म्हणून अनुला अटक झाली होती.. अनु पूर्ण गडबडली होती..जे झालं , तिने जे बघीतलं त्यावर तिचा अजूनही विश्वास बसत नव्हता.. इन्स्पेक्टर गायतोंडे तिला धडाधड प्रश्न विचारत होते. तिच्याकडून सत्य वदवून घ्यायचा प्रयत्न करत होते पण अनुचं या कशाकडेच लक्ष नव्हतं.. तिला वारंवार रक्ताच्या थारोळ्यात निष्प्राण पडलेला शुभमच दिसत होता.. शुभम आता तिला परत कधीच दिसणार नाही या विचारानेच तिचे डोळे भरून आले..कितीही झालं तरी तिने प्रेम केलं होतं त्याच्यावर.. शुभमला अद्दल घडावी अस तिला मनापासून वाटत असलं तरी त्याचा जीव धोक्यात यावा अशी तिने कधीच कल्पना केली नव्हती…
“ मिस अनघा मी तुमच्याशी बोलतोय!!!” गायतोंडे अनुवर ओरडून म्हणाले..अनु दचकून भानावर आली आणि त्यांच्याकडे पाहू लागली. “ सांगा मला.. का खून केला तुम्ही शुभमचा??” त्यांनी पुन्हा विचारलं..
“ मी?? मी काहीच केलं नाही हो.. मला नाही माहीत हे सगळं कसं झालं,कुणी केलं..मी नाही मारलं शुभमला!!! प्लीज मला सोडा..मला जाऊद्या इथून.” अनु रडत रडत म्हणाली.
“ तुम्ही नाही मारलं तर मग कुणी मारलं सांगा??! आणि तुम्हाला कुणी सोडणार नाहीये इथून .. तुमचा वकील घेऊन या .प्रोसिजर Complete करा. बेल ऑर्डर घेऊन या तुम्हाला सोडतो..” गायतोंडे खेकसले..
“ वकील !! अभिजित!!! हा! तोच मला इथून बाहेर काढू शकतो.. त्याला कळवायला हवं.. त्याला सांगायला हवं की मी काही केलं नाहीये.. तो नक्कीच विश्वास ठेवेल माझ्यावर.. फोन !! फोन करायला हवा त्याला.” अनुला अचानक आठवलं आणि ती म्हणाली, “ मी एक फोन करू शकते का?”
“ हॅलो?? कुलकर्णी सर?? मी अनघा बोलतेय…” इतक्या रात्री अनुचा फोन आलेला पाहून अभिला आश्चर्य वाटलं..” काय झालं अनघा?? एवढ्या रात्री फोन केलास ते?? “
“ सर ते मी…म्हणजे मला सांगायचंय की मी..मला,” अनुला शब्द सुचेनात.
“ अनघा मुद्द्याचं काय ते पटकन बोल..” अभिजित कंटाळून म्हणाला..
“ सर मला without वॉरंट अरेस्ट केलंय पोलिसांनी..”
“ without वॉरंट अरेस्ट केलं?? किती दारू प्यायलीस तू??
“ मी दारू नाही प्यायले..”
“ मग कुठे मारामारी??”
“ नाही, मी मारामारी नाही केली.”
“ मग चोरी?”
“ नाही तेपण नाही.”
“अरे??!! मग कशासाठी अरेस्ट केलं त्यांनी तुला??”
“ खून.. खून केल्याच्या आरोपावरून त्यांनी आत टाकलं मला..”
“ काय?? “ अभिजित ओरडला आणि त्याला हसू फुटलं तो जोरजोरात हसू लागला ते ऐकून अनु पण हसू लागली आणि हसत हसत अभिजित रडवेला झाला आणि त्याने फोन कट केला..
अभिजित आणि झेंडे पोलीस स्टेशन ला पोचला तेव्हा पहाटेचे 3.30 वाजून गेलेले.. अनु लॉकअपमधेच होती.. “ अनघा seriously तू ..” अभिजीतला शब्द सुचत नव्हते. “काय बोलू आता मी!! ये इकडे ये!! अचानक गजातून हात घालून अभिजित तिला ओढायचा प्रयत्न करून म्हणाला, “ ये तुला दाखवतो ये!!” अभिजीतच्या अवताराला बघून अनु मागेच सरकली आणि भिंतीला टेकून उभी राहिली..हवालदाराने लॉकअपचं कुलूप काढून दरवाजा उघडला तस अभिजित अनुला बघून दात ओठ खात तिच्या अंगावर धावून गेला.. “ तुला माहितेय नक्की काय झालंय ते?? कल्पना आहे का किती मोठ्या अडचणीत सापडलीयस तू??” अनु खाली मान घालून उभी होती..
“ अनघा इकडे बघ..” अभिजित म्हणाला. ती तशीच उभी होती.
“ अनु इकडे बघ!!” अभिजित दरडावून म्हणाला तरीही अनु खाली मान घालूनच उभी होती..
“ आता बघतेस का..” अभिजित पुढे होत म्हणाला एवढ्यात तिने वर बघितलं..
“ मी म्हणायचे त्याला की I will kill you.. पण अस व्हावं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती सर.. काय झालं, कसं झालं मला काहीच कळलं नाही. मी दूध घेऊन घरी आले त्याआधीच त्याचा खून झालेला.. मी खूप घाबरलेले सर..मी काही केलं नाहीये.. आणि आता तुम्हीच आहात जे मला यातून सोडवू शकतात.. मी फक्त तुमच्यावर depend राहू शकते..” अनु एका दमात सगळं बोलून गेली. ती खूपच रडवेली झालेली.. रडून रडून डोळे सुजले होते…
“ का माझ्यावर depend राहणारेस तू?? नको राहुस!!” अभिजित म्हणाला.
“ मी तुमच्यावर depend राहणार.. कारण तुम्हीच एक पॉवरफुल पर्सन माझ्या ओळखीचे आहेत ज्याला कायद्याविषयी संपूर्ण ज्ञान आहे..” अभिजीतने तिच्याकडे एकवार पाहिलं..
“ तुझे कपडे काढून सबमिट कर तो evidence आहे . तुला वेगळे कपडे मिळतील.. पहिल्यांदा अंघोळ कर.” अभिजित तिच्या हातावर लागलेलं रक्त पाहून म्हणाला.

शुभमच्या घरावर शोककळा पसरली होती.. शुभमचे वडील ‘अप्पासाहेब’,शहरातले खूप मोठे politician होते.. पोस्टमार्टेम झाल्यावर शुभमच्या मृतदेहाला त्यांच्याकडे अंतिम संस्कारासाठी सोपवण्यात आलं.. मुलगा गेल्याचा खूप मोठा धक्का त्यांना बसला होता.. पण ते आता सुडाने पेटले होते.. “ पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून एकाला अरेस्ट केलंय ना?? कोण आहे त्याची खबर काढा..” अप्पासाहेबांनी त्यांच्या सेक्रेटरीला सांगितलं.
“ माझ्या मुलाचा ज्याने जीव घेतलाय त्याला मी जिवंत सोडणार नाही!! पण इतक्या सहजासहजी मारणार नाही. ठेचून!! ठेचून!! अर्धमेलं करून मग त्याची तडफड पाहणार…त्याच्या डोळ्यात मृत्यूची भीक दिसली पाहिजे.. अस मारणार की यमालाही कापरं भरावं!!!” त्यांच्या डोळ्यातून अंगार बरसत होत…..
सकाळपर्यंत ही न्युज सगळीकडे पसरलेली.. Tv, newspaper, internet सगळीकडे ह्याच न्युज ची चर्चा होती..पत्रकारांची अप्पासाहेबांच्या घराबाहेर आणि पोलीस स्टेशनसमोर ही गर्दी झालेली.. प्रत्येकजण प्रश्न विचारून मिळेल तिथून माहिती मिळवून न्युज चॅनल वर टेलीकास्ट करत होते..
“ अप्पासाहेबांच्या मुलाची मुंबईत निर्घृणपणे हत्या, संशयित आरोपिला अटक”.
“ शुभमच्या अचानक जाण्याने अप्पासाहेब आणि त्यांचे कुटुंबीय दुःखात बुडाले”.
“ मिस अनघा कुलकर्णी यांना शुभमचा खून केल्याच्या आरोपावरून अटक. पोलिसांचा तपास चालू आहे.”
अशा हेडलाईन्स ऐकून अभिजितने tv बंद केला.. त्याच डोकं दुखू लागलं होतं.. काय करावं यावरच तो विचार करत होता एवढ्यात त्याच्या ऑफिसचा फोन वाजला. झेंडेंनी फोन उचलला..

अभिजित अप्पासाहेबांच्या बंगल्यावर होता.. त्यांनी मुंबईतल्या मोठमोठ्या वकिलांना बोलावून घेतलं होतं.. बरीच चर्चा झाली आणि बऱ्याच जणांनी त्यांना अभिजितचं नाव suggest केलं.. “ आरोपी advocate कुलकर्णींना पाहून चळाचळा कापतात एवढा यांचा दबदबा आहे..कारण कुलकर्णींनी जी केस घेतली त्यात आरोपीला शिक्षा झालीच म्हणून समजा..
असं क्वचितच झालं आहे की आरोपी सुटून गेला.. जर तो सुटला तर तो खरंच निर्दोष असतो.. आणि म्हणूनच कुलकर्णी त्याला जाऊ देतात.. नाहीतर त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी मिळेल हेच ते बघतात. मला तर वाटतं कुलकर्णीच आपले lawyer होण्यायोग्य आहेत..तेच ही केस व्यवस्थित हँडल करतील आणि आरोपीला शिक्षा देतील आणि आपल्या शुभमसाहेबांना न्याय मिळवून देतील..” अप्पासाहेबांच्या सेक्रेटरीनी पूर्ण माहिती काढली होती आणि त्यावरूनच त्यांनी अप्पासाहेबांना अभिजितचं नाव सुचवलं..
“ सगळीकडे तपास करा.. सगळे कायदे तपासून पहा..तिच्यावर जे जे आरोप करता येतील ते करा.. तिच्याविरुद्ध सगळे पुरावे गोळा करा.. काहिही झालं तरी ती पोरगी सुटली नाही पाहिजे” अप्पासाहेब अभिला सांगत होते..
“ This is the worst situation.” अभि मनात म्हणाला. असं काही होईल हे त्याने imagine च नव्हतं केलं..
“ तुम्ही जर ही केस जिंकली आणि त्या मुलीला शिक्षा झाली तर तुम्हाला कुठल्या कुठे नेवून ठेवतील अप्पासाहेब!!! मग आयुष्याची चांदीच होईल तुमच्या!! त्यामुळे हि केस जिंकायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा नाहीतर तुम्हाला वकिलीसुद्धा करू देणार नाहीत अप्पासाहेब पूर्ण आयुष्यभर.. ते आयुष्यातून उठवतील तुम्हाला.!!!.” अप्पासाहेबांचा सेक्रेटरी गेटपर्यंत अभिजीतला सोडत म्हणाला.. अभिजितने त्यांच्याकडे आणि बंगल्याकडे एकवार पाहिलं आणि तो गाडी सुरू करून निघाला..तो गाडीत सेक्रेटरीने दिलेल्या धमकीवजा सल्ल्याचाच विचार करत होता..

अभिजित पोलीस स्टेशनला अनुला भेटायला गेला होता..त्याने अप्पासाहेबांचं कायदेशीररीत्या वकीलपत्र घेतलं होतं.. आणि आता तो अनुविरुद्ध केस लढणार होता. या खुनाशी संबंधित सगळ्यांची स्टेटमेंट्स घेऊन झालेली आणि पोस्टमार्टेम रेपोर्टही आलेले.. तो लॉकअपमधे पोचला तेव्हा तिथे झेंडे हजर होते. अभिजित अनुसमोर खुर्ची टाकून बसत म्हणाला,
“ सुरवात करायची??”
“ मी opposite साईड चं वकीलपत्र घेतलंय आणि आता मी या खुनाचा तपास करतोय..”
“ मी तुला काही प्रश्न विचारेन आणि काही मला कळलेल्या फॅक्टस विचारेन जर तुला ते मान्य नसेल तर तस तू सांगू शकतेस.”
“ सगळे पुरावे तुझ्या विरुद्ध आहेत हे माहित असेलच तुला..” अभिजित पेपर्स चेक करत म्हणाला.
“ हे त्या जनरल स्टोअरच्या ओनरचं स्टेटमेंट आहे ज्याकडे तू दूध घ्यायला गेलेलीस.” अभिजित कागद पुढे करत म्हणाला.
“ त्याला एवढं आठवतंय की गिर्हाईक आलेलं पण त्याला हे आठवत नाहीये की ती तूच होतीस.”
“ त्या रात्री लाईट गेल्यामुळे सगळीकडे काळोख होता आणि त्या दुकानातील cctv कॅमेराही बंद होता. त्यामुळे तू त्या रात्री घरातून बाहेर पडल्याचा एकही पुरावा नाहीये.” अनु शांतपणे ऐकत होती..
“ हे बघ मी समजू शकतो तुझी situation.. त्याने तुला फसवलं, तुझा विश्वासघात केला आणि त्यात त्याने चारचौघात तुझा अपमानही केला!! अभिजित तिला समजावत म्हणाला.
“त्यामुळे त्या रात्री तुला काय वाटलं असेल हे मी समजूच शकतो. म्हणूनच मी म्हणतोय की तू हे aaccept..” “मी नाही accept करणार!!”अनु त्याचं वाक्य मधेच तोडत म्हणाली.
“ मला चांगलीच ठाऊक आहे तुमची ही method.. आधी समोरच्याला सहानुभूती दाखवायची, की मी तुला समजू शकतो आणि मग समोरच्याला जाळ्यात ओढून त्याच्याकडून आपल्याला हवं ते वदवून घ्यायचं!! मी नाही फसणार तुमच्या बोलण्यात..” अनु शांतपणे म्हणाली. अभिजीतने एक मोठा सुस्कारा सोडला.
“ फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये प्रूफ मिळालाय की घटनास्थळी तिथे तपासणी साठी आलेले पोलीस यांच्या शिवाय बाकी कुणाचेही DNA तिथे मिळाले नाहीत!!तू आणि शुभम सोडून.. तरीही तुला accept नाही करायचं??” अभिजित खुर्चीवर फाईल आपटत म्हणाला..
“ नाही!!मला मान्य नाही!!”अनु ठामपणे म्हणाली.
“ तू कितीही नाही म्हण तुझ्यावर आरोप होणारच.. कारण तू निर्दोष आहेस हे पटवून देणारा एकही पुरावा किंवा साक्षीदार नाहीये..” अभिजित थकून खुर्चीत बसत म्हणाला..
“ पण मी काहीच केलेलं नाहीये!!” अनु म्हणाली.
“त्याने काही फरक पडत नाही..” अभिजित म्हणाला.
“ सॉरी??” अनु काही न कळून म्हणाली.
“ तू खून केलायस की नाही याने मला काही फरक पडत नाही..तुला शिक्षा होईलच..कारण मला माझं आयुष्य बरबाद होऊ द्यायचं नाहीये..” अभिजित तिच्याकडे पाहत मनात म्हणाला.
“ सर! तुमचा माझ्यावर विश्वास आहे. आहे ना?? मला खात्री आहे की तुमचा माझ्यावर विश्वास आहे आणि तुम्ही माझ्या बाजूने आहात.. and you are my only hope!!” अनु विश्वासाने म्हणाली..

अभिजीतला आठवलं तो लहान असताना त्याला एक ज्योतिषाने सांगितलं होतं की तुझ्या आयुष्यात एक व्यक्ती येईल जिच्यामुळे तुझं आयुष्य बरबाद होण्याची शक्यता आहे.. “मग मला असं कळेल ती व्यक्ती कोण ते?” अभिजीतने भोळेपणाने विचारलं. तुला स्वतःलाच समजे ती व्यक्ती समोर आल्यावर.. अभिला या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता पण आत्ता त्याला त्यावर विश्वास ठेवावासा वाटत होता..आत्ता त्याला ज्योतिषाचं भविष्य पटलं..
“ इट्स यू!! अनघा..” अभिजित तिच्याकडे पाहत म्हणाला..
क्रमशः

Group content visibility: 
Use group defaults

अरे हो पोलीस स्टेशन, खून वगैरेंनीच सुरवात झालेली ना! विसरलेच होते.
चांगला झालाय हा भाग. पु भा प्र.

फिल्मी, स्लो कथानक, २०-२५ वयोगटाला आवडणारी कथा इ.इ. सगळं खोटं आहे.

सत्य एकच आहे कथा प्रचंड कॅची आहे. Happy

तुझ्या आयुष्यात एक व्यक्ती येईल जिच्यामुळे तुझं आयुष्य बरबाद होण्याची शक्यता आहे.. “मग मला असं कळेल ती व्यक्ती कोण ते?” अभिजीतने भोळेपणाने विचारलं. तुला स्वतःलाच समजे ती व्यक्ती समोर आल्यावर.. अभिला या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता पण आत्ता त्याला त्यावर विश्वास ठेवावासा वाटत होता..आत्ता त्याला ज्योतिषाचं भविष्य पटलं..>>>>>haha. ...
as daglach ast comely

नवीन प्रतिसाद लिहा