लव्ह इन ट्रबल भाग- 2

Submitted by स्वरांगी on 13 May, 2019 - 04:04

लव्ह इन ट्रबल भाग-२
अनघा आणि शुभमचं भांडण अक्ख कोहिनूर हॉटेल पाहत होत. त्यातच अभिजीतचही तिकडे लक्ष गेलं.
“ही इथे काय करतेय?” अभिजीतला आश्चर्य वाटलं. तो त्यांच्याकडेच पाहत होता. हळूहळू सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि आता पुढे काय होतंय याची वाट पाहू लागला. अनु पडली तेव्हा त्याला काय वाटलं कोण जाणे पण तो अचानक उठला आणि लांब लांब पावलं टाकत तिच्या दिशेने जाऊ लागला. आत्ता तिला इथून बाहेर काढणं त्याला जास्त गरजेचं वाटलं. अनु उठून खाली मान घालून उभी राहिली तोपर्यंत तो तिच्याइथे पोचलासुद्धा…
अभिजित अनुसमोर उभा राहिलेला शुभम ने पाहिलं आणि तो म्हणाला, “ अनु बास आता..तुला नाही जमणार हे.”
अनुने एकदा डोळे घट्ट मिटून घेतले आणि सुस्कारा सोडत अभिजीतला विचारलं “ एक रात्रीसाठी माझा बॉयफ्रेंड होशील?”
“Sure!! आवडेल मला…” अभिजित तिच्याकडे पाहत म्हणाला.
“ Seriously??!!” शुभम चकित झाला. “ अनु बास झाली तुझी नाटकं!!” तो तिथूनच ओरडला.
अनघाने त्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि ती अभिजीतकडे वळली. लेन्स नसल्यामुळे तिला अभिजीतचा चेहरा अंधुक दिसत होता. त्याच्याकडे एकवार बघून ती म्हणाली, “Thank god!! की तू हँडसम आहेस नाहीतर शुभम समोर आणखी इज्जतीचा फालुदा..”
“ खरंच??” अभिजीतने हसून तिला विचारलं.
हे ऐकून अनुने त्याच्याकडे डोळे किलकिले करून निरखून पाहिलं आणि तिला त्याचा चेहरा स्पष्ट दिसला..
“तू???? मेट्रोतला मवाली????” अनु surprised होऊन दोन पावलं मागे सरकली. “ अशी काय बघतेस? चल!!” अनुचा हात पकडून तो म्हणाला आणि तिला ओढतंच आपल्यासोबत घेऊन जाऊ लागला.
“ एक मिनिट!! अरे थांब…थांब ना…..” अनु हात सोडवून घ्यायचा प्रयत्न करू लागली. ती धडपडतच त्याच्यासोबत चालत होती.शुभम अभिजीतला तिला आपल्यासोबत नेताना पाहून हादरला.
“ए helllo !!! थांब...कुठे घेऊन चाललास तिला?? ए थांब म्हटलं ना !!! अनु!!!” शुभम जागेवरूनच हात लांब करून म्हणाला. अभिजित मात्र थांबेना ते पाहून शुभम जोरात ओरडला.. “ अनु आत्ताच्या आत्ता थांब तिथेच नाहीतर खरंच ब्रेकअप होईल आपलं.”
आता अभिजित थांबला आणी अनुकडे पाहू लागला.
“नाही अनु आता अज्जिबात मागे हटू नकोस..शुभम तुझ्या मुळीच लायकीचा नाही.त्याला त्याची लायकी दाखवायलाच हवी..” अनुने मनातुन निर्धार केला आणि अभिजीतकडे पाहिलं. तिने तिचा हात त्याच्या हातातून सोडवून घेतला आणि त्याचा हात पकडून जबरदस्ती स्वतःच्या खांद्यावर टाकला.
“ Let’s go!!” अनु अभिजीतकडे पाहून म्हणाली. अभिजित पूर्ण गोंधळला. आता अनुच अभिजीतला फरपटत बाहेर नेऊ लागली. हे सगळं शुभमला अनपेक्षित होतं. तो तसाच त्या दोघांना जाताना पाहत राहिला… आणि मिटिंग साठी आलेले advocate बर्वे जाणाऱ्या अभिजीतकडे आणि शुभमकडे आळीपाळीने चकीत होऊन पाहत राहिले..

इकडे कोहिनूर मधून कसेबसे धडपडत आलेले अभिजित आणि अनघा बाहेर येताच एकमेकांचे हात झटकून बाजूला झाले..
“ विचार सुद्धा करू नकोस तू की मी आत जे काही बोलले ते seriously बोलले कळलं??कराटे चॅम्पियन आहे मी!!” अनु धाप टाकत म्हणाली.
“ आणि तु विचार सुद्धा करू नकोस मी मवाली असल्याचा..” अभिजित चिडून म्हणाला.
“ तू नाहीयेस??” अनु आश्चर्याने म्हणाली.
“ किती वेळा सांगू मी नाही केलं ते म्हणून??!!” अभिजित वसकन अंगावर जात म्हणाला.
“ मग तू आत्ता मला ओढत बाहेर का घेऊन आलास?”अनु.
“ तुला काय वाटलं मला हौस आहे तुझा बॉयफ्रेंड व्हायची??!” अभिजित वैतागून म्हणाला.
“नाहीये का?” अनुने बावळटासारखं विचारलं.
“एवढंच असतं तर मी तुला हॉटेलच्या रूम मधेच नेलं असतं!! बाहेर कशाला आणलं असतं?? डोकं आहे ना तुला? वापरत नाहीस का कधी?? कसलाही विचार न करता मला मवाली ठरवलंस तू !!! आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यात कुणी मला एवढं humiliate केलं नाही.. आता परत जर मला काही बोललीस तर बघ.. यापुढे कुणालाही डायरेक्ट वाईट ठरवू नकोस कळलं??” अभिजित तिच्यावर ओरडून मगाचपासूनचा राग काढत म्हणाला आणि निघाला.. अनु पाहतच राहिली आणि डोकं खाजवून म्हणाली, “ काय चाललंय तुझं अनु!! का अशी वागतेस??”
एवढ्यात अभिजित मध्यातूनच परत आला आणि तिला म्हणाला, “ अजून एक गोष्ट. इतक्या सहज जशी माझ्यासोबत आलीस तशी कुणासोबत जाऊ नकोस!! मी आहे म्हणून सोड पण असे बरेच माथेफिरू आहेत ज्यांना तुझ्यासोबत night spend करायला आवडेल…” आणि तो निघाला.
“ मी हे बोलताना cool वाटलो असेन ना!!!” अभिजीतने निघताना मनातल्या मनात भाव खाऊन घेतला.. त्याने टॅक्सी ला हात केला.
इकडे शुभम धक्क्यातून बाहेर आला आणि अनघाला थांबवायला बाहेर आला. “ अनु!!!” तो हाक मारत येत होता ते बघून अनु तिथून पळू लागली. समोरच तिला अभिजित टॅक्सीत बसताना दिसला. अनु धावतच तिथे पोचली आणि जबरदस्तीने घाईघाईतच टॅक्सी त बसलं. अभिजित पाहतच राहिला. तो काही बोलणार एवढ्यात अनुने शुभम च्या दिशेने बोट दाखवलं. तो त्यांच्याकडेच बघत होता.
अभिजीतला काहीही बोलायची संधी न देता अनुने ड्रायव्हर ला निघायला सांगितलं..आणि टॅक्सी निघाली सुध्दा!!!अनुने हसून अभिजीतकडे पाहिलं. तो अविश्वासाने बघत होता आणि त्यांना जाताना पाहून शुभमचा चेहरा बघण्यासारखा झाला होता….
गाडीत थोडा वेळ कुणी काहीच बोललं नाही. थोडा वेळाने अनुनेच तोंड उघडलं, “ माझ्यासोबत डिनर करशील??” अभि ने तिच्याकडे, “आता हे काय नवीन??” या अविर्भावात बघितलं, तोच अनु म्हणाली, “ गैरसमज नको करून घेऊ! मला फक्त तुला थँक्यु म्हणायचंय..”
“ याची काही गरज नाही..” अभि शांतपणे म्हणाला.
“ओके” म्हणून अनु सुद्धा गप्प बसली. “ ड्रायव्हर मला समोर कॉर्नर ला उतरायचंय तिथेच टॅक्सी थांबवा..” काही वेळाने अनु म्हणाली.. ड्रायव्हरने गाडी बाजूला घेऊन थांबवली.
अनुने एकदा अभिकडे पाहिलं आणि टॅक्सीतुन उतरली..उतरल्यावर पुन्हा एकदा thank you म्हणून ती समोरच्या ‘ अपना ढाबा फॅमिली रेस्टॉरंट कडे निघाली… तिला तिकडे जाताना पाहून अभिजीतने ड्रायव्हरला निघायला सांगितलं.
अनघा अपना ढाबा समोर उभी होती पण तिला काही खायची इच्छाच नव्हती. तिने जीन्सच्या खिशातून आपला मोबाईल बाहेर काढला आणि कॉल्स , एस एम एस चेक करू लागली. एकही कॉल किंवा मेसेज नव्हता. ती हताश झाली.. “ कुणालाच माझी आठवण येऊ नये एवढ्या वेळात??”. तशीच संथ पावलं टाकत ती आत शिरली..
इकडे अभिजित निघाला आणि थोड्या वेळाने त्याचं शेजारच्या सीट कडे लक्ष गेलं. अनु तीचं वॉलेट टॅक्सीतंच विसरली होती..अभिजीतने ते पाहिलं आणि टॅक्सी परत मागे फिरवायला सांगितली.
अभि अपना ढाबा मध्ये entre झाला आणि तो जागेवरूनच सगळीकडे नजर फिरवून अनुला शोधू लागला, पण ती कुठेच दिसली नाही.. त्याने काउंटर वर चौकशी केली तेव्हा त्याला कळलं की ती वरच्या फ्लोअर वर गेलीय..तो लागलीच ताडताड जिना चढत वर गेला आणि बघितलं तो थक्कच झाला.. अनु फुल्ल टल्ली झाली होती.. खरं म्हणजे तिने सॉफ्ट ड्रिंक ऑर्डर केलेलं पण बार मधल्या एक ग्रुप ने prank करायचा म्हणून तिच्या ड्रिंक मध्ये वोडका मिक्स केलं आणि ती दोन तीन ग्लास प्यायली!!! अभि लगेचच तिच्याकडे गेला..ती मोठमोठ्याने कोकलंत ‘ दोस्त दोस्त ना रहाsss प्यार प्यार ना रहाsss’ गाणं म्हणत होती.. आजूबाजूचे सगळे तिच्याकडे पाहून हसत होते..
“ मजा चाललीय तुझी!! अग काय चाललंय तुझं?? इथे काय करतेयस?? हे बघ तुझं वॉलेट राहिलेलं टॅक्सीत..हे घे!!”अभिजित वॉलेट पुढे करत म्हणाला..अनुने त्याच्याकडे पाहिलं. तिने ओळखलं त्याला..
“ अररररे!!!आलास तू???”अनुने पूर्ण बत्तीशी काढून विचारलं.
“ बरररं वाटलं मला ओळखीचा चेहरा बघून.. बघ ना कुणालाच मी नकोय…ना कुणाचा मेसेज, ना कॉल..एकटी पडलेय मी!!!!” अस म्हणून अनुने भोकाड पसरलं… “ Great!!! आता हेच बाकी राहिलं होतं!!!” अभिजित सुस्कारा सोडत मनात म्हणाला.. आणि तो तिच्यासमोर बसला..

अनु सोफ्याच्या खाली जमिनीवर अस्ताव्यस्त पडली होती. झोपेतच आनंदाने ती आळस देत लोळत पडली होती.. “
“ एका रात्रीसाठी माझा बॉयफ्रेंड होशील??” आदल्या रात्रीचं हे तीचं वाक्य आठवून अनु खाडकन जागी झाली.
“Sure!! आवडेल मला..” अनु शॉक लागल्यासारखी उठून बसली. हळूहळू तिला एक एक गोष्ट आठवू लागली. अभिजित तिला बार मधून कसबसं ओढत बाहेर घेऊन गेला. अनु अजूनही नशेतच होती आणि काहीतरी वेड्यासारखं बरळत होती. अभिने तिला एक जवळच्या बेंचवर बसवलं, तर ती तिथेच आडवी झाली.. अभिजीतने कपाळावर जोरात हात मारला..आता हीच काय करावं तेच त्याला सुचत नव्हतं. अभिजीतने तिला बसवलं आणि विचारलं “तुझं घर कुठे आहे?? सांग मला!!” उत्तर द्यायचं सोडून ती नुसतीच फिदीफिदी हसत होती.. तीच डोकं ठिकाणावर नव्हतं.
अभिजीतने तिचा चेहरा दोन्ही हातात धरला आणि तिला शुध्दीवर आणण्यासाठी तो जोरात ओरडला “ Wake up अनु!!! Wake up!!!” शुभमने तिला अनु हाक मारल्याचं लक्षात होतं त्याच्या.
“ मी जागीच आहे!!! मी कुठे झोपलेय Wake up म्हणायला??!” अनु खिदळत म्हणाली.
आता मात्र अभि वैतागला. “ तुझं घर कुठे आहे सांग मला पटकन!!!” तो तिला गदागदा हलवत म्हणाला.
“ ते माझं घर नाहीये, भाड्याचं आहे. पण माझ्याकडे पैसे आले की मी घेणारे घर!!” अनु दात विचकत म्हणाली..
अभिजित जाम वैतागला होता. कुठून फसलो यात अस झालं त्याला. तिला एकटीला या अवस्थेत सोडणं त्याला बरोबर वाटत नव्हतं..त्यामुळे नाईलाजाने तो अनुला सरळ आपल्या घरी घेऊन आला… अभिजीतचा मोठा well furnished बंगला होता. त्याने तिला आधार देत घरी आणलं आणि सोफ्यावर झोपवलं.
“ एवढं सगळं झालं काल?!!!!” अनु डोळे फाडून फाडून विचार करत होती.. “ एक मिनिट!!!! रात्री काही झालं तर नसेल ना???” या विचारानेच ती जोरात किंचाळली आणि हातपाय झाडत पुन्हा जमीनीवर पडली. आणि पुन्हा ताडकन उठली.
झिंज्या उपटून उपटून ती इकडे तिकडे पाहू लागली.. आता फक्त इथून बाहेर पडायचं एवढंच तिच्या डोक्यात आलं.
अभिजितची चाहूल लागतेय का ते बघत बघत ती हॉल, किचन, गेस्टरूम फिरून आली पण तो नव्हता तिथे. हॉल मधूनच वर जायला जिना होता. ती दबकत दबकत पायऱ्या चढली आणि कुठून त्याचा आवाज येतोय का ते पाहू लागली. वर बेडरूम च्या बाहेर कॉमन वॉशरूम मधून तिला शॉवरचा आवाज ऐकू आला. तिने दाराला कान लावला आणि तो आत असल्याचं कळून ती चार पावलं लांब पळाली..
“आता तो बाहेर आल्यावर मी त्याच्याशी काय बोलू??!!”
“कसं बोलू??!! या situation मध्ये मी त्याला sorry म्हणायला हवं की thank you ???!” अनु पूर्ण गडबडली..तिचा चेहरा तोंडात मारल्यासारखा झालेला..

अभिजित वॉशरूम मधून डोकं पुसतंच बाहेर पडला. वॉर्डरोब मधून तो कपडे काढायला जाणार तोच त्याला हँडल वर लावलेली स्टिकी नोट दिसली.
“ Thank you!!!!” लिहून अनु निघून गेली होती…..
क्रमशः

Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद!! फक्त कथेत काही ठिकाणी स्थळ, रस्ते , मेट्रो किंवा रेल्वे यांचा उल्लेख काल्पनिक असेल कारण मला मुंबईची काहीच माहिती नाही. मॅप बघूनच थोडं फार कथेची गरज म्हणून ठिकाण इकडे तिकडे होऊ शकतं. प्रत्यक्षात तसे नसल्यास सांभाळून घ्या..